Friday 14 December 2012

ज्योतिषी ठगांना आव्हान देण्याची वेळ आली आहे


हिंदुत्ववादी समजल्या जाणार्‍या स्वामी विवेकानंदांची एक कथा सांगून लेखाचा शेवट करतो. दुसर्‍या धर्मीयांचा द्वेष न करता त्यांच्याबद्दल पुरेपूर बंधुभाव बाळगून टिळा, जानवं, पूजाअर्चा, कर्मकांड, वर्णश्रेष्ठत्व, अंधश्रद्धा नाकारूनही माणूस हिंदू असू शकतो. नव्हे तोच खरा हिंदू असतो. असं प्रभावीपणे मांडणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या शब्दाइतका प्रभावी, समर्पक शेवट दुसरा असू शकतो का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाचा कैफ लादून ज्योतिष पसरवणार्‍या षडयंत्राला दुसरं प्रभावी उत्तर असू शकतं का? नियती, नशीब या संकल्पनांवर विश्वास ठेवल्यामुळे या देशातील जनता दुर्बळ होते. त्यामुळेच हा देश रसातळास पोहोचला आहे. हे नेमकेपणानं ओळखून माणसाचं कर्तृत्व जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद एका ज्योतिष्याची कथा आवर्जून सांगत असत. एक चक्रवर्ती राजा होता. त्याच्या पदरी एक फार मोठा विद्वान ज्योतिषी होता. नव्यानचं रुजू झाला होता. कुंडली मांडून अतिशय अचूक असं भूतभविष्य-वर्तमान सांगतो अशी त्या ज्योतिष्याची ख्याती होती. त्यानं वर्तवलेलं भविष्य म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते असं समजलं जायचं. राजाच्या पदरी असणारा प्रधान परदेश प्रवासाला गेला होता. एक दिवस राजाला स्वत:चं भविष्य विचारण्याची हुक्की आली. त्यानं ज्योतिष्याला स्वत:चं भविष्य विचारलं.

राजे महोदय, सहा महिन्यांत मृत्युयोग

ज्योतिष्यानं राजाच्या कुंडलीचा नीट अभ्यास केला. त्याचा चेहरा पडला. तो बोलेनाच. राजानं फारच आग्रह केल्यावर तो भविष्य सांगायला तयार झाला. तो म्हणाला, ''राजे महोदय, मला सांगायला फार वाईट वाटतं, दु:खही होतं; पण सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतो. आपल्याजवळ फार कमी वेळ आहे. केवळ सहा महिन्यांचा अवधी आहे. आतापासून सहाव्या महिन्याच्या शेवटी, सातवा महिना सुरू होण्याच्या आधी आपल्याला हे जग सोडून जावं लागेल. मृत्युयोग आहे. कोणत्याही परिस्थितीत न टळणारा मृत्युयोग.'' राजाला प्रचंड हादरा बसला. आपण मरणार या कल्पनेनंच राजा झुरू लागला. हळूहळू त्याचं राज्यकारभारावरून लक्ष उडालं. तो आपल्या शयनगृहातच राहू लागला. दरबारात येईनासा झाला. ही बातमी बाहेर फुटली. राजा दुबळा होतोय हे लक्षात येताच मांडलिक राजांनी गुप्त तयारी सुरू केली. सैन्याची जमवाजमव सुरू केली. हेरखात्याकडून ही बातमी परदेशात असलेल्या प्रधानाला समजली. 'राज्य' धोक्यात आहे हे लक्षात येताच प्रधान आपली यात्रा अर्धवट टाकून राज्यात परत आला. तोवर दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. ज्योतिष्याच्या भविष्यकथनामुळं राजाचं मन राज्यकारभारातून उडालं, हे प्रधानाला हेरखात्याकडून कळलं होतंच. तातडीनं प्रधानानं राजाची भेट घेतली. भविष्यकथनात काही अर्थ नसतो. कदाचित एखाद्या शत्रूचं हे षडयंत्र असावं, असंही प्रधानानं सांगून पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. राजाचा या नव्या ज्योतिष्याच्या भविष्यकथनावर अढळ विश्वास बसला आहे, आपण कितीही समजावून सांगितलं तरी राजा ऐकणार नाही, हे प्रधानाच्या लक्षात आलं. प्रधानानं खूप विचार केला, निर्णय घेतला आणि निश्चयानं कामाला लागला.

राजदरबार भरला

दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजता राजदरबार भरणार असा तातडीचा आदेश प्रधानानं काढला. सगळ्यांना सूचना गेल्या. महत्त्वाच्या मंर्त्यांना संदेश गेले. सैन्याला आणि हेरखात्याला जय्यत तयार राहण्याचे आदेश सुटले. 'राजाही दरबारात हजर राहणार आहे' असे निरोप गेले. खूप दिवसांनंतर राजदरबार भरला. राजदरबारात सगळे मंत्री, सेनापती, मानकरी तर हजर होतेच; पण राज्यातील

महत्त्वाचे व मान्यवर नागरिकही मोठय़ा संख्येनं प्रधानानं हजर ठेवले होते. बरोबर 12 वाजता खचाखच भरलेल्या दरबारात राजेमहोदयांना प्रधान जातीनं घेऊन आले. सारे आपापल्या स्थानावर विराजमान झाले. प्रधानानं बोलायला सुरुवात केली. ज्योतिष्याला त्याच्या भविष्य कथनाच्या सामर्थ्याविषयी प्रश्न केला. ''ज्योतिष हे गणित आहे. माझं गणित अचूक असतं, माझं भविष्यकथन काळ्या दगडावरची रेघ असते.'' वगैरे ज्योतिष्यानं सांगितलं. ''आपण राजाचं भविष्य सांगितलं. मी पुन्हा तुम्हाला एक संधी देतो. पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास करा. पुन्हा राजाचे भविष्य सांगा.'' प्रधानानं आज्ञा सोडली. ''माझं भविष्य-गणित कधीच चुकत नाही. खरं म्हणजे मी कधीच पुन्हा दुसर्‍यांदा गणित करत नाही. तरी तुमचा आग्रह आहे म्हणून अभ्यास करतो. राजाचं भविष्यकथन असल्यामुळंच मी माझा नियम मोडायला तयार आहे.'' असं म्हणून ज्योतिष्यानं पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास सुरू केला. बराच वेळ आकडेमोड केली आणि शेवटी निर्धारपूर्वक सांगितलं. ''माझं भविष्यकथन अगदी अचूक होतं. राजाचा मृत्युयोग निश्चित आहे. आता केवळ चारच महिने उरलेत. त्यात कालत्रयीही बदल होणं शक्य नाही.'' हे भविष्यकथन ऐकताच संपूर्ण दरबार शहारला. आतापर्यंत केवळ कुजबुज ऐकू येत होती. पण आता खरंच राजा 4 महिन्यांत मरणार म्हटल्यावर सार्‍या दरबारावर शोककळा पसरली. राण्या रडायला लागल्या. पण प्रधानानं मुळीच विचलीत न होता ज्योतिष्याला विचारलं - ''ज्योतिषी महोदय, तुमची कुंडली तुम्हाला माहीत आहे का?''

मी अजून 55 वर्षे जगणार आहे

ज्योतिषी हसून म्हणाला, ''अहो, हे काय प्रधान महोदय, माझी कुंडली मला ठाऊक नसेल? अगदी मुखोद्गत आहे मला ती.'' ''तुमचं आयुष्य किती आहे?'' प्रधान. ज्योतिषी, ''अहो, आता तर मी कुठे पस्तीस वर्षांचा आहे. अगदी वयाच्या नव्वद वर्षांपर्यंत माझं आयुष्य आहे. अजून पंचावन्न वर्षे मी जगणार आहे.'' प्रधान , ''उत्तम गोष्ट आहे. तुम्ही पंचावन्न वर्षे अजून जगणार; दीर्घायू आहात. तरी माझ्याखातर पुन्हा तुम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करा; तुमचं आयुष्य किती ते मला सांगा.'' ज्योतिषी हसून आकडेमोड करायला लागला.. म्हणाला, ''प्रधानजी, तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या कुंडलीचा पुन्हा एकदा अभ्यास केला. आकडेमोड केली. माझं भविष्य बरोबर आहे. मी दीर्घकाळ जगणार. वयाच्या नव्वदीपर्यंत जगणार..''

हे ऐकताच.. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच प्रधानजी ज्योतिष्याजवळ झेपावले. क्षणात आपली तलवार म्यानातून काढली. कचकन ज्योतिष्याचं मुंडकं उडवलं. धडापासून वेगळं झालेलं रक्ताळलेलं ज्योतिष्याचं मुंडकं राजाच्या पायाजवळ पडलं.

संपूर्ण दरबार शहारून गेला. स्मशानशांतता पसरली. प्रधान धीरगंभीर आवाजात सांगू लागला, ''राजे महोदय, मला माफ करा! आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या परवानगीशिवाय मी एक निर्णय घेतला! पण माझा उद्देश तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही मला माफ कराल. एवढच नव्हे, तर तुम्ही, हा सारा देश, सारे प्रजाजन माझा निर्णय योग्य होता असंच म्हणतील याची मला खात्री आहे. राजे महोदय, या ज्योतिष्यानं आपण सहा महिन्यांत मरणार असं भविष्य कथन केलं. ते आपण खरंच धरून चाललात. कारण आपला ज्योतिषावर, भविष्यकथनावर प्रचंड विश्वास आहे. नाइलाजानं मी कठोर निर्णय घेतला. असल्या दैववादी बनवणार्‍या, नियतीवादी बनवणार्‍या ज्योतिषावर लोकांचा विश्वास वाढवणार्‍या ज्योतिष्याचं पितळ उघडं पाडण्याचा मी निश्चय केला. पण राजे महोदय, काल रात्री घेतलेला निर्णय, त्याचा मृत्यू त्याला कळू शकला नाही. त्याचे बदललेले ग्रह त्याला दिसले नाहीत. काही मिनिटांत येणारा मृत्यू ज्या ज्योतिष्याला दिसू शकला नाही, स्वत:चा मृत्युयोग ज्याला कळू शकला नाही, तो ज्योतिषी तुमचा मृत्युयोग कसा काय सांगू शकतो, महाराज? मला सांगा, कसा काय सांगू शकतो?'' प्रधान या ठिकाणी थांबला.. दरबारात स्मशानशांतता पसरली. थोडय़ा वेळानं हळूच राजानं दोन्ही हात उचलले. टाळी वाजवायला सुरुवात केली. सार्‍या दरबारानं टाळ्या वाजवून-वाजवून, टाळ्यांच्या गजरानं सभागृह दणाणून सोडलं. स्वामी विवेकानंद ही गोष्ट आवर्जून का सांगायचे, ते आपण समजून घेऊ, नीट मनात ठसवू. यानंतर कोणत्याच प्रकारचं भविष्य पुढील आयुष्यात पाहणार नाही, भविष्यावर विश्वास ठेवणार नाही असं ठरवू आणि नियतीवादी बनवणारं, पराक्रमशून्य बनवणारं हे ज्योतिषी षडयंत्र उलथवून टाकू !

आजवर कोणीही ''ज्योतिष हे शास्त्र आहे'' हे सिद्ध करू शकला नाही!

1985 सालापासून ज्योतिष्यांना आम्ही सतत आव्हान देत आलो आहे. आम्ही वीस पत्रिका देतो, ज्योतिष्यांनीच तयार केलेल्या पत्रिका देतो, त्यातील कोण जिवंत आहे व कोण मेलं आहे एवढंच 95 टक्के अचूक सांगा आणि 15 लाखांचं (2009 सालात ते 15 लाखांचं झालेलं आहे.) पारितोषिक घेऊन जा. काही ज्योतिषी पुढे म्हणू लागले. आमच्या शास्त्रानुसार मृत्यू सांगायचा नसतो. पुन्हा ही एक पळवाट, बनवेगिरी. ठीक आहे. त्याचाही फायदा आम्ही त्यांना घेऊ दिला. तुम्हाला ज्या विषयाचं भविष्य सांगता येतं असे किमान 5 मुद्दे ठरवा. आम्ही दिलेल्या वीस कुंडल्यांच्या आधारावर या 5 मुद्यांबाबतचं (कदाचित शिक्षण, नोकरी/ व्यवसाय, लग्न, मुलं, अपघात) भविष्य किमान 90 टक्के जरी अचूक सांगितलं तरी हे पारितोषिक मिळेल; पण हे पारितोषिक मात्र आजवर कुणीही जिंकू शकलेलं नाही किंवा त्याच्या जवळपाससुद्धा कुणी येऊ शकलेलं नाही.

काहींनी आव्हान स्वीकारण्याचा दावा केला. तसं वृत्तपत्रांमधून जाहीरही केलं; पण प्रत्यक्षात मात्र, वेळ आल्यावर नेहमीच आव्हानातून पळ काढला.

फक्त अशोक तोमर नावाच्या मुंबईत अँस्ट्रॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट चालवणार्‍या ज्योतिष्यानं नाशिकात हे आव्हान पार पाडलं. 1985 साली सार्‍या पत्रकारांसमोर पार पडलेल्या या आव्हानात 10 कुंडल्यांच्या आधारे भाकितं केली. केवळ 32 टक्के अचूक ठरलीत, त्याचा दारुण पराभव झाला.

दिल्ली स्टार न्यूजच्या चंद्रगहणाच्या एका लाईव्ह कार्यक्रमात मीरा महाजन नावाच्या एका टीव्ही स्टार ज्योतिषीने जाहीर आव्हान स्वीकारण्याचे लाईव्ह मान्य केले. पण पुढे तिने चक्क पळ काढला. पुढे चार दिवस मी दिल्लीत थांबलो, पण ती चॅनेलवाल्यांनाही सापडली नाही.

फलज्योतिषावर आक्षेप : 186 वैज्ञानिकांचे पत्रक

फलज्योतिष हे विज्ञान नव्हे, असे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. फलज्योतिषाला विरोध करणारे परिपत्रकच शास्त्रज्ञांनी तयार केले आहे आणि त्यावर विविध देशांतील महत्त्वाच्या 186 शास्त्रज्ञांनी सह्या केल्या आहेत. सह्या करणार्‍यांमध्ये 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. त्यात भारतातील सी.चंद्रशेखर या एकुलत्या एक शास्त्रज्ञाची सही आहे.

या परिपत्रकाचा मूळ मसुदा असा आहे :

जगभरातील विविध क्षेत्रांत फलज्योतिष अधिकाधिक स्वीकारले जात आहे. हे पाहून विविध क्षेत्रांतील आम्हा वैज्ञानिकांना काळजी वाटते. आम्ही खाली स्वाक्षरी करणारे-खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रातील वैज्ञानिक (ज्योतिष्यांकडून वैयक्तिक आणि सार्वजनिकरीत्या सांगितली जाणारी भाकिते व सल्ले, जे चिकित्साही न करता स्वीकारले जातात त्या विरोधात) लोकांना सावध करू इच्छितो. ज्यांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावासा वाटतो त्यांनी जाणून असावं, की ज्योतिषशास्त्रातील गृहीतांना कोणताही पाया नाही, आधार नाही.

लोक फलज्योतिषावर विश्वास का ठेवतात? आजच्या अनिश्चिततेच्या काळात योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, समाधानकारक सल्ला मिळवण्यासाठी ते आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आवाक्यापलीकडे असणारे आकाशस्थ ग्रहगोल त्यांचे नशीब (नियती) आधीच ठरवतात, यावर विश्वास ठेवणं त्यांना आवडत असेल. तरीपण आपण सगळ्यांनी वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं, ग्रह-तार्‍यांवर नव्हे, हे समजून घेतलं पाहिजे.

आजच्या आधुनिक काळात, आधुनिक शिक्षणाच्या आणि आधुनिक दृष्टीच्या प्रकाशात आपण हे समजून घेतलं पाहिजे की, अंधश्रद्धा आणि जादुई चमत्कारांवर विश्वास ठेवणं, विसंबून राहणं म्हणजे स्वत:चीच फसवणूक करून घेणं होईल. तरीही आजच्या आधुनिक समाजामध्ये फलज्योतिषावरील विश्वास वाढतो आहे. आज केल्या जाणार्‍या भविष्यकथनांवर, त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं (अगदी प्रतिष्ठित दैनिकं, मासिकं, पुस्तक प्रकाशकसुद्धा) प्रसिद्धी देतात. यामुळं आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत.

या परिस्थितीची परिणती अतार्किकता आणि भोंगळवाद वाढवण्यातच होईल. आम्हाला असं वाटतं, की या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तिनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

1 comment: