Saturday, 18 August 2012

ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला सामोरे जा!


'भीती' अनेकांच्या जीवनाला पंगू बनवणारी, सारं जगणंच अधू बनवणारी भावना आहे. जोवर ती मर्यादेत असते तोवर ठीक आहे. कदाचित जीवित संरक्षणासाठी 'भीती' गरजेची आहे. समोर साप दिसला, तो चावू शकतो म्हणून भीती वाटून माणसानं सुरक्षित अंतरावर राहून त्याला जाऊ देणं ठीक आहे. वाघ, सिंह खाऊ शकतो म्हणून त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर स्वत:ला राखणं समजण्यासारखं आहे. पण कुणाला झुरळाची भीती वाटते. समोर झुरळ दिसले तरी जोरजोरानं किंचाळणं, छाती धडधडणं, शरीर थरथर कापणं सुरू होत असेल तर..? आता त्या व्यक्तीला माहीत आहे, की झुरळ चावत नाही. चावलं तरी माणूस मरत नाही. तरीही एखादी स्त्री प्रचंड घाबरत असेल तर त्याला आपण झुरळाचा फोबिया असं म्हणतो.

असे अनेक प्रकारचे फोबिया आपल्या जीवनात असू शकतात. झू फोबिया प्राण्यांची भीती, क्लॅस्ट्रो फोबिया बंद जागांची भीती, उघडय़ा जागांची भीती, अनोळखी माणसांची भीती, रक्ताची भीती, अंधाराची भीती, भीती वाटण्याचीच भीती अशा कितीतरी प्रकारच्या भीती मानवी जीवनात असतात. या तार्किकदृष्टय़ा अप्रस्तुत असतात. चुकीच्या असतात. प्रमाणाबाहेर असतात म्हणून खोटय़ा असतात. तरी अंतर्मनासाठी मात्र 100 टक्के खर्‍या असतात.

एक गृहस्थ गणपतराव एका जिल्हास्थळी राहतात. 20 मैलावर असणार्‍या एका गावातील शाळेत शिक्षक आहेत. रोज बसने जातात-येतात. बसस्टँडपासून त्यांचं घर केवळ 5-7 मिनिटं पायी अंतरावर आहे. पण ते कधीही पायी घरी जात नाहीत. जाऊ शकत नाही. रिक्षेवाला एवढय़ा कमी अंतरावर यायला तयार नसतो. पण रिक्षाला दुप्पट, कधी तिप्पट रक्कम मोजूनच ते घरी परततात. जातानाही हीच अवस्था. मुलांना बाबांसाठी रिक्षा पकडून आणावा लागतो. का? त्यांना कुर्त्यांची प्रचंड भीती वाटते.

एकदा रिक्षांचा स्ट्राईक होता. गणपतरावांना नाइलाजानं स्टँडवरून पायी घरी यावं लागलं. मोठी हिंमत करून, जीव मुठीत घेऊन ते पायी निघाले. गल्लीबोळात भरपूर मोकाट कुत्री. कुत्री पाहताच गणपतराव घाबरले. पाय थबकले. कुर्त्यांनी बरोबर ओळखलं. ते जोरजोरानं भुंकू लागले. गणपतराव आणखीच घाबरले. थरथर कापू लागले. कुर्त्यांनी भुंकून भुंकून रान उठवलं. आपल्या भाईबंदांना निमंत्रण धाडलं. पाहता पाहता 20-25 कुर्त्यांनी थरथर कापणार्‍या, जागच्याजागी थांबलेल्या गणपतरावांना गराडा घातला. आजूबाजूच्या माणसांचं लक्ष गेलं. त्यांना ओळखणार्‍या एका दुकानदारानं धाव घेतली. इतरांच्या मदतीनं कुर्त्यांना पिटाळून लावलं. पण गणपतरावांचं ब्लडप्रेशर एवढं वाढलं होतं, की त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं. नॉर्मल व्हायला 4-5 दिवस लागले. पण गणपतरावांचा फोबिया मात्र अधिक वाढला. ते अधिकच पंगू बनले. एरवी आपल्या जीवनात इतर कशालाही न घाबरणारा माणूस पण कुत्रा-फोबिया पायी अपंग झाला. घरी मोटारसायकल आहे. चालवता येते; पण चालवत नाही. कारण कुत्री मागे लागतात.

त्यांना कितीही समजावून सांगा, ''अहो, कुत्रा नेहमीच चावत नाही. हजारो माणसं रस्त्यावरून चालतात. सगळ्य़ांनाच कुत्रा चावतो कां? बरं चावला तर चावला अँण्टिरेबिज इंजेक्शन घेतलं की झालं. आजकाल तीनंच घ्यावे लागतात. त्याचा फार त्रासही होत नाही.'' गणपतराव म्हणतात, ''हे सारं मला माहीत आहे. मी शाळेत शिकवतो हे सारं. पण मला भीती वाटते.'' या ठिकाणी गणपतरावांचं कॉन्शस माइंड, जागृत मन घाबरत नाही, तर त्यांचं सबकॉन्शस माइंड अंतर्मन घाबरतं आणि अंतर्मनाला तर्कशास्त्र पटत नाही. कळत नाही. ते आपल्या अनुभवाला महत्त्व देतं.

गणपतराव 7 व्या वर्गात शिकत होते. तोवर तो एक नॉर्मल मुलगा होता. कुर्त्यांना फारसे घाबरत नसत. घरी ज्योतिषी आला. त्याने गणपतचा हात पाहिला. पत्रिका पाहिली. इतर भविष्य सांगताना सांगितलं, ''सावध राहा. चार पायांपासून सावध राहा. धोका संभवतो.''

आता ज्योतिष्यांचा धंदाच असा. असं सांगितल्याशिवाय चालणार कसं? गंडांतर टाळण्यासाठी ज्योतिष्यानं ताईत बनवून दिला. 500 रुपयांचा तो ताईत गणपतच्या गळ्यात बांधण्यात आला. त्या दिवसापासून घरातले सगळे, विशेषत: आजी त्याला 'चार पायांपासून सावध राहण्याची'सूचना वारंवार देऊ लागले.

एक दिवस शाळेतून घरी एकटंच येताना गणपतवर कुत्रं भुंकू लागलं. एरवीही असं घडायचं. त्या वेळी गणपत थांबायचा. दगड उचलून कुर्त्याकडे भिरकावला, की ते पळून जायचं. आज मात्र गणपतला आठवलं, 'चार पायांपासून सावध' कुर्त्यालाही चार पाय आहेत आणि घाबरून आपलं जड दफ्तर घेऊन पळत सुटला. कुत्रं मागे लागलं. इतरही कुत्री मागे लागलीत. एका कुर्त्यानं गणपतच्या पायाचा चावा घेतला. तेवढय़ात इतर लोक धावून आले. कुर्त्यांना पिटाळलं. 14 इंजेक्शन घ्यावे लागलेत आणि गणपतच्या आयुष्यात कुत्रा-फोबिया सुरू झाला. अजूनही तो 500 रुपयांचा ताईत गणपतच्या गळ्यात आहे. पण त्याला काही कुत्रे घाबरत नाहीत. फक्त ज्योतिष्याच्या पोटाची सोय झाली. पण गणपतच्या बोकांडी कुत्रा-फोबिया बसला.

अनेकांना आयुष्यात कुत्रे चावतात. सार्‍यांनाच कुत्रा-फोबिया होता कां? नाही ना? मग.. ज्योतिष्याच्या भाकितामुळं 'कुत्रा चावण्याचा अनुभव' गणपतच्या अंतर्मनावर अधिकच खोलवर परिणाम करून गेला आणि या भीतीला इतरांनीही अंधश्रद्धेपायी खतपाणी घातलं.

गणपतरावांना ही भीती घालवता येईल? कशी? गेली 22 वर्षे मी 'व्यक्तिमत्त्वविकास' कार्यशाळा चालवतो आहे. त्या माध्यमातून अक्षरश: हजारो माणसांची भीती, फोबिया घालविण्यासाठी मदत करता आली आहे. हजारोंना भीतीमुक्त होताना मी अनुभवतो आहे. पण मी स्वत: वयाच्या 19-20 वर्षापर्यंत अतिशय भित्रा होतो. मंत्रतंत्र-जादूटोणा प्रकारांना प्रचंड घाबरत असे. पायामध्ये चप्पल घातल्याशिवाय चालण्याची प्रचंड भीती वाटायची. 'पायाखालची कुणी माती घेतली आणि त्याची जारणमारणाची बाहुली बनवली तर..! तिकडे त्या मांत्रिकानं त्या बाहुलीची मान मोडताच इकडे आपली मान ताडकन तुटून पडेल' याची मला प्रचंड भीती वाटत असे. रस्त्यात काही मंत्रवलेलं पडलं असेल तर तिथून माघारी फिरत असे. दुसर्‍या रस्त्यानं जात असे. वडिलांची प्रचंड भीती वाटायची. मुलींची भीती वाटायची. खरं म्हणजे त्या काळात मला सगळ्याच प्रकारांची भीती वाटायची.

माझं वाचन प्रचंड होतं. माझा सर्वाधिक वेळ वाचन करण्यात जात असे. आपल्यात काही नाही. आपण नगण्य आहोत. आपल्याला विनोबा, आचार्य दादा धर्माधिकारी, जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारखं बनता यावं. थोडसं तरी त्यांच्यातलं काही आपल्याला साध्य करता यावं असं खूप तीव्रतेनं वाटत असे. तेवढय़ात एक वाक्य वाचनात आलं.

'या जगात भीती घालविण्याचा एकच मार्ग आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला मुद्दाम फेस करा. सामोरे जा. वारंवार ती गोष्ट करा. मेलो तरी चालेल या जिद्दीनं सामोरे जा.' हे वाक्य मनाला भिडलं. कुणाचं होतं ते आठवत नाही. पण माझे प्रयोग सुरू झाले.

पहिला प्रयोग वडिलांबाबत. त्यांच्यासमोर मुद्दाम उभं राहायचो. त्यांचं लक्ष गेलं, की, ''काय रे, काय काम आहे?'' करडय़ा आवाजात ते विचारायचे. ''काही नाही,'' माझं उत्तर. चारपाचदा असं घडल्यावर त्यांचा स्वर खाली आला. मृदू आवाजात त्यांनी विचारलं, ''का रे, तुला काही हवं कां? काही बोलायचं आहे कां?'' त्यांचा तो मृदू आवाज ऐकताच मला वाटलं मी जिंकलो. ''काही नाही'' म्हणून निघून आलो. पण त्या दिवसापासून वडिलांविषयीची भीती मात्र कमी झाली. माझा उत्साह वाढला. मी वर्धेला सायन्स कॉलेजमध्ये शिकायचो. 1971-72 सालची गोष्ट. त्या काळात कॉलेजमध्ये मुलंमुली एकमेकांशी बोलत नसत. कॉलेज सुटलं, की मुलं मुलींना खूप त्रास देत. टॉण्टिंग करणं, फुलं, कागदी बाण फेकून मारणं, कधी सायकली आडव्या घालणं सर्रास चालायचं. सारे तरुण शम्मी कपूर वा जितेंद्रची अवलाद बनून वावरायचे. अशा वातावरणात मी एक शामळू, खादी घालणारा, मान खाली घालून चालणारा मुलगा म्हणून असेल कदाचित. पण एक दिवस आमचा वर्ग सुटल्यावर अचानक चारपाच मुलींचा घोळका समोर आला. मला म्हणाला, ''तुमची प्रॅक्टिकलची वही देता कां? आम्हांला काही प्रॅक्टिकल्स पूर्ण करायचे आहेत.'' मी घाबरलो. हडबडून ''हो'' म्हणाले. माझा गोंधळ उडाला. वही हातात घेतली; पण माझा हात एवढा थरथर कापू लागला, की मुलींच्या हातात ती जाण्याआधीच खाली पडली. सारे खो-खो हसू लागले. मुलीही हसल्या. मुलांनी खूप टिंगल केली. मला खूप वाईट वाटलं. मी फेस करण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. पण जमेना. रोज ठरवायचो. 5-6 दिवस निघून गेले. एक दिवस एक मुलगी एकटी सापडली. वर्गातून बाहेर पडताना तिला म्हटलं, ''एक्स्क्यूज मी!'' ती थांबली. शांतपणे म्हणाली, ''काय काम आहे?'' मला सुचेना! आता काय म्हणावं? एवढं म्हणण्यासाठीच 5-6 दिवस लागले होते. मी म्हणालो, ''काही नाही, थॅक्स. जा.''आणखी दोनतीन मुलींबाबत हाच प्रयोग रिपीट केला. मुलींना कळेना काय प्रकार आहे. 'एक्स्क्यूज मी' म्हणतो, थांबवतो; जा म्हणतो.त्यांच्यात चर्चा सुरू झाली. पण तिथून दीडदोन वर्षानंतर मी जयप्रकाश नारायणांच्या तरुणशांती सेनेचा वर्धा जिल्हा संघटक होतो आणि मी

मुलांबरोबरच मुलींशीही छान संवाद साधू शकत असे. मोकळेपणानं बोलू शकत असे.

पुढे जयप्रकाशाजींचं आंदोलन प्रखर झालं. मीही देशभर हिंडू लागलो. आणीबाणी लागण्याच्या काही दिवस आधीची गोष्ट. मी बर्‍यापैकी निर्भय झालो होतो. 'हमला चाहे जैसा हो, हाथ हमारा नहीं उठेगा' असले नारे द्यायचो. संघटनेचं राज्यपातळीरचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पेलत होतो. एकदा खेडय़ावर जावं लागलं. ट्रेन उशिरा पोहोचली. त्यामुळं स्टँडवर उशिरा पोहोचलो. 4 कि.मी.पर्यंत पायी जायचं. रात्रीची वेळ. मधे आमराई. त्यात एक पडकी विहीर. तिथे खूप भुतं असतात असं ऐकलेलं. मला दहाव्या वर्गात असताना भूत लागलेलं - ते मांत्रिकानं उतरवलेलं - मी प्रचंड घाबरलेलो. स्वत:ला बजावलं 'कितीही भुतं लागली तरी घाबरून पळून जायचं नाही. मोठय़ा मांत्रिकाकडे जाऊ.सारी भुतं काढून घेऊ; पण पळून जायचं नाही..'

अंधारी रात्र. निर्मनुष्य रस्ता. काळोख. रातकिडय़ांचा आवाज.. विहीर ओलांडता ओलांडता नकळत मी सुसाट पळत सुटलो. लक्षात आले आपण घाबरून पळतो आहे. थांबलो. परत आलो. विहिरीच्या कठडय़ावर बसलो. छाती धडधडत होती. भीतीनं शरीर थरथरत होतं. किती वेळ बसलो माहीत नाही. पण शरीराचं थरथरणं थांबलं. हृदयाची घरघर थांबली. भूतही लागलं नाही. (त्या वेळी या जगात भूत नसतं हे माहीत नव्हतं. कुणाच्या तोंडून ठामपणे तरी ऐकलंही नव्हतं) बस्स! तो भीतीचा शेवटचा दिवस. त्यानंतर कधीही भीती वाटली नाही. नाहीतर रोज हाणामारीचे जीवघेणे प्रसंग झेलत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम एवढय़ा निर्भयपणे उभारताच आलं नसतं. 'ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्ष करा. फेस करा' याचा वापर करत मी माझी सगळ्या प्रकारची भीती घालवली. पण सगळ्यांनाच असं फेस करणं जमत नाही. मग, गणपतरावांना मी काय शिकवलं.. बेडवर पडल्या पडल्या.. संमोहनात गेल्यावर.. कल्पना करा, डोळ्यासमोर व्हिज्युएलाईज करा.. मी (गणपतराव) बसमधून उतरतो आहे. स्टँडवरून निर्भयपणे पायी चालत घरी जातो आहे. आजूबाजूला कुत्री आहेत. पण त्यांच्या समोरून अतिशय आत्मविश्वासानं निर्भयपणे चालतो आहे. ती भुंकताहेत.. तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, निर्भयपणे कुर्त्यांकडे पाहत ठामपणे चालतो आहे. निर्भयपणे घरी पोहोचतो आहे. 0 मी नेहमी असाच निर्भयपणे, कुत्री असतील नसतील तरी, आत्मविश्वासानं चालत येतो-जातो. दिवसेंदिवस माझ्या मनातील कुर्त्यांची भीती निघून जाते आहे आणि मी अधिकाधिक निर्भय बनतो आहे.

दृश्यमालिका पाहिल्यानंतर वरील दोन सूचना अनेकदा रिपीट करायच्या. रोज दिवसांतून दोनतीनदा सराव करायचा. दीड महिन्याच्या सरावात गणपतरावांना आतून वाटायला लागलं, आता आपण पूर्वीसारखं कुर्त्यांना घाबरत नाही. त्यांनी हिंमत केली. प्रत्यक्ष स्टँडवरून घरी पायी चालत आले. जमलं. त्यांना खूप आनंद झाला. मला फोन आला. ''सर, मी घरी पायी चालत आलो. कुत्रे भुंकले. थोडीशी भीती वाटली; पण जमलं.'' मी म्हणालो, ''रोज सराव सुरू ठेवा. पण प्रत्यक्ष पायी येत-जात जा!''

15 दिवसांनी गणपतरावांचा पुन्हा फोन आला, ''सर, गेले 15 दिवस मी रोज पायी येतो-जातो. आज तर मोटारसायकलने शाळेवर गेलो-आलो.''

मी त्यांचं अभिनंदन केलं. ते पुढे म्हणाले, ''सर, मी गळ्यातला तो ज्योतिष्याचा ताईत काढून फेकला.'' मी पुन्हा अभिनंदन केलं. म्हणालो, ''आता तुम्ही खरे निर्भय झाला आहात!''

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832

1 comment:

  1. खूप छान आहे हा लेख… भीती म्हणजे कल्पनेचा खेळ आजून काय

    ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला सामोरे जा! ...

    ReplyDelete