Thursday 28 June 2012

दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा


दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा

       पुण्याची गोष्ट. काही वर्षापूर्वी माझ्या कार्यशाळेचा एक विद्यार्थी आपल्या बहिणीला घेऊन आला. काउन्सिलिंगसाठी. केस फारच विचित्र होती. बहीण सांगू लागली, की माझा नवरा एवढ्यात माझ्यावर खूप संशय घेतो. पंधरा दिवसांपूर्वी तो मला म्हणाला, ''मी तुला रंगेहाथ पकडलं. आज दुपारी तू तुझ्या प्रियकरासोबत घरात रासक्रीडा करत होतीस. तू ब्ल्यू रंगाचा गाऊन घातला होता. तुझ्या त्या प्रियकरानं लाल रंगाचा शर्ट घातला होता आणि तुम्ही माझ्या घरात माझ्या बेडवर असली थेरं करता?'' असं म्हणून तो खूप भांडू लागला. मी त्याला परोपरीनं समजावून सांगत होती, की असं काही नाही. मी एकटीच घरी होते. झोपले होते. तुम्ही केव्हा आलात? केव्हा पाहिलंत? पण या प्रश्नांचं उत्तर न देताच तो खूप भांड भांड भांडला.

पुन्हा आठ दिवसांनी याच पद्धतीचा आरोप त्यानं केला. या वेळी मी हिरवा गाऊन घातला होता अन् माझ्या प्रियकरानं पांढर्‍या रंगाचं शर्ट घातलं होतं असं सांगून आम्ही कशी रतिक्रीडा करत होतो याचं साद्यंत वर्णन करू लागला. जणू काही बेडरूममध्ये उभा राहून तो सारं पाहतो आहे.

पुन्हा कडाक्याचं भांडण.. हे सारं खोटं आहे म्हटल्यावर त्यानं माझ्या अंगावर हात टाकला. मला खूप मारलं. ती काकुळतीनं सांगत होती, ''सर, हे सारं खोटं आहे हो! मी असं काही केलं नाही. माझा कुणी प्रियकर नाही. लग्नाला दोन वर्षे झाली. आता अचानक हे असं का करतात? माझ्यावर कां खोटा आळ घेतात?'' मुलगी अगदी प्रामाणिकपणे बोलत होती. इतक्या वर्षाच्या अनुभवाच्या आधारे ती खरंच बोलते आहे हे माझ्या लक्षात येत होतं.

मी तिला समजावू लागलो. काही माणसं संशयापायी एवढी पछाडली जातात, की मनात आलेली शंका त्यांना खरीच वाटायला लागते. कधीकधी हा आजार बळावला तर त्यांना तशी दृश्येही दिसायला लागतात. आम्ही याला 'पॅरोनिया', 'संशयपिशाच' म्हणतो. तो पेशंट आहे असं समजून त्याला वागवावं लागेल. प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागेल. मी समजावून सांगितलं. बहीणभाऊ पोलिसांकडे तक्रार करणार होते. त्यापासून त्यांना परावृत्त केलं.

बहिणीने जाता जाता मला विचारलं, ''सर, मेडिटेशनमुळं असं होतं कां? माझा नवरा म्हणतो, मी प्रत्यक्ष पाहिलं. मला दिसतं. कुठलंही मी पाहू शकतो. कुणा गुजरातच्या देसाईचा मेडिटेशन कोर्स माझ्या नवर्‍यानं केला आहे.''

''मेडिटेशनमुळं असं होत नाही. असं होत नसतं.'' असं सांगून मी त्यांना पाठवलं. पण त्यांचे वाद वाढतच गेले. त्यांना वेगळं होणं भाग पडलं. माझ्या विद्यार्थ्यानं पुढे मला माहिती पुरवली त्याच्या बहिणीनं वैतागून घटस्फोट द्यायचं ठरवलं.

14 जूनला नागपूरच्या देशपांडे सभागृहात अहमदाबादच्या माइंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईचा कार्यक्रम झाला. माझे काही कार्यकर्ते ऐकायला गेले होते. त्यात देसाईनं दावा केला, ''माझा दोन दिवसांचा वर्कशॉप केल्यानंतर मेडिटेशनद्वारे 'थर्ड आय'ची शक्ती जागृत होते. ('अँस्ट्रल ट्रॅव्हल' असंही त्याला म्हटलं) त्याद्वारा तुम्ही नागपुरात असताना तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी दिल्लीत वा कुठेही असले तरी तुम्ही त्यांना पाहू शकता. ते त्या वेळी काय करताहेत, त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत वगैरे सारं तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.''

16-17 जून रोजी नागपुरात झालेल्या वर्कशॉपमध्ये स्नेह देसाईनं मेडिटेशनमध्ये सूचना दिली, ''आता तुम्ही शरीराच्या बाहेर आला आहात. स्वत:ला पाहता आहात.. तुम्हांला आता जिथे जायचं आहे तिथे जा.. पाहा'' आणि मग काही लोकांनी घरी जाऊन पाहिलं. कुणी दूरवरच्या गावी जाऊन पाहून आले. काहींनी परदेशात मित्र-नातेवाईक काय करतात तेही पाहिलं. नंतर त्यांचे अनुभव रेकॉर्डही केलेत.

काय प्रकार आहे हा? मी गेली 22 वर्षे हिप्नोथेरपी, संमोहन उपचार शिकवतो. सुरुवातीस प्रामुख्यानं मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, सोशलवर्कर्स यांना शिकवत आलो. पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर विविध प्रकारे संमोहनाचे प्रयोग करून पाहिले आहेत. सर्वसाधारणत: सुशिक्षित लोकांपैकी 60 ते 70 टक्के लोक डीप-मेडियम ट्रान्समध्ये जाऊ शकतात. त्यांना सहज व्हिज्युअलाजेशन होतं. डोळ्य़ांपुढे चित्रमालिका उभी राहते. म्हणजे या अवस्थेत जी कल्पना मनात करतात अथवा त्यांना सांगितलं जातं ते प्रत्यक्ष दिसू लागतं. अगदी स्पष्ट-स्वच्छ दिसतं. डोळे बंद असताना उघडय़ा डोळ्य़ांनी पाहिल्यासारखं सारं दिसतं. पण हे सारं काल्पनिक असतं. खरं नसतं. ही मानवी मनाबाबत सहज घडून येणारी गोष्ट आहे. या व्हिज्युअलाजेशनच्या मानवी मनाच्या, सामर्थ्याचा उपयोग संमोहन उपचारांमध्ये रोगदुरुस्तीकरिता व्यक्तिमत्त्वविकासाकरिता केला जातो.

चलाख स्नेह देसाई बुवांनी हे तेच (पुण्याला मेडिटेशन शिकविणारे ते देसाईबाबा हेच आहेत हे आता मला कळलं.) व्हिज्युअलाजेशनचं सामर्थ्य म्हणजे थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल असल्याचं सांगून तुम्ही दोन दिवसांत 'दिव्य दृष्टी' प्राप्त करू शकता असं सांगून चक्क लोकांना फसविण्याचा धंदा सुरू ठेवला आहे. ही केवळ मनाची कल्पना असते ही वस्तुस्थिती न सांगता तुम्ही सूक्ष्म देहानं कुठेही जाऊन पाहू शकता असं हा स्नेह देसाई नामक भंपक बाबा सांगतो.

भारतीय संस्कारात वाढलेला माणूस 'दिव्य दृष्टी'च्या या सिद्धान्तावर चटकन विश्वास ठेवतो अन् भरपूर पैसे भरून स्वत:ला फसवून घेतो. माझ्या विद्यार्थ्याच्या बहिणीच्या त्या नवर्‍यानं पुण्यात स्नेह देसाईची कार्यशाळा केली. त्याची थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती जागृत झाली अशी त्याची समजूत झाली. दुकानात असताना मेडिटेशनमध्ये जाऊन तो घरी बायको काय करते हे पाहू लागला. (त्याला वाटू लागलं आपण घरी जाऊन सूक्ष्म देहानं खरंच पाहतो आहे.) त्याला त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत रतिक्रीडा करताना दिसू लागली. त्याच्या मनात जशी कल्पना येईल तसं दिसेल. हा सारा मनाचा खेळ. पण त्यांच्या भंपळ बाबानं, स्नेह देसाईनं तर सांगितलं होतं, की तुम्ही सूक्ष्म देहानं प्रत्यक्ष जाऊन पाहता. मग दिसतं ते सारं खरंच असं त्याला वाटू लागलं. त्या वेळी त्या मुलीला मी पोलीस तक्रारीपासून परावृत्त केलं याचं वाईट वाटतं. मारहाणीच्या केसमध्ये तिच्या नवर्‍याच्या जबाबात देसाईच्या 'थर्ड आय'चा उल्लेख आला असता.. आणि.. पण मेडिटेशनच्या नावाखाली एवढा खोटारडेपणा करणारा स्नेह देसाईंसारखा एखादा ट्रेनर असू शकतो हे त्या वेळी मला माहीत नव्हतं. म्हणूनच आता आपण त्याला 15 लाखांचं आव्हान टाकलं आहे. 'थर्ड आय' सिद्ध करा, 15 लाख रु. जिंका! नाहीतर जनतेची माफी मागा!

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी : 9371014832

No comments:

Post a Comment