Saturday, 7 July 2012

भोंदूंना सारे मिळून धडा शिकवू या!


'व्यक्तिमत्त्व विकास' हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. माझं स्वत:चं व्यक्तिमत्त्व वयाच्या 19-20 वर्षापर्यंत अत्यंत खुजं होतं, निराशावादी 'मेलॉनकॉलिक' होतं. कसलाही आत्मविश्वास, हिंमत नव्हती. खूप न्यूनगंड होता. स्वभाव भित्रा, हळवा, दुबळा, रडका, एकलकोंडा होता.

खूप मेहनतीनं, प्रयत्नपूर्वक, दीर्घकाळाच्या तपश्चर्येनं स्वत:चं व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदललं. पुढे 14-15 वर्षे वेगवेगळय़ा वृत्तपत्रांचे 'युवा स्तंभ' चालवीत असताना आणि 1982 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे ही चळवळ चालवीत असताना हजारो युवक-युवतींचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हजारो व्यक्तिमत्त्वांना आकार आला. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या वेगवेगळय़ा, जगभर चालणार्‍या विविध पद्धतींचा, प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला.

हा विषय खूपच मोलाचा वाटल्यामुळं नागपूरचा मुक्काम हलवून मी मुंबईत 1990 साली राहायला गेलो. तिथून 1991 सालापासून महाराष्ट्रभर 'व्यक्तिमत्त्व विकासा'ची कार्यशाळा चालवतो आहे.

1990-91 साली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा इंग्रजी भाषेतूनच चालत. पंचतारांकित वा मोठय़ा, महागडय़ा हॉटेलमध्ये त्यांचं आयोजन करून भरमसाठ फी आकारली जात असे. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक, इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी. पण सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचवता यावा म्हणून मुद्दाम मराठी भाषेत, कमी खर्चात ही कार्यशाळा हजारो लोकांपर्यंत पोहोचवली. त्यातून हजारो माणसांचं व्यक्तिमत्त्व घडताना अनुभवलं. सोबत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरूच होतं. बुवाबाजीविरुद्धची लढाई सुरूच होती.

आज ही समाजातील बुवाबाजी उघड पद्धतीनं व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात शिरल्यामुळं मनाला प्रचंड वेदना होतात. म्हणूनच या बुवाबाजीविरुद्ध दंड थोपटून उभं राहण्याचा, या बुवाबाजांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्याचाच दृष्य परिणाम स्नेह देसाई, दत्ता घोडे यासारख्यांना जाहीर आव्हानं टाकणं, त्यांच्याविरुद्ध निदर्शनं आयोजित करून निषेध करणं हे मार्ग अनुसरावे लागले.

स्नेह देसाई तर पळून गेला. पण दत्ता घोडेनं नागपूरच्या हिंदी मोरभवन समोर आमची निदर्शनं सुरू असतानाच (त्याची कार्यशाळा सुरू होण्याच्या वेळी) फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. नंतरही एक दोन वेळा फोनवरून संपर्क साधला.

''सर मी तुमचा विद्यार्थी. पुण्याला आपण प्रत्यक्षही भेटलो आहे. स्नेह देसाईंसारखे लोक असेच थर्डआयसारखे दावे करतात. त्यामुळं कार्यशाळांना लोक गर्दी करतात. मोठा व्यवसाय होतो. म्हणून इतरांसारखाच मीही टेलिपॅथीचा दावा केला. माझी चूक झाली. पुन्हा असं करणार नाही. मी आता काय करू? तुम्हीच सांगा. माझं खूप आर्थिक नुकसान झालं. पण तुम्ही म्हणाल तसं करेन. आपले कार्यकर्ते कार्यशाळेत येऊन तर काही करणार नाही ना?'', दत्ता घोडे काकुळतीनं मला सांगत होता.

मी त्याला स्पष्टच शब्दात सांगितलं, ''व्यवसाय चालावा म्हणून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली असलं खोटंनाटं सांगून लोकांना फसवण्यापेक्षा सरळ बाबागिरीचा धंदाच सुरू कर ना?''

''मग तर तुम्ही मला मुळीच सोडणार नाही,'' त्यावर घोडेचं उत्तर.

29 जूनला, शुक्रवारी आम्ही दत्ता घोडेविरुद्ध निदर्शनं केली आणि त्याच दिवशी रात्री श्रीमती छाया सावरकर, सुरेश सुरमुरे, प्रशांत सपाटे यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दत्ता घोडेविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.

रविवार 1 जुलैला दत्ता घोडेचा फोन आल्यावर त्याला स्पष्टच सांगितलं; ''तूच म्हणतो की मी तुमचा विद्यार्थी आहे. मग मी एवढं वैज्ञानिक पद्धतीनं तुला शिकवलं असताना, एवढे धादांत असत्य दावे तू केले आहेस. तुझ्यापुढे दोनच पर्याय आहेत. एक तर आमचं 15 लाखांचं आव्हान स्वीकारून तुझ्यात टेलिपॅथीची (म्हणजे दूर अंतरावरच्या माणसाच्या मनाशी बोलणे, त्याचे विचार आपोआप ओळखणे) क्षमता आहे हे सिद्ध करणे. नाहीतर जनतेची जाहीर माफी मागणे. त्यासाठी तू नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घे. माझ्यात टेलिपॅथीची क्षमता नाही. अशी शक्ती कुणाला प्राप्त करता येत नाही. मी खोटा दावा केला होता. पुन्हा असं करणार नाही, अशी स्पष्ट कबुली देऊन त्या प्रेस कॉन्फरन्समधल्या निवेदनाची एक प्रत जोडून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला व सीताबर्डी पोलीस स्टेशन नागपूरला माफीनाम्यासह एक विनंतीपत्र दे. प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. तुलाही आम्ही देतो.''

सोमवारी दि. 2 जुलैला मी हे सारं करतो असं दत्ता घोडे म्हणाला, मला कबूल केलं. मला वाटलं खरंच हा तसं करेल. पण दत्ता घोडेचा मंगळवारी, 3 जुलैला फोन आला, तो धुळय़ावरून. ''सर मी धुळय़ाला आलो. मी इथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू का?''

म्हणजे दत्ता घोडेला गांभीर्य नाही. इतकी वर्षे आपण लोकांची फसवणूक केली त्याची खंत नाही. नागपूरला केलेल्या फसवणुकीची कबुली धुळय़ाला देऊ का असं म्हणतो? म्हणजे फक्त वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे.

फसवून पैसे कमावण्याची चटक लागल्यानंतर प्रामाणिक मार्गावर येणं तसं कठीणच. स्नेह देसाई असो की दत्ता घोडे असो यांना धडा शिकवण्याशिवाय पर्यायच नाही. स्नेह देसाईचा सहकारी असणार्‍याची एक कार्यशाळा नागपूरच्या सेंटर पॉईंटला 7-8 जुलैला आहे. अ. भा. अनिस तर आपलं काम करेलच. पोलीस यंत्रणाही आपलं काम करेल. पण प्रत्येक नागरिकानंही खडसावून जाब विचारला पाहिजे.

आता तुमच्या गावात कुणीही व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपॅथी, लेव्हिटेशन (हवेत तरंगणं), मनी अट्रॅक्शन, सिकेट्र, पास्ट लाईफ रिग्रेशन असे दावे करायला लागले तर सरळ त्यांना त्या क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान द्या. आमच्या वतीनं 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्याचे आव्हान द्या. त्यांचे खोटे दावे त्यांच्याच घशात घाला. आव्हान स्वीकारले तर आम्ही आहोतच.

मुंबईला पोहोचताच गृहमंत्री आर. आर. पाटलांना भेटून या सगळय़ा फसवणूक करणार्‍या भोंदूविरुद्ध पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची विनंती करणारच आहोत. आणि ते अँक्शन घेतील याची खात्री आहे.

पण आपणा वाचकांचीही जबाबदारी आहेच. असल्या भोंदूंना सारे मिळून धडा शिकवू या!

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत)

भ्रमणध्वनी : 9371014832

No comments:

Post a Comment