Tuesday 26 February 2013

माणूस प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं?


मागचा प्रेमावरचा लेख प्रसिद्ध झाला आणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना दिली अभिनंदन'! 'प्रेमाला प्रतिष्ठा दिली त्याबद्दल धन्यवाद'! असे खूप फोन होते. पण 'तुम्ही लिहिलं त्यात शेवटपर्यंत प्रेम म्हणजे काय ते कळलयच नाही'. 'विषयवासना, सेक्स म्हणजे प्रेम असं तुम्हांला म्हणायचं आहे का?' 'तुमच्यासारख्या विचारी माणसानं 'अशा' विषयावर का लिहावं? अशाही प्रतिक्रिया होत्या, तर काही फोन फारच विचित्र होते. माझ्या एका ओळखीच्या मुलीचं प्रेम जुळलं. त्या दोघांचं प्रेम मला तोडायचं आहे. ती त्याच्यासोबत कधीच सुखी होणार नाही. कसं तोडू हे प्रेम? कसं वाचवू तिला? तर प्रेम कसं करायचं? समोरच्या व्यक्तीला प्रेमात कसं पाडायचं? असे प्रश्न विचारणारेही काही फोन होते.

'प्रेम' हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा, फार महत्त्वाचा, आदराचा, अभ्यास करण्याचा, समजून घेण्याचा विषय आहे. भाऊ, प्रेम म्हणजे नेमकं काय? हे सांगणं फार कठीण आहे. मी आधीच सांगितलं व्यक्तिपरत्वे प्रेमाची व्याख्या बदलते. बदलू शकते. व्यक्तीनुसार प्रेमाची तीव्रता, प्रेमभावनेची पातळी बदलते. तरी सर्व माणसांनी सर्वाच्या हृदयाला जाणवणारी, स्पर्शधारी ही भावना आहे. सर्वाना जाणवते, स्पर्शते, उसासो सोडायला लावते हाच या भावनेतला 'समान दुआ', 'समान धागा' आहे.

आयुष्यात कधीच प्रेमात पडली नसेल अशी व्यक्ती अपवादच असली पाहिजे. माणूस प्रेमात कां पडतो? प्रेमात कसा पडतो? सामान्यत: एखादी विरुद्ध लिंगीय व्यक्ती आवडते. खूप खूप आवडते. फारच आवडते. तिच्याविषयी जबरदस्त ओढ वाटते. आकर्षण वाटतं. तिच्या सहवासात राहावसं वाटतं. तिला पाहत राहावसं वाटतं. तिच्यासोबत बोलत राहावसं वाटतं. समोर नसताना सारखी ती व्यक्ती आठवत राहते.

तिच्या आठवणीत रमताना खूप छान वाटतं. ती अचानक समोर दिसली तर छातीत धडधड होते. पण ही 'धडधड' खूप छान, हवीहवीशी वाटते. ती हसली की, सारं आसमंत फुलल्यासारखं वाटतं. ती 'रडवेली' झाली, दु:खी झाली की, आसमंतात मळभ दाटून आल्यासारखं वाटतं. सारं विचारांचं, भावनांचं केंद्र ती व्यक्ती बनून बसते. असं काहीसं घडू लागलं की, माणूस प्रेमात पडला असं फार तर म्हणता येईल.

दोन माणसं कोणत्या तरी निमित्तानं वा रस्त्यानं जाताना अचानक समोर येतात. सहज नजरानजर होते आणि एक घडलेला किस्सा. कॉलेज लायब्ररीतून 'तो' बाहेर पडला. वर्गात जाण्यासाठी तेवढय़ात जोरदार पावसाची सर आली. लायब्ररीसमोरून क्लासमध्ये जाणारी 'ती' पावसापासून वाचण्यासाठी लायब्ररीच्या व्हरांडय़ाच्या आडोशाला आली. काहीशी भिजलेली. केसांवर पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकू लागलेले. सलवार कमीजचं कमीज अंगाला चिपकू लागलेलं. आपल्या वक्षस्थळाचं संरक्षण करण्यासाठी वह्या-पुस्तकांचा गठ्ठा तिनं छातीसमोर ढालीसारखा धरलेला. पण.. पावसाचा जोर वाढला. शिंतोडे अंगावर येऊ लागले. आत सरकण्यास जागा नाही. सारा व्हरांडा गर्दीनं ओसंडून वाहतोय. मुलांमध्ये शिरण्याची तिची हिंमत नाही. आतील पोलला लागून असलेल्या सुरक्षित जागी उभ्या असलेल्या त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. डोळ्यानंच तो तिला जवळ येण्याची खूण करतो. पण ती कळूनही हिंमत करू शकत नाही. 'एका मुलाजवळ उभं राहायचं?' पुन्हा तो खुणावतो. आता पावसाचे शिंतोडे तिला अधिकच भिजवू लागलेले. नाइलाजानं ती तिथे येऊ लागते. तो अदबीनं सरकतो. तिला सुरक्षित जागेत घुसू देतो आणि तत्काळ तिथून हलून तिच्या भिजवणीच्या जागेवर जाऊन उभा राहतो. तिला खूप हायसं वाटतं. तो जवळ चिकटून उभं राहण्याचा चान्स त्यानं घेतला नाही म्हणून. पण त्याला थँक्स म्हणायला हवं. पण म्हणायचं कसं? त्याचं लक्षच नाही. शेवटी त्याचं लक्ष जातं. ती डोळ्यांनीच थँक्स म्हणून जाते. अन् त्यानं पहिल्यांदा तिचे ते टप्पोरे, शिलेदार, समुद्राच्या अथांग पाण्यासारखे पाणीदार डोळे पाहिले. इतके सुंदर डोळे? अन् तो त्या डोळ्यांतच अडकून जातो. एकसारखा एकटक पाहत राहतो. तिच्या डोळ्यांत डुबू लागतो. अथांग महासागरात खोल खोल उतरू लागतो. एकटक, एकाग्रतेनं पाहत राहतो. भान हरपून मनसोक्त खोल खोल जात राहतो.

काही क्षण तीही भान हरपून, एकटक, एकाग्रतेनं पाहते. साध्याच दिसणार्‍या या तरुणाच्या भावपूर्ण, जितकं स्वच्छ डोळ्यांमध्ये आपण केव्हा अडकून पडलो हे तिच्या लक्षातच येत नाही. थोडय़ाच वेळात भानावर येते. नजर खाली घेते. पुन्हा पाहते तर तो भान हरपून पाहतोच आहे. त्याची ब्रह्मनंदी टाळी लागली आहे. पापणीही न हलवता तो सारखा पाहतोच आहे. तिला काय करावं ते कळतंच नाही. असा अनुभव तिनं कधी घेतलाच नाही. त्याच्या नजरेत अडकून जायला होतं. नजर काढता काढता येत नाही. काय आहे असं त्या डोळ्यांत? आतवर, खोलवर काहीतरी शिरतं सारं. हृदय आतून असं घुसळू लागतं. कसं कसं, पण छान छान वाटतं. बराच वेळ दोघांचे डोळे सारखे एकदुसर्‍यात गुंतत होते. ती सारखी नजर खाली घ्यायची, पण पुन्हा पाहण्याची अनिवार इच्छा व्हायची. पुन्हा पाहायची. डोळ्यांत अडकायची. तो मात्र एकटक पाहतच होता. अडकूनच पडला होता. किती वेळ उलटला माहीत नाही. पाऊस ओसरला. थांबला. व्हरांडा रिकामा होऊ लागला. नाइलाजानं तीही निघाली. पण त्याची नजर मात्र सारखी तिच्या डोळ्यांचाच वेध घेत होती. झालं तो तिच्या प्रेमात पडला. आकंठ बुडाला. तिच्यावर प्रेमकविता करू लागला. त्याचं सारं विश्व तिच्या अस्तित्वानं, तिच्या डोळ्यांनी व्यापलं. 1970च्या दशकातलं हे प्रेम. याला म्हणायचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट'.'दिसताक्षणीच प्रेमात पडणं'.

हा एक प्रेमाचा प्रकार, प्रेमाचा आविष्कार. माणूस दिसताक्षणीच कसा काय प्रेमात पडू शकतो? समोरची व्यक्ती कोण? कुठली? काय करते? काय योग्यतेची आहे? काहीच माहीत नसताना माणूस असा प्रेमात पडतो हे मात्र खरं आहे. अनेक माणसं प्रत्यक्ष जीवनात या प्रकारे प्रेमात पडली आहेत हेही तेवढंच खरं आहे. अशा प्रेमाची परिणती काय होते? प्रेमाची यशस्विता म्हणजे लगAात रूपांतर होणं असं मानलं तर कदाचित अशा प्रकारच्या प्रेमाचा सक्सेस रेट कमीच असणार आहे. कारण प्रेमात पडताना कुठलीच व्यावहारिक बाजू पाहिलेली नसल्यामुळं दोन पात्रांत जर फारच व्यावहारिक अंत असेल. उदा. जात, धर्म, खानदान, आर्थिक स्थिती, दोन्ही कुटुंबांतील संस्कृती, कर्मठपणा, आधुनिकपणा तर लगAात रूपांतर होणं अशक्यप्रायच होऊन बसतं. म्हणून काय ते प्रेम कमी दर्जाचं असतं? कम अस्सल असतं?

पण तो तिच्या प्रेमात कां पडला? फक्त निळ्या डोळ्यांच्या प्रेमात पडला? मग कोणत्याही निळे डोळे असलेल्या मुलीच्या प्रेमात तो पडेल का? त्याने आधी निळे डोळे कधीच पाहिले नव्हते का? ती खूप सुंदर आहे म्हणून तो प्रेमात पडला कां? त्यापेक्षा अधिक सुंदर मुलगी त्यानं आधी पाहिली नव्हती कां? निळे डोळे असणारी मुलगी काही ही पहिलीच नाही आणि तिच्यापेक्षाही सुंदर मुली त्याच्या आसपास वावरतच होत्या. मग तो तिच्यात प्रेमात कां पडला? आणि नकळत प्रेमात पडला. खूप खूप सिर्मस प्रेमात पडला? का? या प्रश्नाचं उत्तर मी वर्षानुवर्षे शोधतोय. खूप लोकांचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट' समजून घेतलं. मानसशास्त्रीय अंगानं अभ्यास केला. जे उत्तर गवसतं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूस जन्माला आल्यानंतर अगदी बालवयापासून तो माणसांना पारखू लागतो. ओळखू लागतो. काही माणसं त्याला खूप भावतात. काही माणसं खूप आवडतात. त्यांच्याजवळ ही मुलं चटकन जातात. रमतात, आनंदी होतात. कदाचित ही माणसं त्यांच्याशी खूप चांगली वागतात. त्यांना आवडेल अशा पद्धतीनं प्रेम करतात. त्यांना मुळीच वाईट अनुभव न देता फक्त चांगलेच अनुभव देतात, तर काही माणसांजवळ ही लहान मुलं मुळीच जात नाही. जाऊ इच्छित नाही.

साधारणत: मुलं 4-5 वर्षाची व्हायला लागली की, त्यांना स्त्री, पुरुष वेगळे आहेत याची तीव्र जाणीव व्हायला लागते. विरुद्ध लिंगीय व्यक्तीविषयीच्या कुतूहलाचं, उत्सुकतेचं रूपांतर आकर्षणात होण्याच्या सुरुवातीचा हा कालावधी असतो. वय वर्ष 5 ते 10-11 वर्षापर्यंत अशी आवडणारी, भावणारी व्यक्ती जर वारंवार सहवासात आली, प्रेम करू लागली, गालगुच्चे घेऊ लागली, गालांचे चुंबन घेऊ लागली, छातीशी आवळू लागली, आलिंगन देऊ लागली, तर हे मूल त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतं. कदाचित हे मूल 5-6 वर्षाचं असेल. ती विरुद्ध लिंगीय व्यक्ती 10 वर्षे ते 30-35 वर्षाचीही असेल तरी असं घडू शकतं, घडतं. अर्थात त्या मुलाला वा मुलीला आपण प्रेमात पडलो हे फार तीव्रतेनं कळतंच असं नाही. फक्त ती व्यक्ती खूप आवडते. तिचा सहवास खूप आवडतो एवढंच त्यावेळी कळत असतं. जर या दोघांमधले हे प्रेमसंबंध (अत्यंत निकोप, निर्वाज्य. यात कुठेही रूढार्थानं सेक्स नसतो, रोमांस नसतो.) काही काळ चालले तर त्या मुलांच्या मनात खोलवर ते घर करून जातात. प्रेमात पडलेल्या मोठय़ा वयाच्या व्यक्तीची प्रतिमा या मुलांच्या हृदयात बंदिस्त होते.

अनेकदा ही प्रेम व्यक्ती जीवनातून निघून जाते, दूर जाते अथवा तिचं लगA होऊन ती वेगळ्या अर्थानं दुरावते. पण वाढत्या वयासोबत या मुलांच्या मनातील ती प्रेम-प्रतिमा तशीच हृदयात बंदिस्त राहते. वयात आल्यावर मनात खोलवर रुजलेल्या प्रेम-प्रतिमेसारखीच वा त्याच्या आसपासची एखादी व्यक्ती दिसताच आपल्या मनातील खोलवर रुजलेली प्रतिमा हीच आहे असं त्याच्या मनाला नकळत वाटतं आणि माणूस 'लव्ह अँट फर्स्ट साईट' पडू शकतो. खरं म्हणजे तो स्वत:च्या मनात रुजलेल्या प्रेमातच पुन्हा पडत असतो.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

2 comments: