कारण महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात पुरोगामी प्रांत. जादूटोणाविरोधी बिलाच्या निमित्तानं मी मंत्रालयात, विधिमंडळात सारखे खेटे घालत होतो. आमचे मित्र त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. वसंतराव पुरके यांनी सेक्स एज्युकेशनसंबंधी एक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सेक्स एज्युकेशन शब्द असला तरी ती टीनएजर्सला, पौगंडावस्थेतील मुलांना शरीराची साधी ओळख करून देण्याची तयारी होती. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक पुस्तिका निर्माण करण्यात आली होती. ती पुस्तिका फडकवत, त्यातील स्त्रीपुरुष देहाची चित्रे दाखवत दाखवत अनेक जनप्रतिनिधी कडाडून तुटून पडले होते. भारतीय संस्कृतीचा हा अपमान आहे. नव्या पिढीला हे बिघडवायला निघाले आहेत. शाळाशाळांमध्ये कंडोम पुरविणार का? वगैरे वगैरे आक्षेप घेतले गेले. शेवटी या आरोपांच्या धुराळ्यात तो प्रस्ताव बाजूला पडला. वसंतराव पुरके यांनी दूरदृष्टी ठेवून नव्या पिढीच्या हितासाठी एक अत्यंत आवश्यक पाऊल उचलण्याची हिंमत केली होती, त्याबद्दल केव्हाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण पुरोगामी महाराष्ट्रातल्या विरोध करणार्या जनप्रतिनिधीचं काय? एका माझ्या ओळखीच्या जनप्रतिनिधीला मी म्हटलं, तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातून एक मोठा मोर्चा मध्य प्रदेश आणि ओरिसात न्यायला हवा. कारण पुस्तकातील चित्रांवर तुम्ही एवढे खवळलात, तर खजुराहो व कोणार्क येथे तर रतिक्रीडेची कोरीव शिल्पे आहेत, संभोग दृश्य आहेत. हजारो शाळकरी मुलं ते पाहत असतात. त्यामुळं आपली भारतीय संस्कृती रसातळात जाते आहे आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिराचं काय? भारतातील सर्वात मोठं, अत्यंत पुरातन, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेलं हे मंदिर आहे. रोज किमान लाखभर लोक या मंदिरात दर्शनाला जातात. या मंदिराच्या घुमटावर संभोग दृश्य कोरलेली आहेत. भारतीय संस्कृती वाचविण्यासाठी खजुराहो, कोणार्क, पुरीचं जगन्नाथ मंदिर तिन्हीही जमीनदोस्त करायला नको का? आता तुमच्या लक्षात आलं असेल मला चीड का आली होती ते. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली सेक्स एज्युकेशनला विरोध करणार्यांना भारत, भारतीय संस्कृती काहीही माहीत नसतं. इंग्रजांनी शंभर-दीडशे वर्षापूर्वी लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीद्वारा पेरलेल्या सेक्सविषयीच्या विकृत कल्पना घेऊनच आजही या विषयाकडे आपण पाहतो आहोत. त्या काळात इंग्लंड सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. ºिश्चनातील कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे. पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा होता. सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय. मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र तशीच प्रतिगामीच राहिली.भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा 'कामसूत्र' जनक वात्सायन ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. शशीकपूरनं यावर शेखर सुमन आणि रेखाला घेऊन एक सुंदर चित्रपट निर्माण केला होता. याद्वारे या विषयाची एक अल्पशी, पण सर्वागसुंदर ओळख भारतीयांना करून दिली. शाक्तपंथीय साधनेत, तंत्र साधनेत या विषयाकडे केवळ उदार दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनसुद्धा पाहिलं जातं. महादेवाची पिंड गावागावांत असते. गावोगाव भक्तिभावानं व आदरानं त्याची पूजा केली जाते. पिंड हे स्त्री-पुरुष लिंगाचं प्रतीक आहे, हे प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवं. निसर्गानंच मानवी प्राण्यात सेक्स हा एक अपरिहार्य भाग म्हणून निर्माण केला आहे. निर्मिती, नवी निर्मिती ही निसर्गाची, प्राणिमात्राची गरज आहे. नर आणि मादी यांनी वारंवार एकत्र यावं. त्यातून गर्भधारणा राहावी, नव्या अपत्यांचा जन्म व्हावा म्हणूनच नर आणि मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण होईल याची काळजी निसर्गानं घेतली आहे. आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे. म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष संबंधातील 'ऑरगॅझम'मधून रतिक्रीडेतील 'लैंगिक तृप्तीतून' मिळतो. केवळ आनंदच मिळत नाही तर संपूर्ण शरीर आणि मन 'ऑरगॅझम' नंतर पूर्णत: रिलॅक्स होतं. एवढं सुंदर रिलॅक्सेशन दुसर्या मार्गानं प्राप्त होत नाही. त्यामुळं सार्या टेंशन्स आणि ताणतणावांचा निचरा होतो. माणूस अंतर्बाह्य शांत, शांत होतो. त्यामुळं अधिक निरोगी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. स्वभावही अधिक संतुलित होऊ लागतो आणि यासाठी स्त्री आणि पुरुषांची मनापासून एकदुसर्याला साथ असावी लागते. तरच हे साध्य होतं. बलात्कारात हे शक्य असतं का? रतिक्रीडेतला आनंद ज्याला कळतो तो बलात्कार करणंच शक्य नाही. हे एज्युकेशन आम्हाला केव्हा व कसं मिळणार? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Wednesday 23 January 2013
'लैंगिक तृप्ती'तूनच मिळतो मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment