अनेक विद्यार्थी अशा नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात अडकतात. पण हे स्वाभाविकपणे घडत असलं तरी अपरिहार्य नाही. आपण मनात जसा विचार करत जातो तसं आपल्याबाबत घडत जातं. आपण स्वत:च स्वत:शी सतत बोलत असतो. जसं आपण सतत स्वत:शी बोलू, सतत स्वत:ला सांगू तसंच आपल्याबाबत घडत जाणार आहे. त्यामुळं आपण स्वत:ला काय सांगतो ते फार महत्त्वाचं आहे.अशा वेळी स्वत:च स्वत:शी सेल्फ टॉक करावा. जाणीवपूर्वक स्वत:ला विधायक पद्धतीनं पटवावं. स्वत:चं नाव घेऊन म्हणावं, 'श्यामराव जमेल, अभ्यास जमेल. असा कंटाळा येऊन कसं चालेल? मन भरकटवून कसं चालेल? अभ्यासावर मन एकाग्र करा. बरोबर मन एकाग्र होईल. माझं मन एकाग्र होत आहे. जसा जसा मी अभ्यास करतो आहे तसंतसं ते अधिकाधिक एकाग्र होत आहे. अभ्यासातील गोडी वाढते आहे. अभ्यास करताना मला मनापासून आनंद होतो आहे. अधिकाधिक मन एकाग्र होत आहे. मला छान अभ्यास जमतो आहे.' असं वारंवार स्वत:ला नीट समजावून सांगावं. बरोबर अभ्यास अधिक चांगला जमू लागेल. संमोहनासारखी प्रक्रिया वापरून जर या पद्धतीच्या सूचना दिल्यात तर त्याचा खूप चांगला व प्रभावी परिणाम मिळतो. लवकर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते. पण संमोहन नीट शिकून घ्यावं. वैज्ञानिक पद्धतीनं शिकविणार्यांकडूनच शिकावं. आज बाजारात भरमसाट दावे करणारे अनेक संमोहनतज्ज्ञ आहेत. खोटे-नाटे दावे करून भलत्याच गोष्टी ते आपल्या माथी मारत असतात. त्यांच्यापासून आपण सावध राहावं. असल्या भोंदूंना ओळखण्याच्या काही खुणा आहेत. त्यापैकी एक 'माझ्या मित्राचं वा पाल्याचं अभ्यासात मन लागत नाही. परीक्षेची भीती वाटते. मला त्याच्यासाठी संमोहन शिकायचं आहे. मी शिकून त्याचा फायदा देता येईल का?' जो संमोहनतज्ज्ञ हो म्हणेल तो 100 टक्के भोंदू आहे हे तुमच्या लक्षात येईल. संमोहन, मेडिटेशन या सार्या प्रक्रिया स्वत:च स्वत:करता वापरता येतात. आपण वापरून इतरांना त्याचा काहीही फायदा देता येत नाही. परीक्षेचं फारच टेन्शन आलं तर स्वत:ला नीट समजावून सांगावं, 'जे होईल ते पाहिलं जाईल. मी आता माझं सारं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतो आहे. नीट मन लावून, एकाग्रतेनं अभ्यास करणार आहे. मला जमेल तेवढय़ा उत्तमपणे मी पेपर सोडवेन. पुढचं पुढं पाहिलं जाईल. मी माझं कर्तव्य नीट पार पाडेन. अगदी रिलॅक्स राहून अभ्यास करेन. परीक्षा देईन. यश-अपयशाची आत्ताच चिंता न करता सारं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करेन. उत्तम अभ्यास करेन' असं जर आपण वारंवार स्वत:ला सांगू लागलो तर अगदी तसाच परिणाम आपल्याला मिळू लागतो. कारण ज्यावेळी आपण टेन्शनमध्ये असतो, भीतीच्या आहारी असतो त्या वेळी आपण 'हायली सजेस्टिबल' असतो. या अवस्थेत जर आपण अशा विधायक सूचना दिल्यात तर त्या प्रभावीपणे अमलात येऊ शकतात, नव्हे येतात. फक्त या सूचना देताना काही क्षण डोळे मिटा. पूर्ण एकाग्रतेनं स्वत:ला अशा विधायक सूचना द्या. डोळे उघडा आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हापुन्हा असा प्रयत्न करत गेलात तर बरोबर तुम्हाला रिझल्ट मिळताहेत अशी प्रचिती येईल. स्वत:च स्वत:च्या अभ्यासाचा टाईमटेबल तयार करा. तो काटेकोरपणे पाळा. 'पण सर, मी अशा अवस्थेत परीक्षा दिली, मला कमी मार्क्स मिळाले, तर माझं अख्खं करिअर बरबाद होईल ना? त्यामुळं ड्रॉप घेणं उत्तम नाही का?' असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरं म्हणजे परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन टाळण्यासाठी, परीक्षेपासून पळ काढण्यासाठी 'ही ड्रॉपची आयडिया' आपल्याच मनानं काढलेली असते. त्याला आपण कधीही बळी पडता कामा नये. नाही तर आयुष्यभर आपल्याला पळावं लागेल. एखाद्या समस्येला सरळ न भिडता पळून जाण्याची सवय लागेल. आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी हे फार घातक आहे. त्यामुळे मनापासून ठरवून टाकायचं, 'मी पळून जाणार नाही. कितीही टेन्शन आलं, भीती वाटली तरी मी पळणार नाही. अभ्यास करेनच. परीक्षा देईनच. वाट्टेल ते झालं तरी मी हे करेनच' असं वारंवार स्वत:ला सांगायचं. पण परीक्षेत कमी मार्क्स मिळून करिअर बरबाद झालं तर? या प्रश्नाचंही सोपं उत्तर आपल्या मनाला देता येतं. ठीक आहे. तरी मी अभ्यास करेन. सार्या पेपर्सचा मन लावून अभ्यास करेन. सारे पेपर्स देईन. फक्त शेवटच्या पेपरच्या दिवशी मी ठरवेन, तो पेपर द्यायचा की नाही ते. मला मार्क्स कमी मिळून करिअर बरबाद होईल असं निश्चित वाटलं तर मी शेवटचा पेपर देणार नाही. त्यामुळं मला सारी परीक्षा पुन्हा दुसर्यांदा देण्याची संधीही मिळेल आणि आता अभ्यास, परीक्षा यापासून पळून जाण्याच्या मानसिकतेपासूनही मला स्वत:ला वाचवता येईल.' असं स्वत:ला नीट समजावून सांगून त्याप्रमाणं प्रत्यक्षात आपल्याला वागता येतं. टेन्शनही कमी होतं. टेन्शन कमी करण्याचे काही सुंदर उपाय आहेत. आजच्या आधुनिक काळाची ती देण आहे. माझ्या 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमध्ये मी दोन प्रकारचं प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांना शिकवतो. संमोहनात जाऊन अभ्यासाची गोडी-एकाग्रता वाढविण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याप्रमाणे नियमित सराव करायला लागलात तर अभ्यासाची एकाग्रता-गोडी वाढू लागते आणि एकाग्रतेनं अभ्यास करू लागल्यामुळं अभ्यासाचा 'इनपूट' वाढतो. दुसरं परीक्षेची भीती आणि परीक्षेचं टेन्शन येऊ न देता रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याचा नियमित सराव करायला लागलं की, रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देणं जमू लागतं. परीक्षेच्या काळात आपलं माईंड जेवढं रिलॅक्स असेल तेवढी आपली स्मरणशक्ती उत्तम पद्धतीनं काम करते. आपला परीक्षेचा 'आऊटपूट' वाढतो. केवळ या दोन प्रोग्रामिंगमुळंसुद्धा आपणंच करत असलेल्या अभ्यासाच्या भरवशावर आपला परीक्षेतील परफार्मन्स सुधारतो. परीक्षेतील परसेन्टेज वाढतं. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घेतला आहे.जरी आपण कार्यशाळा केली नाही तरी घरी बसल्या तुम्ही करू शकाल अशी एक सोपी रिलॅक्सेशन पद्धती सांगतो. अर्थात त्याला संमोहनाची सर नाही. तरी काही अंशी निश्चितपणे आपणास परिणाम मिळू शकतील.रिलॅक्स करणं म्हणजे आपल्या मसल्स ढिल्या सोडणं, ताणरहित अवस्थेत आणणं. आरामात खुर्चीवर बसा अथवा बेडवर झोपा. (उशी पातळ हवी.) सारं शरीर ढिलं सोडा. डोळे बंद करा. टप्प्याटप्प्यानं सारं शरीर रिलॅक्स करा. मनातल्या मनात म्हणा आणि तसं करा. पायांची बोटं रिलॅक्स, तळवे रिलॅक्स, पाय रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, मांडय़ा रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, श्वासोच्छ्वास नॉर्मल, संथ, लयबद्ध होतोय. पाठ-पाठीचे रिलॅक्स, खांदे-दोन्ही हात-बोटं रिलॅक्स, मान रिलॅक्स, जबडा रिलॅक्स, गाल-कान रिलॅक्स, ओठ-नाक रिलॅक्स, डोळे-पापण्या रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, आठय़ा निघून जाताहेत. डोकं रिलॅक्स, डोक्यातला प्रत्येक मज्जातंतू रिलॅक्स होतोय. डावं डोकं रिलॅक्स, उजवं डोकं रिलॅक्स, डोकं खूप रिलॅक्स, रिलॅक्स हलकं हलकं झालंय. खूप शांत, आनंदित, टवटवीत वाटतंय असं 2 वेळा म्हणा. 2-4 सेकंद थांबा व पुढील सूचना द्या. मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो आहे. दिवसेंदिवस माझी अभ्यासातील गोडी, एकाग्रता वाढते आहे.मी सोडत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या मनातील टेन्शन, नकारात्मक विचार, परीक्षेची भीती निघून जाते आहे आणि मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची निर्भयता, रिलॅक्सेशन व विधायक विचार करण्याची क्षमता वाढते आहे.(हे सजेशन 2 ते 3 वेळा रिपीट करा.) मला खूप आनंदित, टवटवीत, रिलॅक्स, उत्साहित वाटतंय असं तीनदा म्हणत म्हणत हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा. 5 ते 6 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. बस्स एवढंच. दरवेळी अभ्यासाला बसताना असा सराव करा. दिवसांतून किमान 3 ते 5 वेळा असा सराव करा आणि पाहा काय परिणाम मिळतात ते. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Monday 11 February 2013
परीक्षेच्या काळात माईंड रिलॅक्स ठेवा, टेन्शन अजिबात घेऊ नका
Subscribe to:
Post Comments (Atom)
This comment has been removed by the author.
ReplyDelete