कारण महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात पुरोगामी प्रांत. जादूटोणाविरोधी बिलाच्या निमित्तानं मी मंत्रालयात, विधिमंडळात सारखे खेटे घालत होतो. आमचे मित्र त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. वसंतराव पुरके यांनी सेक्स एज्युकेशनसंबंधी एक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सेक्स एज्युकेशन शब्द असला तरी ती टीनएजर्सला, पौगंडावस्थेतील मुलांना शरीराची साधी ओळख करून देण्याची तयारी होती. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक पुस्तिका निर्माण करण्यात आली होती. ती पुस्तिका फडकवत, त्यातील स्त्रीपुरुष देहाची चित्रे दाखवत दाखवत अनेक जनप्रतिनिधी कडाडून तुटून पडले होते. भारतीय संस्कृतीचा हा अपमान आहे. नव्या पिढीला हे बिघडवायला निघाले आहेत. शाळाशाळांमध्ये कंडोम पुरविणार का? वगैरे वगैरे आक्षेप घेतले गेले. शेवटी या आरोपांच्या धुराळ्यात तो प्रस्ताव बाजूला पडला. वसंतराव पुरके यांनी दूरदृष्टी ठेवून नव्या पिढीच्या हितासाठी एक अत्यंत आवश्यक पाऊल उचलण्याची हिंमत केली होती, त्याबद्दल केव्हाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण पुरोगामी महाराष्ट्रातल्या विरोध करणार्या जनप्रतिनिधीचं काय? एका माझ्या ओळखीच्या जनप्रतिनिधीला मी म्हटलं, तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातून एक मोठा मोर्चा मध्य प्रदेश आणि ओरिसात न्यायला हवा. कारण पुस्तकातील चित्रांवर तुम्ही एवढे खवळलात, तर खजुराहो व कोणार्क येथे तर रतिक्रीडेची कोरीव शिल्पे आहेत, संभोग दृश्य आहेत. हजारो शाळकरी मुलं ते पाहत असतात. त्यामुळं आपली भारतीय संस्कृती रसातळात जाते आहे आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिराचं काय? भारतातील सर्वात मोठं, अत्यंत पुरातन, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेलं हे मंदिर आहे. रोज किमान लाखभर लोक या मंदिरात दर्शनाला जातात. या मंदिराच्या घुमटावर संभोग दृश्य कोरलेली आहेत. भारतीय संस्कृती वाचविण्यासाठी खजुराहो, कोणार्क, पुरीचं जगन्नाथ मंदिर तिन्हीही जमीनदोस्त करायला नको का? आता तुमच्या लक्षात आलं असेल मला चीड का आली होती ते. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली सेक्स एज्युकेशनला विरोध करणार्यांना भारत, भारतीय संस्कृती काहीही माहीत नसतं. इंग्रजांनी शंभर-दीडशे वर्षापूर्वी लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीद्वारा पेरलेल्या सेक्सविषयीच्या विकृत कल्पना घेऊनच आजही या विषयाकडे आपण पाहतो आहोत. त्या काळात इंग्लंड सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. ºिश्चनातील कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे. पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा होता. सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय. मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र तशीच प्रतिगामीच राहिली.भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा 'कामसूत्र' जनक वात्सायन ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. शशीकपूरनं यावर शेखर सुमन आणि रेखाला घेऊन एक सुंदर चित्रपट निर्माण केला होता. याद्वारे या विषयाची एक अल्पशी, पण सर्वागसुंदर ओळख भारतीयांना करून दिली. शाक्तपंथीय साधनेत, तंत्र साधनेत या विषयाकडे केवळ उदार दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनसुद्धा पाहिलं जातं. महादेवाची पिंड गावागावांत असते. गावोगाव भक्तिभावानं व आदरानं त्याची पूजा केली जाते. पिंड हे स्त्री-पुरुष लिंगाचं प्रतीक आहे, हे प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवं. निसर्गानंच मानवी प्राण्यात सेक्स हा एक अपरिहार्य भाग म्हणून निर्माण केला आहे. निर्मिती, नवी निर्मिती ही निसर्गाची, प्राणिमात्राची गरज आहे. नर आणि मादी यांनी वारंवार एकत्र यावं. त्यातून गर्भधारणा राहावी, नव्या अपत्यांचा जन्म व्हावा म्हणूनच नर आणि मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण होईल याची काळजी निसर्गानं घेतली आहे. आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे. म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष संबंधातील 'ऑरगॅझम'मधून रतिक्रीडेतील 'लैंगिक तृप्तीतून' मिळतो. केवळ आनंदच मिळत नाही तर संपूर्ण शरीर आणि मन 'ऑरगॅझम' नंतर पूर्णत: रिलॅक्स होतं. एवढं सुंदर रिलॅक्सेशन दुसर्या मार्गानं प्राप्त होत नाही. त्यामुळं सार्या टेंशन्स आणि ताणतणावांचा निचरा होतो. माणूस अंतर्बाह्य शांत, शांत होतो. त्यामुळं अधिक निरोगी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. स्वभावही अधिक संतुलित होऊ लागतो आणि यासाठी स्त्री आणि पुरुषांची मनापासून एकदुसर्याला साथ असावी लागते. तरच हे साध्य होतं. बलात्कारात हे शक्य असतं का? रतिक्रीडेतला आनंद ज्याला कळतो तो बलात्कार करणंच शक्य नाही. हे एज्युकेशन आम्हाला केव्हा व कसं मिळणार? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Wednesday 23 January 2013
'लैंगिक तृप्ती'तूनच मिळतो मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद
Monday 14 January 2013
आजच्या पिढीला 'सेक्स एज्युकेशन' आवश्यक!
वाईट याचंच वाटतं की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा समाजाचं प्रबोधन करणार्या, समाजाला चार पावलं पुढं नेणार्या संतांकरिता जी संत उपाधी वापरली जाते तीच उपाधी असल्या बेशरम माणसाकरिता महाराष्ट्रातील त्यांचे तथाकथित भक्त वापरतात.विनोबा भावेंनी 'संत' या शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे. 'सत्याचा आग्रह धरत जो समाजाला पुढे नेतो तो खरा संत' यानिमित्तानं अनेकांचं विकृत हृदय आणि विकृत विचार प्रगट झाले. 'स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. पाश्चत्त्य संस्कृतीचा पगडा असणार्या शहरी वातावरणात 'इंडियात' बलात्कार होतात. ग्रामीण भागात, 'भारतात' बलात्कार होत नाहीत.अर्थात, ज्यांना खरा भारत माहीत नाही, भारताशी ज्यांचा परिचय नाही, पुरुषी अहंगंडानं आणि काल्पनिक विश्वात रमण्याच्या ध्यासानं ज्यांची दृष्टी अधू बनली आहे अशांनी उधळलेली ही मुक्ताफळं आहेत. त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. बलात्कारी माणसाची मानसिकता नेमकी काय असते? या समाजात, पुरुषप्रधान समाजरचनेत, स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे असाच संस्कार होतो. बोलण्यातून, म्हणीतून, वागण्यातूच हाच संस्कार सतत ध्वनित होत असतो. या संस्काराचा स्त्रीसुद्घा बळी आहे. दीर्घकाळ युवा चळवळींमध्ये असल्यामुळं, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमुळं आणि तब्बल 15 वर्षे वृत्तपत्रांचे युवास्तंभ हाताळल्यामुळं भारतीय युवकांची मानसिकता फार जवळून अनुभवता आली. माझ्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेमप्रकरणं मला हाताळावी लागली. 30-35 वर्षापूर्वी दोन मनांचं प्रेम आणि त्यात काही टक्क्यांमध्ये शारीरिक संबंध असायचे. पण अलीकडच्या काळात 'बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड'च्या जमान्यात बहुतांश प्रेमसंबंध शारीरिकसुद्घा असतात. बरं, प्रेम सुरू करताना आयुष्यभराची साथ, लग्न असं काहीही कमिटमेंट नसतं. खरं म्हणजे आजच्या जमान्यात हे प्रेम शरीरसंबंध टूवे (दुतर्फा) असतात, असावेत. बरोबरीच्या नात्यानं हे रिलेशन असतं.पण जेव्हा काही कारणानं ही रिलेशनशिप तुटते तेव्हा चांगल्या सुशिक्षित, आधुनिक मुलीसुद्घा 'त्या मेल्यानं माझा भोग घेतला, मजा मारली आणि आता कंटाळा आला तर उडून चालला' या अर्थानं आरोप करतात. तेव्हा त्या आधुनिक कपडय़ाआड दडलेली, पण मुळात बुरसटलेली स्त्री बाहेर येते. या मुलींना सांगावं लागतं, तू असं बोलून स्वत:चा, तुझ्यातल्या स्त्रित्वाचा अपमानं करते आहेस. तुमच्यातले संबंध राजीखुशीचे होते. उपभोग घेतलाच असेल तर तुम्ही एक-दुसर्याचा घेतला आहे. खरं म्हणजे प्रेमाला 'उपभोग' हा शब्द वापरून प्रेमाचा आणि सेक्सचा दोहाेंचा तुम्ही अपमान करताहात. बलात्कारी मनोवृत्तीचा संबंध सरळ सरळ स्त्री-पुरुष संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे. पुरुषप्रधान भारतीय संस्कृती असो अथवा पाश्चात्त्य संस्कृती, दोन्ही विचारधारा एकच आहेत. स्त्रीदेह हा भोगाचा विषय आहे. पुरुषानं स्त्रीचा भोग घ्यायचा असतो. स्त्री त्यासाठीच जन्माला आली असते. म्हणून तिला स्वातंर्त्य नाही. इति मनुस्मृती. लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लग्नानंतर पतीच्या हाती तिला एकदाचं सोपवलं की, मग पित्याची सुटका होते. ही मानसिकता, ही विचारधारा आणि 'स्त्री ही भोग्य वस्तू आहे' ही विचारधारा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रीचं शील, चार्त्यि यांनी शुचितेशी जोडलेली विचारधारा अजूनही कायम आहे. शील आगपेटीच्या काडीसारखं असतं. एकदा ती उगाळली की, पुन्हा काडीपेटी उगाळता येत नाही. हा आदर्श, मानसिक संस्कार अजूनही तसाच आहे. फक्त प्रत्यक्षात तो अमलात येण्याची अपेक्षा ठेवण्याची कुणी हिंमत ठेवत नाही एवढंच. टीव्ही, इंटरनेटच्या जमान्यातील, आधुनिक कपडे घालणारी, इंग्रजी बोलण्यात भूषण मानणारी ही आधुनिक पिढी आगपेटीच्या काडीपासून लायटरपर्यंत (जो वारंवार पेटवला जाऊ शकतो, हवा तेव्हा पेटतो) प्रवासकर्ती झाली आहे आणि इंग्रजी बोलू न शकणारी, थोडंसं मॉडर्न बनण्याचा प्रयत्न करणारी, अजूनही ग्रामीण भाषेचा लेहजा असणारी सुशिक्षित पिढीही त्याच दिशेनं वाटचाल करते आहे.या सर्वाना इंटरनेटवर, मोबाईलवर स्त्री-पुरुष देहाची उघडीनागडी चित्र, ब्ल्यू फिल्म्स सतत आणि सहज पाहायला मिळतात. त्यातून पुन्हा मनात असलेला 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' जुनाच संस्कार पक्का होतो. विकृत पद्घतीनं चालवला जातो. बहुतांश ब्ल्यू फिल्म्स बलात्कारसदृशच असतात. शृंगार, रोमान्स या गोष्टींना फारसं स्थान नसतं. स्त्री-पुरुष प्रेमसंबंध म्हणजे फक्त 'इंटरकोर्स', 'भोगणं' हाच संस्कार अधिकाधिक पक्का होतो. दृक्-श्रव्य माध्यमामुळं तो अधिक तीव्र स्वरूपाची विकृती निर्माण करतो. चित्रपट, इंटरनेट, सेक्सी जाहिराती यातून असं चाळवलं गेलेलं मन, मुळात पुरुषी अहंगंडानं, पुरुषी मनोवृत्तीनं पछाडलं गेलेलं हे मन मग रस्त्यारस्त्यांवर छेडखानी करणं, अश्लील कॉमेंट्स करणं सुरू करतं. समाजात याविषयी 100 परसेन्ट टॉलरन्स असल्यामुळे ते चेकाळलेलं मन अधिकच सोकावतं, स्थिरावतं. अश्लील हातवारे करणं, विकृत हावभाव करणं, घाणेरडं टॉन्टिंग करणं हा आपला जन्मसिद्घ पुरुषी अधिकार आहे असं मानू लागतं आणि मग यातील काही महाभाग बलात्कारापर्यंत जाऊन पोहोचतात.बलात्काराचा इतिहास पाहिला, तपासला तर त्यातील पंचाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आधी छेडखानीचे, टॉन्टिंगचे प्रकार केले आहेत असं लक्षात येतं. मग यावर उपाय काय? सर्वप्रथम स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का? संस्कार बदलणं. मुलं आणि मुली दोन्हींबाबत. स्त्री ही बरोबरीचा माणूस आहे. तिचा, तिच्या देहाचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक पुरुषाला, मुलाला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून तशा संस्कार शाळा, कॉलेज, प्रसिद्घिमाध्यमं आणि घरातूनसुद्घा बिंबवायला पाहिजे. त्याचप्रमाणं देहाच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, बुद्घिमत्ता, कर्तृत्व हे तिच्या सौंदर्याइतकच, किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे असा संस्कार तिच्यावर केला पाहिजे. समजा, तिच्या इच्छेविरुद्घ तिच्यावर बलात्कार झालाच, तर एक अपघात, एक शारीरिक जखम एवढय़ाच अर्थानं त्याकडे पाहायला स्त्रीनं शिकलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे अन्यथा एवढय़ा महत्प्रयासानं मिळालेलं स्वातंर्त्य स्त्रीला गमवावं लागेल आणि तेही काही विकृत पुरुषांच्या भीतीपोटी, तिचा काहीएक दोष नसताना स्वातंर्त्य तिला गमवावं लागेल. ज्युडो-कराटे शिकून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत असेल तर शिकायला, शिकवायला हरकत नाही. पण बलात्कार झाला तरी त्याला एका जखमेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, हा संस्कार मात्र त्यासोबत तेवढाच प्रभावीपणे बिंबवला पाहिजे. तरच स्त्रिया मोकळेपणानं वावरू शकतील. नवी नवी क्षेत्रे पादाक्रांत करू शकतील. देशभर बलात्कारविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा फायदा उचलून सरकार-पोलिसांनी काही कडक पावलं उचलली पाहिजे. छेडखानी, अश्लील कॉमेंट्स याबाबत झिरो टॉलरन्स निर्माण झाला पाहिजे आणि या गुन्ह्याखाली अटक झालेल्या मुलांची व त्यांच्या आई-बापांची व शाळा-कॉलेजेसची नावं वृत्तपत्रात प्रसिद्घ केली पाहिजे. आपला दिवटा तरुण चिरंजीव मुलींना छेडत असेल तर आई-वडिलांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे. कारण घरातला दुटप्पी संस्कार याला जबाबदार असतो. आपल्या मुलींना छेडलं तर जे आई-वडील गंभीर बनतात तेच आई-वडील मात्र आपल्या मुलाच्या अशा कृत्याकडे कानाडोळा करतात. हा अक्षम्य अपराध आहे. मी ज्या काळात विद्यापीठ परिसरात एम. ए. इंग्रजी करत होतो त्या काळात अशा छेडखानी करणार्या मुलांविरोधात मोहीम उघडली होती. हातात दै. 'तरुण भारत'चा 'महाविद्यालयाचा परिसर' कॉलम होता. आपलं नाव पेपरात छापून येईल या धाकानंच अनेकांचं 'पौरुष' थिजलं होतं. छेडखानी आटली होती. हा एक प्रभावी मार्ग बनू शकतो. शाळा-कॉलेजातूनही छेडखानीविरोधात मोहिमा राबवायला हव्यात. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींचं नीट प्रबोधन करायला हवं. सहजीवन, एक-दुसर्याचा सन्मान करायला, शिकवायला हवं. तशा चर्चा घडवून आणायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीचं सेक्स एज्युकेशन करायला हवं. बलात्कार करून, ओरबाडून कोणताच आनंद मिळत नाही, तर दोघांच्या सहमतीनं, रोमान्ससह असलेल्या प्रेमसंबंधातूनच खरा आनंद मिळतो, हे ज्ञान सर्वापर्यंत पोहचवणं नितांत गरजेचं आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
बलात्कारास प्रोत्साहन देणारी मानसिकता विकृत
यावर केल्या जाऊ शकणार्या उपायांचा, सूचनांचा पाऊस पडतो आहे. बलात्कार्याला फाशी द्या, त्याला नपुंसक करा, कायदा कडक करा इत्यादी सूचना, उपाय सुचविले जाताहेत. कायदा कडक झाला पाहिजे. बलात्कारी पुरुषाला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे. एवढी कडक शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा दुसरा कुणी बलात्कार करण्यास धजावणार नाही. असं घडावं याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. बलात्काराचं, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही कारणानं, कोणत्याही काळी समर्थन होऊच शकत नाही. कुणीही सहृदय माणूस बलात्काराचं समर्थन करण्यास, धजावणारचं नाही हे खरं असलं तरी बलात्कार होतात का होतात? यामागच्या मनोवृत्तीचा, मानसिक कारणांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू या. एबीपी माझा या वृत्तवाहिनींनं आयोजिलेल्या बलात्कार या विषयावरील एका चर्चात्मक कार्यक्रमात गेल्या पंधरवडय़ात मी सहभागी झालो होतो. त्या वेळी काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात आल्या. यानिमित्तानं काही महत्त्वाच्या बाबींकडे, इतिहासाकडे लक्ष वेधून घेण्याची गरज वाटते. 1975 साली 25 जूनला 'आणीबाणी' घोषित झाली आणि 27 जूनला आम्ही काही सहकारी वर्धा जेलमध्ये कोंबले गेलो. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष इथापे हे तीन विद्यार्थी वगळता बाकी 900 कैदी हे गुन्हेगार होते. अनेक अट्टल गुन्हेगार होते. त्यात एक गोरा गोमटा, उंचपुरा, स्मार्ट कैदी होता. पुलगाव सैनिक कॅम्पमधील एक माजी सैनिक पण अख्ख्या जेलमधील एकही कैदी त्याच्याशी बोलत नसे, संपर्क ठेवत नसे. सारे त्याच्याशी अत्यंत तुच्छतेनं वागत असत. पुढे कारण कळलं. त्यानं त्याच्याच ऑफिसरच्या बायकोवर बलात्कार केला आहे. म्हणून सार्या कैद्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. पुढे अनेक कैदी मित्र झाले. त्यांच्या अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली. तेव्हा कळले की गुन्हेगारांचीसुद्धा एक मूल्यव्यवस्था असते. चोर, दरोडेखोर, खुनी माणसंसुद्धा बलात्कारी गुन्हेगाराला 'गया गुजरा', 'एकदम हिणकस,' हमारे साथ बैठने लायक नही' समजतात. हे कळल्यावर एका बाजूनं आश्चर्य वाटलं; पण दुसर्या बाजूनं फार बरं वाटलं. असाच प्रसंग आता घडला. दिल्लीतील तरुणीवर बलात्कार करणार्या संशयित गुन्हेगाराला तिहाड जेलमधील कैद्यांनीच बदडून काढलं. बलात्कार हा गुन्हा, हे कृत्य अट्टल गुन्हेगारांनासुद्धा तिरस्करणीय वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे. पण 1992-93 च्या मुंबई दंगलीमध्ये आणि गुजरातच्या दंगलींमध्ये अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले. पण हे बलात्कार करणारे कुणी अट्टल गुन्हेगार नव्हते, अथवा चवचाल, विकृत समजले जाणारे तरुण नव्हते. तर उलट धर्माभिमानी म्हणविणार्यांनी, काही तथाकथिक सुसंस्कृत लोकांनी, हे बलात्कार केले होते आणि तेही धर्माच्या, धर्मरक्षणाच्या नावावर बलात्कार केले होते. त्यातील काही केसेस तर काळजाचा थरकाप उडविणार्या आहेत. दंगली आधी ज्या घरांसोबत घरोबा होता. एका घरात शिजलेली भाजी दुसर्या घरात जात असे. एवढे जिव्हाळ्य़ाचे संबंध आहेत. अशा दुसर्या धर्माच्या घरातील स्त्रीवर ओळखीच्या पुरुषांनी बलात्कार केलेत आणि हे बलात्कार करविण्यात पुढाकार घेणार्या स्त्रिया आहेत. आपल्याच तरुण मुलांना रोजारणीवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देताहेत, अशा किमान दोन केसेस मला माहीत आहेत. पोलीस तपास अधिकार्यांच्या तोंडूनच त्या ऐकल्या आहेत. अर्थात, याच मुंबई दंगलीत इतर धर्मातील स्त्रियांना प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविल्याची, बलात्कार वाचविल्याची व शेजारधर्म प्रखरपणे पाळल्याची अनेक उदाहरणंही मला माहीत आहेत. म्हणूनच माणुसकीवरचा विश्वास अजून कायम आहे. पण याच दंगलीच्या काळात इतर धर्मीयांवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणार्या नेत्याचा अत्यंत बीभत्स चेहरा सप्रमाण उघड झाला होता, हेही अत्यंत विदारक सत्य आहे. 1971-72 सालच्या बांगलादेश युद्धाच्या आधी आम्ही काही 'तरुण शांती सैनिक' बंगालमधील 'बनगाव' या बॉर्डरच्या गावी काही सेवा कार्य करीत होतो. पाकिस्तान बॉर्डर केवळ तीन-चार किलोमीटर अंतरावर होती. हजारो बंगाली पाकिस्तानी शरणार्थी भारताच्या सीमेत प्रवेश करीत होते. त्यांची व्यवस्था 'बनगाव' कॅम्पमध्ये केली जात असे. त्यामध्ये अनेक बलात्कारित स्त्रिया असत. अनेक तरुणींचे स्तन कापले असत. योनीमध्ये संगिनी खुपसल्या असत. बांगला स्त्रियांचा अपमान करणं, सूड उगवणं हे परमराष्ट्रीय धर्मकर्तव्य आहे असं समजून पाकिस्तानी मिल्ट्री हे करीत असे. पाकिस्तानी बंगाली स्त्रियांना भारतीय बॉर्डरमध्ये शिरण्याआधी सर्वासमक्ष पकडून पाकिस्तानी सैनिक बलात्कार करीत आणि बंदुका, रायफली ताणून उभ्या असलेल्या भारतीय सैनिकांना खिजविण्यासाठी, तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही असं दाखविण्यासाठी तर अधिकच चेकाळून ही कृत्य केली जात. त्या वेळी बॉर्डरवरच्या या सैनिकांची चाललेली मानसिक उलाघाल आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. आपल्या समक्ष बलात्कार केले जाताहेत, स्तन कापले जाताहेत, संगिनी योनीत खुपसल्या जाताहेत, नग्न केलं जात आहे. केवळ काही फर्लाग अंतरावर हे संगळं घडताना दुर्बिणीशिवाय प्रत्यक्ष डोळ्य़ांनी दिसत आहे. हातात शस्त्र आहे, लढण्याची खुमखुमी आहे. पण ऑर्डर नाही म्हणून हात चोळत बसण्याशिवाय काहीही करता येत नाही. अशा अत्यंत उद्विग्न मनोवस्थेत असलेल्या सैनिकांना आम्ही पाहिलं आहे. सैनिकांचं नियंत्रण सुटून आदेशाशिवाय युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आपल्या सैनिकांची एका बाजूनं समजूत काढत असतानाच आतून मात्र संतापानं प्रचंड पेटलेले सैनिक अधिकारीही त्या वेळी जवळून पाहिले आहेत. या सर्व परिस्थितीमुळेच त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींना पूर्व पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडलं असावं. पण पुढचं आम्हाला काही पाहता आलं नाही. युद्ध सुरू झालं. पेटलेल्या सैनिकांनी अवघ्या काही दिवसांत अख्खा पूर्व पाकिस्तान ताब्यात घेतला आणि 1 लाख पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करून स्वत:ला भारतीय सैन्याच्या हवाली केलं. जगाच्या इतिहासात यापूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा संख्येनं शस्त्रसज्ज सैनिकांनी शरणागती पत्करली नव्हती. भारतीय सैन्यानं इतिहास घडविला. पाकिस्तानी सैनिक बॉर्डरवर बलात्कार करताना, छळताना विचार करीत नसत की, ही स्त्री कोणत्या धर्माची आहे. दोन्ही धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार करीत असत. सैनिक आणि बलात्कार हा युद्धाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. पहिल्या आणि दुसर्या अशा दोन्ही महायुद्धात मोठय़ा प्रमाणात स्त्रियांवर बलात्कार झाले आहेत. हिटलरच्या नाझी सैन्यानं जसे असंख्य अमानुष बलात्कार केलेत तसंच प्रमाण कमी असलं तरी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनीही बलात्कार केले आहेत. सैनिकांच्या बलात्कारांनी तर सारा भारताचा इतिहास भरलेला आहे. शिवाजी राजांच्या उदयाच्या आधी युद्धात प्रदेश जिंकला की जिंक णारे सैनिक, सरदार सारेच त्या परिसरातील तरुण, सुंदर स्त्रियांना पकडून बलात्कार करीत असत. तेवढय़ानं मन भरलं नाही तर त्यातील विशेष सुंदर स्त्रियांना सोबत घेऊन जात आणि आपल्या नाटक शाळेत व जनानखान्यात भरती करीत असत. युद्धात जिंकण्यासोबतच पराजित परिसरातील स्त्रियांना भोगण्याचा, पळविण्याचा, बलात्कार करण्याचा अधिकारच प्राप्त होतो. असा समज आणि शिरस्ता त्या काळी होता. आपल्या सैनिकांना असे बलात्कार करण्यास बंदी घालणारा, ही आज्ञा मोडल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्याला कडक शिक्षा करणारा पहिला राजा इतिहासानं पाहिला तो शिवाजी राजा. स्त्रियांचा सन्मान राखणारा, तो सन्मान राखलाच जाईल याची काळजी घेणारा जाणता राजा म्हणूनच अद्वितीय आहे, महान आहे. पण शिवाजी राजा नंतर काय? काश्मीर, पंजाब, नागालंॅड वगैरे परिसरात काय घडलं? भारतीय सैनिकांवर बलात्काराचे अनेक आरोप झालेत. भारतीय कायद्यानुसार काही सैनिकांना शिक्षाही झाली. पुरुष स्त्रीवर बलात्कार का करतो? बलात्कार करणारा पुरुष विकृत असतो का? की बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणारी मानसिकता घडविणारी परिस्थिती विकृत असते? या परिस्थितीला पुरुषप्रधान संस्कृती म्हणतात का? या संस्कारात घडलेल्या प्रत्येक पुरुषाच्या मनाच्या एका कोपर्यात बलात्कारी दडला आहे का? पुढे शोधू या प्रश्नांची उत्तरं. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत ) भ्रमणध्वनी : 9371014832 एारळश्र- ीहूरारपर्रीùीशवळषषारळश्र.लेा |
Subscribe to:
Posts (Atom)