Saturday, 30 June 2012

स्नेह देसाईनंतर आता पोलखोल दत्ता घोडेची!


स्नेह देसाईनंतर आता
पोलखोल दत्ता घोडेची!
'थर्ड आय'ची जाहिरात करणारा 'निर्मल बाबा' सध्या अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस केसेस दाखल झाल्या आहेत. 'थर्ड आय' अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती दोन दिवसांच्या वर्कशॉपमधून (प्रत्येक विद्यार्थ्याची) जागृत करून दाखवतो. फक्त त्यासाठी 6900 रुपये फी भरून माझ्या कार्यशाळेत दाखल व्हा असा भंपक दावा करणारा अहमदाबादचा माईंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईनं चक्क आव्हानातून पळ काढला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याला 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं होतं. ते न स्वीकारताच पळून जाणं त्यानं पसंत केलं.

नागपुरात आता स्वत:ला डॉ. म्हणवणार्‍या एका नकली डॉ. दत्ता घोडेची कार्यशाळा होणार आहे. त्याची काही व्याख्यानं वसंतराव देशपांडे सभागृहात झालीत. तो कमी पैशात अद्भुत शक्ती प्राप्त करून देण्याचा दावा करतो. 5500 रुपये भरा माझी कार्यशाळा करा तुमचा 'सिक्स्थ सेन्स' जागृत होतो. त्यामुळं तुम्हाला तुमच्या परिचित माणसाशी तो कितीही दूर असला तरी टेलिफोनशिवाय संवाद साधता येईल, बोलता येईल. एका माणसाचं मन दुसर्‍या माणसाशी बोलू शकेल. म्हणजेच 'सिक्स्थ सेन्स' जागृत होईल. अंतराची मर्यादा नाही. परदेशातल्या माणसाशीही तुम्हाला (विदाऊट आयएसडी चार्जेस) संवाद साधता येईल, असा दावा या दत्ता घोडेनं केला. हाही माईंड पॉवर ट्रेनर. स्नेह देसाईसारखाच दुसरा एक ठग.

यालाही अ. भा. अंनिसनं 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं. हाही न स्वीकारता पळ काढणार! शनिवारी हा लेख प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी त्याची कार्यशाळा नागपुरात हिंदी मोर भवनात (सीताबर्डी, नागपूर) सुरू होणार आहे. आणि दत्ता घोडेनं आव्हान स्वीकारलं नाही तर अ. भा. अंनिस कार्यशाळेसमोर त्याच्या निषेधासाठी निदर्शनं करणार आहे. अ. भा. अंनिस गेली 30 वर्षे बुवाबाजी, चमत्कार करणार्‍या बाबांचा, मांत्रिकांचा, देव, देवी अंगात असल्याचा दावा करणार्‍यांचा, ज्योतिष्यांचा भंडाफोड करते आहे. आजवर हजारो अशा भोंदूंचा पर्दाफाश समितीनं केला आहे.

पण अलीकडे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांच्या नावाखाली, सुटबुटटाय घालून, आधुनिकतेचं व वैज्ञानिकतेचं सोंग आणून जुनीच बुवाबाजी धुडगूस घालते आहे. लहानपणापासून मनावर झालेल्या अंधश्रद्धाळू संस्कारांचा फायदा उचलून, विविध आमिषं दाखवून सामान्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे.भगवी कफनी घातलेल्या बाबांपेक्षा हे सुटबुटातले बाबा जास्त घातक आहेत, धोकादायक आहेत, तरुण पिढीला खड्डय़ात टाकण्याचं काम करणारे आहेत.

'व्यक्तिमत्त्व विकास' ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे आधुनिक सुटाबुटातले बाबा त्याचाच फायदा उचलून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली बेमालूमपणे अंधश्रद्धा पेरताहेत व स्वत:ची तुंबडी भरताहेत. म्हणून यांना यांची जागा दाखवणं व यांना गजाआड करणं नितांत गरजेचं आहे. स्नेह देसाई आणि दत्ता घोडे या दोघांचेही दावे सारखेच आहेत. एक 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' म्हणतो, दुसरा 'सिक्स्थ सेन्स' म्हणतो, एवढाच काय तो फरक. देसाई म्हणतो, तुम्ही कुठेही जाऊन सूक्ष्म देहाने पाहू शकता. दत्ता घोडे म्हणतो, तुम्ही इथे राहून कुठेही, कितीही अंतरावरच्या माणसाशी बोलू शकता. पॅरासायकॉलॉजीमध्ये 'अँस्ट्रल ट्रॅव्हल'ला 'क्लेअरोव्हायन्स' म्हणतात. दूर-संवादाला 'टेलिपॅथी' म्हणतात.

म्हणून दोघांनाही अ. भा अंनिसनं सारखं आव्हान टाकलं. आम्ही एक सत्य अन्वेषण समिती गठित करू. त्यात नागपुरातले ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते असतील. स्नेह देसाई व दत्ता घोडेनं निवडलेल्या एका माणसाला एका बंद खोलीत बसवलं जाईल. या व्यक्तीला सत्य अन्वेषण समिती काही कृती करायला वा बोलायला सांगेल. तो भाग व्हिडीओ रेकॉर्ड केला जाईल. त्याचवेळी स्नेह देसाई वा दत्ता घोडे पत्रकार संघाच्या हॉलमध्ये बसून त्यांच्या माणसानं काय कृती केली वा बोलला हे मेडिटेशनमध्ये जाऊन थर्ड आय जागृत करून वा सिक्स्थ सेन्स जागृत करून सांगावं. तेही व्हिडीओ रेकॉर्ड केलं जाईल. सत्य अन्वेषण समिती दोन्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून निर्णय देईल. जर स्नेह देसाई व दत्ता घोडेला 95 टक्के खरं सांगता आलं तर त्यांचा दावा खरा आहे असं मानलं जाईल. पुन्हा एकदा सेम प्रक्रिया रिपिट केली जाईल. दोन्हीदा 95 टक्के खरं ठरलं तर अ. भा. अंनिसचं 15 लाखांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. पहिल्यांदा त्यांना 95 टक्के खरं सांगता आलं नाही तरी दुसर्‍यांदा स्नेह देसाई वा दत्ता घोडे यांना संधी दिली जाईल.

या पद्धतीचं आव्हान स्नेह देसाईला पाठवलं. त्यानं स्वीकारण्यास नकार दिला म्हणून कोरिअरनं पाठवलं. तेही त्यानं नाकारलं म्हणून ई-मेलनं पाठवलं. दत्ता घोडेला आव्हान प्रत द्यायला कार्यकर्ते गेले. त्याच्या माणसांनी ते घेतलं नाही. दुसर्‍यांदा गेले तेव्हा स्वीकारत नाही म्हणून त्याच्या माणसांसमोर आव्हान प्रत ठेवून आले. एवढंच नव्हे तर विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने अ. भा. अंनिसनं आयोजिलेल्या 27 जूनच्या 'थर्ड आय किती खरं किती खोटं' या जाहीर कार्यक्रमात दत्ता घोडेलाही स्नेह देसाईसोबतच जाहीर आव्हान दिलं आहे. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. हॉलमध्ये जागा अपुरी पडल्यामुळं अनेकांना परत जावं लागलं होतं.

थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, दिव्यशक्ती, सिक्स्थ सेन्स, टेलिपॅथी या सगळय़ा प्रकारांबद्दल मी वा माझी समिती एवढं ठामपणे कसं काय बोलू शकतो? असा प्रश्न आपणास पडला असेल. दिव्यशक्ती, अँस्ट्रल ट्रॅव्हल, क्लेअरोव्हायन्स याचा अर्थ ''व्यक्ती एका ठिकाणी असताना त्याचा देह तिथेच राहतो. पण सूक्ष्म देहानं वा अन्य शक्ती मार्गानं तो कुठेही जाऊ शकतो, पाहू शकतो. स्वत: डोळय़ानं पाहिल्यासारखं सगळं त्याला दिसतं,'' असं मानलं जातं. कुठेही याचा अर्थ क्षणात, जगात कुठेही अमेरिकेत, हिमालयात कुठेही. टेलिपॅथीचा अर्थ कितीही अंतरावर दोन माणसं असली तरी त्यांना कोणत्याही अस्तित्वात असलेल्या माध्यमांशिवाय संवाद साधता येतो. मन मनाशी बोलू शकतं. या दोन्ही समजुती वा कल्पना जगभर अस्तित्वात होत्या. आध्यात्मिक शक्तीमुळं काही लोकांना, योग्यांना, साधूंना या प्रकारची क्षमता वा शक्ती प्राप्त होते अशी मान्यता होती.

माझं पंचवीस वर्षांपर्यंतचं आयुष्य आध्यात्मिक वातावरणात गेलं आहे. मला स्वत:ला या सगळय़ा शक्तींविषयी प्रचंड जिज्ञासा होती. खूप अभ्यास केला. विनोबा भावेंसारखा योगी जवळून पाहिला, अनुभवला. अनेक पोहोचलेल्या (म्हणजे आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेल्या) बाबांच्या नादी लागलो. पुढे या विषयाचा जमेल तेवढा अभ्यास केला. पण काही सापडेना.

मी पुण्याच्या किलरेस्कर प्रेसमध्ये पत्रकाराची नोकरी करायला लागल्यावर 80-82 सालात विज्ञानवादी विचारांचा परिचय झाला. अभ्यासाचा परीघ वाढला आणि पुढे कळलं, आपण ज्याचा शोध घेतो आहे त्या विषयांवर शास्त्रशुद्धरीत्या संशोधन झालं आहे. अमेरिकेमधील डय़ूक युनिव्हर्सिटीमध्ये एक पॅरासायकॉलॉजी (परामानसशास्त्र) डिपार्टमेंट होतं. डॉ. जे.बी. र्‍हाईन यांच्या नेतृत्वाखाली तिथे सगळय़ा आध्यात्मिक शक्तींबाबत संशोधन सुरू झालं. त्यांनी या सगळय़ा शक्ती तपासण्याची एक शास्त्रशुद्ध अचूक मेथड (पद्धती) वापरण्याची शिस्त निर्माण केली. डॉ. र्‍हाईन यांच्यानंतरही संशोधन सुरू राहिलं.

अशा पद्धतीची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स जगभर सुरू झाली. त्यातही संशोधन होत राहिलं. आत्मा, पुनर्जन्म, दिव्यशक्ती, टेलिपॅथी, सिक्स्थ सेन्स, क्लेअरोव्हायन्स, इन्टय़ुशन, सायकोकायनेसिस (नजरेनं चमचा वाकवण्याची क्षमता) या सगळय़ांवर दीर्घकाळ संशोधनं सुरू होतं. अमेरिकेतील डय़ूक युनिव्हर्सिटीतील संशोधनांवर हजारो कोटी खर्च झालेत. पण 75 वर्षांत एकही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. म्हणून हे पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट बंद करण्यात आलं. हळूहळू जगभरची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स बंद पडलीत. जी सुरू आहेत त्यांना वैज्ञानिक जगतात मान्यता नाही, प्रतिष्ठा नाही.

या गोष्टी खर्‍या नाहीत हे निर्विवादपणे सिद्ध झालं आहे. अमेरिकन मिल्ट्री व रशियन मिल्ट्रीनंही अशा संशोधनांवर खूप खर्च केला. पण काहीच मिळालं नाही. एक जरी दिव्यशक्ती असणारा माणूस मिळाला असता तर 26/11 चा मुंबईवर होणारा अतिरेकी हल्ला, (किमान अतिरेकी जहाजात बसल्यावर तरी) आधीच कळला असता.

आपलं सैन्य, पोलीस दल समुद्रकिनार्‍यावर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीत राहिलं असतं. काही मिनिटांत 10 अतिरेकी मारले गेले असते आणि आमचे मित्र, एटीएसचे प्रमुख पोलीस अधिकारी हेमंत करकरे मारले गेले नसते.बिन लादेनला शोधण्यासाठी व मारण्यासाठी करोडो डॉलर्स व अनेक वर्षे वाया घालवावे लागले नसते. एक स्नेह देसाई व दत्ता घोडे.. खरंच यांच्यात अशी शक्ती असती तर पोलीस खात्याचं कामच सोपं झालं असतं. नागपुरातील मोनिकाचे मारेकरी शोधण्यासाठी नागपूर पोलिसांना जंग जंग पछाडावं लागलं नसतं. बस्स, यांच्या दिव्यशक्तीनं, 'सिक्स्थ सेन्स'नं तत्काळ शोध लागला असता. आपण असे दिव्यशक्तीवाले स्नेह देसाई त्यांचे चेले पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस खात्यात अधिकृत नेमले असते. एकही चोरी, एकही खून केस अनसॉल्व्हड राहिली नसती. 100 टक्के केसेस सोडवण्याचा पोलीस रेकॉर्ड निर्माण करता आला असता. पण हे शक्य आहे?

भंपक स्नेह देसाई नामक बाबा कार्यशाळेत म्हणाला, ''हे अंनिसवाले काय मला 15 लाख देतात? मीच त्यांना 15 करोड रुपये देऊ शकतो. माझ्याजवळ करोडोंची संपत्ती आहे.'' लोकांना खोटी लालूच दाखवून, लुबाडून कोटय़वधी रुपये कमावणार्‍या ठग देसाईची मस्ती, माज उतरवण्याची वेळ आली आहे. गणेशपेठ पोलीस चौकीत स्नेह देसाईविरुद्ध दोन लोकांनी तक्रार केली आहे. नागपूरचे पोलीस कमिश्नर अंकुश धनविजय यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे. स्नेह देसाईंकडून फसवल्या गेलेल्या लोकांनी हिंमत दाखवून, तक्रार करण्यास पुढे यावं आणि नागपूरचं पोलखोल शहर नावाची प्रतिष्ठा राखण्यास मदत करावी. पुढचा नंबर दत्ता घोडेचा आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी - 9371014832

No comments:

Post a Comment