''किती दिवस झालेत? केव्हा कार्यशाळा केली?'' मी. ''सर, 15 दिवसांपूर्वी सातार्यात मी तुमची कार्यशाळा केली. 15 दिवस सूचना देते आहे,'' मुलगी. ''पण मी महिनाभर कंपलसरी सीडीवर संमोहन-सराव करायला सांगितला होता ना? नंतरच टार्गेट निवडून सूचना द्यायच्या होत्या नां?'' मी. ''हो पण, मला इमर्जन्सी होती म्हणून मी त्वरित स्वतंत्र सूचना द्यायला सुरुवात केली,'' मुलगी. ''बरं ठीक आहे, पण 15 दिवसांतच तुला अपेक्षित रिझल्टस् मिळतील असं तुला कुणी सांगितलं? मी तर तसं सांगितलं नव्हतं नां? बरं काय सूचना देते आहेस?'' मी. ''सर, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे, पण तो माझ्याकडे लक्षच देत नाही. गेले 15 दिवस संमोहनात सूचना देते आहे.. माझ्याकडे पाहा, लक्ष दे, माझ्यावर प्रेम कर, खूप खूप प्रेम कर... पण सर तो साधं वळूनसुद्धा पाहत नाही.,'' मुलगी. मी उडालोच. माझा विश्वासच बसेना? माझ्या कार्यशाळेत शिकलेली एखादी विद्यार्थिनी असा प्रश्न विचारू शकते? असा विचार करू शकते? मला राहावलं नाही, मी विचारलंच, ''का गं नक्की तू माझ्याच कार्यशाळेत शिकलीस नां? पाचही दिवस पूर्ण वेळ उपस्थित होती नां?'' ''हो सर, पाचही दिवस, पूर्ण वेळ, तुमच्यासमोरच पहिल्या रांगेत बसली होती.'' ''या पाच दिवसांत कधीतरी, असं दुसर्याचं नाव घेऊन अथवा त्याची प्रतिमा पाहून दुसर्याला अशा सूचना देऊन काही परिणाम साधता येतो असं मी शिकवलं का? सांगितलं का?'' ''नाही सर, तुम्ही नाही सांगितलं. उलट असं काही करता येत नाही असंच तुम्ही सांगितलं, पण मला माहीत आहे नां! संमोहनात जाऊन अशा सूचना दिल्या की परिणाम मिळतो,'' मुलगी. ''तुला कसं माहीत?'' मी. ''तुमच्या आधी सातार्यात एक संमोहनतज्ज्ञ आले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं व्याख्यान झालं. मी गेले होते व्याख्यानाला. त्यांनी काही संमोहनाचे प्रयोगही करून दाखवले होते. त्या वेळी त्यांनी सांगितलं होतं. आपण संमोहनात जशा सूचना देऊ तसा दुसर्यांवर परिणाम होतो. आपल्या इच्छेनुसार घडतं.'' ''मग तू त्यांची शाळा न करता माझ्या कार्यशाळेत कशी आलीस?'' मी. ''त्यांचं व्याख्यान मला प्रभावी वाटलं नाही. तुमचं जास्त प्रभावी वाटलं. म्हणून मी तुमच्या कार्यशाळेला आले होते.'' ''तू जे ऐकलंस वा तुला जे वाटतं तो तुझा गैरसमज आहे. आपण स्वत: संमोहनात जाऊन स्वत:ला सूचना देतो, वारंवार सूचना देतो. त्या आपल्या मेंदूत ठसतात, इंप्रिंट होतात. त्यानुसार आपली नवी सवय निर्माण होऊ शकते. आपला स्वभाव बदलू शकतो. आपली वर्तणूक बदलू शकते. आपल्यात बदल होऊ शकतो. पण आपण संमोहनात जाऊन दुसर्याची प्रतिमा डोळ्यांपुढे ठेवून कितीही सूचना दिल्या. हजारो-लाखो वेळा सूचना दिल्या तरी त्याचा त्या दुसर्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही, होणं शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, गैरसमजूत आहे.'' दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट. पण तेव्हापासून सातत्यानं या प्रकारच्या प्रश्नांना, अंधश्रद्धांना मला तोंड द्यावं लागत आहे. 1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा' मुंबईतून सुरू केल्या तेव्हाही मला सातत्यानं या प्रकारच्या अंधश्रद्धांशी, समजुतींशी सारखी लढाई करावी लागली. संमोहन म्हणजे दुसर्याला वश करण्याचं, मोहित करण्याचं तंत्र अशीच समजूत होती. त्यामुळं सुरुवातीला काही वर्षे मोठय़ा संख्येनं पुरुष शिकण्यास येत असत, पण स्त्रियांची संख्या मात्र नगण्य, अल्प असे. माझे अनेक विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी म्हणत असत- ''सर, तुम्ही संमोहन न म्हणता या विषयाला मेडिटेशन म्हणा! जर दोन्ही अवस्था एकच आहेत, अल्फा रिदमच् आहेत, तर मेडिटेशन म्हणायला काय हरकत आहे? त्यामुळं सहभागींची संख्या वाढेल. मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळेल. स्त्रियाही मोठय़ा संख्येनं येऊ शकतील. एक चांगला, महत्त्वाचा विषय सगळ्यांना नीट आत्मसात करता येईल.'' मला कळत होतं. मेडिटेशन म्हटलं तर माझं काम जास्त सोपं होणार आहे. पण हा खोटेपणा झाला असता. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे मी शिकवतो ते मेडिटेशन नव्हतं. कारण भारतीय परंपरागत मेडिटेशनमध्ये, अल्फा रिद्मच्या अवस्थेत म्हणजे मेडिटेशनच्या अवस्थेत सूचना द्यायच्या नसतात. उलट आतलं सगळं मूळ आत्मास्वरूप बाहेर येऊ द्यावं अशी अपेक्षा असते. दुसरं मेडिटेशन हे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात वापरलं जात असल्यामुळं त्यासोबत त्या त्या कल्टसंबंधीच्या अनेक अंधश्रद्धा जुळल्या आहेत. त्यांचीही सफाई मला करत बसावी लागली असती. शिवाय मी कुणी श्री श्री, बाबा, महाराज नसल्यामुळं आणि तसं दुरान्वयानंही बनायचं नसल्यामुळं मेडिटेशन शब्द न वापरताच संमोहन शब्द वापरूनच कार्यशाळा चालवायचं ठरवलं. त्यासाठी महाराष्ट्रभर हजारो विनामूल्य व्याख्यानं आयोजित करून लाखो लोकांच्या मनातील 'संमोहन' या विषयासंबंधीचे गैरसमज दूर केले, भीती, अंधश्रद्धा दूर केल्यात. माझ्या आधी फक्त एक-दोघं जण संमोहनाचे स्टेज प्रोग्राम्स घेत असत. संमोहनात टाकून सूचना देत असत. त्यांनीही पुढे कार्यशाळा सुरू केल्या. त्या कार्यशाळेतही ते संमोहनात टाकून सूचना देणं आणि संमोहन प्रयोग करणं एवढंच करायचे. त्याचा 'व्यक्तिमत्त्व विकास' वगैरेशी फारसा संबंध नसे. त्यांच्या कामातूनही संमोहनासंबंधी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसारित होत असत. पण मी ठरवलं होतं उगाच टीका करत बसण्यापेक्षा आपण या विषयासंबंधी विधायक प्रबोधन करत जायचं आणि तेच इतकी वर्षे करत आलो. मोठय़ा प्रमाणावर मेडिटेशनच्या नावाखाली संमोहनाचा वापर अलीकडच्या काळात केला जाऊ लागला आहे, पण त्याची सुरुवात बर्याच वर्षापूर्वी सुरू झाली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक कल्टने डायरेक्ट संमोहनाचा वापर मेडिटेशनच्या नावाखाली करायला फार पूर्वीच सुरुवात केली. त्यामुळं ही कल्ट खूप वाढली. संमोहनासारखं प्रभावी हत्यार वापरून ही कल्ट त्यांच्या साधकांचं पार ब्रेनवॉशिंग करून टाकतं. दुसरं उदाहरण निर्मला माताचं. त्यांनीही सक्रियपणे संमोहनाचा वापर 'सहजयोगाच्या', मेडिटेशनच्या नावाखाली केला आहे. या दोन्ही कल्टबद्दल, त्यांच्या ब्रेनवॉशिंगबद्दल पुढच्या लेखांमध्ये आपण विस्तारानं पाहू. पण सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली चालणार्या ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून संमोहन वा मेडिटेशनच्या नावाखाली चालणार्या बदमाशीविरुद्ध लक्ष केंद्रित करू. आपण आपली 'माईंड पॉवर' वापरून काहीही करू शकतो, असा दावा अनेक ट्रेनर करतात. त्यासाठी सुरुवातीला आपल्या विनामूल्य कार्यक्रमात अनेक सक्सेस स्टोरी दाखवतात. एखाद्या अपंगाचं यश, पाय नसलेला माणूस जिद्दीनं उभा कसा राहिला, सचिन तेंडुलकर, अंबानी, अमिताभ बच्चनपासून अनेक लोक कसे यशस्वी झाले. या सक्सेस स्टोरी सांगताना त्यांच्या 'माईंड पॉवर'मुळं ते यशस्वी झालेत असा आभास निर्माण केला जातो आणि मग आमच्या कार्यशाळेत या, आपली 'माईंड पॉवर' वापरा आणि सहजतेनं यशस्वी व्हा! असा उघड संदेश दिला जातो. 'माईंड पॉवर'चं स्पष्टीकरण देताना काय सांगतात? आपण एखादी प्रबळ इच्छा केली, विल पॉवर वापरली, पुन्हापुन्हा हे घडावं अशी इच्छा धरली की, ती इच्छा फलद्रूप होते, प्रत्यक्षात येते. संमोहनात, मेडिटेशनमध्ये जाऊन एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा केली, तसं घडताना चलचित्र पाहिलं, व्हिज्युअलाईज केलं की तसं खरंच घडतं, असं सांगितलं जातं. थोडक्यात एखाद्यानं संमोहनात वा मेडिटेशनमध्ये जाऊन स्वत:ला सांगितलं, पाहिलं, ''मोठ्ठा इंडस्ट्रियालिस्ट झालो. मोठ्ठा कारखानदार झालो. (वा होतो आहे).'' असं रोज करत गेलं तर तो एक दिवस अंबानी सारखा इंडस्ट्रियालिस्ट बनेल. एखाद्यानं ''मी मोठा नट बनतो आहे. अमिताभसारखा यशस्वी नट, हिरो बनतो आहे.,'' अशी प्रबळ इच्छा धरली, वारंवार इच्छा धरली तर तो खरंच मोठा, यशस्वी नट बनेल. एखाद्यानं प्रबळ विल पॉवर वापरली तर त्याला बंगला, कारसुद्धा माईंड पॉवरमुळं प्राप्त होईल. हे असले 'माईंड पॉवर'चे दावे करणारे खूप भोंदू निर्माण झाले आहेत. अहमदाबादचा 'माईंड पॉवर ट्रेनर' स्नेह देसाई आणि महाराष्ट्रातला देसाईची काळी डुप्लिकेट म्हणजे 'कार्बन कॉपी' दत्ता घोडे यांच्याविषयी आधी लिहिलंच आहे. हे दोघेही महाठग आहेत. त्यांच्या 'थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपथी' या दाव्यांना आपण जाहीर आव्हान टाकलंच आहे. त्यांनी पळ काढला म्हणून नागपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार गुदरलीच आहे. पण इतरही सगळ्या खोटे दावे करणार्या 'माईंड पॉवर'वाल्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं भांडाफोड करणारच आहोत. माझा साधा प्रश्न आहे. भारतातल्या किमान पाच कोटी तरुणांना कॅटरिना कैफ वा करिना कपूर हवी आहे. अडीच, अडीच कोटी तरुणांनी जर यापैकी एकीला प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेतला, मन एकाग्र केलं, व्हिज्युअलाईज केलं तर अडीच कोटी लोकांना करिना आणि इतर अडीच कोटींना कॅटरिना प्राप्त होईल का? करिना-कॅटरिनाची हाडं तरी पुरतील का? अडीच कोटी तरुणांना हे शक्य आहे? मग माईंड पॉवर काय आहे? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Sunday, 21 October 2012
मेडिटेशन, माईंड पॉवरच्या नावे होते फसवणूक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment