रागाने पाहण्याचा परिणाम
रागाने पाहण्याचा परिणाम
| ||
हे सारे आपल्या मनाचे खेळ. वेगवेगळ्य़ा प्रसंगांत प्रकट झालेले, शब्दरूप घेऊन अवतरलेले. पण मन म्हणजे काय? हृदय, हार्ट माहीत आहे. शरीरात पाहता येतं. तपासता येतं. त्याची धडधड, फडफड जाणवते. मोजता येते; पण ते मन नव्हे. हृदय रक्ताभिसरणाचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. रक्त शुद्धीकरणाचं पम्पिंग स्टेशन आहे. अजूनही हृदयावर हात ठेवून 'ये मेरा दिल तेरेही लिये धडक रहा है,' असं म्हणत असलो तरी प्रेम जाणवणारं, करणारं मन म्हणजे हृदय नव्हे. मग मन म्हणजे काय? 1986-87 सालची गोष्ट. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू करून पाच-सहा वर्षे झाली होती. एस. एम. जोशी, यदुनाथजी थत्ते यांचे सहकारी चंद्रकांतजी शहा, ते आंतरभारतीचं देशभराचं काम पाहत असत. यांच्यासमवेत उत्तर प्रदेश दौर्यावर जात होतो. उत्तर प्रदेश सरकारनं सातव्या वर्गापर्यंतच्या शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरं आयोजिली होती. शिक्षकांसमोर 'अंधश्रद्धा निर्मूलन' हा विषय मांडावा म्हणून सुमारे दोन महिने कालावधी काढून मला जावं लागलं. त्या काळात लाखभर शिक्षकांचं प्रशिक्षण होणार होतं. तिसर्या वर्गाच्या स्लिपर कोचमध्ये आमचं आरक्षण होतं. आगगाडीनं उत्तर प्रदेशात प्रवेश केला. आरक्षणाला काहीच अर्थ उरला नव्हता. कुणीही शिरत होतं. धड बसायला पण जागा शिल्लक नव्हती. नव्या स्टेशनावरून चार-पाच आडदांड तरुणांचं टोळकं शिरलं. सहा फुटांपेक्षा अधिक उंच असणार्या, एका प्रचंड देहपठरी असणार्या, तरुणानं माझ्या शेजारच्या 6 इंच रिकाम्या जागेत अचानक बसकन मारली. मी त्या वेळी खूप बारका होतो. माझी सारी हाडं चेपली. बरगडय़ा प्रचंड दुखावल्या. मी खूप रागानं त्या धटिंगण तरुणाकडे काही वेळ पाहिलं. कदाचित माझे डोळे रागानं लालबुंद झाले असावेत. 15-20 सेकंद रोखून पाहिलं असावं. बस्स..! रागारागात उठलो आणि चंद्रकांत शहा बसले होते तिथे जाऊन कशीबशी जागा मिळवून बसलो. हे उत्तर प्रदेश होतं. इथे नियम-कायदा याला काही अर्थ नसतो हे मला माहीत होतं. भांडण्यात काहीच अर्थ नव्हता. 20-25 मिनिटांनंतर तोच धटिंगण तरुण माझ्याकडे आला. खूप रडवेला वाटत होता तो. अगदी आर्जवी आवाजात मला म्हणू लागला, ''साहबजी, मुझे माफ करो. मुझसे गलती हुई. मैने आपको पहचाना नहीं? आपने जो कुछ किया प्लिज उसे वापस लो.'' मला कळेना तो काय बोलतो आहे ते. पण त्याचा व्याकूळ स्वर पाहून, ऐकून मी अधिक निरखून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल-काळाठिक्कर दिसत होता. घामानं थबथबला होता. त्याचे चारही सहकारीसुद्धा खूप घाबरलेले दिसत होते. मी विचारलं, ''क्यों? क्या बात है?'' ''साहबजी, मुझे बहुत अस्वस्थ लग रहा है! जब से आपने मेरी आँखों में देखा तब से धडकने तेज चल रही है (उलटी) आने जैसा लगता है! मै बार बार टॉयलेट जा रहा हूँ। लेकिन कै भी नहीं हो रही! और मै छटपटा रहा हूँ! मेरी पुरी जिंदगी में ऐसा बुरा अनुभव कभी नहीं हुआं! प्लिज, मुझे क्षमा किजीये! आपने आँखों से जो कुछ किया उसे वापस लिजिये.'' आता थोडासा प्रकाश माझ्या डोळ्य़ांत पडू लागला. हा एवढा पहेलवान, उद्दाम, धटिंगण तरुण एवढा गलितगात्र होऊन समोर उभा राहून विनवण्या करताना पाहून मला एका बाजूनं हंसू येत होतं. दुसर्या बाजूनं कीवही येत होती. मी खूप रागानं एकटक काही काळ त्याच्याकडे रोखून पाहिल्यामुळं मी डोळ्य़ांसमोर त्याच्यावर जादू केली, त्राटक केलं असं त्याला वाटत आहे हे माझ्या लक्षात आलं. मी अगदी सहजपणे उभं राहून त्याच्या खांद्यावर हात टाकला. थोडसं थपथपलं. अत्यंत आश्वासक आवाजात स्पष्टपणे पण प्रेमानं म्हणालो, ''आपको कुछ नहीं हुआ है. एकदम रिलॅक्स हो जाओ! रिलॅक्स.. रिलॅक्स! कुछ नहीं हुआ है। आप पुरी तरह ये स्वस्थ हो, रिलॅक्स हो। एकदम नॉर्मल हो!.'' आणि थोडा वेळ त्याच्या खांद्यावर थपथपत राहिलो. पाहता पाहता मिनिटभरात त्याचा श्वासोच्छ्वास नॉर्मल होऊ लागला. लाल-काळवंडलेला चेहरा रिलॅक्स होऊ लागला. ''आप को कुछ नहीं हुआ है! ऐसा कोई आपका कुछ बिगाड नहीं सकता है। किसी में भी ऐसी शक्ती नहीं होती है। मुझ में भी नहीं है। ये केवल आपका वहम है!'' तीन-चार मिनिटांत महाशय पूर्णत: नॉर्मल झाले. मग आमचा संवाद सुरू झाला. चंद्रकांतजी शहांनी माझा परिचय करून दिला. मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम काय असतं ते त्यांना समजावून सांगू लागलो. लहानपणापासून असेच संस्कार झाल्यामुळं 'माझं रागानं एकटक रोखून पाहणं त्याला त्राटक वाटलं. तो घाबरला. या घाबरल्या अवस्थेत त्याच्या मनानं स्ट्राँग सजेशन घेतलं. आणि लहानपणापासून निर्माण झालेल्या समजुतीमुळं त्यानं झीश-उेपवळींळेपशव र्डीससशींळेपी (आधीच पेरलेल्या समजुती सूचना) स्वीकारून आपली ही अवस्था करून घेतली. त्याला जे-जे होईल असं वाटलं ते-ते त्याला झालं. यात माझा काहीही संबंध नाही. फक्त त्याच्या समजुतीचा संबंध आहे. दुसरं कुणी काही करू शकत नसतं. जादूटोणा, त्राटक, मंत्रतंत्र वगैरे सारं कसं खोटं असतं. त्यासाठी आमचं लाखभर रुपयाचं (त्या वेळी ते 1 लाख रुपये होतं. आता बक्षिसाची रक्कम 15 लाख रुपयांची आहे) आव्हान आहे. ते कुणीही जिंकू शकलं नाही हे समजावून सांगितलं. हा धटिंगण तरुण अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट होता. आणि उत्तर प्रदेशात विद्यार्थी निवडणुका जिंकण्यासाठी 10-20 लोकांचे हातपाय तोडण्याची क्षमता असल्याशिवाय कुणी निवडणूक जिंकू शकत नाही. एरव्ही तो आणि त्याचे सहकारी अत्यंत धाडसी होते. निर्भय होते. पण माझ्या साध्या रागाने पाहण्याचा परिणाम.. खेळ हा सारा मनाचा. पण मन म्हणजे काय? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत ) |
No comments:
Post a Comment