Monday 14 January 2013

आजच्या पिढीला 'सेक्स एज्युकेशन' आवश्यक!

बलात्कार हा मानवी जीवनातील सर्वात भयानक, माणुसकीला काळिमा फासणारा, हत्येपेक्षाही जास्त गंभीर असा गुन्हा आहे. त्याचं कोणत्याही अवस्थेत समर्थन होऊच शकत नाही. स्वत:ला संत म्हणवणारे, पण खर्‍या अर्थानं सामान्य, सहृदय माणसाचीही पात्रता नसणारे आसाराम बापूंसारखे ढोंगी साधू यानिमित्तानं आपल्या अकलेचे तारे पाजळताहेत. 'दिल्लीच्या बलात्कारित मुलीनं 'भाऊ' म्हणून बलात्कार्‍यांना आवाहन केलं असतं तर त्यांनी तिला सोडून दिलं असतं. बलात्कार्‍यांइतकीच मुलगा मित्र असणारी ती मुलगी जबाबदार आहे. सरस्वतीला आवाहन केलं असतं तर देवानं तिचं रक्षण केलं असतं.'आता हे आसाराम बापू कोण? ज्यांच्या आश्रमात आपल्याच भक्त स्त्रियांना राधा बनवून त्यांच्यासोबत रासलीला रचल्या जातात. केवळ तेच नाही, तर त्यांचा मुलगाही हेच धंदे करतो. मुंबईच्या दोन सुशिक्षित भक्त मुलींवर आसारामच्या मुलानं बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप प्रसिद्घिमाध्यमांमध्ये आधीच प्रसिद्घ झाले आहेत. आपल्या 'दिव्य' ग्रंथामधून स्त्रियांविषयी अतिशय हिणकस विचार लिहिणार्‍या गुरूनं सांगितलेली प्रत्येक आज्ञा शिष्यांनी पाळलीच पाहिजे, असं सांगणार्‍या, विटाळशी बाई बागेत फिरायला गेली तर फुललेली फुलं कोमेजतात. निखालस खोटं, अवैज्ञानिक, निलाजरं विधान करणार्‍या महाविद्वान आसारामांविषयी काय बोलावं?

वाईट याचंच वाटतं की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा समाजाचं प्रबोधन करणार्‍या, समाजाला चार पावलं पुढं नेणार्‍या संतांकरिता जी संत उपाधी वापरली जाते तीच उपाधी असल्या बेशरम माणसाकरिता महाराष्ट्रातील त्यांचे तथाकथित भक्त वापरतात.विनोबा भावेंनी 'संत' या शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे. 'सत्याचा आग्रह धरत जो समाजाला पुढे नेतो तो खरा संत' यानिमित्तानं अनेकांचं विकृत हृदय आणि विकृत विचार प्रगट झाले. 'स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. पाश्चत्त्य संस्कृतीचा पगडा असणार्‍या शहरी वातावरणात 'इंडियात' बलात्कार होतात. ग्रामीण भागात, 'भारतात' बलात्कार होत नाहीत.अर्थात, ज्यांना खरा भारत माहीत नाही, भारताशी ज्यांचा परिचय नाही, पुरुषी अहंगंडानं आणि काल्पनिक विश्वात रमण्याच्या ध्यासानं ज्यांची दृष्टी अधू बनली आहे अशांनी उधळलेली ही मुक्ताफळं आहेत. त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. बलात्कारी माणसाची मानसिकता नेमकी काय असते? या समाजात, पुरुषप्रधान समाजरचनेत, स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे असाच संस्कार होतो. बोलण्यातून, म्हणीतून, वागण्यातूच हाच संस्कार सतत ध्वनित होत असतो. या संस्काराचा स्त्रीसुद्घा बळी आहे.

दीर्घकाळ युवा चळवळींमध्ये असल्यामुळं, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमुळं आणि तब्बल 15 वर्षे वृत्तपत्रांचे युवास्तंभ हाताळल्यामुळं भारतीय युवकांची मानसिकता फार जवळून अनुभवता आली. माझ्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेमप्रकरणं मला हाताळावी लागली. 30-35 वर्षापूर्वी दोन मनांचं प्रेम आणि त्यात काही टक्क्यांमध्ये शारीरिक संबंध असायचे. पण अलीकडच्या काळात 'बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड'च्या जमान्यात बहुतांश प्रेमसंबंध शारीरिकसुद्घा असतात. बरं, प्रेम सुरू करताना आयुष्यभराची साथ, लग्न असं काहीही कमिटमेंट नसतं. खरं म्हणजे आजच्या जमान्यात हे प्रेम शरीरसंबंध टूवे (दुतर्फा) असतात, असावेत. बरोबरीच्या नात्यानं हे रिलेशन असतं.पण जेव्हा काही कारणानं ही रिलेशनशिप तुटते तेव्हा चांगल्या सुशिक्षित, आधुनिक मुलीसुद्घा 'त्या मेल्यानं माझा भोग घेतला, मजा मारली आणि आता कंटाळा आला तर उडून चालला' या अर्थानं आरोप करतात. तेव्हा त्या आधुनिक कपडय़ाआड दडलेली, पण मुळात बुरसटलेली स्त्री बाहेर येते. या मुलींना सांगावं लागतं, तू असं बोलून स्वत:चा, तुझ्यातल्या स्त्रित्वाचा अपमानं करते आहेस. तुमच्यातले संबंध राजीखुशीचे होते. उपभोग घेतलाच असेल तर तुम्ही एक-दुसर्‍याचा घेतला आहे. खरं म्हणजे प्रेमाला 'उपभोग' हा शब्द वापरून प्रेमाचा आणि सेक्सचा दोहाेंचा तुम्ही अपमान करताहात. बलात्कारी मनोवृत्तीचा संबंध सरळ सरळ स्त्री-पुरुष संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे. पुरुषप्रधान भारतीय संस्कृती असो अथवा पाश्चात्त्य संस्कृती, दोन्ही विचारधारा एकच आहेत. स्त्रीदेह हा भोगाचा विषय आहे. पुरुषानं स्त्रीचा भोग घ्यायचा असतो. स्त्री त्यासाठीच जन्माला आली असते. म्हणून तिला स्वातंर्त्य नाही. इति मनुस्मृती. लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लग्नानंतर पतीच्या हाती तिला एकदाचं सोपवलं की, मग पित्याची सुटका होते. ही मानसिकता, ही विचारधारा आणि 'स्त्री ही भोग्य वस्तू आहे' ही विचारधारा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रीचं शील, चार्त्यि यांनी शुचितेशी जोडलेली विचारधारा अजूनही कायम आहे. शील आगपेटीच्या काडीसारखं असतं. एकदा ती उगाळली की, पुन्हा काडीपेटी उगाळता येत नाही. हा आदर्श, मानसिक संस्कार अजूनही तसाच आहे. फक्त प्रत्यक्षात तो अमलात येण्याची अपेक्षा ठेवण्याची कुणी हिंमत ठेवत नाही एवढंच. टीव्ही, इंटरनेटच्या जमान्यातील, आधुनिक कपडे घालणारी, इंग्रजी बोलण्यात भूषण मानणारी ही आधुनिक पिढी आगपेटीच्या काडीपासून लायटरपर्यंत (जो वारंवार पेटवला जाऊ शकतो, हवा तेव्हा पेटतो) प्रवासकर्ती झाली आहे आणि इंग्रजी बोलू न शकणारी, थोडंसं मॉडर्न बनण्याचा प्रयत्न करणारी, अजूनही ग्रामीण भाषेचा लेहजा असणारी सुशिक्षित पिढीही त्याच दिशेनं वाटचाल करते आहे.या सर्वाना इंटरनेटवर, मोबाईलवर स्त्री-पुरुष देहाची उघडीनागडी चित्र, ब्ल्यू फिल्म्स सतत आणि सहज पाहायला मिळतात. त्यातून पुन्हा मनात असलेला 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' जुनाच संस्कार पक्का होतो. विकृत पद्घतीनं चालवला जातो. बहुतांश ब्ल्यू फिल्म्स बलात्कारसदृशच असतात. शृंगार, रोमान्स या गोष्टींना फारसं स्थान नसतं. स्त्री-पुरुष प्रेमसंबंध म्हणजे फक्त 'इंटरकोर्स', 'भोगणं' हाच संस्कार अधिकाधिक पक्का होतो. दृक्-श्रव्य माध्यमामुळं तो अधिक तीव्र स्वरूपाची विकृती निर्माण करतो. चित्रपट, इंटरनेट, सेक्सी जाहिराती यातून असं चाळवलं गेलेलं मन, मुळात पुरुषी अहंगंडानं, पुरुषी मनोवृत्तीनं पछाडलं गेलेलं हे मन मग रस्त्यारस्त्यांवर छेडखानी करणं, अश्लील कॉमेंट्स करणं सुरू करतं. समाजात याविषयी 100 परसेन्ट टॉलरन्स असल्यामुळे ते चेकाळलेलं मन अधिकच सोकावतं, स्थिरावतं. अश्लील हातवारे करणं, विकृत हावभाव करणं, घाणेरडं टॉन्टिंग करणं हा आपला जन्मसिद्घ पुरुषी अधिकार आहे असं मानू लागतं आणि मग यातील काही महाभाग बलात्कारापर्यंत जाऊन पोहोचतात.बलात्काराचा इतिहास पाहिला, तपासला तर त्यातील पंचाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आधी छेडखानीचे, टॉन्टिंगचे प्रकार केले आहेत असं लक्षात येतं. मग यावर उपाय काय? सर्वप्रथम स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का? संस्कार बदलणं. मुलं आणि मुली दोन्हींबाबत. स्त्री ही बरोबरीचा माणूस आहे. तिचा, तिच्या देहाचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक पुरुषाला, मुलाला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून तशा संस्कार शाळा, कॉलेज, प्रसिद्घिमाध्यमं आणि घरातूनसुद्घा बिंबवायला पाहिजे. त्याचप्रमाणं देहाच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, बुद्घिमत्ता, कर्तृत्व हे तिच्या सौंदर्याइतकच, किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे असा संस्कार तिच्यावर केला पाहिजे. समजा, तिच्या इच्छेविरुद्घ तिच्यावर बलात्कार झालाच, तर एक अपघात, एक शारीरिक जखम एवढय़ाच अर्थानं त्याकडे पाहायला स्त्रीनं शिकलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे अन्यथा एवढय़ा महत्प्रयासानं  मिळालेलं स्वातंर्त्य स्त्रीला गमवावं लागेल आणि तेही काही विकृत पुरुषांच्या भीतीपोटी, तिचा काहीएक दोष नसताना स्वातंर्त्य तिला गमवावं लागेल. ज्युडो-कराटे शिकून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत असेल तर शिकायला, शिकवायला हरकत नाही. पण बलात्कार झाला तरी त्याला एका जखमेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, हा संस्कार मात्र त्यासोबत तेवढाच प्रभावीपणे बिंबवला पाहिजे. तरच स्त्रिया मोकळेपणानं वावरू शकतील. नवी नवी क्षेत्रे पादाक्रांत करू शकतील. देशभर बलात्कारविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा फायदा उचलून सरकार-पोलिसांनी काही कडक पावलं उचलली पाहिजे. छेडखानी, अश्लील कॉमेंट्स याबाबत झिरो टॉलरन्स निर्माण झाला पाहिजे आणि या गुन्ह्याखाली अटक झालेल्या मुलांची व त्यांच्या आई-बापांची व शाळा-कॉलेजेसची नावं वृत्तपत्रात प्रसिद्घ केली पाहिजे. आपला दिवटा तरुण चिरंजीव मुलींना छेडत असेल तर आई-वडिलांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे. कारण घरातला दुटप्पी संस्कार याला जबाबदार असतो. आपल्या मुलींना छेडलं तर जे आई-वडील गंभीर बनतात तेच आई-वडील मात्र आपल्या मुलाच्या अशा कृत्याकडे कानाडोळा करतात. हा अक्षम्य अपराध आहे. मी ज्या काळात विद्यापीठ परिसरात एम. ए. इंग्रजी करत होतो त्या काळात अशा छेडखानी करणार्‍या मुलांविरोधात मोहीम उघडली होती. हातात दै. 'तरुण भारत'चा 'महाविद्यालयाचा परिसर' कॉलम होता. आपलं नाव पेपरात छापून येईल या धाकानंच अनेकांचं 'पौरुष' थिजलं होतं. छेडखानी आटली होती. हा एक प्रभावी मार्ग बनू शकतो. शाळा-कॉलेजातूनही छेडखानीविरोधात मोहिमा राबवायला हव्यात. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींचं नीट प्रबोधन करायला हवं. सहजीवन, एक-दुसर्‍याचा सन्मान करायला, शिकवायला हवं. तशा चर्चा घडवून आणायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीचं सेक्स एज्युकेशन करायला हवं. बलात्कार करून, ओरबाडून कोणताच आनंद मिळत नाही, तर दोघांच्या सहमतीनं, रोमान्ससह असलेल्या प्रेमसंबंधातूनच खरा आनंद मिळतो, हे ज्ञान सर्वापर्यंत पोहचवणं नितांत गरजेचं आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

4 comments: