Monday 10 September 2012

नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा

   A A << Back to Headlines     
मागच्या आठवडय़ाचा लेख प्रसिद्ध झाल्यावर 'नशीब-कर्तृत्व' या विषयासंबंधी खूप प्रश्न निर्माण झाल्याचं फोनच्या प्रतिसादावरून लक्षात आलं. त्यासंबंधी सखोल विवेचन करण्याची गरज लक्षात आल्यामुळं हा प्रपंच. ''माणसानं कितीही कर्तृत्व करायचं ठरवलं तरी त्याला नशिबाची साथ असावी लागते. त्याशिवाय कर्तृत्वाचं फळ मिळत नाही. कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते.'' अशा प्रकारची वाक्य आपण भारतीय नेहमीच ऐकत आलो आहोत, बोलत आलो आहोत. यात आपल्याला काहीही वावगं वाटत नाही, चुकीचं वाटत नाही. दोन्हींमध्ये अंतर्विरोध आहे हेही आपल्या लक्षात येत नाही. कारण तर्कशुद्धरीत्या विचार करण्याची क्षमताच आपल्या शिक्षणातून, संस्कारातून निर्माण होत नाही.

आम्ही पत्रकार छापत असलेली नेहमीची बातमी-''सुमोभरून दहा माणसं दर्शनासाठी चालली होती. रस्त्यात अपघात झाला. सुमो गाडीचा पार चकनाचूर झाला. 'ऑन द स्पॉट' नऊ माणसं मेलीत. एक माणूस जिवंत राहिला. देव तारी त्याला कोण मारी.'' ही बातमी वाचून आपण सारेच खूश होतो. आपल्याला वाटतं अपघातात दहाही माणसं मरणार होती. त्यापैकी नऊ मेलीत, पण नेमकं एकाला देवानं वाचवलं. पण हे खरं आहे का? अपघात झाला हे खरं. नऊ माणसं मेलीत हेही खरं. पण ही नऊ माणसं देवाच्या परवानगीशिवाय, संमतीशिवाय मेलीत का? जर देवानं एकाला वाचविलं असं आपल्याला म्हणायचं असेल तर नऊ माणसांना देवानेच मारलं असंही आपल्याला म्हणावं लागेल. मात्र हे आपल्या लक्षातच येत नाही. खरं काय आहे? ''अपघातानं नऊ माणसं मेलीत. त्याचप्रमाणे अपघातानंच त्यातील एक माणूस वाचला.'' नाहीतर ''देवानं एकाला मुद्दाम वाचवलं आणि नऊ माणसांना मुद्दाम मारलं.'' या दोन वाक्यांपैकी कोणतं तरी एक वाक्य पूर्ण खरं आहे. दोन्हीमधलं अर्धअर्ध वाक्य खरंच असू शकत नाही.

स्वामी विवेकानंद इंग्रजीतील एक म्हण नेहमीच वापरत असत. ''देव त्यांनाच मदत करतो जे स्वत:ची मदत करतात.'' याचा नेमका अर्थ काय? ''देईल हरी खाटल्यावरी असं कधीच घडत नाही. माणसानं कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. मी स्वामी विवेकानंदांना खरा समाजसुधारक मानतो. तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करणारा धार्मिक संत मानतो ते याचमुळं. त्यांच्या अशा प्रखर विचारांमुळं. आता नशीब आणि कर्तृत्व यात कसा अंतर्विरोध आहे ते आपण समजून घेऊ. नशीब म्हणजे गेल्या जन्मीच्या पाप-पुण्यामुळं असेल अथवा कुणी आपलं नशीब लिहून ठेवलं असेल म्हणून असेल, पण ''जे आपल्या आयुष्यात घडणार आहे ते आधीच ठरलेलं असतं. ते त्यानुसारच घडतं.'' असं मानणं म्हणजे नशीब मानणं. कर्तृत्व म्हणजे आपण जी कृती करतो, प्रयत्न करतो, मेहनत घेतो ते. 'केल्याने होत आहे रे' या उक्तीनुसार आपल्या आयुष्यात घडणार आहे असं मानणं, त्यानुसार जगणं, त्याप्रमाणं परिश्रम करणं म्हणजे कर्तृत्व. थोडक्यात परिश्रम केले तरच काही घडतं अथवा काही घडत नाही असं मानणं.

या दोन्हीही संकल्पना परस्परविरोधी आहेत. नशीब खरं असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही. काही केलं काय आणि नाही केलं तरी, ठरलं आहे. त्यानुसारच घडणार आहे. कर्तृत्वाला यात मुळी स्थान असूच शकत नाही. याचा अर्थ 'देई नशीब खाटल्यावरी' असा होतो. म्हणूनच गेल्या लेखात मी असं नशीब मानणार्‍यांना म्हटलं होतं, ''मी येतो. तुमच्या मुस्काटात एक मारतो. म्हणतो, नशिबात होतं (तुमच्या) म्हणून तुम्ही झापड खाल्ली. माझ्या नशिबात होतं म्हणून मी मारली.'' पण आपल्यापैकी कुणीही असं नशीब मानायला तयार नाही. तरी आपण, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर नशीब का मानतात, असे विचारतो. ''कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते का?'' असाही आपला प्रश्न असतो. कारण आपल्याला तर्कशुद्ध विचार करता येत नाही म्हणून. कर्तृत्व केल्याशिवाय काहीच घडत नाही. हे आपल्याला मान्य असतं. त्याबद्दल आपल्या मनात संदेह नसतो. पण अनेकदा आपण कर्तृत्व करूनसुद्धा, खूप प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश मिळत नाही आणि मग आपण त्या अपयशामागची नेमकी कारणं न शोधता नशिबाला बोट लावून मोकळे होतो.

आता मी कितीही करेक्ट कार चालवली, हायवेवरून प्रवास करताना सगळे रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळलेत, तर माझा अपघात होणारच नाही का? होऊ शकतो. समजा समोरच्या ट्रक ड्रायव्हरनं चूक केली तर, चांगल्या रस्त्यामध्ये मध्येच एखादा मोठ्ठा खड्डा पडला असेल तर आणि त्या ठिकाणी रोड संबंधित अधिकार्‍याने कोणताच सूचनाफलक लावला नसेल तर अथवा अचानक एखादं मोकाट जनावर रस्त्यावर धावत आलं असेल तर अपघात होऊ शकतो. माझी काहीही चूक नसतानासुद्धा त्या अपघाताचे दुष्परिणाम मला भोगावे लागतील. मग हे दुष्परिणाम माझ्या नशिबाचा भाग आहे का? नशीब मानलं तर हा अपघात आधीच ठरला होता त्याप्रमाणं घडला असं मानावं लागेल. मग कुणाला दोष देता येणार नाही. पण हे खोटं आहे. अपघात का घडला? ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळं अथवा रोड इंजिनिअरनं रोड बांधताना भ्रष्टाचार केल्यामुळं वा आपलं कर्तव्य नीट न बजावल्यामुळं (खड्डय़ाचा फलक लावण्याचं काम) अथवा जनावरांच्या मालकानं जबाबदारी पार न पाडता जनावराला मोकाट सोडून हायवेवर जनावर येऊ दिल्यामुळं अपघात घडू शकतो. म्हणजे माझी वैयक्तिक चूक नसतानासुद्धा दुसर्‍या कुणाच्या तरी चुकीचे परिणाम मला भोगावे लागतात. कारण आपण एकटे नसतो, शंभर टक्के स्वतंत्र नसतो. आपण सारेच आपल्या देशाचे, समाजाचे घटक असतो. समाजात निर्माण होणार्‍या संधीचे आपल्याला फायदेही मिळतात आणि समाजात निर्माण होणार्‍या चुकांचे परिणामही भोगावे लागतात.

इतरांच्या चुकांचे परिणाम पाहिले. आता फायद्याचे पाहू. 1978 मध्ये मी इंग्रजी साहित्याच्या एम.ए. फायनल परीक्षेला बसलो. त्या काळी मी एक वक्ता म्हणून प्रसिद्ध होतो. स्त्रीमुक्ती चळवळींमध्ये अग्रेसर होतो. नागपूरच्या दै. 'तरुण भारत'चा माझा युवकांसाठीचा स्तंभ अतिशय लोकप्रिय होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका महाविद्यालयाचे काही प्राध्यापक ''तुम्ही

आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून जॉईन व्हा,'' अशी विनंती करायला आले. दुसरीकडे जाऊन नोकरी मागण्यापेक्षा ही आयती चालून आलेली सन्मानजनक संधी घ्यायचं मी ठरवलं. परीक्षेचा निकाल लागायचाच होता. निकाल लागला. पास झालो. त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. सिनिअर कॉलेजलाही शिकविण्याची संधी मिळाली. हे माझं नशीब होतं का? आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात फर्स्टक्लास आलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा सहजासहजी अशी सिनिअर कॉलेजला प्राध्यापकी मिळणार नाही. मग त्याचं नशीब वाईट आहे का? 1978 मध्ये इंग्रजी विषयातील प्राध्यापकांचा खूप तुटवडा होता. या क्षेत्रात भरपूर संधी होती. म्हणून मला कुठेना कुठे प्राध्यापकी मिळणारच होती. फक्त मला नावलौकिक असल्यामुळं पास होण्याच्या आधीच निमंत्रण मिळालं एवढंच ते काय घडलं. त्या काळी समाजात संधी होती म्हणून मला प्राध्यापकी मिळाली. आज या क्षेत्रात सॅच्युरेशन निर्माण झालं आहे. म्हणून आज जशी सहज प्राध्यापकी मिळणार नाही, एवढाच याचा अर्थ आहे.

नुसतं आपलं कर्तृत्व महत्त्वाचं नसतं. आपण समाजाचा घटक असल्यामुळं समाजात उपलब्ध असलेल्या संधीनुसार अनुकूल कर्तृत्व केलं तरचं त्या कर्तृत्वाचं फळ मिळतं हे आपण समजून घेत नाही आणि अपयशाची कारणं न शोधता नशिबाचे ढोल बडवत बसतो. नशीब असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही आणि कर्तृत्व खरं असेल तर आधी नशीब ठरलेलं असू शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपली भाषा सुधारली पाहिजे. विचारप्रक्रिया तर्कशुद्ध केली पाहिजे. एक गोष्ट सांगून संपवितो. शिवाजी राजांचे तानाजी मालुसरे गड 'सर' करायला गेले. ('गड आला, पण सिंह गेला.') घोरपडी-दोर लावून गडावर चढले. लढाई सुरू झाली. तानाजी धारातीर्थी पडले. सेनापती पडल्यावर सारे मावळे गडाच्या दोरावरून उतरून पळू लागले. तानाजीच्या भावानं सारे दोर कापले, ''आता उडय़ा टाकून नेभळटासारखे मरा, नाहीतर शूरासारखे लढून मरा अथवा जिंका,'' असा आदेश सोडला. परिणाम, सारे मावळे लढले. गड जिंकला. आता तरी नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा. समोर आलेल्या प्रसंगाला धैर्यानं व कर्तृत्वानं तोंड द्या. जिंका अथवा मरा, पण भेकडासारखं जगणं, पळणं सोडा.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी -9371014832

1 comment:

  1. Apratim lekh sir!! pan sir he vichar acharanat anayla khup himmat asayla lagte na aaplyat? mhanje jasa khota bollela,vaglela kabul karayla lagte tashi?? nashibacha excuse gheun jagnyachi savay zhaleli aahe....ti modaylach havi!!

    ReplyDelete