समजा आपण सारे परीक्षेला बसलो आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'होय' अथवा 'नाही' असं टिकमार्क करायचं आहे. मीही तुमच्यासोबत परीक्षा देतो आहे. मी मुळीच अभ्यास केला नाही. 100 प्रश्नांपैकी मला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही. म्हणजे माझी लायकी भोपळा (शून्य) मिळण्याची आहे. पण मी जर थोडी अक्कल वापरली आणि सारीच्या सारी उत्तरं 'होय' अशी टिकमार्क केली, तर? कदाचित शंभरपैकी पन्नास प्रश्नांची उत्तरं अचूक निघतील. मला 50 टक्के मार्क्स मिळतील. कदाचित 70 प्रश्न बरोबर ठरून 70 टक्के मार्क्स मिळतील. पण मला शून्य मार्क्स मिळतील का? शक्य नाही. कारण त्यासाठी मला सारे प्रश्न चुकवावे लागतील. खरी उत्तरं माहिती नसल्यामुळं ते मी चुकवू शकणार नाही. कमीतकमी 30 प्रश्न बरोबर निघतील आणि मला 30 टक्के मार्क्स मिळतील. म्हणजे माझी लायकी भोपळा मिळण्याची असतानासुद्धा मला 30 ते 70 टक्के यामधील कितीही मार्क्स मिळू शकतात. हा निसर्गातील चान्स फॅक्टर, शक्याशक्यतेचा नियम कळला आणि विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं व्हायला लागली. ज्यावेळी निसर्गात, कोणत्याही विषयात ही 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी' ओलांडणारी भाकितं वारंवार खरी ठरतात. म्हणजे 100 घटनांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक घटनांची भाकितं अचूक ठरतात. त्यात काही तथ्य आहे असं मानलं जातं. मग त्या विषयाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. त्यात सातत्यानं हा शक्याशक्यतेचा नियम ओलांडणारे रिझल्टस् मिळत गेले तर त्या विषयाला विज्ञानाचा दर्जा मिळतो. त्या विषयात अधिक संशोधन करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. मानवजातीला, विज्ञान जगताला, शक्याशक्यतेचा नियम गवसला आणि मग विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं झाली. शारीरिक विज्ञानात सजेशनचं सामर्थ्य (मनावर होणारा सूचनांचा परिणाम) कळलं आणि मेडिकल सायन्समधील मेडिसीनची प्रगती झपाटय़ानं झाली. सार्या मानवजातीचं आयुर्मान आश्चर्यकारकरीत्या वाढलं. औषधांच्या चाचण्या घेताना 'प्लासिबो' इफेक्ट तपासला जातो. एकाच प्रकारचं दिसणारं औषध दोन वेगवेगळ्या ग्रुपला दिलं जातं. त्या औषधाचे परिणाम होणार आहेत, हे दोन्ही ग्रुपला सांगितलं जातं. एका ग्रुपला खरं औषध दिलं जातं. दुसर्या ग्रुपला मात्र तशाच वेष्टणात औषधी गुणधर्म नसलेली नुसतीच पावडर (वा गोळी) दिली जाते. आता दुसर्या ग्रुपला औषध दिलेलं नसतानाही काही लोकांबाबत परिणाम मिळतात. हे औषधासोबत सांगितलेल्या सजेशनचे (असे असे परिणाम होणार आहेत) परिणाम असतात. पहिल्या ग्रुपला 'ज्याला खरं औषध दिलं असतं.' जर दुसर्या ग्रुपपेक्षा अधिक प्रमाणावर परिणाम मिळाले तरच त्यात काही औषधी गुणधर्म आहेत असं मानलं जातं. या चाचण्यांचे वारंवार असेच परिणाम मिळाले तर त्या औषधाला मान्यता मिळते. हे औषध सजेशनचं सामर्थ्य ओलांडून रिझल्टस् देऊ शकत असल्यामुळं औषधांच्या क्षेत्रात प्रगती साधता आली. त्याचप्रमाणं शक्याशक्यतेचा नियम ओलांडून तपासणी करण्याच्या पद्धती विकसित झाल्यानं विज्ञानाची प्रगती झाली. माणसाच्या दहा लाख वर्षाच्या आयुष्यात मानवजातीनं गेल्या 150 वर्षात उरलेल्या 9 लाख 99 हजार 850 वर्षापेक्षा अधिक प्रगती केली. त्यामागचं हे कारण आहे. आपल्याला सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती, सायंटिफिक मेथड सापडली आहे. या वैज्ञानिक पद्धतीचा काटेकोर वापर करून आज प्रत्येक क्षेत्रातलं सत्य तपासलं जातं. या फुटपट्टीवर जे खरं ठरत नाही., वैज्ञानिक पद्धतीच्या कसोटीवर जे खरं उतरत नाही त्याला कचरा, पालापाचोळा समजून फेकून दिलं जातं. सोळावं ते विसावं या चार शतकांमध्ये फलज्योतिषाला वारंवार वैज्ञानिक कसोटय़ांवर तपासण्यात आलं. ते कधीच 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी'ची शक्याशक्यतेची कसोटी ओलांडू शकलं नाही. म्हणून वैज्ञानिक जगतातून त्याला हद्दपार करण्यात आलं आहे. आता फलज्योतिष हे केवळ आपल्या अंधश्रद्धाळू मनांमुळं जिवंत आहे आणि काही अंधश्रद्धा जोपासण्याचा विडा उचललेल्या कालिदास संस्कृत विद्यापीठांसारख्या विद्यापीठात जिवंत आहे. पण या अभ्यासक्रमांना वैज्ञानिक मान्यता नाही. पंचांगामध्ये दोन भाग असतात. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रहण हा ग्रहगोल, गती, स्थान यासंबंधित अभ्यास खरा असतो. त्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. तो आजच्या काळात 100 टक्के अचूक सांगता येतो. पंचांगामधला दुसरा भाग शुभ, अशुभ मुहूर्त, राहू, केतू, काळ, भविष्य, राशिभविष्य हे सारं निर्थक असतं. त्याला कोणताही आधार नसतो. सारी भारतीय माणसं शुभमुहूर्तावर लग्न करतात. शुभकार्याला सुरुवात करतात तरी अनेकांची लग्न फसतात. अनेकांचे व्यवसाय, कार्य बुडतात. तरी आपला विश्वास मात्र कायम असतो. हिंदुत्ववादी म्हणवणार्या सावरकरांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, ''आमचे पेशवे प्रत्येक काम मुहूर्त पाहून करीत असत. संकट आलं तर गणपती पाण्यामध्ये बुडवून ठेवत असत.पण कधीही मुहूर्त न पाहणार्या इंग्रजांनी कधीही सूर्य मावळत नाही एवढय़ा मोठय़ा पृथ्वीच्या भूभागावर आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्त पाहणार्या आमच्या पेशव्यांची पेशवाई मात्र गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' किंवा स्वामी विवेकानंद म्हणत असतात, ''जोवर या देशातला तरुण नशिबावर विश्वास ठेवतो, नशिबात असेल तसंच घडतं यावर विश्वास ठेवतो तोवर या भारत देशाला भवितव्य नाही.'' तुमचं माझं नशीब आधी ठरलं असेल तरच ज्योतिष्याला कुंडलीच्या आधारे ते सांगता येईल. पण ते आधीच ठरलं असतं? जर ते आधीचं ठरलं असेल तर तुम्हाला मला करण्यासारखं काही उरतं काय? खरंच कुणाचा नशिबावर 100 टक्के विश्वास असतो? मी माझ्या दर भाषणात जाहीररीत्या विचारतो, ''नशिबावर कुणाचा 100 टक्के विश्वास आहे का? जो 'हो' म्हणेल, त्याच्याजवळ मी येतो. एक जोरदार थापड मुस्काटात मारतो. म्हणतो बाबारे, तुझ्या नशिबात होतं तू झापड खाल्लीस, माझ्या नशिबात होतं मी मारली, चालेल का?'' आपल्यापैकी एकालाही हे मान्य होणार नाही. जोपर्यंत मानव आपल्या मेंदूनं झापड मारण्याचं ठरवत नाही तोवर ते झापड मारणार नाहीत. म्हणून झापड मारणार्याचा तो निर्णय असल्यामुळं त्या कृत्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे, परिणामस्वरूप शिक्षा भोगली पाहिजे. ज्योतिष्याचा आधारच 'नशीब ठरलं आहे' हा आहे. आणि आपलं नशीब वगैरे काहीही ठरलेलं नसतं. ही निव्वळ नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट आहे. आपण भारतीय माणसं हजारो वर्षापासून या नशिबाच्या पळवाटीनं पळतो आहोत.म्हणूनच हजारो वर्षापासून आपल्या देशात जात व्यवस्था टिकली, अस्पृश्यता टिकली. गाईवर प्रेम करणारी, गाईची पूजा करणारी माणसं हजारो वर्षे इतर माणसांना शूद्र लेखून ढोरापेक्षाही वाईट जीवन जगायला मजबूर करू लागली. आपला समाज कधीच एकसंघ नव्हता. तो जातीजातींमध्ये विखुरला होता. म्हणून 500 वर्षे लुटालुटीची आणि आठशे वर्षे गुलामगिरीची या भारताला भोगावी लागली. अब्राहम लिंकनचं एक प्रसिद्ध वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी उच्चारत असत, ''गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठेल.'' भारतात जाती-अस्पृश्यतेच्या नावावर गुलामगिरीसोबतच दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळ वेठबिगारी लादली गेली, पण त्याविरुद्ध कधीच बंड झालं नाही. कारण कर्मविपाक सिद्धांताचं अद्भुत रसायन.''बाबारे, तू अस्पृश्य का? शुद्ध का? तर गेल्या जन्मात पाप केल्यामुळं. बाबारे, हा ब्राह्मण का? तर गेल्या जन्मात पुण्य केल्यामुळं. त्यामुळं या जन्मात तुझ्या नशिबात जे आलंय ते निमूटपणे भोग. मुकाटय़ानं सहन कर. कदाचित असा वागलास तर पुढच्या जन्मात, या जन्मातील पुण्यसंचयामुळं चांगला जन्म मिळेल.'' भारतीय माणसं फक्त गेल्या जन्माचं पापच फेडत आलीत. डोकचं पार गुलाम करून टाकलं होतं या संकल्पनेनं. म्हणून भारतात कधीच जातिव्यवस्थेविरुद्ध बंड झालं नाही. ज्योतिष्यावरचा विश्वास म्हणजे भविष्यावरचा विश्वास. आपली कुंडली मांडली जाते, ती खरी असते? त्याला काही शास्त्रीय आधार आहे? त्यातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो? हो जाता जाता, गेल्या शनिवारच्या लेखानंतर एकाचा मला चिडून 'एसएमएस' आला. 08275948967 या फोनवरून 'तुम्ही उद्या मरणार आहात.'25 तारखेला दुपारी 2.05 वाजता आलेला हा 'एसएमएस' बहुधा एखाद्या चिडलेल्या ज्योतिषाचा असावा. पोलिसांत तक्रार करण्यापेक्षा मी वाचकांनाच कळविलं. मी अजून जिवंत आहे. काय म्हणाल तुम्ही? ''कावळ्याच्या शापानं..'' (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Saturday, 1 September 2012
नशीब : नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment