मी मुंबईत. रात्रभर कुणाचा न् कुणाचा फोन येत होता. सर्वदूर मृत्यूचं, भूकंपाचं भय पसरलं. धर्म-जात-पंथ ओलांडून पसरलं. इकडे सप्तशृंगीच्या गडावरच्या देवीच्या डोळय़ांतूनही अश्रू यायला लागले. प्रचंड गर्दी उसळली. विदर्भात पोहरा देवी अतिशय प्रसिद्ध. भारतभरातील बंजारा समाज तिच्या दर्शनासाठी येतो. पण थोडय़ाच अंतरावरच्या 'श्याम की माता' कडे मात्र लोकांचं फारसं लक्ष नाही. यानिमित्तानं 'श्याम की माता' दर्शनासाठी दिवसभरात 25 हजारांपेक्षा जास्त लोक येऊन गेलेत. 'श्याम की माता' प्रसिद्ध झाली. अशा अफवा का पसरतात? आसामात मुस्लिमांचं शिरकाण होतं. अफवा पसरवली जाते. मुंबईमध्ये तास-दीड तास नंगानाच चालतो. पोलिसांना नेम धरून मारलं जातं आणि काही दिवसांत इकडे देवीच्या डोळय़ातून वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच वेळी अश्रू येतात. कधी कधी चर्चमधील मेरी मातेच्या डोळय़ातून अश्रू येतात आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट वापरणारा माणूसही या चमत्कारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडतो. अफवा पसरविण्याच्या प्रक्रियेचा सक्रिय भाग बनतो. भारतीय वातावरणात वाढलेल्या कोणत्याही धर्माचा माणूस असो, त्याला दैवी चमत्काराचं प्रचंड आकर्षण वाटतं. लहानपणापासून संस्कारातूनच हे बाळकडू त्याच्या मनात ठसलं असतं. हे चमत्कार प्रत्यक्षात घडत नाहीत. म्हणून ते घडावेत असं त्याला मनोमन वाटत असतं. त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ती गरज असते. म्हणून कोणत्याही प्रकारचा चमत्कार ऐकला रे ऐकला की त्याची मुळीच शहानिशा न करता 'आपणच तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला' अशा थाटात तो सांगत सुटतो. मोबाईल, एसएमएस ही आधुनिक साधनं त्याच्या सांगण्याचा वेग वायुवेगापेक्षाही अधिक वाढवतात. निव्वळ चमत्कारापेक्षाही भयासोबत जुळलेला चमत्कार अधिक वेगानं पसरतो. तसं भारतीय समाजमन भित्रं आहे. संस्कारानं ते तसं बनलं आहे. एखादा राजा शिवाजी, महात्मा गांधी हे भय दूर करून काही काळ समाजमन निर्भय बनवून टाकतात. एरवी ते भय-प्रोन असतं. जेव्हा जेव्हा काहीतरी अरिष्ट येईल, आपण मरू या पद्धतीची भीती या चमत्कारासोबत जुळली असेल तेव्हा अफवा पसरवणारं हे मन जास्तच सक्रिय बनतं. 'भीती' ही भावना माणसाच्या मनाचा तत्काळ ताबा घेते. या भीतीच्या आहारी गेलेल्या माणसाला त्या अवस्थेत जे सांगितले जातं, जे तो ऐकतो वा त्याच्या मनात येतं ते एखाद्या प्रभावी सजेशनसारखं काम करतं. त्याला ते खरंच वाटायला लागतं आणि मग इतरांनी या आपत्तीला बळी पडू नये म्हणून तो सक्रियपणे ही भीती इतरांपर्यंत तत्परतेनं पोहोचवतो. 'रात्रभर झोपू नका, लहान मुलांनाही झोपू देऊ नका. शेजार्यांनाही झोपू देऊ नका. जो झोपेल तो उठणारच नाही,' हे सांगण्यामध्ये आपण इतरांचे जीव वाचवतो आहोत अशी त्याची प्रामाणिक भावना असते. अफवा पसरवणे, इतरांना घाबरवणे हा त्याचा उद्देशही नसतो आणि आपण असं काही करतो आहे याची त्याला कल्पनाही नसते. ज्या क्षणी भीती मनाचा ताबा घेते, त्या क्षणी 'लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट' घडून येतो आणि वातावरणातील अफवा त्याच्यासाठी 'सत्य घटना' बनते. तो सामान्य माणूस या काळात 'हायली सजेस्टिबल' असतो. जर कुणी नकारात्मक सजेशन्स पेरलं, 'ते तुमचा जीव घेणार आहेत, त्यांनी तुमचा, तुमच्या मुलाबाळांचा जीव घेण्याआधीच त्यांना संपवा' तर हा सामान्य माणूस त्या विशिष्ट लोकांचा जीव घ्यायला, त्याचं घर जाळायला, खून करायला पुढे सरसावतो. याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो. पण ही फिअर सायकॉलॉजी असते. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एरवी मुंगीही न मारणारा हा माणूस इतरांचे जीव घेऊन मोकळा होतो. ज्यांना हे मानसशास्त्र कळतं ते त्याचा उपयोग करून घेतात. दंगली घडवून आणतात. माणसांमधली माणुसकी उद्ध्वस्त करून टाकतात. शेजारी शेजार्याचा खून करतो. शेजारी शेजारील बाईवर बलात्कार करतो. माणसाचा जनावर बनतो. माणुसकीचा खून पाडतो म्हणून या अफवांकडं निरुपद्रवी अफवा म्हणून पाहू नये. त्यांना वेळीच सक्रियपणे अटकाव केलाच पाहिजे. 'श्याम की माता' प्रकरणातील अफवा आम्हाला आमच्या कार्यकत्र्यांना झपाटय़ानं आटोक्यात आणता आली. कारण त्या परिसरात आमचं सक्रिय काम आहे. पण सामान्य, भयग्रस्त माणूस अहेतूक अफवा पसरवीत असला तरी सुरुवातीस विशिष्ट हेतूनं अफवा पसरवणारा, एक स्वार्थी हेतू राखणारा हितसंबंधी वर्ग असतोच. हा जाणीवपूर्वक, फायद्यासाठी अफवा पसरवीत असतो. त्यामुळे दरवेळी पोलीस खात्यानं काळजीपूर्वक सखोल चौकशी करून अशी अफवा पसरवणार्यांना शोधून काढून गजाआड केलंच पाहिजे. तरच अशा अफवा पसरवणार्यांना खर्या अर्थाने अटकाव बसेल, जरब बसेल. पण या ठिकाणी आपलं पोलीस खातं फारच टची असतं. असल्या धार्मिक ठिकाणी ते बिलकूल पोलिसी डोकं वापरायला तयार नसतात. उलट अफवेपोटी उसळलेल्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी मात्र त्यांना खूप मेहनत, वेळ खर्ची घालावा लागतो. कळत नकळत बदमाशांना साथ द्यावी लागते. काही वेळेस मुद्दाम चमत्कार घडवून आणले जातात. मुंबईतील गोष्ट. एका जैन मंदिरात मूर्तीवरचं चांदीचं छत आरतीच्या वेळी हलू लागलं. प्रचंड गर्दी, प्रचंड पैसा, देणग्या ओघ सुरू झाला. संबंधित पोलीस स्टेशनची मदत मागितली. त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेतली. मी, काही पत्रकार (त्यात म.टा.चे पत्रकार सुरेश वैद्यही होते) हा चमत्कार तपासण्यास गेलो. अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा चमत्कार निर्माण केला होता. मी जयंत नारळीकरांच्या माध्यमातून त्यांनी सुचवलेल्या श्री. शर्मा नावाच्या 'अप्लाईड फिजिक्स'च्या एका शास्त्रज्ञाकडे गेलो. त्यांच्या मदतीनं आम्हाला चमत्कार कळला. आता फक्त एक छुपा जनरेटर पकडण्याची गरज होती. ते आम्हाला शक्य नव्हतं. पोलीस मदत करणार नाही हे कळत होतं. शेवटी संबंधितांना कसा चमत्कार घडवला ते जाहीर करण्याची धमकी द्यावी लागली. चमत्कार तत्काळ थांबला. पुन्हा हा चमत्कार घडवला तर रंगेहाथ पकडू अशी जाहीर धमकी दिली. गेल्या 20 वर्षांत पुन्हा असा चमत्कार घडला नाही. पण चमत्कार घडवणारे मात्र मोकळे सुटले. पण त्या मंदिराचं रिनोवेशन दिमाखात पार पडलं. यात ट्रस्टी, साधू सारेच गुंतले होते. पोलिसांनी मनात आणलं तर अशा अफवांना तत्काळ पायबंद घालण्याचं काम पोलीस खातं किती अप्रतिमरीत्या करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते फारसं कुणाला माहीत नाही. म्हणून मुद्दाम सांगतो. गणपती दूध प्यायला लागले. तो दिवस आठवत असेल. रात्रभर प्रवास करून नागपूरहून मुंबईला नॉनस्टॉप पहाटे कारने पोहोचलो. झोपलो. सकाळी 6 वाजता फोन खणखणला. दिल्लीच्या टीव्हीच्या प्रतिनिधीचा फोन. 'तुम्हाला 7 च्या विमानानं दिल्लीत यायचं आहे. दिल्लीत रात्रभर ठिकठिकाणच्या मंदिरातील देवांच्या मूर्ती दूध पीत आहेत ते तपासायचं आहे.' कसंबसं, थोडय़ा वेळात संपर्क साधतो असं सांगून झोपलो. खूप थकलो होतो. पण थोडय़ा वेळानंतर सारखा फोन खणखणू लागला. झोपूच देईना म्हणून उचलला. एकदम करडा आवाज, 'एवढा वेळ फोन वाजतो. तासभर झाला. उचलत का नाही? बोला.. कमिश्नर साहेबांना बोलायचे आहे.' मुंबईचे अँडिशनल कमिश्नर पी.के.बी. चक्रवर्ती बोलू लागले, 'काय मानव साहेब तुम्ही झोपता आहात.' मुंबईत सगळय़ा मंदिरात रांगा लागल्या आहेत. आम्हाला भीती वाटते.. कुणी तरी मुद्दाम अफवा पसरवतो आहे. मंदिरात गर्दी गोळा करायची आणि बॉम्बस्फोट घडवायचे असं प्लॅनिंग असावं म्हणून रेड अँलर्ट घोषित केला आहे. गणपती दूध पितो हे प्रकरण तपासायचं आहे. माझ्या अधिकार्याकडे देतो त्यांना मदत करा.' प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. खडबडून जागा झालो. फोनवरच आमचं काम सुरू झालं. मी विचारलं मूर्ती बदलवल्या का?' ' नाही. जुन्याच मूर्ती आहेत. बहुदा सार्या संगमरमरी.' पोलीस अधिकार्याने माहिती दिली. माझं काम सोपं झालं. मी सूचना दिली, 'पुजार्याच्या हातून मूर्ती पुसून घ्या. निर्माल्य वगैरे काढून टाका. देव्हारा कोरडा करा. मूर्तीजवळ लेडीज कॉन्स्टेबल उभ्या करा. रांगेतील लोकांना दूध पाजताना चमचा वाकडा करू देऊ नका. थोडा वेळ तरी लोक वाकडा करतील. त्याशिवाय दूध ओघळणार नाही. 25-50 लोकांनी दूध पाजलं की खाली गाभार्यातील दूध स्पंजने गोळा करा. बादलीमध्ये सगळय़ा भक्तांसमोर स्पंज पिळा. बादलीत दूध गोळा होईल.' खरं म्हणजे माझं म्हणणं त्या पोलीस अधिकार्याला पटलं नाही. त्याच्या बायकोच्या हातानेही गणपती दूध प्यायला होता. प्रत्यक्ष डोळय़ानं पाहिलं होतं. त्यानं तसं बोलूनही दाखवलं. पण साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी माझी सूचना अमलात आणायची ठरवली. नाईलाजास्तव. तासभरातच या अधिकार्यानं खूप उत्साही आवाजात फोन केला, ''मानव साहेब, दहा-एक मंदिरात प्रयोग केला. बादलीत दूध गोळा होतंय. खरंच गणपती दूध पीत नाही.'' असे बोर्ड लावता येईल का याची आम्ही चर्चा केली. 12 नंतर अनेक ठिकाणी बोर्ड लागले. मंदिरामंदिरात पोलीस स्पंजने दूध गोळा करत होते. किमान 15-20 लाख लोकांना मंदिरात ओढून आणणार्या अफवेला पोलिसांनी अथक परिश्रमाने, सक्रियतेने अवघ्या 8-10 तासात थिजवलं होतं. थांबवलं होतं. संध्याकाळच्या बातम्यात प्रसिद्ध झालं- ''मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरचा गणपती दूध प्यायला.'' पोलिसांचा पुन्हा फोन, ''मानव साहेब, गणपती दूध पीत नाही, असं तुमच्या संघटनेच्या वतीने स्टेटमेंट काढा.'' ''मी म्हणालो, 'हा चमत्कार पोलिसांनी थांबवला आहे. पोलीस कमिश्नरने वा गृहमंर्त्याने स्टेटमेंट काढलं पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करा. नाहीतर मी गृहमंर्त्यांशी बोलतो. पोलिसांना स्टेटमेंट काढणं योग्य वाटत नव्हतं. कारण मुख्यमंत्री स्वत: या चमत्काराचं समर्थन करत होते. तसं वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या टीव्हीवरून केलं होतं. पण हे स्टेटमेंट काऊंटर करणं आवश्यक होतं. उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथजी मुंडे हे गृहमंत्री असल्यामुळे मुंबईत रेड अँलर्ट घोषित झाल्यामुळं सार्या प्रकारावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची नीट कल्पना असायला हवी होती. पण मित्रपक्षाच्या मुख्यमंर्त्यांचं स्टेटमेंट काऊंटर करण्याची रिस्क उपमुख्यमंत्री घेतील का? अशी शंका पोलीस अधिकार्यांना आणि मलाही वाटत होती. त्यांच्याशी त्यावेळी माझी वैयक्तिक ओळख नव्हती. जयप्रकाश आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेले प्रमोद महाजन यांची मदत मिळू शकली असती. पण.. त्याची गरज पडली नाही. काही तासातच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांचं स्टेटमेंट टीव्हीवरून प्रसारित झालं. 'पोलिसांनी ठिकठिकाणी मंदिरात दूध गोळा केलं. दूध गाभार्यात जमा होत होतं, गणपती दूध पीत नाही.' आम्हा सार्यांचा जीव भांडय़ात पडला. पोलिसांच्या अथक परिश्रमाचं चीज झालं होतं. आजही मूर्ती दूध पिते आहे. डोळय़ातून अश्रू येताहेत अशा अफवा अधूनमधून पसरतात. पोलिसांनी ठरवलं तर ते किती प्रभावीपणे अशा दैवी वलय असणार्या अफवांनाही अटकाव करू शकतात याचा हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता. पण मुंबई पोलिसांचाही तारीफ के काबील कामगिरी त्यावेळी फारशी जनतेला कळू शकली नव्हती, हेही सत्य आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी 9371014832 |
Monday, 29 October 2012
मुख्यमंर्त्यांचा गणपती दूध प्यायला, त्याची गोष्ट !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment