तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..'' ''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.'' ''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.'' ''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते. ''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.'' बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.'' ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.'' 8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे. पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार? हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही. ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत. खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो. मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.'' जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?'' जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..??? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Saturday, 6 October 2012
ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment