Saturday, 29 September 2012

ज्योतिष्यांचं भविष्यशास्त्र भंकस आणि हास्यास्पद


आपल्या कुंडलीतील परंपरागत 9 ग्रहांपैकी सोम (चंद्र), रवि (सूर्य) हे ग्रहच नाहीत आणि राहू, केतू हे अस्तित्वातच नाहीत. म्हणजे 9 पैकी 4 ग्रह नाहीत. तरी आजही, 2012 सालातही ज्योतिषी हे ग्रह आपल्या कुंडलीत नाचवीत असतात हे आपण गेल्या लेखात पाहिलं.

आता उरले मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि हे पाच ग्रह. हे ग्रह अस्तित्वात आहेत; पण यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? ग्रह-गोल-तार्‍यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र (ईंीेपेा) ही जगातील पहिली विज्ञान शाखा आहे. या विषयाचं मानवजातीचं ज्ञान अतिशय अचूक आहे. पुढे 5 लाख वर्षानंतर कोणत्या दिवशी केव्हा सूर्योदय-सूर्यास्त होईल, ग्रहण लागेल हे आज अचूक सांगता येते. म्हणूनच मानवजातीनं पाठवलेला माणूस चंद्रावर अचूक उतरला, परत आला. अनेक यानं मंगळावर जाऊन परत आली. एवढं या विषयाचं गणित अचूक आहे.

खगोलशास्त्रज्ञ सांगतात की, मानवीजीवनावर ग्रहांचे परिणाम तीन प्रकारे होऊ शकतात. एक-गुरुत्वाकर्षणाचा, दोन-चुंबकाचा, तिसरा-किरणांचा. या तिन्हींचा मानवीजीवनावर होणारा परिणाम निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. कारण पृथ्वी, सूर्य, चंद्र यांचं गुरुत्वाकर्षण एवढं परिणाम करतं की, बाकी ग्रहांचं गुरुत्वाकर्षण नगण्य परिणाम करतं. ज्याची दखलही घेण्याची गरज नाही, एवढा तो परिणाम नगण्य असतो. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात, ''ग्रहमालेतील सगळ्यात मोठा व ताकदवान ग्रह 'गुरु'. या गुरुच्या गुरुत्वाकर्षणाचा माणसावर किती परिणाम होतो? आपण बसलो असताना खुर्चीवरून उठून उभे राहतो, तेवढा. म्हणजे नगण्य. आपल्याला जाणवतही नाही.'' ग्रहांच्या किरणांचा काहीच परिणाम होत नाही आणि पृथ्वीचं चुंबक इतकं ताकदवान आहे की, त्या तुलनेत हजारो-लाखो किलोमीटर दूर असणारे ग्रह काहीच परिणाम करू शकत नाहीत.

थोडक्यात, उरलेल्या 5 ग्रहांचा तुमच्या-माझ्यावर काहीच परिणाम होत नाही हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालं असतानाही हे ज्योतिषी तुमच्या-माझ्या जीवनात या ग्रहांचा धुडगूस सुरू असतो असं धादांत खोटं सांगतात. तुमच्या- माझ्यावर लहानपणापासून झालेल्या धार्मिक श्रद्धांचा फायदा घेऊन स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी, पोट ओसंडून वाहील एवढं भरण्यासाठी, तुमच्या माझ्या कुंडल्या मांडून आपल्याला लुबाडत असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

म्हणूनच 1975 साली जगातील 186 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं आहे. त्यावर 19 नोबेल प्राईज विजेत्या शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. त्यातील एक भारतीय नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. चंद्रशेखर आहेत. सारे शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रांतील मोठे वैज्ञानिक आहेत. ते म्हणतात, ''आम्ही लोकांना सावध करू इच्छितो. ज्योतिषशास्त्रातील गृहीतकांना कोणताही पाया नाही, आधार नाही. दूर अंतरावरील आकाशस्थ ग्रहगोल ही विशिष्ट प्रकारची कृती करण्याकरिता काही दिवसांना किंवा काही कालावधीला शुभ वा अशुभ बनवितात किंवा एखादी व्यक्ती ज्या राशीत जन्माला येते ती राशी त्या माणसाची योग्यता किंवा अयोग्यता निर्धारित करते, हे मुळीच सत्य नाही. भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं; ग्रह, तार्‍यांवर नव्हे.

आज केल्या जाणार्‍या भविष्यकथनांवर, कुंडल्यांवर त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं प्रसिद्धी देतात. यामुळे आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत. या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तीनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे.''

ग्रह गोलांच्या क्षेत्रातील विद्वान वैज्ञानिक म्हणतात, ज्योतिषी ठगांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ज्या फलज्योतिषाच्या (ईंीेश्रेस) शाखेमधून खगोलशास्त्र निर्माण झाले आहे, त्याच शाखेतील वैज्ञानिक ज्योतिष्यांना 'ठग' म्हणतात. हे आपण समजून घेणार आहोत का?

जन्मवेळ आणि जन्मस्थान हे दोन महत्त्वाचे मुद्दे. या आधारावरच तुमच्या-माझ्या संपूर्ण आयुष्याचं भविष्य सांगणारी कुंडली बनवली जाते. जन्मवेळ अचूक कशी पकडायची?

1985 सालची गोष्ट. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं होतं. ऐनवेळी कळल्यामुळं मी घाईघाईत या संमेलनासाठी पुण्यात पोहोचलो. तोवर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची तीन वर्षे उलटली होती. अनेक मोठमोठय़ा बाबांचा, मांत्रिकांचा त्यांच्या गुहेत शिरून भंडाफोड केला होता. अनेक ज्योतिष्यांनाही गजाआड केलं होतं. तरीपण बहुतांश पांढरपेशे असणारे ज्योतिषी सभ्य असावेत अशी समजूत माझ्या मनात कायम होती. त्यामुळं या संमेलनासमोर उभं राहून आम्ही तीघचं कार्यकत्र्यांची फौज सोबत न घेता पत्रक वाटत होतो. मी, एक जामनेरची प्राध्यापक कुळकर्णी, यवतमाळचा आयुर्वेद कॉलेजचा विद्यार्थी विजय पोटफोड.े हे दोघंही वेगळ्याच कामानिमित्त वेगवेगळे पुण्यात आले होते. बातम्या वाचून मला भेटायला आले. त्यांनाही कामाला जुंपलं.

''20 कुंडल्यांच्या आधारे माणूस जिवंत आहे, की मृत आहे हे 95 टक्के अचूक सांगा आणि 1 लाखाचं पारितोषिक जिंका.'' या पद्धतीच्या आव्हानाच्या प्रती आत जाणार्‍या प्रत्येक ज्योतिष्याच्या हाती आम्ही देत होतो. त्यामुळं प्रचंड खळबळ माजली होती. वातावरण तापत होतं. तरी मी प्रत्येक सेशनला जमेल तसं आत जाऊन बसत होतो.

जन्मवेळेवरच्या परिसंवादाला सुरुवात झाली. सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बी. एन. पुरंदरे त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते. अनेक ज्योतिषी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे खास करून माझ्या नावानं शंख करतच बोलत होते.

''आजकाल हे ु ु ु ु ु लोक ज्योतिषशास्त्राबद्दल आक्षेप घेतात. त्यामुळं आपण जन्मवेळ अचूक पकडली पाहिजे. कधी कधी 1 मिनिटाची जरी चूक झाली तरी जन्मराशी बदलू शकते. त्यामुळं पत्रिका आणि सारं भविष्यच चुकू शकतं. माझं म्हणणं असं आहे की, ''जन्मणार्‍या बाळाचं मुंडकं बाहेर येताच, ती जन्मवेळ पकडावी. ही जन्मवेळ अचूक असेल,'' एका ज्योतिष्यानं आपलं मत मांडलं.

दुसर्‍यानं ते खोडलं, ''सामान्य बाळांसाठी हे ठीक आहे, पण काही बाळं पायाळू जन्मतात. त्यांचं मुंडकं शेवटी बाहेर येतं. मग कसं? म्हणून माझं म्हणणं असं आहे की, अख्खं मूल बाहेर आल्यानंतरच जन्मवेळ पकडावी, पण ती अचूक असावी.''

परिसंवाद सुरू राहिला. या दोन मुद्यांभोवती चर्चा फिरत राहिली. शेवटी अध्यक्ष डॉ. बी. एन. पुरंदरे बोलू लागले, ''या विषयावर बोलण्याचा मला सगळ्यात जास्त अधिकार आहे. कारण आजवर मी हजारो मुलांना जन्माला घातलं आहे. कधी कधी मूल जन्माला आल्यानंतर ते काहीच हालचाल करत नाही. मृत आहे की जिवंत आहे, शंका येते. मग आम्ही त्याला मसाज करतो, वेगवेगळे उपाय करतो. कधी कधी ते अनेक मिनिटांनंतर रडायला लागतं. तेव्हा खात्री पटते. ते जिवंत आहे. रडणं ही जिवंतपणाची खूण आहे. त्यामुळं मूल जन्माला आल्यानंतर जेव्हा रडतं तेव्हाची वेळ ही अचूक जन्मवेळ मानावी.''

माझी मात्र हसून हसून पुरेवाट होत होती. ती डॉक्टर, नर्स, सुईन मुलाला जन्म घालण्यात मश्गूल असताना सेकंदासेकंदानुसार अचूक वेळ पकडूच कशी शकेल? आणि हे तर म्हणतात की, मिनिटाची चूकसुद्धा चुकीची जन्म रास ठरवू शकते.

वध्र्याला एक शहाडेशास्त्री होता. त्याची मुलाखत घ्यायला मी गेलो. तो व्यवसायानं इंजिनिअर. तो सांगू लागला, ''अहो, पत्रकार साहेब (त्या वेळी त्याला मी माझं नाव सांगितलं नव्हतं) आमचे बाकी ज्योतिषी मूर्ख असतात. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसतो. आमच्या 'होराशास्त्रा' नुसार (हा ज्योतिष्याचा मूळ ग्रंथ) जन्मवेळ म्हणजे गर्भाधानाची वेळ पकडायची असते. मी गर्भाधानाची वेळ पकडतो.''

मी आश्चर्यानं स्तंभित झालो. 'गर्भाधान' म्हणजे 'मूल राहण्याची, बीज फलनाची वेळ.' नवरा-बायकोलाही गर्भाधानाची वेळ सांगता येणं शक्य नाही. कारण कोणत्या प्रणयप्रसंगी गर्भाधान झालं, ते कसं कळणार? महिन्यानंतरच गर्भ राहिला, ते कळतं ना?

''काहो, तुम्ही नवरा-बायकोवर पहारे बसवता का? गर्भाधान झालं ते कसं ओळखता?

छे! छे! सोप्पं आहे. पहारे बसविण्याची काय गरज? मूल जन्माला येतं त्या क्षणापासून मी बरोबर 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मिनिटं मागे जातो आणि ती वेळ अचूकपणे गर्भाधानाची वेळ पकडतो.''

मला हसावं की रडावं ते कळे ना? मुलांचा जन्म 8 व्या महिन्यापासून ते 10 व्या महिन्यापर्यंत केव्हाही होऊ शकतो आणि हे महोदय 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मि. घेऊन बसले आहेत.

ज्यांना अजून धड जन्मवेळ म्हणजे नेमकं काय ते ठरविता येत नाही, अशा ज्योतिष्यांच्या भाकितांवर आपण विश्वास ठेवायचा?

दर अठरा वर्षानंतर सिरॉस सायकलप्रमाणे मुहूर्त रिपीट होतो. याचा अर्थ प्रत्येकाच्या जन्मवेळेचा मुहूर्त केव्हा ना केव्हा रिपीट होणारचं.

किती सोप्पं काम. बायको प्रेग्नंट राहिली. गायनॅक डॉक्टरने संभाव्य डेट दिली की, सर्वप्रथम ज्योतिष्याला भेटून त्या डेटच्या आसपासचे महत्त्वाचे मुहूर्त शोधायचे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयींचा, दुपारी 4 वाजता नेहमी मंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांचा, रात्री 9 वाजता सदी का महानायक अमिताभचा. रात्री 12 वाजता सचिनचा.

झालं, डॉक्टराला रात्री 9 वाजताच्या मुहूर्तावर आतापासून बुक करायचं. बरोबर सिझेरियन करून त्या मुहूर्तावर मूल जन्माला घालायचं. झाला घरात सदी का महानायक अमिताभ बच्चनचा जन्म. हमखास नशीब असणारं मूल सचिन ते पंतप्रधान, केंद्रीय मंत्री जन्माला घालता येईल. आहे की नाही आयडिया? काय भंकस कल्पना आहे. हास्यास्पद वाटतं ना हे सारं?

मग जन्मवेळेनुसार आणि स्थानानुसार आपलं सारं आयुष्य ठरतं हे गृहीत पकडून सांगणारं ज्योतिष्यांचं भविष्यशास्त्रही एवढंच भंकस आणि हास्यास्पद आहे ना?

सिझेरियन नाही नॅचरल जन्मवेळ खरी, असा दावा काही ज्योतिषी करतात. आज शहरी जीवनात 30 ते 40 टक्के मुलं सिझेरियन करूनच जन्माला येतात. हे ज्योतिषी त्यांच्या कुंडल्या मांडत नाही? मांडतात ना? पोटापोण्यासाठी काहीही?

खरं म्हणजे फलज्योतिष हा विषय खूप मोठा. तुमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. या विषयावर अतिशय विस्तारानं एक पुस्तक लिहिलं आहे.''ज्योतिषशास्त्र-नशीब, किती खरं किती खोटं?'' मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक वा मानवी विकास प्रकाशनं प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तिका वाचा. सगळ्या शंका फिटून जातील.

स्वामी विवेकानंदांनीही ज्योतिष्याला कडाडून विरोध केला. राजाला भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्याचं मुंडकं पंतप्रधानानं उडविल्याची कथा ते आवर्जून सांगत असत.

95 टक्के अचूक भविष्य सांगा आणि 15 लाख घेऊन जा, हे आपलं आव्हान आजही कायम आहे.

माझ्यावर अजूनही विश्वास बसत नसेल तर अपघातात मेलेल्या एखाद्या तरुण मुलामुलीची पत्रिका ज्योतिष्याकडे घेऊन जा आणि हे स्थळ सांगून आलंय असं सांगा. त्या मेलेल्या व्यक्तीचं भविष्य ज्योतिषी कसं सांगतात ते अनुभवा. करून पाहणार?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक,संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment