Friday 7 December 2012

ज्योतिष्यांनो, हिंमत असेल तर या प्रश्नांचे उत्तर द्या


शेगावला अखिल भारतीय ज्योतिष परिषद दि. 7 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 8,9 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानिमित्तानं देशभरातील ज्योतिषी शेगावला दाखल झाले असणार!

अर्थात, कुणालाही परिषद भरविण्याचा अधिकार आपल्या भारतीय घटनेनेच दिला आहे. त्या स्वातंर्त्याचा, अधिकाराचा आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आदर राखून काही जाहीर प्रश्न उपस्थित करू इच्छितो.

अर्थात, आजवर आम्ही कधीही कायदा हातात घेतला नाही. गेल्या 30 वर्षात कधीही अलोकतांत्रिक कृती केली नाही. त्यामुळे ज्योतिष परिषदेला डिस्टर्ब करण्याचा वा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही मुळीच करणार नाही. ज्योतिष्यांनी नि:शंक मनाने आपली परिषद एन्जॉय करावी. पण जर अजूनही थोडीशी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असेल, तर आपण लोकांची लुबाडणूक करणारे; त्यांच्यावर झालेल्या लहानपणापासूनच्या संस्काराचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवून स्वत:च्या पोटाची खळगी भरणारे; गंडांतर, अरिष्ट, ग्रहशांती, राहू वक्री सांगून त्यांना घाबरवून त्यांच्या खिशावर डल्ला मारणारे तर नाही ना? याचा अत्यंत गंभीरतेने विचार करावा.

एकेकाळी माझी श्रद्धा होती, फलज्योतिष खरंच शास्त्र आहे असा विश्वास होता. त्या काळी काही काळ मीही भविष्यकथन केलं आहे. पण जेव्हा मला त्यातला फोलपणा लक्षात आला तेव्हा मी ते सोडलं. माझ्या संपर्कात आलेल्या अनेक ज्योतिष्यांनी, ज्योतिष्याचा खोटेपणा लक्षात आणून दिल्यावर आपला ज्योतिषी व्यवसाय बंद केला.

गेल्या 30 वर्षाच्या कामातून एक गोष्ट तीव्रतेनं लक्षात आली. किमान पाच-दहा वर्षे व्यावसायिक पद्धतीनं फलज्योतिष सांगणार्‍या सार्‍यांच्याच लक्षात येतं की, शास्त्रानुसार आपली अनेक भाकितं चुकतात, निम्म्याहून अधिक चुकतात. थोडासा मानसशास्त्राचा, लोकांच्या बॉडीलॅंग्वेजचा आधार घेऊन अंदाजे ठोकताळे आपण करीत असतो. आपल्या ज्योतिष्यांना (नक्की काहीही) माहीत नसतं. पण सामान्य जनता मात्र श्रद्धेमुळं ज्योतिष्याच्या भाकितांवर विश्वास ठेवून जीवनातील खूप महत्त्वाचे निर्णय घेते. अशा वेळी ज्योतिषी व्यवसाय करणार्‍या माणसाचं मन ही 'फसवणूक' कशी सुरू ठेवू देते?

दहा एक वर्षे व्यवसाय केल्यावर तरी या शास्त्रातील फोलपणा कळतोच कळतो. तरी जे त्यानंतरही ज्योतिष व्यवसाय सुरू ठेवतात त्यांना काय म्हणावं?

इतरांना फसविण्याची मानसिक तयारी असल्याशिवाय ज्योतिषी आपला व्यवसाय व परिषदा रेटून नेऊ शकतील का?

गर्भवती बाईला मुलगा होईल की मुलगी याचा अंदाज वर्तविणार्‍या कुणाही अडाणी माणसाची भाकितं 50 टक्के खरी ठरू शकतात. 100 स्त्रियांविषयीच्या भाकितात हाच आकडा 30 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत खरा ठरू शकतो. याला 'लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटी', शक्याशक्यतेचा नियम म्हणतात. केवळ याचाच फायदा ज्योतिषी उचलत असतात. त्यांची भाकितं कधीही अंदाज नियमापेक्षा अधिक अचूक ठरत नाही. म्हणूनच अँस्ट्रॉलॉजी, फलज्योतिष्याला कधीच वैज्ञानिक मान्यता व दर्जा मिळू शकला नाही.

जर ज्योतिष्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर, 'जोवर फलज्योतिष हे शास्त्राच्या कसोटय़ांवर सिद्ध होत नाही तोवर आम्ही लोकांना त्यांचं भविष्य सांगून त्यांची दिशाभूल करणार नाही, त्यांना फसवणार नाही,' असा निर्णय अखिल भारतीय ज्योतिष परिषद का घेत नाही? या आधीही अखिल भारतीय ज्योतिष परिषदांना आम्ही आव्हानं दिलीत.

2, 3 डिसेंबर 1985 साली पुण्यात झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेला पत्रकं वाटून जाहीर आव्हानं दिली. त्यानंतर धुळय़ाच्या 86 सालच्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेला जाहीर आव्हान टाकण्यासाठी संपूर्ण धुळे परिसरात प्रबोधनाची राळ उडवून दिली.

पोलिसांना आणि डीआयजी अरविंद इनामदारांना आम्ही आधीच सांगितलं होतं. ज्योतिष्यांच्या परिषदस्थळी आम्ही काहीही करणार नाही. कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना परिषद भरविण्याचा अधिकार आहे, असला पाहिजे. चोरांनासुद्धा संमेलन भरविण्याचा, परिषद भरविण्याचा अधिकार असला पाहिजे.(यावर डीआयजी खळखळून हसले होते.) त्यामुळं आदल्या दिवसापर्यंत आम्ही प्रबोधन करू; पण ज्योतिष परिषदेत मात्र आम्ही गोंधळ घालणार नाही, धुमाकूळ घालणार नाही. त्यामुळं आपण निश्चिंत असावं. आदल्या रात्रीपर्यंत प्रचारसभा घेऊन मी व माझ्या प्रमुख कार्यकत्र्यांनी धुळे शहर सोडलं.

आमचे काही पत्रकार कार्यकर्ते परिषदेत हजर होते. संपूर्ण परिषदेवर आंदोलनाची छाया होती. आम्ही आतमध्ये घुसून काहीतरी गोंधळ घालू या भीतीने ते डोळय़ात तेल घालून पहारा देत होते. प्रत्येक परिसंवादात, उद्घाटनाच्या भाषणात आमच्या आव्हानाचं प्रतिबिंब पडत होतं. ज्योतिष्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू होती.

त्यानंतर अमरावतीला अखिल भारतीय ज्योतिष परिषद झाली. त्यालाही आमच्या कार्यकत्र्यांनी आव्हान टाकलंच; पण आम्ही जनजागरण सभा घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. अर्थात, याही वेळी ज्योतिष्यांनी आव्हान स्वीकारलंच नाही.

उपाध्येंच्या मुलींचा गोंधळ..

पुढे 1991 साली मुंबईला अखिल भारतीय परिषद भरली. मी तिथेच असल्यामुळं परिषदेच्या दोन दिवस आधी 'फलज्योतिष : एक थोतांड' या विषयावर एक व्याख्यान दादरच्या छबिलदास शाळेच्या हॉलमध्ये आयोजिलं. या व्याख्यानात आव्हान न स्वीकारता, तशी तयारीही न दाखवता, ज्योतिषी शरद उपाध्येंच्या ज्योतिष वर्गातील विद्यार्थ्यांनी व खास करून विद्यार्थिनींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरुण सुशिक्षित मुलींनी आमच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याची ही पहिलीच वेळ होती. सभ्य दिसणार्‍या मुली असं वागू शकतात यावर विश्वास ठेवणं फार कठीण जात होतं. पण त्या वेळी त्यांना फारसं काही करता आलं नाही. तरी त्यामुळे ज्योतिष परिषदेला आम्हाला पुन्हा आव्हान टाकावं लागलं. काही जाहीर प्रश्न विचारावे लागले. तशी वृत्तपत्रांतून प्रसिद्धी द्यावी लागली.

पुढे नागपूरला ज्योतिष परिषद भरली आणि ज्योतिषविरोधी प्रबोधनानं नागपूर दणाणून सोडलं. नियोजित उद्घाटक मुख्यमंत्री मनोहर जोशी व स्वागताध्यक्ष बांधकाममंत्री नितीन गडकरी परिषदेला उपस्थितच राहिले नाही. नागपूर श्रमिक पत्रकार संघानं प्राचार्य राम शेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली मी व ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असा परिसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी (आधी शेवाळकरांना व पत्रकारांना संमती देऊनही) कालनिर्णयकार साळगावकरांनी ज्योतिष परिषद परवानगी देत नाही या सबबीखाली माघार घेतली.

म्हणून पुन्हा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जाहीर सवाल..

1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? 2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? 3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे? 5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?

6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? 7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 8) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य. ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 12) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?

पेशव्यांची पेशवाई पाण्यात गणपतीसारखीच बुडाली

स्वातंर्त्यवीर सावरकर फलज्योतिषाद्वारे मुहूर्त पाहण्यावर कडाडून हल्ला करताना फार सुंदर युक्तिवाद वापरतात.

''मुहूर्तावर मुळीच विश्वास न ठेवणार्‍या मूठभर इंग्रजांनी पृथ्वीवर सूर्य मावळणार नाही एवढय़ा विस्तीर्ण प्रदेशावर-भूमीवर साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्तावर, शुभ-अशुभावर विश्वास ठेवणारे पेशवे, डावा पाय पुढे ठेवायचा की उजवा पाय पुढे ठेवायचा हे ज्योतिष्याला विचारून ठरविणारे पेशवे, संकट आलं की विघ्नहर्त्या गणपतीस पाण्यात बुडवून ठेवत असत. अशा पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.''

स्वातंर्त्यवीर सावरकर एवढय़ावरच थांबत नाहीत, तर वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी मनोवृत्तीवर टीका करणारे, जन्मानं चित्पावन ब्राह्मण असलेले सावरकर म्हणतात,''आम्ही ब्राह्मण शेंडय़ा का ठेवतो? कारण अखिल ब्रह्मंडात असलेल्या सगळ्या ज्ञानलहरी (सगळं ज्ञान) केवळ आमच्याच डोक्यात शिराव्यात म्हणून आम्ही रेडिओच्या एरिअलसारख्या शेंडय़ा ठेवतो.''

भविष्यावर विश्वास म्हणजे कर्तृत्वाला सोडचिठ्ठी

भविष्यावर विश्वास म्हणजेच नशिबावर विश्वास; आपलं भविष्य आधीपासूनच ठरलं आहे असं मानलं तरच ज्योतिषी ते ओळखून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताहेत असं मानता येईल ना? नशिबावर विश्वास ही गोष्ट कोणत्याही राष्ट्राच्या उत्थानाकरिता, नागरिकांच्या स्वकर्तृत्वाकरिता घातकच आहे.

स्वामी विवेकानंदांसारख्या, हिंदू धर्माची पताका समुद्रापार पोहोचविणार्‍या द्रष्टय़ालासुद्धा आग्रहानं सांगावं लागलं की,''जोवर या देशातले तरुण नशिबावर आणि दैवावर विसंबून राहताहेत तोवर या देशाला भवितव्य नाही.'' ज्योतिषाचं समर्थन म्हणजेच दैववादाचं समर्थन, नशिबाचं समर्थन, माणूस नियतीच्या हातचं बाहुलं असल्याचं समर्थन नव्हे का? (क्रमश:)

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

2 comments:

 1. मी मटामध्ये लिहीलेला लेख अवश्य वाचावा https://www.facebook.com/photo.php?fbid=3509439973078&set=pb.1184199263.-2207520000.1367322619.&type=3&theater

  आपला
  राजीव उपाध्ये

  ReplyDelete
 2. barobar- thotand band vhayalach have. Pan prashna punha toch - he itar dharmamadhe pan chalu ch ahe. Tyanchyavar pan asa halla kara ki ekda tari.
  himmat dakhvavi laagelach.

  aso - sawrkar, vivekanandanchya naavacha vaapar bhari ch kela raav tumhi ithe. avghad ahe!

  ... vande mataram ...

  ReplyDelete