Saturday 29 September 2012

ज्योतिष्यांचं भविष्यशास्त्र भंकस आणि हास्यास्पद


आपल्या कुंडलीतील परंपरागत 9 ग्रहांपैकी सोम (चंद्र), रवि (सूर्य) हे ग्रहच नाहीत आणि राहू, केतू हे अस्तित्वातच नाहीत. म्हणजे 9 पैकी 4 ग्रह नाहीत. तरी आजही, 2012 सालातही ज्योतिषी हे ग्रह आपल्या कुंडलीत नाचवीत असतात हे आपण गेल्या लेखात पाहिलं.

आता उरले मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि हे पाच ग्रह. हे ग्रह अस्तित्वात आहेत; पण यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? ग्रह-गोल-तार्‍यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र (ईंीेपेा) ही जगातील पहिली विज्ञान शाखा आहे. या विषयाचं मानवजातीचं ज्ञान अतिशय अचूक आहे. पुढे 5 लाख वर्षानंतर कोणत्या दिवशी केव्हा सूर्योदय-सूर्यास्त होईल, ग्रहण लागेल हे आज अचूक सांगता येते. म्हणूनच मानवजातीनं पाठवलेला माणूस चंद्रावर अचूक उतरला, परत आला. अनेक यानं मंगळावर जाऊन परत आली. एवढं या विषयाचं गणित अचूक आहे.

खगोलशास्त्रज्ञ सांगतात की, मानवीजीवनावर ग्रहांचे परिणाम तीन प्रकारे होऊ शकतात. एक-गुरुत्वाकर्षणाचा, दोन-चुंबकाचा, तिसरा-किरणांचा. या तिन्हींचा मानवीजीवनावर होणारा परिणाम निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. कारण पृथ्वी, सूर्य, चंद्र यांचं गुरुत्वाकर्षण एवढं परिणाम करतं की, बाकी ग्रहांचं गुरुत्वाकर्षण नगण्य परिणाम करतं. ज्याची दखलही घेण्याची गरज नाही, एवढा तो परिणाम नगण्य असतो. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात, ''ग्रहमालेतील सगळ्यात मोठा व ताकदवान ग्रह 'गुरु'. या गुरुच्या गुरुत्वाकर्षणाचा माणसावर किती परिणाम होतो? आपण बसलो असताना खुर्चीवरून उठून उभे राहतो, तेवढा. म्हणजे नगण्य. आपल्याला जाणवतही नाही.'' ग्रहांच्या किरणांचा काहीच परिणाम होत नाही आणि पृथ्वीचं चुंबक इतकं ताकदवान आहे की, त्या तुलनेत हजारो-लाखो किलोमीटर दूर असणारे ग्रह काहीच परिणाम करू शकत नाहीत.

थोडक्यात, उरलेल्या 5 ग्रहांचा तुमच्या-माझ्यावर काहीच परिणाम होत नाही हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालं असतानाही हे ज्योतिषी तुमच्या-माझ्या जीवनात या ग्रहांचा धुडगूस सुरू असतो असं धादांत खोटं सांगतात. तुमच्या- माझ्यावर लहानपणापासून झालेल्या धार्मिक श्रद्धांचा फायदा घेऊन स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी, पोट ओसंडून वाहील एवढं भरण्यासाठी, तुमच्या माझ्या कुंडल्या मांडून आपल्याला लुबाडत असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

म्हणूनच 1975 साली जगातील 186 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं आहे. त्यावर 19 नोबेल प्राईज विजेत्या शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. त्यातील एक भारतीय नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. चंद्रशेखर आहेत. सारे शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रांतील मोठे वैज्ञानिक आहेत. ते म्हणतात, ''आम्ही लोकांना सावध करू इच्छितो. ज्योतिषशास्त्रातील गृहीतकांना कोणताही पाया नाही, आधार नाही. दूर अंतरावरील आकाशस्थ ग्रहगोल ही विशिष्ट प्रकारची कृती करण्याकरिता काही दिवसांना किंवा काही कालावधीला शुभ वा अशुभ बनवितात किंवा एखादी व्यक्ती ज्या राशीत जन्माला येते ती राशी त्या माणसाची योग्यता किंवा अयोग्यता निर्धारित करते, हे मुळीच सत्य नाही. भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं; ग्रह, तार्‍यांवर नव्हे.

आज केल्या जाणार्‍या भविष्यकथनांवर, कुंडल्यांवर त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं प्रसिद्धी देतात. यामुळे आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत. या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तीनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे.''

ग्रह गोलांच्या क्षेत्रातील विद्वान वैज्ञानिक म्हणतात, ज्योतिषी ठगांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ज्या फलज्योतिषाच्या (ईंीेश्रेस) शाखेमधून खगोलशास्त्र निर्माण झाले आहे, त्याच शाखेतील वैज्ञानिक ज्योतिष्यांना 'ठग' म्हणतात. हे आपण समजून घेणार आहोत का?

जन्मवेळ आणि जन्मस्थान हे दोन महत्त्वाचे मुद्दे. या आधारावरच तुमच्या-माझ्या संपूर्ण आयुष्याचं भविष्य सांगणारी कुंडली बनवली जाते. जन्मवेळ अचूक कशी पकडायची?

1985 सालची गोष्ट. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं होतं. ऐनवेळी कळल्यामुळं मी घाईघाईत या संमेलनासाठी पुण्यात पोहोचलो. तोवर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची तीन वर्षे उलटली होती. अनेक मोठमोठय़ा बाबांचा, मांत्रिकांचा त्यांच्या गुहेत शिरून भंडाफोड केला होता. अनेक ज्योतिष्यांनाही गजाआड केलं होतं. तरीपण बहुतांश पांढरपेशे असणारे ज्योतिषी सभ्य असावेत अशी समजूत माझ्या मनात कायम होती. त्यामुळं या संमेलनासमोर उभं राहून आम्ही तीघचं कार्यकत्र्यांची फौज सोबत न घेता पत्रक वाटत होतो. मी, एक जामनेरची प्राध्यापक कुळकर्णी, यवतमाळचा आयुर्वेद कॉलेजचा विद्यार्थी विजय पोटफोड.े हे दोघंही वेगळ्याच कामानिमित्त वेगवेगळे पुण्यात आले होते. बातम्या वाचून मला भेटायला आले. त्यांनाही कामाला जुंपलं.

''20 कुंडल्यांच्या आधारे माणूस जिवंत आहे, की मृत आहे हे 95 टक्के अचूक सांगा आणि 1 लाखाचं पारितोषिक जिंका.'' या पद्धतीच्या आव्हानाच्या प्रती आत जाणार्‍या प्रत्येक ज्योतिष्याच्या हाती आम्ही देत होतो. त्यामुळं प्रचंड खळबळ माजली होती. वातावरण तापत होतं. तरी मी प्रत्येक सेशनला जमेल तसं आत जाऊन बसत होतो.

जन्मवेळेवरच्या परिसंवादाला सुरुवात झाली. सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बी. एन. पुरंदरे त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते. अनेक ज्योतिषी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे खास करून माझ्या नावानं शंख करतच बोलत होते.

''आजकाल हे ु ु ु ु ु लोक ज्योतिषशास्त्राबद्दल आक्षेप घेतात. त्यामुळं आपण जन्मवेळ अचूक पकडली पाहिजे. कधी कधी 1 मिनिटाची जरी चूक झाली तरी जन्मराशी बदलू शकते. त्यामुळं पत्रिका आणि सारं भविष्यच चुकू शकतं. माझं म्हणणं असं आहे की, ''जन्मणार्‍या बाळाचं मुंडकं बाहेर येताच, ती जन्मवेळ पकडावी. ही जन्मवेळ अचूक असेल,'' एका ज्योतिष्यानं आपलं मत मांडलं.

दुसर्‍यानं ते खोडलं, ''सामान्य बाळांसाठी हे ठीक आहे, पण काही बाळं पायाळू जन्मतात. त्यांचं मुंडकं शेवटी बाहेर येतं. मग कसं? म्हणून माझं म्हणणं असं आहे की, अख्खं मूल बाहेर आल्यानंतरच जन्मवेळ पकडावी, पण ती अचूक असावी.''

परिसंवाद सुरू राहिला. या दोन मुद्यांभोवती चर्चा फिरत राहिली. शेवटी अध्यक्ष डॉ. बी. एन. पुरंदरे बोलू लागले, ''या विषयावर बोलण्याचा मला सगळ्यात जास्त अधिकार आहे. कारण आजवर मी हजारो मुलांना जन्माला घातलं आहे. कधी कधी मूल जन्माला आल्यानंतर ते काहीच हालचाल करत नाही. मृत आहे की जिवंत आहे, शंका येते. मग आम्ही त्याला मसाज करतो, वेगवेगळे उपाय करतो. कधी कधी ते अनेक मिनिटांनंतर रडायला लागतं. तेव्हा खात्री पटते. ते जिवंत आहे. रडणं ही जिवंतपणाची खूण आहे. त्यामुळं मूल जन्माला आल्यानंतर जेव्हा रडतं तेव्हाची वेळ ही अचूक जन्मवेळ मानावी.''

माझी मात्र हसून हसून पुरेवाट होत होती. ती डॉक्टर, नर्स, सुईन मुलाला जन्म घालण्यात मश्गूल असताना सेकंदासेकंदानुसार अचूक वेळ पकडूच कशी शकेल? आणि हे तर म्हणतात की, मिनिटाची चूकसुद्धा चुकीची जन्म रास ठरवू शकते.

वध्र्याला एक शहाडेशास्त्री होता. त्याची मुलाखत घ्यायला मी गेलो. तो व्यवसायानं इंजिनिअर. तो सांगू लागला, ''अहो, पत्रकार साहेब (त्या वेळी त्याला मी माझं नाव सांगितलं नव्हतं) आमचे बाकी ज्योतिषी मूर्ख असतात. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसतो. आमच्या 'होराशास्त्रा' नुसार (हा ज्योतिष्याचा मूळ ग्रंथ) जन्मवेळ म्हणजे गर्भाधानाची वेळ पकडायची असते. मी गर्भाधानाची वेळ पकडतो.''

मी आश्चर्यानं स्तंभित झालो. 'गर्भाधान' म्हणजे 'मूल राहण्याची, बीज फलनाची वेळ.' नवरा-बायकोलाही गर्भाधानाची वेळ सांगता येणं शक्य नाही. कारण कोणत्या प्रणयप्रसंगी गर्भाधान झालं, ते कसं कळणार? महिन्यानंतरच गर्भ राहिला, ते कळतं ना?

''काहो, तुम्ही नवरा-बायकोवर पहारे बसवता का? गर्भाधान झालं ते कसं ओळखता?

छे! छे! सोप्पं आहे. पहारे बसविण्याची काय गरज? मूल जन्माला येतं त्या क्षणापासून मी बरोबर 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मिनिटं मागे जातो आणि ती वेळ अचूकपणे गर्भाधानाची वेळ पकडतो.''

मला हसावं की रडावं ते कळे ना? मुलांचा जन्म 8 व्या महिन्यापासून ते 10 व्या महिन्यापर्यंत केव्हाही होऊ शकतो आणि हे महोदय 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मि. घेऊन बसले आहेत.

ज्यांना अजून धड जन्मवेळ म्हणजे नेमकं काय ते ठरविता येत नाही, अशा ज्योतिष्यांच्या भाकितांवर आपण विश्वास ठेवायचा?

दर अठरा वर्षानंतर सिरॉस सायकलप्रमाणे मुहूर्त रिपीट होतो. याचा अर्थ प्रत्येकाच्या जन्मवेळेचा मुहूर्त केव्हा ना केव्हा रिपीट होणारचं.

किती सोप्पं काम. बायको प्रेग्नंट राहिली. गायनॅक डॉक्टरने संभाव्य डेट दिली की, सर्वप्रथम ज्योतिष्याला भेटून त्या डेटच्या आसपासचे महत्त्वाचे मुहूर्त शोधायचे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयींचा, दुपारी 4 वाजता नेहमी मंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांचा, रात्री 9 वाजता सदी का महानायक अमिताभचा. रात्री 12 वाजता सचिनचा.

झालं, डॉक्टराला रात्री 9 वाजताच्या मुहूर्तावर आतापासून बुक करायचं. बरोबर सिझेरियन करून त्या मुहूर्तावर मूल जन्माला घालायचं. झाला घरात सदी का महानायक अमिताभ बच्चनचा जन्म. हमखास नशीब असणारं मूल सचिन ते पंतप्रधान, केंद्रीय मंत्री जन्माला घालता येईल. आहे की नाही आयडिया? काय भंकस कल्पना आहे. हास्यास्पद वाटतं ना हे सारं?

मग जन्मवेळेनुसार आणि स्थानानुसार आपलं सारं आयुष्य ठरतं हे गृहीत पकडून सांगणारं ज्योतिष्यांचं भविष्यशास्त्रही एवढंच भंकस आणि हास्यास्पद आहे ना?

सिझेरियन नाही नॅचरल जन्मवेळ खरी, असा दावा काही ज्योतिषी करतात. आज शहरी जीवनात 30 ते 40 टक्के मुलं सिझेरियन करूनच जन्माला येतात. हे ज्योतिषी त्यांच्या कुंडल्या मांडत नाही? मांडतात ना? पोटापोण्यासाठी काहीही?

खरं म्हणजे फलज्योतिष हा विषय खूप मोठा. तुमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. या विषयावर अतिशय विस्तारानं एक पुस्तक लिहिलं आहे.''ज्योतिषशास्त्र-नशीब, किती खरं किती खोटं?'' मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक वा मानवी विकास प्रकाशनं प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तिका वाचा. सगळ्या शंका फिटून जातील.

स्वामी विवेकानंदांनीही ज्योतिष्याला कडाडून विरोध केला. राजाला भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्याचं मुंडकं पंतप्रधानानं उडविल्याची कथा ते आवर्जून सांगत असत.

95 टक्के अचूक भविष्य सांगा आणि 15 लाख घेऊन जा, हे आपलं आव्हान आजही कायम आहे.

माझ्यावर अजूनही विश्वास बसत नसेल तर अपघातात मेलेल्या एखाद्या तरुण मुलामुलीची पत्रिका ज्योतिष्याकडे घेऊन जा आणि हे स्थळ सांगून आलंय असं सांगा. त्या मेलेल्या व्यक्तीचं भविष्य ज्योतिषी कसं सांगतात ते अनुभवा. करून पाहणार?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक,संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Saturday 22 September 2012

'ज्योतिष' हा प्रकार थोतांडच!


'पुण्य नगरी'चा वाचक खूपच जागरूक आहे. सक्रिय आहे. जवळपास 17 वर्षे वेगवेगळ्या दैनिकांमधून आणि

साप्ताहिकांमधून मी लिहीत आलो. आता बर्‍याच वर्षाच्या अंतरानंतर दै. 'पुण्य नगरी'त लिहितो आहे. पण असा सक्रिय प्रतिसाद पूर्वी अनुभवला नव्हता. अर्थात, पूर्वी आजसारखी आधुनिक साधनं नव्हती. विशेषत: मोबाईल नव्हता. शनिवारी लेख प्रसिद्ध होतो. दिवसभर सारखा फोन खणखणत असतो. अभिनंदनही इतकं भरभरून असतं, की विचारू नका. त्यातून बळ मिळतं पुन्हा ताकदीनं लिखाण करण्याचं. खूप सूचना असतात. हे लिहा, ते लिहा, अमुक विषय हाताळा, तमुक विषयाबद्दल तुमचं मत काय, अशी प्रश्नांची सरबत्तीही असते आणि दुखावले गेले तर नाराजी, शिव्याही असतात, 'ईश्वर तुम्हांला सद्बुद्धी देवो.. इथपासून तर तुम्ही मरणार' असे आशीर्वादही असतात.

त्यामुळं कोणत्या विषयावर लिहावं, असा प्रश्न पडतो. पण खेळ मनाचा एक सुसंगत धागा ठरवणं गरजेचं आहे. सगळ्याच विषयांना योग्य न्याय देता येणं नितांत गरजेचं आहे. कारण माझं काम प्रबोधनाचं आहे. त्यामुळे वाचकांच्या मागणीनुसार विषयांची हाताळणी करतानाच प्रत्येक विषय व्यवस्थितरीत्या मांडला जाईल याची काळजी मला घ्यावी लागते हे आपण कृपया लक्षात घ्या. फलज्योतिषाविषयी खूप प्रश्न आलेत. तो आपल्या सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य झालेला विषय असल्यामुळं ते स्वाभाविकही आहे.

मागच्या लेखांमध्ये आपण पाहिलं, की पंचांगाचे दोन भाग असतात. अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त हा सारा खगोलशास्त्राचा भाग आहे. तो खरा असतो. शंभर टक्के खरा असायला हवा एवढं आपलं विज्ञान प्रगत झालं आहे.

मुहूर्त, शुभ-अशुभ आणि राशिभविष्य, हस्तसामुद्रिक,

मुद्रासामुदिक, अंक भविष्य, रमल, टॅरो कार्ड, क्रिस्टल गेझिंग, नाडी भविष्य इत्यादी भविष्यकथनाचे प्रकार फलज्योतिष अँस्ट्रॉलॉजी या विषयात मोडतात. या भविष्यप्रकारांना, ईंीेश्रेसूला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. वैज्ञानिक मान्यता नाही हे आपण विस्तारानं मागच्या लेखांमध्ये पाहिलं आहे.

या सगळ्यांमध्ये ज्योतिष्याच्या वतरुळातसुद्धा राशिभविष्य ईंीेश्रेसू हा उत्तम भविष्यकथनाचा प्रकार आहे असं मानलं जातं. त्यात अनेक शाखा, पद्धती आहेत. कृष्णमूर्ती, सायन, निर्मन वगैरे त्या तपशिलात न शिरता काही ठळक गोष्टी आपण समजून घेऊ.

पत्रिकेवरून भविष्य सांगणं हा सगळ्यात उत्तम प्रकार मानला जातो. ज्योतिष्याला जन्मवेळ आणि जन्मस्थळ मिळालं, की त्याआधारे त्याला कुंडली केीेीलेशि मांडता येते. या दोन गोष्टींशिवाय इतर कोणतीही माहिती देण्याची गरज नसते. आजकाल कॉम्प्युटरवरही कुंडली तयार करून मिळते. 12 राशींच्या 12 घरांत एकूण 9 ग्रह (परंपरेनुसार) मांडलेले आपणांस आढळतात. आजकाल ज्योतिषी आधुनिक झाल्याचं दाखविण्यासाठी युरेनस, नेपच्यूनही (काही प्लूटो) या घरात खेळवतात.

परंपरागत 9 ग्रह म्हणजे राहू, केतू आणि आपले सात वार रवि, सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीत हे ग्रह आहेत. माझ्याही कुंडलीत आहेत. लहानपणीच आईबाबांनी कुंडली बनवून घेतली होती.

राहू, केतू ग्रह आहेत? आपण शाळेमध्ये जे ग्रह शिकलोत त्यात राहू, केतू नावाचे ग्रह नाहीत. सूर्यमंडळामध्ये मुळात नसलेले हे ग्रह आलेत कुठून? हजारो वर्षाआधी केवळ डोळ्यांच्या साहाय्यानं माणसानं ग्रह शोधले. त्या वेळी आपल्यापासून या ग्रहांचं अंतर किती असावं याचा त्याला अंदाज करता येणं शक्यच नव्हतं. म्हणून ग्रहणाचा अभ्यास करताना काहीतरी चंद्र आणि सूर्याला गिळंकृत करत असावं असा त्यानं अंदाज केला. राहू, केतू, साप आहेत वा राक्षस आहेत. विशिष्ट काळात ते चंद्राला वा सूर्याला गिळतात म्हणून चंद्रग्रहण व सूर्यग्रहण लागतं असा समज रूढ झाला. आजही पुराण ग्रंथांमधून तो वाचायला मिळतो.

सारे खगोलशास्त्री पूर्वी ज्योतिषी ईंीेश्रेसशी म्हणून ओळखले जात. ग्रीक शास्त्रज्ञ 'अँरिस्टार्कस ऑफ सॅमॉस' याने तेवीसशे वर्षांपूर्वी तारे व सूर्य स्थिर असून पृथ्वी आणि ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात,' असं मत मांडलं.

भारतातील महान ज्योतिषी आर्यभट्ट याने पाचव्या शतकाच्या शेवटी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे मत गणिताच्या आधारे मांडलं. पण डोळ्यांना पृथ्वीभोवती सूर्य फिरताना दिसत असल्यामुळं या ज्योतिर्विदांची मतं नाकारण्यात आली. उलट त्यांची खिल्ली उडवण्यात आली.

ब्रुनो, कोपर्निकस व दुर्बिणीचा शोध लावून तिचा वापर करणार्‍या 16व्या शतकातील गॅलिलिओनं गणिताच्या आधारावर सिद्ध केलेलं मत जगाला स्वीकारावं लागलं. 'पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते व पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे सत्य आज सार्‍यांनी स्वीकारलं आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला तर सूर्यग्रहण लागतं आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर चंद्रग्रहण लागतं हे ज्ञान मानवजातीला झाल्यानंतर ज्योतिष्यांचे राहू, केतू म्हणजे साप व राक्षस या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्या. म्हणून हुशार ज्योतिष्यांनी त्यांना 'इन्व्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे ग्रह' ठरवलेत.

आश्चर्य म्हणजे न दिसणारे ग्रह ही कल्पना एका सत्यावर आधारित होती. युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह शास्त्रज्ञांना आधी गणितात आढळले. त्यानुसार त्यांनी शोध घेतल्यानंतर त्या स्थानांवर हे ग्रह दिसले.प्लूटो हा ग्रह गणितानुसार असावा असे वाटल्यानंतर बर्‍याच काळानंतर तो सापडला, दिसला.

स्वाभाविकच ज्योतिष्यांची न दिसणारे राहू, केतू ग्रह ही चलाखी काही काळ चालली. पण त्या स्थानांवर राहू, केतू असूच शकत नाही. या निर्णयाप्रत खगोलशास्त्रज्ञ आल्यावर मात्र ज्योतिष्यांची फारच पंचाईत झाली. मग त्यांनी राहू, केतू हे 'इंटरसेक्टिंग पॉइंट्स' आहेत, असं सांगायला सुरुवात केली.

पृथ्वीपासून सर्व ग्रहतार्‍यांचं समान अंतर कल्पून त्यांच्या भ्रमणाचा काल्पनिक नकाशा तयार केला जातो. त्यानुसार राशी, नक्षत्र मानले जातात. खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी ही कल्पना दीर्घकाळ वापरली गेली आहे. यानुसार चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणकक्षा जिथे छेद देतात त्या बिंदूंना राहू आणि केतू असं मानलं गेलं. आता हे छेदनबिंदू मुळातच काल्पनिक आहेत. कारण पृथ्वीपासून चंद्राचं अंतर एक फूट पकडलं तर पृथ्वी, सूर्य यांचं अंतर 385 फूट पकडावं लागेल. पृथ्वी मध्यबिंदूवरून 1

फुटावर फिरणार्‍या चंद्राची भ्रमणकक्षा 385 फुटांवरून फिरणार्‍या सूर्याच्या कक्षेला कधीही छेद देऊ शकणार नाही हे भूमितीच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यालाही कळतं. त्यामुळं राहू, केतू हे छेदनबिंदू आहेत ही मांडणीसुद्धा ज्योतिष्यांचं पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतराबद्दल त्यांचं अज्ञान दर्शविणारी आहे, चुकीची आहे; काल्पनिक आहे.

रवी म्हणजे सूर्य. सूर्य हा तारा आहे. तारा स्वयंप्रकाशी असतो. ग्रह परप्रकाशी असतात. ग्रह हे तार्‍याभोवती फिरतात. तरीही ज्योतिषी अजूनही रवीला म्हणजे सूर्याला ग्रह मानून तुमच्या-माझ्या पत्रिकेत पृथ्वीभोवती हिंडवत असतात. सूर्य-रवी हा तारा आहे, ग्रह नाही हे विद्वान ज्योतिषी केव्हा स्वीकारणार?

सोम म्हणजे चंद्र. चंद्र हा उपग्रह आहे. तो ग्रह नाही. 1986 साली धुळ्याला अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं होतं. त्या काळी भास्कर वाघाची धुळ्यात खूप दहशत होती. काही पत्रकारांना त्यांच्या गुंडांनी भरचौकात मारलं होतं. ज्योतिष्यांच्या अधिवेशनाला या गुंडांचं पूर्ण संरक्षण होतं. मी आणि माझे कार्यकर्ते या अधिवेशनाविरुद्ध रान उठविण्याची हिंमत करणार नाही या हेतूनेच धुळ्याला आयोजन केलं होतं.

15 दिवस आधीपासून आम्ही वातावरण तापवायला सुरुवात केली. शाळा, कॉलेजमध्ये 'ज्योतिष एक थोतांड' या विषयावरील व्याख्यानांचा धडाका उडवून दिला. त्या पाश्र्वभूमीवर ज्योतिष महामंडळाची धुळ्याला प्रेस कॉन्फरन्स झाली. ''चंद्र हा ग्रह आहे का?'' पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. ''हो! आमच्या शास्त्रानुसार चंद्र हा ग्रहच आहे,'' असे उत्तर पदाधिकार्‍यांनी दिलं. ''पण शाळांमध्ये चंद्र हा उपग्रह आहे असं शिकवलं जातं. मग आपलं ज्योतिष महामंडळ काय करणार, सरकारला असं चुकीचं पाठय़पुस्तकात शिकवतात याबद्दल जाब विचारणार कां, पाठय़पुस्तकातील हा भाग बदलविण्यास भाग पाडणार का,'' अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

''आम्ही या अधिवेशनात निर्णय घेऊ. चंद्र हा ग्रह आहे की उपग्रह ते ठरवू.'' असं उत्तर ज्योतिष्यांनी दिलं. आमच्या हाती कोलीतच मिळालं. प्रत्येक शाळेत, कॉलेजात, चौकाचौकांत आम्ही ग्रह, उपग्रहातील फरक समजावून सांगू लागलो. ग्रह हा तार्‍याच्या भोवती फिरतोआणि ग्रहाच्या भोवती फिरतो तो उपग्रह. ग्रह आणि उपग्रह हे केवळ शब्द नाहीत, तर या संकल्पना आहेत.

हजारोंच्या संख्येनं गावात ज्योतिषी यायला लागले. अधिवेशनाचा बिल्ला लटकवलेला ज्योतिषी दिसला, की शाळकरी वानरसेना विचारायची, ''ज्योतिषी काका, सोम ग्रह आहे की उपग्रह? रवी ग्रह आहे का? राहू, केतू कुठे आहेत?'' ज्योतिष्यांनी चुकीची वा अवैज्ञानिक उत्तरे दिली, की मग वानरसेना त्यांना निमंत्रण द्यायची, ''ज्योतिषी काका, आमच्या शाळेत शिकायला या. 9 पैकी 4 ग्रह तर अस्तित्वातच नाही! मग पत्रिकेला काय अर्थ?''

परिणाम असा झाला, की हजारोंच्या संख्येनं आलेले ज्योतिषी आपला बिल्ला काढून धुळ्यात वावरू लागले. त्या वेळी वातावरण एवढं तणावपूर्ण होतं, की डीआयजी अरविंद इनामदार नाशिक सोडून काही काळ धुळे मुक्कामी तळ ठोकून बसले. व्यक्तिश: त्यांचा ज्योतिषावर विश्वास होता. त्याबद्दल ते

माझ्याशी वादही घालत. पण पोलीस अधिकारी म्हणून आमच्या वादळी चौक सभांना पूर्ण संरक्षणही देत. पुढे ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झालेत. 'ज्योतिषशास्त्र आहे सिद्ध करा. एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंका अन्यथा फसवण्याचा धंदा बंद करा.' या आव्हानाच्या दबावातच धुळ्याचं ज्योतिष संमेलन पार पडलं. ज्योतिष्यांनी आव्हान स्वीकारलं का?

(लेखक हे अखिल भरतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Saturday 15 September 2012

डॉ.कलाम, अमिताभ, सचिनवर चुकीच्या संस्काराचा पगडा


'तिरूपतीचे बालाजी पावले,
इस्त्रोची अंतराळ मोहीम यशस्वी झाली'

अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. इस्त्रो ही अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी भारत सरकारची वैज्ञानिक संस्था. भारताच्या 100 व्या अवकाश मोहिमेच्या सुरुवातीला ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून इस्त्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन अग्निबाणाची प्रतिकृती घेऊन बालाजीच्या दर्शनाला गेले होते. प्रतिकृती बालाजी समोर ठेवली. मोहीम यशस्वी झाली. जणूकाही बालाजींनीच मोहीम यशस्वी केली. मग इस्त्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची गरज काय? पुजारीच पुरेसे ना? भारतातील एवढय़ा मोठय़ा अवकाश विज्ञान संस्थेतील लोक अशी कृती करतात याबद्दल आपणा कुणालाही फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, वैज्ञानिक प्रक्रिया संमत नसली, वैज्ञानिक विचारविरोधी असली तरी ती आपल्या संस्काराचा भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे.

डॉ. अब्दुल कलामांसारखे एक वैज्ञानिक या देशाचे राष्ट्रपती निवडले गेले होते तेव्हा माझ्या सारख्या बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी विचाराच्या

माणसाला आनंद झाला होता. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर एवढय़ा मोठय़ा उच्चपदावर पहिल्यांदा एखादी बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती या देशात विराजमान होते आहे असं वाटलं. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला. राष्ट्रपतिपदाची शपथ घेताच डॉ. अब्दुल कलाम सामान्य जनतेच्या पैशातून, विकत घेतलेल्या विमानातून, वायुदलाच्या स्पेशल विमानातून, पुट्टपार्थिला सत्यसाईबाबांच्या दर्शनाला, नव्हे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. एवढा मोठा एका वैज्ञानिक सामान्य जादूगारासारखे (कुणीही काही तासांच्या प्रशिक्षणानं हे प्रयोग शिकू शकतो.) हातचलाखीचे प्रयोग करून सोन्याचे हार, अंगठय़ा, विभूती काढणार्‍या सत्यसाईबाबांसारख्या एका वादग्रस्त, उघड उघड लोकांना फसविणार्‍या, बाबांच्या पायावर डोकं ठेवायला का जातो? भारताच्या अणुविज्ञान संस्थेचे, संशोधनाचे एकेकाळी प्रमुख असणार्‍या डॉ. कलामांपेक्षा सत्यसाईबाबा जास्त बुद्धीवान आहेत का? की, त्यांच्याच आशीर्वादानं त्यांना राष्ट्रपती बनवलं किंवा अमिताभ बच्चन सारखा (माझा आवडता नट आहे, त्याच्यावर अनेक लेख लिहिले.) महासदीचा नायक उघड अंधश्रद्धा बाळगतो, त्याचं प्रदर्शन करतो. सुनेचा मंगळ काढण्यासाठी नागबळी करतो. तो कमी बुद्धिमान आहे का? सचिन तेंडुलकरची तीच गत. आपली बॅट चालत नाही म्हणून नागबळी पूजा गाजतवाजत केली. तरी पुढे सात-आठ मॅचेस त्याची बॅट चाललीच नाही. बरं अशी नागबळी करून बॅट चालू लागते हे खरं असेल तर आपण सचिन तेंडुलकरचं एवढं कौतुक करण्याचं काय कारण? नागबळी पूजेचंच कौतुक करू ना? आणि कुणाही सोमा गोम्या, गल्लीतल्या पोर्‍याला सचिन इतकाच महान बल्लेबाज, अनेक पूजा घालून घालून बनवू या ना?

इस्त्रोचे वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे बुद्धिमान, प्रतिभासंपन्न, अनेकांचे विशेषत्वानं युवकांचे आयकॉन आहेत. हे लोक जेव्हा अशी अंधश्रद्धा कृती करतात, अतार्किक गोष्टीचं उघड समर्थन- प्रदर्शन करतात तेव्हा अख्खी भारतीय तरुण पिढी आणखीच त्या दिशेनं, नशिबाच्या, अंधश्रद्धेच्या दिशेनं वाटचाल करण्यास प्रवृत्त होते. आपल्या जीवनातील यशापयश स्वबळावर, स्वकर्तृत्वावर

मिळत नसून नशिबामुळं अथवा अशा आधीभौतिक शक्तींच्या कृपाप्रसादामुळं मिळतं असं अधिक घट्टपणे मानू लागते. लहानपणापासून निर्माण झालेला हा अंधश्रद्धांचा विळखा अधिकच घट्ट होतो. त्यामुळे या मोठय़ांचं वागणं हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा विषय राहत नाही. तो सामाजिक संस्कारांचा भक्कम आधार बनतो.

बर्‍याच वर्षापूर्वीची गोष्ट. विनोद दुआंचा 'चक्रव्यूह' नावाचा एक चर्चात्मक कार्यक्रम एका टीव्ही वाहिनीवरून प्रसारित होत असे. त्यातील एक कार्यक्रम फलज्योतिष या विषयावरची टीव्ही वाहिनीवरील ही पहिली जाहीर चर्चा. जगजित ऊप्पल नावाचे, टीव्हीवरून नियमित भविष्य सांगणारे, एक खूप प्रसिद्ध ज्योतिषी, मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक आणि मी असे तिघे चर्चेत होतो. विनोद दुआ अँंकर (संचालक) होते. नेहरू तारांगणाचे संचालक (डायरेक्टर) हे खगोल वैज्ञानिक असतात. वैज्ञानिक क्षेत्रातील ही अत्यंत मानाची, प्रतिष्ठेची पोस्ट समजली जाते. रेकॉर्डिग

मुंबईच्या स्टुडिओत होतं. 100-125 प्रेक्षकसंख्या. सारेच्या सारे जगजित उप्पलच्या मागे. पाया पडताहेत, तिथेच भविष्य विचारताहेत, त्यांचं दर्शन घेऊन कृतकृत्य होताहेत, असं भारलेलं वातावरण. तरुण-तरुणींची संख्या अधिक. हिंदीत कार्यक्रम असला तरी सारे आंग्लाळलेले, इंग्रजी बोलणारे आणि राशिभविष्यानुसार दिवसाचा दिनक्रम ठरवणारे. मला वाटलं

किमान एक वैज्ञानिक आपल्यासोबत आहेत. ते नेहरू तारांगणाचे संचालक असल्यामुळं विज्ञानवादी विचार प्रखरपणे मांडतील, किमान विज्ञान विचारांचं समर्थन करतील.

झालं भलतच.पहिल्या टप्प्यातील चर्चेतच त्यांनी फलज्योतिषाचं समर्थन केलं. सुरुवातच अशी केली,''मी एका पुजार्‍याचा मुलगा आहे. माझे वडील ज्योतिषी होते. मोठय़ा कष्टानं मी शिकलो. वैज्ञानिक बनलो, एवढय़ा मोठय़ा वैज्ञानिक पदावर पोहोचलो. राशिभविष्य यावर माझी श्रद्धा आहे.'' पत्रिकेतील राहू केतूचा विषय निघाला. राहू, केतू, चंद्र, सूर्य हे ग्रह नसल्यामुळं मी जगजित उप्पल यांची भंबेरी उडवत होतो. त्यांना काही त्याचं समर्थन करता येईना. हे वैज्ञानिक त्यांच्या मदतीला धावले, ''हॉ! राहू केतू का परिणाम होता है! ये परंपरागत भविष्यशास्त्र है, सदियोंसे हम इसे मानते आये है' वगैरे बोलायला लागले. मग माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला, 'तुम्हाला येथे एक पुजार्‍याचा, ज्योतिष्याचा मुलगा म्हणून बोलावलं नाही. एक वैज्ञानिक, नेहरू तारांगणाचा संचालक, खगोलशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून बोलावलं आहे. तुमच्या खगोलशास्त्रानुसार राहू, केतू नावाचे ग्रह अस्तित्वात आहेत का? चंद्र व सूर्य (रवी) हे ग्रह आहेत का? ते सांगा. तुमच्या वैयक्तिक अंधश्रद्धा सांगू नका.'' तेव्हा कुठे महाशय जागेवर आले.''खगोलशास्त्रानुसार राहू, केतू हे ग्रह नाहीत, ते अस्तित्वातच नाहीत. रवी हा तारा आहे, चंद्र (सोम) हा उपग्रह आहे. हे जाहीररीत्या बोलले.'

सारा घोळ विनोद दुआंच्या लक्षात आला. खरं म्हणजे ते अँंकर, पण तेही आतून चिडले. कार्यक्रमाच्या दुसर्‍या सेगमेंटमध्ये त्यांनी या वैज्ञानिकाच्या हातून नारळ फोडून घेतलं. प्रस्तावना केली. ''हम भूल गये थे! इस कार्यक्रम का शुभ- उद्घाटन हमने नहीं किया! अब करते है! ये नारीयल इनके हाथों से फोडते है! क्योंकि ये एक पूजारी के बेटे है और इनका शुभ, अशुभ पर गहरा विश्वास है! वे नेहरू तारांगण इस वैज्ञानिक संस्था के संचालक है! लेकिन पूजारी के बेटे है''

वैज्ञानिक महोदयांनी नारळ फोडलं. विनोद दुआ आपली खिल्ली उडवताहेत हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. जगजित उप्पलचे हाल हाल झालेत. 'फल-ज्योतिष्याची भाकिते 90 टक्के सिद्ध करा आणि 1 लाखांचं पारितोषिके घ्या' हे आव्हान मी टाकलं. अर्थात, त्यांनी स्वीकारलं नाही. कार्यक्रम खूप गाजला. झी टीव्हीनं तो अनेकवेळा रिपिट केला.

एक मोठा खगोलशास्त्रज्ञ, आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणूस. त्याच्या अभ्यासशास्त्रानुसार राहू, केतू, चंद्र, सूर्य हे ग्रह नाहीत. पत्रिकेला शास्त्रीय आधार नाही. तरी संस्कारामुळं तो ज्योतिष मानतो, सार्‍या अंधश्रद्धा मानतो. कारण विज्ञान हा केवळ त्याच्या पोटापाण्याचा भाग आहे. वैज्ञानिक विचार, विज्ञान हा त्याच्या बुद्धीचा भागच नाही. ज्या तर्कशुद्ध विचारांवर अख्ख विज्ञान उभं आहे. माणूस तर्कशुद्ध विचार करायला लागल्यामुळं विज्ञानाचा विकास झाला, माणसाची एवढी प्रगती झाली. तो वैज्ञानिक विचार आपल्या भारतीयांच्या जीवनाचा, बुद्धींचा भाग बनू शकला नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात आपण उल्हासनगर (मेड इन यूएसए) आहोत. इतरांचं मूलभूत संशोधन आपण आयतं वापरतो. त्यात थातूरमातूर बदल करून, ते थोडसं विकसित करून काही उत्पादन करतो आणि स्वत:ला महासत्ता बनविण्याच्या गप्पा मारतो. भारत महासत्ता बनविण्याचं भविष्य वर्तविणारे वा तसा आशावाद वर्तविणारे वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलामच जर अवैज्ञानिक विचार करणारे असतील, सत्यसाईबाबांसारख्या जादूगाराच्या पाया पडून अवैज्ञानिक आचारांचे प्रदर्शन करणारे असतील तर भारत कशा प्रकारची महासत्ता बनू शकेल?

सर्वसामान्य भारतीय माणसानं आपल्या मेंदूचे दोन कप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्यानं तो विज्ञान शिकतो, प्रयोगशाळेपुरती वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो, त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो, वैज्ञानिक जागा पटकावतो, नेहरू तारांगणाचा संचालक बनतो, इस्त्रोचा वैज्ञानिक बनतो, अंतराळ संशोधनाचा प्रकल्प संचालक बनतो. त्यावर पोट भरतो. पण त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो बिलकूल मेंदूच्या दुसर्‍या कप्प्यात शिरू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार जीवनाचा भाग बनवत नाही. कारण त्याच्यावर लहानपणापासून संस्कार होतो. 'विज्ञान खरं असतं, ठीक असतं. पण जिथून विज्ञान संपतं तिथून खरं अध्यात्म, आधिभौतिक जग सुरू होतं. या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाहीत.' हा या देशातील सगळ्यात मोठा खड्डा आहे अंधश्रद्धेचा. ज्यात आपण वारंवार पडतो. वैज्ञानिक जगात एक म्हण आहे, 'न्यूटन जे सिद्ध करतो तेवढंच महत्त्वाचं आहे. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं आहे' हे आपण केव्हा शिकणार?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

Monday 10 September 2012

नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा

   A A << Back to Headlines     
मागच्या आठवडय़ाचा लेख प्रसिद्ध झाल्यावर 'नशीब-कर्तृत्व' या विषयासंबंधी खूप प्रश्न निर्माण झाल्याचं फोनच्या प्रतिसादावरून लक्षात आलं. त्यासंबंधी सखोल विवेचन करण्याची गरज लक्षात आल्यामुळं हा प्रपंच. ''माणसानं कितीही कर्तृत्व करायचं ठरवलं तरी त्याला नशिबाची साथ असावी लागते. त्याशिवाय कर्तृत्वाचं फळ मिळत नाही. कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते.'' अशा प्रकारची वाक्य आपण भारतीय नेहमीच ऐकत आलो आहोत, बोलत आलो आहोत. यात आपल्याला काहीही वावगं वाटत नाही, चुकीचं वाटत नाही. दोन्हींमध्ये अंतर्विरोध आहे हेही आपल्या लक्षात येत नाही. कारण तर्कशुद्धरीत्या विचार करण्याची क्षमताच आपल्या शिक्षणातून, संस्कारातून निर्माण होत नाही.

आम्ही पत्रकार छापत असलेली नेहमीची बातमी-''सुमोभरून दहा माणसं दर्शनासाठी चालली होती. रस्त्यात अपघात झाला. सुमो गाडीचा पार चकनाचूर झाला. 'ऑन द स्पॉट' नऊ माणसं मेलीत. एक माणूस जिवंत राहिला. देव तारी त्याला कोण मारी.'' ही बातमी वाचून आपण सारेच खूश होतो. आपल्याला वाटतं अपघातात दहाही माणसं मरणार होती. त्यापैकी नऊ मेलीत, पण नेमकं एकाला देवानं वाचवलं. पण हे खरं आहे का? अपघात झाला हे खरं. नऊ माणसं मेलीत हेही खरं. पण ही नऊ माणसं देवाच्या परवानगीशिवाय, संमतीशिवाय मेलीत का? जर देवानं एकाला वाचविलं असं आपल्याला म्हणायचं असेल तर नऊ माणसांना देवानेच मारलं असंही आपल्याला म्हणावं लागेल. मात्र हे आपल्या लक्षातच येत नाही. खरं काय आहे? ''अपघातानं नऊ माणसं मेलीत. त्याचप्रमाणे अपघातानंच त्यातील एक माणूस वाचला.'' नाहीतर ''देवानं एकाला मुद्दाम वाचवलं आणि नऊ माणसांना मुद्दाम मारलं.'' या दोन वाक्यांपैकी कोणतं तरी एक वाक्य पूर्ण खरं आहे. दोन्हीमधलं अर्धअर्ध वाक्य खरंच असू शकत नाही.

स्वामी विवेकानंद इंग्रजीतील एक म्हण नेहमीच वापरत असत. ''देव त्यांनाच मदत करतो जे स्वत:ची मदत करतात.'' याचा नेमका अर्थ काय? ''देईल हरी खाटल्यावरी असं कधीच घडत नाही. माणसानं कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. मी स्वामी विवेकानंदांना खरा समाजसुधारक मानतो. तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करणारा धार्मिक संत मानतो ते याचमुळं. त्यांच्या अशा प्रखर विचारांमुळं. आता नशीब आणि कर्तृत्व यात कसा अंतर्विरोध आहे ते आपण समजून घेऊ. नशीब म्हणजे गेल्या जन्मीच्या पाप-पुण्यामुळं असेल अथवा कुणी आपलं नशीब लिहून ठेवलं असेल म्हणून असेल, पण ''जे आपल्या आयुष्यात घडणार आहे ते आधीच ठरलेलं असतं. ते त्यानुसारच घडतं.'' असं मानणं म्हणजे नशीब मानणं. कर्तृत्व म्हणजे आपण जी कृती करतो, प्रयत्न करतो, मेहनत घेतो ते. 'केल्याने होत आहे रे' या उक्तीनुसार आपल्या आयुष्यात घडणार आहे असं मानणं, त्यानुसार जगणं, त्याप्रमाणं परिश्रम करणं म्हणजे कर्तृत्व. थोडक्यात परिश्रम केले तरच काही घडतं अथवा काही घडत नाही असं मानणं.

या दोन्हीही संकल्पना परस्परविरोधी आहेत. नशीब खरं असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही. काही केलं काय आणि नाही केलं तरी, ठरलं आहे. त्यानुसारच घडणार आहे. कर्तृत्वाला यात मुळी स्थान असूच शकत नाही. याचा अर्थ 'देई नशीब खाटल्यावरी' असा होतो. म्हणूनच गेल्या लेखात मी असं नशीब मानणार्‍यांना म्हटलं होतं, ''मी येतो. तुमच्या मुस्काटात एक मारतो. म्हणतो, नशिबात होतं (तुमच्या) म्हणून तुम्ही झापड खाल्ली. माझ्या नशिबात होतं म्हणून मी मारली.'' पण आपल्यापैकी कुणीही असं नशीब मानायला तयार नाही. तरी आपण, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर नशीब का मानतात, असे विचारतो. ''कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते का?'' असाही आपला प्रश्न असतो. कारण आपल्याला तर्कशुद्ध विचार करता येत नाही म्हणून. कर्तृत्व केल्याशिवाय काहीच घडत नाही. हे आपल्याला मान्य असतं. त्याबद्दल आपल्या मनात संदेह नसतो. पण अनेकदा आपण कर्तृत्व करूनसुद्धा, खूप प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश मिळत नाही आणि मग आपण त्या अपयशामागची नेमकी कारणं न शोधता नशिबाला बोट लावून मोकळे होतो.

आता मी कितीही करेक्ट कार चालवली, हायवेवरून प्रवास करताना सगळे रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळलेत, तर माझा अपघात होणारच नाही का? होऊ शकतो. समजा समोरच्या ट्रक ड्रायव्हरनं चूक केली तर, चांगल्या रस्त्यामध्ये मध्येच एखादा मोठ्ठा खड्डा पडला असेल तर आणि त्या ठिकाणी रोड संबंधित अधिकार्‍याने कोणताच सूचनाफलक लावला नसेल तर अथवा अचानक एखादं मोकाट जनावर रस्त्यावर धावत आलं असेल तर अपघात होऊ शकतो. माझी काहीही चूक नसतानासुद्धा त्या अपघाताचे दुष्परिणाम मला भोगावे लागतील. मग हे दुष्परिणाम माझ्या नशिबाचा भाग आहे का? नशीब मानलं तर हा अपघात आधीच ठरला होता त्याप्रमाणं घडला असं मानावं लागेल. मग कुणाला दोष देता येणार नाही. पण हे खोटं आहे. अपघात का घडला? ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळं अथवा रोड इंजिनिअरनं रोड बांधताना भ्रष्टाचार केल्यामुळं वा आपलं कर्तव्य नीट न बजावल्यामुळं (खड्डय़ाचा फलक लावण्याचं काम) अथवा जनावरांच्या मालकानं जबाबदारी पार न पाडता जनावराला मोकाट सोडून हायवेवर जनावर येऊ दिल्यामुळं अपघात घडू शकतो. म्हणजे माझी वैयक्तिक चूक नसतानासुद्धा दुसर्‍या कुणाच्या तरी चुकीचे परिणाम मला भोगावे लागतात. कारण आपण एकटे नसतो, शंभर टक्के स्वतंत्र नसतो. आपण सारेच आपल्या देशाचे, समाजाचे घटक असतो. समाजात निर्माण होणार्‍या संधीचे आपल्याला फायदेही मिळतात आणि समाजात निर्माण होणार्‍या चुकांचे परिणामही भोगावे लागतात.

इतरांच्या चुकांचे परिणाम पाहिले. आता फायद्याचे पाहू. 1978 मध्ये मी इंग्रजी साहित्याच्या एम.ए. फायनल परीक्षेला बसलो. त्या काळी मी एक वक्ता म्हणून प्रसिद्ध होतो. स्त्रीमुक्ती चळवळींमध्ये अग्रेसर होतो. नागपूरच्या दै. 'तरुण भारत'चा माझा युवकांसाठीचा स्तंभ अतिशय लोकप्रिय होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका महाविद्यालयाचे काही प्राध्यापक ''तुम्ही

आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून जॉईन व्हा,'' अशी विनंती करायला आले. दुसरीकडे जाऊन नोकरी मागण्यापेक्षा ही आयती चालून आलेली सन्मानजनक संधी घ्यायचं मी ठरवलं. परीक्षेचा निकाल लागायचाच होता. निकाल लागला. पास झालो. त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. सिनिअर कॉलेजलाही शिकविण्याची संधी मिळाली. हे माझं नशीब होतं का? आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात फर्स्टक्लास आलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा सहजासहजी अशी सिनिअर कॉलेजला प्राध्यापकी मिळणार नाही. मग त्याचं नशीब वाईट आहे का? 1978 मध्ये इंग्रजी विषयातील प्राध्यापकांचा खूप तुटवडा होता. या क्षेत्रात भरपूर संधी होती. म्हणून मला कुठेना कुठे प्राध्यापकी मिळणारच होती. फक्त मला नावलौकिक असल्यामुळं पास होण्याच्या आधीच निमंत्रण मिळालं एवढंच ते काय घडलं. त्या काळी समाजात संधी होती म्हणून मला प्राध्यापकी मिळाली. आज या क्षेत्रात सॅच्युरेशन निर्माण झालं आहे. म्हणून आज जशी सहज प्राध्यापकी मिळणार नाही, एवढाच याचा अर्थ आहे.

नुसतं आपलं कर्तृत्व महत्त्वाचं नसतं. आपण समाजाचा घटक असल्यामुळं समाजात उपलब्ध असलेल्या संधीनुसार अनुकूल कर्तृत्व केलं तरचं त्या कर्तृत्वाचं फळ मिळतं हे आपण समजून घेत नाही आणि अपयशाची कारणं न शोधता नशिबाचे ढोल बडवत बसतो. नशीब असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही आणि कर्तृत्व खरं असेल तर आधी नशीब ठरलेलं असू शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपली भाषा सुधारली पाहिजे. विचारप्रक्रिया तर्कशुद्ध केली पाहिजे. एक गोष्ट सांगून संपवितो. शिवाजी राजांचे तानाजी मालुसरे गड 'सर' करायला गेले. ('गड आला, पण सिंह गेला.') घोरपडी-दोर लावून गडावर चढले. लढाई सुरू झाली. तानाजी धारातीर्थी पडले. सेनापती पडल्यावर सारे मावळे गडाच्या दोरावरून उतरून पळू लागले. तानाजीच्या भावानं सारे दोर कापले, ''आता उडय़ा टाकून नेभळटासारखे मरा, नाहीतर शूरासारखे लढून मरा अथवा जिंका,'' असा आदेश सोडला. परिणाम, सारे मावळे लढले. गड जिंकला. आता तरी नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा. समोर आलेल्या प्रसंगाला धैर्यानं व कर्तृत्वानं तोंड द्या. जिंका अथवा मरा, पण भेकडासारखं जगणं, पळणं सोडा.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी -9371014832

Saturday 1 September 2012

नशीब : नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट


'कुणीही ज्योतिषी बनू शकतो, भविष्य सांगू शकतो. त्याला काहीही माहीत नसताना त्याचं भविष्य 50 टक्क्यांपेक्षा अधिक बरोबर निघू शकतं' हे गेल्या शनिवारच्या अंकात लिहिलं होतं. याला म्हणतात,''लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी.'' शक्याशक्यतेचा नियम. गरोदर बाईबाबतचं आपलं भाकीत का व कसं खरं ठरू शकतं ते आपण पाहिलं.

समजा आपण सारे परीक्षेला बसलो आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'होय' अथवा 'नाही' असं टिकमार्क करायचं आहे. मीही तुमच्यासोबत परीक्षा देतो आहे. मी मुळीच अभ्यास केला नाही. 100 प्रश्नांपैकी मला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही. म्हणजे माझी लायकी भोपळा (शून्य) मिळण्याची आहे. पण मी जर थोडी अक्कल वापरली आणि सारीच्या सारी उत्तरं 'होय' अशी टिकमार्क केली, तर?

कदाचित शंभरपैकी पन्नास प्रश्नांची उत्तरं अचूक निघतील. मला 50 टक्के मार्क्‍स मिळतील. कदाचित 70 प्रश्न बरोबर ठरून 70 टक्के मार्क्‍स मिळतील. पण मला शून्य मार्क्‍स मिळतील का? शक्य नाही. कारण त्यासाठी मला सारे प्रश्न चुकवावे लागतील. खरी उत्तरं माहिती नसल्यामुळं ते मी चुकवू शकणार नाही. कमीतकमी 30 प्रश्न बरोबर निघतील आणि मला 30 टक्के मार्क्‍स मिळतील. म्हणजे माझी लायकी भोपळा मिळण्याची असतानासुद्धा मला 30 ते 70 टक्के यामधील कितीही मार्क्‍स मिळू शकतात. हा निसर्गातील चान्स फॅक्टर, शक्याशक्यतेचा नियम कळला आणि विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं व्हायला लागली. ज्यावेळी निसर्गात, कोणत्याही विषयात ही 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी' ओलांडणारी भाकितं वारंवार खरी ठरतात. म्हणजे 100 घटनांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक घटनांची भाकितं अचूक ठरतात. त्यात काही तथ्य आहे असं मानलं जातं. मग त्या विषयाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. त्यात सातत्यानं हा शक्याशक्यतेचा नियम ओलांडणारे रिझल्टस् मिळत गेले तर त्या विषयाला विज्ञानाचा दर्जा मिळतो. त्या विषयात अधिक संशोधन करण्यास प्रोत्साहन दिलं जातं.

मानवजातीला, विज्ञान जगताला, शक्याशक्यतेचा नियम गवसला आणि मग विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं झाली. शारीरिक विज्ञानात सजेशनचं सामर्थ्य (मनावर होणारा सूचनांचा परिणाम) कळलं आणि मेडिकल सायन्समधील मेडिसीनची प्रगती झपाटय़ानं झाली. सार्‍या मानवजातीचं आयुर्मान आश्चर्यकारकरीत्या वाढलं. औषधांच्या चाचण्या घेताना 'प्लासिबो' इफेक्ट तपासला जातो. एकाच प्रकारचं दिसणारं औषध दोन वेगवेगळ्या ग्रुपला दिलं जातं. त्या औषधाचे परिणाम होणार आहेत, हे दोन्ही ग्रुपला सांगितलं जातं. एका ग्रुपला खरं औषध दिलं जातं. दुसर्‍या ग्रुपला मात्र तशाच वेष्टणात औषधी गुणधर्म नसलेली नुसतीच पावडर (वा गोळी) दिली जाते. आता दुसर्‍या ग्रुपला औषध दिलेलं नसतानाही काही लोकांबाबत परिणाम मिळतात. हे औषधासोबत सांगितलेल्या सजेशनचे (असे असे परिणाम होणार आहेत) परिणाम असतात. पहिल्या ग्रुपला 'ज्याला खरं औषध दिलं असतं.' जर दुसर्‍या ग्रुपपेक्षा अधिक प्रमाणावर परिणाम मिळाले तरच त्यात काही औषधी गुणधर्म आहेत असं मानलं जातं. या चाचण्यांचे वारंवार असेच परिणाम मिळाले तर त्या औषधाला मान्यता मिळते. हे औषध सजेशनचं सामर्थ्य ओलांडून रिझल्टस् देऊ शकत असल्यामुळं औषधांच्या क्षेत्रात प्रगती साधता आली. त्याचप्रमाणं शक्याशक्यतेचा नियम ओलांडून तपासणी करण्याच्या पद्धती विकसित झाल्यानं विज्ञानाची प्रगती झाली.

माणसाच्या दहा लाख वर्षाच्या आयुष्यात मानवजातीनं गेल्या 150 वर्षात उरलेल्या 9 लाख 99 हजार 850 वर्षापेक्षा अधिक प्रगती केली. त्यामागचं हे कारण आहे. आपल्याला सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती, सायंटिफिक मेथड सापडली आहे. या वैज्ञानिक पद्धतीचा काटेकोर वापर करून आज प्रत्येक क्षेत्रातलं सत्य तपासलं जातं. या फुटपट्टीवर जे खरं ठरत नाही., वैज्ञानिक पद्धतीच्या कसोटीवर जे खरं उतरत नाही त्याला कचरा, पालापाचोळा समजून फेकून दिलं जातं. सोळावं ते विसावं या चार शतकांमध्ये फलज्योतिषाला वारंवार वैज्ञानिक कसोटय़ांवर तपासण्यात आलं. ते कधीच 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी'ची शक्याशक्यतेची कसोटी ओलांडू शकलं नाही. म्हणून वैज्ञानिक जगतातून त्याला हद्दपार करण्यात आलं आहे. आता फलज्योतिष हे केवळ आपल्या अंधश्रद्धाळू मनांमुळं जिवंत आहे आणि काही अंधश्रद्धा जोपासण्याचा विडा उचललेल्या कालिदास संस्कृत विद्यापीठांसारख्या विद्यापीठात जिवंत आहे. पण या अभ्यासक्रमांना वैज्ञानिक मान्यता नाही.

पंचांगामध्ये दोन भाग असतात. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रहण हा ग्रहगोल, गती, स्थान यासंबंधित अभ्यास खरा असतो. त्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. तो आजच्या काळात 100 टक्के अचूक सांगता येतो. पंचांगामधला दुसरा भाग शुभ, अशुभ मुहूर्त, राहू, केतू, काळ, भविष्य, राशिभविष्य हे सारं निर्थक असतं. त्याला कोणताही आधार नसतो.

सारी भारतीय माणसं शुभमुहूर्तावर लग्न करतात. शुभकार्याला सुरुवात करतात तरी अनेकांची लग्न फसतात. अनेकांचे व्यवसाय, कार्य बुडतात. तरी आपला विश्वास मात्र कायम असतो.

हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या सावरकरांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, ''आमचे पेशवे प्रत्येक काम मुहूर्त पाहून करीत असत. संकट आलं तर गणपती पाण्यामध्ये बुडवून ठेवत असत.पण कधीही मुहूर्त न पाहणार्‍या इंग्रजांनी कधीही सूर्य मावळत नाही एवढय़ा मोठय़ा पृथ्वीच्या भूभागावर आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्त पाहणार्‍या आमच्या पेशव्यांची पेशवाई मात्र गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' किंवा स्वामी विवेकानंद म्हणत असतात, ''जोवर या देशातला तरुण नशिबावर विश्वास ठेवतो, नशिबात असेल तसंच घडतं यावर विश्वास ठेवतो तोवर या भारत देशाला भवितव्य नाही.'' तुमचं माझं नशीब आधी ठरलं असेल तरच ज्योतिष्याला कुंडलीच्या आधारे ते सांगता येईल. पण ते आधीच ठरलं असतं? जर ते आधीचं ठरलं असेल तर तुम्हाला मला करण्यासारखं काही उरतं काय? खरंच कुणाचा नशिबावर 100 टक्के विश्वास असतो? मी माझ्या दर भाषणात जाहीररीत्या विचारतो, ''नशिबावर कुणाचा 100 टक्के विश्वास आहे का? जो 'हो' म्हणेल, त्याच्याजवळ मी येतो. एक जोरदार थापड मुस्काटात मारतो. म्हणतो बाबारे, तुझ्या नशिबात होतं तू झापड खाल्लीस, माझ्या नशिबात होतं मी मारली, चालेल का?''

आपल्यापैकी एकालाही हे मान्य होणार नाही. जोपर्यंत मानव आपल्या मेंदूनं झापड मारण्याचं ठरवत नाही तोवर ते झापड मारणार नाहीत. म्हणून झापड मारणार्‍याचा तो निर्णय असल्यामुळं त्या कृत्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे, परिणामस्वरूप शिक्षा भोगली पाहिजे. ज्योतिष्याचा आधारच 'नशीब ठरलं आहे' हा आहे. आणि आपलं नशीब वगैरे काहीही ठरलेलं नसतं. ही निव्वळ नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट आहे. आपण भारतीय माणसं हजारो वर्षापासून या नशिबाच्या पळवाटीनं पळतो आहोत.म्हणूनच हजारो वर्षापासून आपल्या देशात जात व्यवस्था टिकली, अस्पृश्यता टिकली. गाईवर प्रेम करणारी, गाईची पूजा करणारी माणसं हजारो वर्षे इतर माणसांना शूद्र लेखून ढोरापेक्षाही वाईट जीवन जगायला मजबूर करू लागली.

आपला समाज कधीच एकसंघ नव्हता. तो जातीजातींमध्ये विखुरला होता. म्हणून 500 वर्षे लुटालुटीची आणि आठशे वर्षे गुलामगिरीची या भारताला भोगावी लागली. अब्राहम लिंकनचं एक प्रसिद्ध वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी उच्चारत असत, ''गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठेल.'' भारतात जाती-अस्पृश्यतेच्या नावावर गुलामगिरीसोबतच दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळ वेठबिगारी लादली गेली, पण त्याविरुद्ध कधीच बंड झालं नाही. कारण कर्मविपाक सिद्धांताचं अद्भुत रसायन.''बाबारे, तू अस्पृश्य का? शुद्ध का? तर गेल्या जन्मात पाप केल्यामुळं. बाबारे, हा ब्राह्मण का? तर गेल्या जन्मात पुण्य केल्यामुळं. त्यामुळं या जन्मात तुझ्या नशिबात जे आलंय ते निमूटपणे भोग. मुकाटय़ानं सहन कर. कदाचित असा वागलास तर पुढच्या

जन्मात, या जन्मातील पुण्यसंचयामुळं चांगला जन्म मिळेल.'' भारतीय माणसं फक्त गेल्या जन्माचं पापच फेडत आलीत. डोकचं पार गुलाम करून टाकलं होतं या संकल्पनेनं. म्हणून भारतात कधीच जातिव्यवस्थेविरुद्ध बंड झालं नाही. ज्योतिष्यावरचा विश्वास म्हणजे भविष्यावरचा विश्वास. आपली कुंडली मांडली जाते, ती खरी असते? त्याला काही शास्त्रीय आधार आहे? त्यातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो? हो जाता जाता, गेल्या शनिवारच्या लेखानंतर एकाचा मला चिडून 'एसएमएस' आला. 08275948967 या फोनवरून 'तुम्ही उद्या मरणार आहात.'25 तारखेला दुपारी 2.05 वाजता आलेला हा 'एसएमएस' बहुधा एखाद्या चिडलेल्या ज्योतिषाचा असावा. पोलिसांत तक्रार करण्यापेक्षा मी वाचकांनाच कळविलं. मी अजून जिवंत आहे. काय म्हणाल तुम्ही? ''कावळ्याच्या शापानं..''

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832