Saturday 25 August 2012

ज्योतिष खरं असतं का हो?


'ज्योतिष खरं असतं का हो? ज्योतिष हे शास्त्र आहे का?' असे अनेक प्रश्न गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाल्यावर मला विचारल्या गेले. भारतात ज्योतिष्य, भविष्य हा प्रत्येक भारतीयांच्या संस्काराचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक नव्या कामाची सुरूवात शुभमुहूर्तावर केली पाहिजे. तरच ते यशस्वी होतं. अशुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या कामाची परिणती नेहमी अयशस्वीतेत होते. हा आपल्या संस्काराचा भाग आहे. थोडक्यात ज्योतिष आणि त्यासंबंधीच्या विचारांनी भारतीयांचं सारं जीवनच व्यापलेलं असतं. सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला ज्योतिष हे शास्त्र आहे याची पक्की खात्री असते. तसं शाळा - कॉलेजातील कोणत्याही पुस्तकात शिकलेलं नसताना सुद्धा ही समजूत मात्र मनात घट्ट रूजलेली असते. ज्योतिषाचं भविष्य चुकलं तरी ती मानवी चूक आहे. त्या ज्योतिषाचा शास्त्राचा अभ्यास अपुरा होता असचं मानलं जातं. अँस्ट्रोलॉजी, ज्योतिर्विद्या म्हणजे ग्रहगोलांचा अभ्यास करण्याचं शास्त्र. हे मानवी जीवनातलं पुरातन शास्त्र आहे. किमान पाच हजार वर्षापासून या शास्त्राची मानवजातीला माहिती आहे. क्लाडेमस्, प्लोटेमस् या ज्योतिर्विदानं 'टेट्रा - बिब्लियस' हा ग्रंथ लिहिला. त्याद्वारा ग्रीस, रोम, युरोप, बॅबीलॉन, इसेरिया या परिसरात हे शास्त्र पसरत गेलं. भारतात 'होराशास्त्र' या गं्रथाच्या माध्यमातून भारत, चीन, नेपाळ, पूर्व एशियात हे शास्त्र पसरत गेलं.माणूस समुद्रात प्रवास करायला लागल्यावर रात्री दिशादर्शनाकरिता सूर्य उपलब्ध नसे. बदलत्या चंद्राच्या आधारावर वा चंद्र दिसत नसताना इतर ग्रहांच्या आधारावर दिशा ठरवता येणं आवश्यक होतं. त्यासाठी ग्रहगोलांच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालं. या संगळ्यांसाठी गतीचा अभ्यास आवश्यक असल्यामुळं त्याकाळी प्रत्येक ज्योतिर्विद हा गणितज्ञही असे. याच काळात ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. या विचाराला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि जवळपास प्रत्येक ज्योतिर्विद ग्रहगोलांच्या स्थितीवर आधारीत मानवी भविष्य सांगू लागला.

आधी केवळ राजांचं भविष्य सांगितलं जात असे. जसजशी ज्योतिष्यांची संख्या वाढत गेली तसं तसं इतरांचं भविष्य सांगण्याच्या पद्धती विकसित झाल्यात आणि भारतासारख्या देशात त्याला धार्मिक अधिष्ठान लाभल्यामुळं ते संपूर्ण जीवनव्यापी बनलं. ज्योतिर्विद्येत दोन भाग असतात. एक ग्रहगोलांच्या स्थिती गतीचा अभ्यास. या आधारावर महिना, ऋतू, अमावस्या, पौर्णिमा, सूर्यादय, सुर्यास्त, ग्रहण याची माहिती मिळवली जाते. आजच्या काळात याला आपण अँस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र म्हणतो. आज आपलं खगोलशास्त्र अतिशय अचुक आहे. त्याआधारे आपण पुढच्या पाच लाख वर्षानंतर होणार्‍या पौर्णिमा, अमावस्या, ग्रहण, सुर्यादयाचं अचूक निदान करू शकतो. म्हणूनच माणसाचं दान चंद्रावर जाऊन माणसाला घेऊन परत येऊ शकलं. आता अमेरिकन यान मंगळावर उतरून तेथील सारी माहिती पृथ्वीवर पाठवतं आहे. ज्योतिर्विद्येचा दुसरा भाग - भविष्य कथानाचा. याला आज अँस्ट्रोलॉजी फलज्योतिष असं म्हणतात. अठराव्या शतकापर्यंत या दोन्ही शाखा वा दोन्ही भाग एकच होते. प्रत्येक खगोलशास्त्रज्ञ भविष्य सांगण्याचं काम करत असते. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टकर्स ऑफ सॅमॉस याने 2250 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 'पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते.' एवढं मोठं सत्य सांगणारा हा गणितज्ज्ञही त्याकाळी भविष्य कथनाचं काम करत असे. पाचव्या शतकात भारतातील आर्यभट्टाने हेच मत (पृथ्वी गोल, सूर्याभोवती फिरते) मांडलं. त्याला गणिताच्या आधारावर हेच मत खरं आहे हे कळत होतं. पण त्या काळातल्या इतर ज्योतिर्विदांनी आर्यभट्टाची खिल्ली उडवली. 'पृथ्वी गोल असती तर दूरवर प्रवास करणारे प्रवाशी घसरून पडले नसते का?' 'पृथ्वी फिरत असती तर सकाळी उडणार्‍या पक्षांना आपलं घरटं - झाड कसं सापडलं असतं' असले तार्किक दृष्टय़ा खरे वाटणारे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं आर्य भट्टाला देता आली नाहीत. ज्योतिषी म्हणून आर्यभट्टाला प्रचंड प्रतिष्ठा होती. तरी त्याचं हे मत मात्र कुणी मान्य केलं नाही. हा आर्यभट्टही त्याकाळी भविष्यकथनाचं काम करत असे.

'सूर्याभोवती फिरताना पृथ्वी स्वत:सोबत साधारणत: 200 मैलांचं वातावरण - गुरूत्वाकर्षणामुळं घेऊन फिरते. त्यामुळं माणसं घसरून पडत नाही. आणि पक्ष्यांना आपली घरटी बरोबर सापडतात' हे कारण त्या काळात आर्यभट्टाला कसं सांगता येणार? त्याला कुठे गुरूत्वाकर्षणाची माहिती होती. सोळाव्या - सतराव्या शतकात दुर्बिणीच्या आधारे अधिक अचूक पृथ्वी - सूर्याचं नातं मांडणारा गॅलिलिओ हाही भविष्य सांगत असे. माणसांचे होरोस्कोप, कुंडली तयार करत असे. त्याकाळी युरोपमधील विद्यापीठांमध्ये गॅलिलिओचं खुप नाव होतं. तो अतिशय मोठा गणितज्ज्ञ, वैज्ञानिक म्हणून नावाजला होता, प्रतिष्ठित झाला होता. डय़ूक फर्डिनांड आजारी पडला. सगळ्यात मोठा ज्योतिषी म्हणून गॅलिलिओकडे त्याची कुंडली अभ्यासासाठी आली. गॅलिलिओकडे त्याची कुंडली अभ्यासासाठी आली. गॅलिलिओनं त्यावेळच्या शास्त्रानुसार कुंडलीचा अभ्यास केला. भविष्य वर्तविलं. डय़ूक फर्डिनांड अजून दीर्घकाळ जगणार आहे. अर्थात डय़ूक फर्डिनांड मोठं प्रस्थ असल्यामुळं गॅलिलिओचं हे भाकित युरोपभर पसरलं. पण 25 दिवसांतच डय़ूक फर्डिनांड वारला. अख्ख्या युरोपमध्ये हा चर्चेचा विषय झाला. सगळ्या विद्यापीठांमध्ये कुंडलीचा अभ्यास केला जात असे. पुन्हा पुन्हा डय़ूक फर्डिनांडच्या कुंडलीचा अभ्यास केला गेला. 'गॅलिलिओचं गणित अचुक होतं, भाकितही अचुक होतं' तरी प्रत्यक्षात डय़ूक वारला. भविष्य चुकलं. असं का घडलं?' म्हणून युरोपभर यावर चर्चा घडून आली. डय़ूक फर्डिनांडची जन्मवेळ चूक असावी, त्याची कुंडलीच अचूक नव्हती म्हणून भविष्य चुकलं. अशी पळवाट युरोपियन विद्यापीठांनी काढली नाही. यातून एका नव्या विचारांचा अंकुर फुटला. ग्रह गोलांचा अभ्यास खरा आहे. पण ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे मानून आपण भविष्य सांगतो ते खरं नसावं. पुढील काटेकोर अभ्यासातून हा विचार अधिकाधिक पक्का होत गेला. कारण दुर्बिणीच्या शोधानंतर, गॅलिलिओनंतर, ग्रहगोल गतींचा, स्थितींचा (म्हणजे खगोलशास्त्राचा) अभ्यास खुप अचूक होऊ लागला. पण दुसर्‍या बाजूनं भविष्य कथनातल्या चुकाही, फोलपणाही तेवढय़ाच तीव्रतेनं लक्षात येऊ लागला.

अठराव्या शतकाच्या शेवटी अँस्ट्रोलॉजी ज्योतिर्विद्येच्या दोन स्वतंत्र शाखा निर्माण झाल्यात. एक अँस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र आणि दुसरी उरलेली अँस्ट्रोलॉजी फलज्योतिष. विसाव्या शतकात मात्र खगोलशास्त्रानं फलज्योतिष्याला पूर्णत: नाकारलं. जर एखादा खगोलशास्त्रज्ञ भविष्य सांगत असेल तर त्याला खगोलशास्त्राची फेलोशिप दिली जाणार नाही. म्हणजे त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळणार नाही असा नियम रूढ झाला. आज जगताल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये सायन्सचा एक भाग म्हणून (फिजिक्स, अँस्ट्रोफिजिक्स वा अँस्ट्रोनॉमी, अँस्ट्रोनॉमी शिकवली जाते. पण कोणत्याच विज्ञान - विद्यापीठांमध्ये अँस्ट्रोलॉजी मात्र शिकविली जात नाही. अँस्ट्रोलॉजी, फलज्योतिष्याला विज्ञानाची प्रतिष्ठा नाही. यावर दीर्घकाळ संशोधनं झालीत. त्यात काही तथ्थ्य न आढळल्यामुळं एक निर्थक, टाकावू भाग म्हणून फलज्योतिष्याला टाकून देण्यात आलं आहे.

कोणताही आधार नसताना, तत्थ्य नसतानासुद्धा आज भविष्य कथनाची पद्धती, फलज्योतिष टिकून आहे ते अंधश्रद्धांवर. तुमच्या माझ्यावर झालेल्या लहानपणापासूनच्या अंधश्रद्धाळू संस्कारांमुळं. एकेकाळी माझाही फलज्योतिषावर खुप विश्वास होता. अँस्ट्रोलॉजी इज ए सायन्स, फळज्योतिष हे विज्ञानच आहे. असं मी ठणकावून सांगत असे. माझ्या कॉलेज जीवनात मी अभ्यास केला. इतरांचं भविष्य सांगू लागलो. मी सांगितलेलं भविष्य खुप बरोबर ठरतं असं मला वारंवार अनुभवाला येऊ लागलं. अधिक अभ्यास करावा म्हणून त्या विषयावरची वेगवेगळ्या लेखकांची आणखी चार पुस्तकं आणली. जेव्हा या पाच पुस्तकात अनेक महत्त्वाच्या मुद्यांबाबत वेगवेगळी मतं मांडलेली पाहिली तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी इंटरसायन्सपर्यंत विज्ञानाचा विद्यार्थी होतो. विज्ञानाचे बेसिक पक्के होते. एवढय़ा मोठय़ा प्रसिद्ध ज्योतिष्यांमध्ये जर एकमत नाही तर हे कसं विज्ञान? असा प्रश्न मनात घर करू लागला. आणि एका प्रसंगानंतर मी भविष्य कथन बंद केलं. पण त्या काळातला तो अनुभव ज्योतिष्यांना पुढे एक्सपोज करण्यासाठी खुप उपयोगी पडला. आज गेल्या 30 वर्षापासून आपण ज्योतिष्यांना 90 टक्के तरी अचुक भविष्य सांगा आणि आमचं 15 लाख रूपयांचं पारितोषिक घेऊन जा अशी जाहीर आव्हानं टाकतो आहे. ज्योतिष महामंडळांना टाकतो आहे पण पुढे कुणीही येत नाही. जे आले त्यांचा दारूण पराभव झाला.कारण फलज्योतिष हे शास्त्र नाही. त्यात काहीही सत्य नाही. तुमचं माझं भविष्य कुणालाच सांगता येत नाही. आपलं भविष्य आधीपासून ठरलेलं नसतं. तरी ज्योतिष्यांचं भविष्य अनेकदा खरं कसं ठरतं? तुमचा ज्योतिष्याचा काहीच अभ्यास नाही ना? तरी तुम्ही सहज ज्योतिषी बनू शकता. कदाचित अभ्यासू ज्योतिष्यापेक्षा तुमचं भविष्य अधिक अचुक ठरू शकेल.

गरोदर बाईचं भविष्य सांगा. तिला मुलगा होईल की मुलगी होईल. झाला तुम्ही ज्योतिषी. समजा तुम्ही हुशारीनं शंभर गरोदर स्त्रियांना सांगितलं 'बाई तुला मुलगाच होईल.' निसर्गाच्या नियमाप्रमाणं बाईला एकतर मुलगा होतो वा मुलगी होते. दोन चान्सेस असल्यामुळं पन्नास टक्के तरी स्त्रियांना मुलगा होण्याची शक्यता आहे. ज्या बाईला मुलगा होतो तिला 100 टक्के मुलगा होतो. ती ज्योतिषी म्हणून तुमची खुप प्रसिद्धी करले. किमान आणखी पाच - दहा स्त्रियांना तुमच्याकडे घेऊन येईल. मुल झालेल्या 50 स्त्रिया, 500 स्त्रियांना तुमचा ग्राहक बनवेल. मुलगी झालेल्या स्त्रिया म्हणतील जाऊ द्या या ज्योतिष्याला कळत नाही. आपण, दुसर्‍या रामशास्त्राकडे जाऊ.. झाला तुमचा भविष्याचा धंदा सुरू..पण ज्योतिषी बनण्यासाठी एक महत्त्वाची योग्यता असावी लागते. दुसर्‍याला फसवण्याची तयारी. फसवण्याची तयारी असल्याशिवाय ज्योतिषी बनू शकत नाही.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

दूरध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment