Saturday 30 June 2012

स्नेह देसाईनंतर आता पोलखोल दत्ता घोडेची!


स्नेह देसाईनंतर आता
पोलखोल दत्ता घोडेची!
'थर्ड आय'ची जाहिरात करणारा 'निर्मल बाबा' सध्या अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस केसेस दाखल झाल्या आहेत. 'थर्ड आय' अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती दोन दिवसांच्या वर्कशॉपमधून (प्रत्येक विद्यार्थ्याची) जागृत करून दाखवतो. फक्त त्यासाठी 6900 रुपये फी भरून माझ्या कार्यशाळेत दाखल व्हा असा भंपक दावा करणारा अहमदाबादचा माईंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईनं चक्क आव्हानातून पळ काढला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याला 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं होतं. ते न स्वीकारताच पळून जाणं त्यानं पसंत केलं.

नागपुरात आता स्वत:ला डॉ. म्हणवणार्‍या एका नकली डॉ. दत्ता घोडेची कार्यशाळा होणार आहे. त्याची काही व्याख्यानं वसंतराव देशपांडे सभागृहात झालीत. तो कमी पैशात अद्भुत शक्ती प्राप्त करून देण्याचा दावा करतो. 5500 रुपये भरा माझी कार्यशाळा करा तुमचा 'सिक्स्थ सेन्स' जागृत होतो. त्यामुळं तुम्हाला तुमच्या परिचित माणसाशी तो कितीही दूर असला तरी टेलिफोनशिवाय संवाद साधता येईल, बोलता येईल. एका माणसाचं मन दुसर्‍या माणसाशी बोलू शकेल. म्हणजेच 'सिक्स्थ सेन्स' जागृत होईल. अंतराची मर्यादा नाही. परदेशातल्या माणसाशीही तुम्हाला (विदाऊट आयएसडी चार्जेस) संवाद साधता येईल, असा दावा या दत्ता घोडेनं केला. हाही माईंड पॉवर ट्रेनर. स्नेह देसाईसारखाच दुसरा एक ठग.

यालाही अ. भा. अंनिसनं 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं. हाही न स्वीकारता पळ काढणार! शनिवारी हा लेख प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी त्याची कार्यशाळा नागपुरात हिंदी मोर भवनात (सीताबर्डी, नागपूर) सुरू होणार आहे. आणि दत्ता घोडेनं आव्हान स्वीकारलं नाही तर अ. भा. अंनिस कार्यशाळेसमोर त्याच्या निषेधासाठी निदर्शनं करणार आहे. अ. भा. अंनिस गेली 30 वर्षे बुवाबाजी, चमत्कार करणार्‍या बाबांचा, मांत्रिकांचा, देव, देवी अंगात असल्याचा दावा करणार्‍यांचा, ज्योतिष्यांचा भंडाफोड करते आहे. आजवर हजारो अशा भोंदूंचा पर्दाफाश समितीनं केला आहे.

पण अलीकडे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांच्या नावाखाली, सुटबुटटाय घालून, आधुनिकतेचं व वैज्ञानिकतेचं सोंग आणून जुनीच बुवाबाजी धुडगूस घालते आहे. लहानपणापासून मनावर झालेल्या अंधश्रद्धाळू संस्कारांचा फायदा उचलून, विविध आमिषं दाखवून सामान्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे.भगवी कफनी घातलेल्या बाबांपेक्षा हे सुटबुटातले बाबा जास्त घातक आहेत, धोकादायक आहेत, तरुण पिढीला खड्डय़ात टाकण्याचं काम करणारे आहेत.

'व्यक्तिमत्त्व विकास' ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे आधुनिक सुटाबुटातले बाबा त्याचाच फायदा उचलून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली बेमालूमपणे अंधश्रद्धा पेरताहेत व स्वत:ची तुंबडी भरताहेत. म्हणून यांना यांची जागा दाखवणं व यांना गजाआड करणं नितांत गरजेचं आहे. स्नेह देसाई आणि दत्ता घोडे या दोघांचेही दावे सारखेच आहेत. एक 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' म्हणतो, दुसरा 'सिक्स्थ सेन्स' म्हणतो, एवढाच काय तो फरक. देसाई म्हणतो, तुम्ही कुठेही जाऊन सूक्ष्म देहाने पाहू शकता. दत्ता घोडे म्हणतो, तुम्ही इथे राहून कुठेही, कितीही अंतरावरच्या माणसाशी बोलू शकता. पॅरासायकॉलॉजीमध्ये 'अँस्ट्रल ट्रॅव्हल'ला 'क्लेअरोव्हायन्स' म्हणतात. दूर-संवादाला 'टेलिपॅथी' म्हणतात.

म्हणून दोघांनाही अ. भा अंनिसनं सारखं आव्हान टाकलं. आम्ही एक सत्य अन्वेषण समिती गठित करू. त्यात नागपुरातले ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते असतील. स्नेह देसाई व दत्ता घोडेनं निवडलेल्या एका माणसाला एका बंद खोलीत बसवलं जाईल. या व्यक्तीला सत्य अन्वेषण समिती काही कृती करायला वा बोलायला सांगेल. तो भाग व्हिडीओ रेकॉर्ड केला जाईल. त्याचवेळी स्नेह देसाई वा दत्ता घोडे पत्रकार संघाच्या हॉलमध्ये बसून त्यांच्या माणसानं काय कृती केली वा बोलला हे मेडिटेशनमध्ये जाऊन थर्ड आय जागृत करून वा सिक्स्थ सेन्स जागृत करून सांगावं. तेही व्हिडीओ रेकॉर्ड केलं जाईल. सत्य अन्वेषण समिती दोन्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून निर्णय देईल. जर स्नेह देसाई व दत्ता घोडेला 95 टक्के खरं सांगता आलं तर त्यांचा दावा खरा आहे असं मानलं जाईल. पुन्हा एकदा सेम प्रक्रिया रिपिट केली जाईल. दोन्हीदा 95 टक्के खरं ठरलं तर अ. भा. अंनिसचं 15 लाखांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. पहिल्यांदा त्यांना 95 टक्के खरं सांगता आलं नाही तरी दुसर्‍यांदा स्नेह देसाई वा दत्ता घोडे यांना संधी दिली जाईल.

या पद्धतीचं आव्हान स्नेह देसाईला पाठवलं. त्यानं स्वीकारण्यास नकार दिला म्हणून कोरिअरनं पाठवलं. तेही त्यानं नाकारलं म्हणून ई-मेलनं पाठवलं. दत्ता घोडेला आव्हान प्रत द्यायला कार्यकर्ते गेले. त्याच्या माणसांनी ते घेतलं नाही. दुसर्‍यांदा गेले तेव्हा स्वीकारत नाही म्हणून त्याच्या माणसांसमोर आव्हान प्रत ठेवून आले. एवढंच नव्हे तर विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने अ. भा. अंनिसनं आयोजिलेल्या 27 जूनच्या 'थर्ड आय किती खरं किती खोटं' या जाहीर कार्यक्रमात दत्ता घोडेलाही स्नेह देसाईसोबतच जाहीर आव्हान दिलं आहे. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. हॉलमध्ये जागा अपुरी पडल्यामुळं अनेकांना परत जावं लागलं होतं.

थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, दिव्यशक्ती, सिक्स्थ सेन्स, टेलिपॅथी या सगळय़ा प्रकारांबद्दल मी वा माझी समिती एवढं ठामपणे कसं काय बोलू शकतो? असा प्रश्न आपणास पडला असेल. दिव्यशक्ती, अँस्ट्रल ट्रॅव्हल, क्लेअरोव्हायन्स याचा अर्थ ''व्यक्ती एका ठिकाणी असताना त्याचा देह तिथेच राहतो. पण सूक्ष्म देहानं वा अन्य शक्ती मार्गानं तो कुठेही जाऊ शकतो, पाहू शकतो. स्वत: डोळय़ानं पाहिल्यासारखं सगळं त्याला दिसतं,'' असं मानलं जातं. कुठेही याचा अर्थ क्षणात, जगात कुठेही अमेरिकेत, हिमालयात कुठेही. टेलिपॅथीचा अर्थ कितीही अंतरावर दोन माणसं असली तरी त्यांना कोणत्याही अस्तित्वात असलेल्या माध्यमांशिवाय संवाद साधता येतो. मन मनाशी बोलू शकतं. या दोन्ही समजुती वा कल्पना जगभर अस्तित्वात होत्या. आध्यात्मिक शक्तीमुळं काही लोकांना, योग्यांना, साधूंना या प्रकारची क्षमता वा शक्ती प्राप्त होते अशी मान्यता होती.

माझं पंचवीस वर्षांपर्यंतचं आयुष्य आध्यात्मिक वातावरणात गेलं आहे. मला स्वत:ला या सगळय़ा शक्तींविषयी प्रचंड जिज्ञासा होती. खूप अभ्यास केला. विनोबा भावेंसारखा योगी जवळून पाहिला, अनुभवला. अनेक पोहोचलेल्या (म्हणजे आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेल्या) बाबांच्या नादी लागलो. पुढे या विषयाचा जमेल तेवढा अभ्यास केला. पण काही सापडेना.

मी पुण्याच्या किलरेस्कर प्रेसमध्ये पत्रकाराची नोकरी करायला लागल्यावर 80-82 सालात विज्ञानवादी विचारांचा परिचय झाला. अभ्यासाचा परीघ वाढला आणि पुढे कळलं, आपण ज्याचा शोध घेतो आहे त्या विषयांवर शास्त्रशुद्धरीत्या संशोधन झालं आहे. अमेरिकेमधील डय़ूक युनिव्हर्सिटीमध्ये एक पॅरासायकॉलॉजी (परामानसशास्त्र) डिपार्टमेंट होतं. डॉ. जे.बी. र्‍हाईन यांच्या नेतृत्वाखाली तिथे सगळय़ा आध्यात्मिक शक्तींबाबत संशोधन सुरू झालं. त्यांनी या सगळय़ा शक्ती तपासण्याची एक शास्त्रशुद्ध अचूक मेथड (पद्धती) वापरण्याची शिस्त निर्माण केली. डॉ. र्‍हाईन यांच्यानंतरही संशोधन सुरू राहिलं.

अशा पद्धतीची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स जगभर सुरू झाली. त्यातही संशोधन होत राहिलं. आत्मा, पुनर्जन्म, दिव्यशक्ती, टेलिपॅथी, सिक्स्थ सेन्स, क्लेअरोव्हायन्स, इन्टय़ुशन, सायकोकायनेसिस (नजरेनं चमचा वाकवण्याची क्षमता) या सगळय़ांवर दीर्घकाळ संशोधनं सुरू होतं. अमेरिकेतील डय़ूक युनिव्हर्सिटीतील संशोधनांवर हजारो कोटी खर्च झालेत. पण 75 वर्षांत एकही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. म्हणून हे पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट बंद करण्यात आलं. हळूहळू जगभरची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स बंद पडलीत. जी सुरू आहेत त्यांना वैज्ञानिक जगतात मान्यता नाही, प्रतिष्ठा नाही.

या गोष्टी खर्‍या नाहीत हे निर्विवादपणे सिद्ध झालं आहे. अमेरिकन मिल्ट्री व रशियन मिल्ट्रीनंही अशा संशोधनांवर खूप खर्च केला. पण काहीच मिळालं नाही. एक जरी दिव्यशक्ती असणारा माणूस मिळाला असता तर 26/11 चा मुंबईवर होणारा अतिरेकी हल्ला, (किमान अतिरेकी जहाजात बसल्यावर तरी) आधीच कळला असता.

आपलं सैन्य, पोलीस दल समुद्रकिनार्‍यावर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीत राहिलं असतं. काही मिनिटांत 10 अतिरेकी मारले गेले असते आणि आमचे मित्र, एटीएसचे प्रमुख पोलीस अधिकारी हेमंत करकरे मारले गेले नसते.बिन लादेनला शोधण्यासाठी व मारण्यासाठी करोडो डॉलर्स व अनेक वर्षे वाया घालवावे लागले नसते. एक स्नेह देसाई व दत्ता घोडे.. खरंच यांच्यात अशी शक्ती असती तर पोलीस खात्याचं कामच सोपं झालं असतं. नागपुरातील मोनिकाचे मारेकरी शोधण्यासाठी नागपूर पोलिसांना जंग जंग पछाडावं लागलं नसतं. बस्स, यांच्या दिव्यशक्तीनं, 'सिक्स्थ सेन्स'नं तत्काळ शोध लागला असता. आपण असे दिव्यशक्तीवाले स्नेह देसाई त्यांचे चेले पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस खात्यात अधिकृत नेमले असते. एकही चोरी, एकही खून केस अनसॉल्व्हड राहिली नसती. 100 टक्के केसेस सोडवण्याचा पोलीस रेकॉर्ड निर्माण करता आला असता. पण हे शक्य आहे?

भंपक स्नेह देसाई नामक बाबा कार्यशाळेत म्हणाला, ''हे अंनिसवाले काय मला 15 लाख देतात? मीच त्यांना 15 करोड रुपये देऊ शकतो. माझ्याजवळ करोडोंची संपत्ती आहे.'' लोकांना खोटी लालूच दाखवून, लुबाडून कोटय़वधी रुपये कमावणार्‍या ठग देसाईची मस्ती, माज उतरवण्याची वेळ आली आहे. गणेशपेठ पोलीस चौकीत स्नेह देसाईविरुद्ध दोन लोकांनी तक्रार केली आहे. नागपूरचे पोलीस कमिश्नर अंकुश धनविजय यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे. स्नेह देसाईंकडून फसवल्या गेलेल्या लोकांनी हिंमत दाखवून, तक्रार करण्यास पुढे यावं आणि नागपूरचं पोलखोल शहर नावाची प्रतिष्ठा राखण्यास मदत करावी. पुढचा नंबर दत्ता घोडेचा आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी - 9371014832

Thursday 28 June 2012

दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा


दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा

       पुण्याची गोष्ट. काही वर्षापूर्वी माझ्या कार्यशाळेचा एक विद्यार्थी आपल्या बहिणीला घेऊन आला. काउन्सिलिंगसाठी. केस फारच विचित्र होती. बहीण सांगू लागली, की माझा नवरा एवढ्यात माझ्यावर खूप संशय घेतो. पंधरा दिवसांपूर्वी तो मला म्हणाला, ''मी तुला रंगेहाथ पकडलं. आज दुपारी तू तुझ्या प्रियकरासोबत घरात रासक्रीडा करत होतीस. तू ब्ल्यू रंगाचा गाऊन घातला होता. तुझ्या त्या प्रियकरानं लाल रंगाचा शर्ट घातला होता आणि तुम्ही माझ्या घरात माझ्या बेडवर असली थेरं करता?'' असं म्हणून तो खूप भांडू लागला. मी त्याला परोपरीनं समजावून सांगत होती, की असं काही नाही. मी एकटीच घरी होते. झोपले होते. तुम्ही केव्हा आलात? केव्हा पाहिलंत? पण या प्रश्नांचं उत्तर न देताच तो खूप भांड भांड भांडला.

पुन्हा आठ दिवसांनी याच पद्धतीचा आरोप त्यानं केला. या वेळी मी हिरवा गाऊन घातला होता अन् माझ्या प्रियकरानं पांढर्‍या रंगाचं शर्ट घातलं होतं असं सांगून आम्ही कशी रतिक्रीडा करत होतो याचं साद्यंत वर्णन करू लागला. जणू काही बेडरूममध्ये उभा राहून तो सारं पाहतो आहे.

पुन्हा कडाक्याचं भांडण.. हे सारं खोटं आहे म्हटल्यावर त्यानं माझ्या अंगावर हात टाकला. मला खूप मारलं. ती काकुळतीनं सांगत होती, ''सर, हे सारं खोटं आहे हो! मी असं काही केलं नाही. माझा कुणी प्रियकर नाही. लग्नाला दोन वर्षे झाली. आता अचानक हे असं का करतात? माझ्यावर कां खोटा आळ घेतात?'' मुलगी अगदी प्रामाणिकपणे बोलत होती. इतक्या वर्षाच्या अनुभवाच्या आधारे ती खरंच बोलते आहे हे माझ्या लक्षात येत होतं.

मी तिला समजावू लागलो. काही माणसं संशयापायी एवढी पछाडली जातात, की मनात आलेली शंका त्यांना खरीच वाटायला लागते. कधीकधी हा आजार बळावला तर त्यांना तशी दृश्येही दिसायला लागतात. आम्ही याला 'पॅरोनिया', 'संशयपिशाच' म्हणतो. तो पेशंट आहे असं समजून त्याला वागवावं लागेल. प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागेल. मी समजावून सांगितलं. बहीणभाऊ पोलिसांकडे तक्रार करणार होते. त्यापासून त्यांना परावृत्त केलं.

बहिणीने जाता जाता मला विचारलं, ''सर, मेडिटेशनमुळं असं होतं कां? माझा नवरा म्हणतो, मी प्रत्यक्ष पाहिलं. मला दिसतं. कुठलंही मी पाहू शकतो. कुणा गुजरातच्या देसाईचा मेडिटेशन कोर्स माझ्या नवर्‍यानं केला आहे.''

''मेडिटेशनमुळं असं होत नाही. असं होत नसतं.'' असं सांगून मी त्यांना पाठवलं. पण त्यांचे वाद वाढतच गेले. त्यांना वेगळं होणं भाग पडलं. माझ्या विद्यार्थ्यानं पुढे मला माहिती पुरवली त्याच्या बहिणीनं वैतागून घटस्फोट द्यायचं ठरवलं.

14 जूनला नागपूरच्या देशपांडे सभागृहात अहमदाबादच्या माइंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईचा कार्यक्रम झाला. माझे काही कार्यकर्ते ऐकायला गेले होते. त्यात देसाईनं दावा केला, ''माझा दोन दिवसांचा वर्कशॉप केल्यानंतर मेडिटेशनद्वारे 'थर्ड आय'ची शक्ती जागृत होते. ('अँस्ट्रल ट्रॅव्हल' असंही त्याला म्हटलं) त्याद्वारा तुम्ही नागपुरात असताना तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी दिल्लीत वा कुठेही असले तरी तुम्ही त्यांना पाहू शकता. ते त्या वेळी काय करताहेत, त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत वगैरे सारं तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.''

16-17 जून रोजी नागपुरात झालेल्या वर्कशॉपमध्ये स्नेह देसाईनं मेडिटेशनमध्ये सूचना दिली, ''आता तुम्ही शरीराच्या बाहेर आला आहात. स्वत:ला पाहता आहात.. तुम्हांला आता जिथे जायचं आहे तिथे जा.. पाहा'' आणि मग काही लोकांनी घरी जाऊन पाहिलं. कुणी दूरवरच्या गावी जाऊन पाहून आले. काहींनी परदेशात मित्र-नातेवाईक काय करतात तेही पाहिलं. नंतर त्यांचे अनुभव रेकॉर्डही केलेत.

काय प्रकार आहे हा? मी गेली 22 वर्षे हिप्नोथेरपी, संमोहन उपचार शिकवतो. सुरुवातीस प्रामुख्यानं मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, सोशलवर्कर्स यांना शिकवत आलो. पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर विविध प्रकारे संमोहनाचे प्रयोग करून पाहिले आहेत. सर्वसाधारणत: सुशिक्षित लोकांपैकी 60 ते 70 टक्के लोक डीप-मेडियम ट्रान्समध्ये जाऊ शकतात. त्यांना सहज व्हिज्युअलाजेशन होतं. डोळ्य़ांपुढे चित्रमालिका उभी राहते. म्हणजे या अवस्थेत जी कल्पना मनात करतात अथवा त्यांना सांगितलं जातं ते प्रत्यक्ष दिसू लागतं. अगदी स्पष्ट-स्वच्छ दिसतं. डोळे बंद असताना उघडय़ा डोळ्य़ांनी पाहिल्यासारखं सारं दिसतं. पण हे सारं काल्पनिक असतं. खरं नसतं. ही मानवी मनाबाबत सहज घडून येणारी गोष्ट आहे. या व्हिज्युअलाजेशनच्या मानवी मनाच्या, सामर्थ्याचा उपयोग संमोहन उपचारांमध्ये रोगदुरुस्तीकरिता व्यक्तिमत्त्वविकासाकरिता केला जातो.

चलाख स्नेह देसाई बुवांनी हे तेच (पुण्याला मेडिटेशन शिकविणारे ते देसाईबाबा हेच आहेत हे आता मला कळलं.) व्हिज्युअलाजेशनचं सामर्थ्य म्हणजे थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल असल्याचं सांगून तुम्ही दोन दिवसांत 'दिव्य दृष्टी' प्राप्त करू शकता असं सांगून चक्क लोकांना फसविण्याचा धंदा सुरू ठेवला आहे. ही केवळ मनाची कल्पना असते ही वस्तुस्थिती न सांगता तुम्ही सूक्ष्म देहानं कुठेही जाऊन पाहू शकता असं हा स्नेह देसाई नामक भंपक बाबा सांगतो.

भारतीय संस्कारात वाढलेला माणूस 'दिव्य दृष्टी'च्या या सिद्धान्तावर चटकन विश्वास ठेवतो अन् भरपूर पैसे भरून स्वत:ला फसवून घेतो. माझ्या विद्यार्थ्याच्या बहिणीच्या त्या नवर्‍यानं पुण्यात स्नेह देसाईची कार्यशाळा केली. त्याची थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती जागृत झाली अशी त्याची समजूत झाली. दुकानात असताना मेडिटेशनमध्ये जाऊन तो घरी बायको काय करते हे पाहू लागला. (त्याला वाटू लागलं आपण घरी जाऊन सूक्ष्म देहानं खरंच पाहतो आहे.) त्याला त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत रतिक्रीडा करताना दिसू लागली. त्याच्या मनात जशी कल्पना येईल तसं दिसेल. हा सारा मनाचा खेळ. पण त्यांच्या भंपळ बाबानं, स्नेह देसाईनं तर सांगितलं होतं, की तुम्ही सूक्ष्म देहानं प्रत्यक्ष जाऊन पाहता. मग दिसतं ते सारं खरंच असं त्याला वाटू लागलं. त्या वेळी त्या मुलीला मी पोलीस तक्रारीपासून परावृत्त केलं याचं वाईट वाटतं. मारहाणीच्या केसमध्ये तिच्या नवर्‍याच्या जबाबात देसाईच्या 'थर्ड आय'चा उल्लेख आला असता.. आणि.. पण मेडिटेशनच्या नावाखाली एवढा खोटारडेपणा करणारा स्नेह देसाईंसारखा एखादा ट्रेनर असू शकतो हे त्या वेळी मला माहीत नव्हतं. म्हणूनच आता आपण त्याला 15 लाखांचं आव्हान टाकलं आहे. 'थर्ड आय' सिद्ध करा, 15 लाख रु. जिंका! नाहीतर जनतेची माफी मागा!

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी : 9371014832

रागाने पाहण्याचा परिणाम


रागाने पाहण्याचा परिणाम

रागाने पाहण्याचा परिणाम
'मनी वसे ते स्वप्नी दिसे', 'मन चिंती ते वैरीना चिंती', 'मन चंचल असतं', 'मन वायुवेगापेक्षाही वेगवान असतं', 'माझ्या हृदयात तुझं स्थान अढळ आहे', 'मनात फक्त तू आणि तूच आहेस', 'माझं हृदय तू छिन्नविछिन्न केलंस', 'माझं मन शुद्ध आहे',. 'मन मोकाट.. वारू', 'मनावर ताबा मिळवतो तोच खरा..!', 'माझं मन थार्‍यावर नाही', 'मन आनंदानं भरून आलं', 'मन दु:खावेगानं थबथबलं.'

हे सारे आपल्या मनाचे खेळ. वेगवेगळ्य़ा प्रसंगांत प्रकट झालेले, शब्दरूप घेऊन अवतरलेले.

पण मन म्हणजे काय? हृदय, हार्ट माहीत आहे. शरीरात पाहता येतं. तपासता येतं. त्याची धडधड, फडफड जाणवते. मोजता येते; पण ते मन नव्हे. हृदय रक्ताभिसरणाचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. रक्त शुद्धीकरणाचं पम्पिंग स्टेशन आहे.

अजूनही हृदयावर हात ठेवून 'ये मेरा दिल तेरेही लिये धडक रहा है,' असं म्हणत असलो तरी प्रेम जाणवणारं, करणारं मन म्हणजे हृदय नव्हे. मग मन म्हणजे काय?

1986-87 सालची गोष्ट. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू करून पाच-सहा वर्षे झाली होती. एस. एम. जोशी, यदुनाथजी थत्ते यांचे सहकारी चंद्रकांतजी शहा, ते आंतरभारतीचं देशभराचं काम पाहत असत. यांच्यासमवेत उत्तर प्रदेश दौर्‍यावर जात होतो. उत्तर प्रदेश सरकारनं सातव्या वर्गापर्यंतच्या शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरं आयोजिली होती. शिक्षकांसमोर 'अंधश्रद्धा निर्मूलन' हा विषय मांडावा म्हणून सुमारे दोन महिने कालावधी काढून मला जावं लागलं. त्या काळात लाखभर शिक्षकांचं प्रशिक्षण होणार होतं.

तिसर्‍या वर्गाच्या स्लिपर कोचमध्ये आमचं आरक्षण होतं. आगगाडीनं उत्तर प्रदेशात प्रवेश केला. आरक्षणाला काहीच अर्थ उरला नव्हता. कुणीही शिरत होतं. धड बसायला पण जागा शिल्लक नव्हती. नव्या स्टेशनावरून चार-पाच आडदांड तरुणांचं टोळकं शिरलं. सहा फुटांपेक्षा अधिक उंच असणार्‍या, एका प्रचंड देहपठरी असणार्‍या, तरुणानं माझ्या शेजारच्या 6 इंच रिकाम्या जागेत अचानक बसकन मारली. मी त्या वेळी खूप बारका होतो. माझी सारी हाडं चेपली. बरगडय़ा प्रचंड दुखावल्या. मी खूप रागानं त्या धटिंगण तरुणाकडे काही वेळ पाहिलं. कदाचित माझे डोळे रागानं लालबुंद झाले असावेत. 15-20 सेकंद रोखून पाहिलं असावं. बस्स..! रागारागात उठलो आणि चंद्रकांत शहा बसले होते तिथे जाऊन कशीबशी जागा मिळवून बसलो.

हे उत्तर प्रदेश होतं. इथे नियम-कायदा याला काही अर्थ नसतो हे मला माहीत होतं. भांडण्यात काहीच अर्थ नव्हता.

20-25 मिनिटांनंतर तोच धटिंगण तरुण माझ्याकडे आला. खूप रडवेला वाटत होता तो. अगदी आर्जवी आवाजात मला म्हणू लागला, ''साहबजी, मुझे माफ करो. मुझसे गलती हुई. मैने आपको पहचाना नहीं? आपने जो कुछ किया प्लिज उसे वापस लो.''

मला कळेना तो काय बोलतो आहे ते. पण त्याचा व्याकूळ स्वर पाहून, ऐकून मी अधिक निरखून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल-काळाठिक्कर दिसत होता. घामानं थबथबला होता. त्याचे चारही सहकारीसुद्धा खूप घाबरलेले दिसत होते. मी विचारलं, ''क्यों? क्या बात है?''

''साहबजी, मुझे बहुत अस्वस्थ लग रहा है! जब से आपने मेरी आँखों में देखा तब से धडकने तेज चल रही है (उलटी) आने जैसा लगता है! मै बार बार टॉयलेट जा रहा हूँ। लेकिन कै भी नहीं हो रही! और मै छटपटा रहा हूँ! मेरी पुरी जिंदगी में ऐसा बुरा अनुभव कभी नहीं हुआं! प्लिज, मुझे क्षमा किजीये! आपने आँखों से जो कुछ किया उसे वापस लिजिये.''

आता थोडासा प्रकाश माझ्या डोळ्य़ांत पडू लागला. हा एवढा पहेलवान, उद्दाम, धटिंगण तरुण एवढा गलितगात्र होऊन समोर उभा राहून विनवण्या करताना पाहून मला एका बाजूनं हंसू येत होतं. दुसर्‍या बाजूनं कीवही येत होती.

मी खूप रागानं एकटक काही काळ त्याच्याकडे रोखून पाहिल्यामुळं मी डोळ्य़ांसमोर त्याच्यावर जादू केली, त्राटक केलं असं त्याला वाटत आहे हे माझ्या लक्षात आलं.

मी अगदी सहजपणे उभं राहून त्याच्या खांद्यावर हात टाकला. थोडसं थपथपलं. अत्यंत आश्वासक आवाजात स्पष्टपणे पण प्रेमानं म्हणालो, ''आपको कुछ नहीं हुआ है. एकदम रिलॅक्स हो जाओ! रिलॅक्स.. रिलॅक्स! कुछ नहीं हुआ है। आप पुरी तरह ये स्वस्थ हो, रिलॅक्स हो। एकदम नॉर्मल हो!.'' आणि थोडा वेळ त्याच्या खांद्यावर थपथपत राहिलो.

पाहता पाहता मिनिटभरात त्याचा श्वासोच्छ्वास नॉर्मल होऊ लागला. लाल-काळवंडलेला चेहरा रिलॅक्स होऊ लागला.

''आप को कुछ नहीं हुआ है! ऐसा कोई आपका कुछ बिगाड नहीं सकता है। किसी में भी ऐसी शक्ती नहीं होती है। मुझ में भी नहीं है। ये केवल आपका वहम है!''

तीन-चार मिनिटांत महाशय पूर्णत: नॉर्मल झाले. मग आमचा संवाद सुरू झाला. चंद्रकांतजी शहांनी माझा परिचय करून दिला. मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम काय असतं ते त्यांना समजावून सांगू लागलो. लहानपणापासून असेच संस्कार झाल्यामुळं 'माझं रागानं एकटक रोखून पाहणं त्याला त्राटक वाटलं. तो घाबरला. या घाबरल्या अवस्थेत त्याच्या मनानं स्ट्राँग सजेशन घेतलं. आणि लहानपणापासून निर्माण झालेल्या समजुतीमुळं त्यानं झीश-उेपवळींळेपशव र्डीससशींळेपी (आधीच पेरलेल्या समजुती सूचना) स्वीकारून आपली ही अवस्था करून घेतली. त्याला जे-जे होईल असं वाटलं ते-ते त्याला झालं. यात माझा काहीही संबंध नाही. फक्त त्याच्या समजुतीचा संबंध आहे. दुसरं कुणी काही करू शकत नसतं. जादूटोणा, त्राटक, मंत्रतंत्र वगैरे सारं कसं खोटं असतं. त्यासाठी आमचं लाखभर रुपयाचं (त्या वेळी ते 1 लाख रुपये होतं. आता बक्षिसाची रक्कम 15 लाख रुपयांची आहे) आव्हान आहे. ते कुणीही जिंकू शकलं नाही हे समजावून सांगितलं.

हा धटिंगण तरुण अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट होता. आणि उत्तर प्रदेशात विद्यार्थी निवडणुका जिंकण्यासाठी 10-20 लोकांचे हातपाय तोडण्याची क्षमता असल्याशिवाय कुणी निवडणूक जिंकू शकत नाही. एरव्ही तो आणि त्याचे सहकारी अत्यंत धाडसी होते. निर्भय होते.

पण माझ्या साध्या रागाने पाहण्याचा परिणाम.. खेळ हा सारा मनाचा. पण मन म्हणजे काय?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत )