आजूबाजूला केवढी दु:खं आहेत? जीवनात केवढय़ा समस्या आहेत? सारं जीवनच वेगवेगळ्या दु:खांनी भरलेलं आहे. 'एक धागा सुखाचा.., तर शंभर धागे दु:खाचे' अशी जीवघेणी वस्तुस्थिती आहे. म्हणूनच दु:ख असह्य झाल्यावर अनेक लोक आत्महत्या करतात. प्रेमाचं, विरहाचं, प्रेमभंगाचं दु:ख असह्य झाल्यानं प्रेमी हे जग सोडून जातात. कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेला शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. पत्नीनं बदफैलीपणा केला म्हणून पती इहलोक सोडून जातो. पतीनं दुसरा घरठाव केला म्हणून पत्नी संसार अध्र्यावर सोडून निघून जाते. काही माणसं जगतात, पण मरणप्राय यातना, दु:ख भोगत जगत असतात. असल्या जगण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांना वाटत असतं. हे जग असं आहे. यातील खरं काय आहे? दु:खाचा संबंध आपल्या मनाशी आहे. मनावर होणार्या परिणामांबद्दल दोन विचारधारा आहेत. एक आध्यात्मिक, पारलौकिक विचारधारा. मन प्रचंड सामर्थ्यशाली असतं. त्याची शक्ती एवढी वाढवता येते की त्याचा परिणाम आजूबाजूच्या वस्तूंवर, परिस्थितीवर, माणसांवर निसर्गावरसुद्धा होऊ शकतो. त्याची क्षमता एवढी वाढवू शकतो की मन:सामर्थ्यानं वस्तूसुद्धा हलू शकते, वाकू शकते. परिस्थिती हवी तशी बदलू शकते. प्रकाशापेक्षाही अधिक वेगाने मन प्रवास करू शकतं. 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' करू शकतं. पण या विचारधारेनुसार मानलेलं मन:सामर्थ्य आजवर सिद्ध होऊ शकलं नाही. किमान वैज्ञानिक कसोटय़ांवर ते कुणालाही सिद्ध करता आलं नाही. जगभर संशोधनं झालीत; पण असं काही आजवर सिद्ध झालं नाही. उद्याही सिद्ध होण्याची शक्यता नाही. दुसरी विचारधारा मार्क्सवादी, जडवादी, भौतिक विचारधारा. मन हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतं. माईंड इज ए रिझल्टंट ऑफ मॅटर (अँटमॉस्पिअर). थोडक्यात ते आजूबाजूच्या परिस्थितीचं गुलाम असतं. स्वतंत्र नसतं. परिस्थितीला वातावरणाचा परिणाम ते टाळू शकत नाही. दु:खी परिस्थितीनं ते दु:खीच होणार? वरपांगी पाहताना आपल्याला हे मत, ही विचारधारा खरी वाटू शकते, वाटते. कारण आपल्यापैकी बहुतेकांवर भोवतालच्या परिस्थितीचा, वातावरणाचा असा गडद प्रभाव पडतो. त्यानुसार आपलं मन दु:खी बनतं वा आनंदी बनतं. पण सत्य मात्र वेगळचं आहे. हिप्पोक्रेटस, औषधशास्त्राचा जनक साडेबावीसशे वर्षापूर्वी म्हणून गेला, 'माणसाचं सुख आणि दु:ख', 'यश आणि अपयश' त्याच्या मेंदूतून निर्माण होतं आणि मगच जीवनात ते प्रत्यक्ष अमलात येतं. स्पिनोझा नावाचा एक महान तत्त्वज्ञ म्हणून गेला, 'हॅप्पिनेस इज द अल्टिमेट व्हच्र्यू' (आनंदी असणं हा मानवी जीवनातील सर्वात मोठा सद्गुण आहे.) अथवा विसाव्या शतकातील एक महान वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ बट्रॉंड रसेल यानं 'सुखी माणसाचा सदरा' (पुस्तक लिहून) मानवजातीला घातला आहे. सुखी कसं राहता येतं ते शिकवलं आहे. हे खरं आहे की, माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणार्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्याशिवाय त्याला आनंदानं जगता येणार नाही. अन्न, वस्त्र व निवारा मिळालाच पाहिजे. त्याच्या नैसर्गिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे. अर्थात, या गरजा पूर्ण करण्यासाठी गरीब माणसांना प्रचंड धडपड करावी लागते, काबाडकष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते. समजा रडत, भेकत, कुथत, दु:खीकष्टी होत एखादी 'अ' व्यक्ती कष्ट करते. आठ-दहा तास काबाडकष्ट केल्यावर त्याच्या हातावर त्या दिवसाची मजुरी पडते. या पैशातून तो रात्रीसाठीचा शिधा घेतो. पुन्हा रडत, कुथत, नशिबाला दोष देत, ''माझ्याच वाटय़ाला कां हे भोग? इतर कसे आनंदात जगताहेत?'' असा विचार करत शिधा रांधतो. जेवतो, पोटभर जेवतो., तृप्त होतो. जेवल्यावर हा माणूस आनंदी होईल कां? नाही. कदाचित त्याचं शरीर अन्न ग्रहण केल्यावर तृप्त होईल; पण मन मात्र आनंदी होणार नाही. उलट ''आजतर कसंबसं जेवलो, पण उद्या काम मिळेल कां? जेवायला मिळेल की उपाशी राहावे लागेल?'' याच विवंचनेत, तळमळून तो रात्र काढेल. कदाचित त्याला धड झोपही लागणार नाही. तो सारखा अस्वस्थ, चिंताग्रस्त असेल. समजा दुसरा 'ब' माणूस,''चला छान काम करू या, आनंदानं काबाडकष्ट करू या'' अशा मनोवृत्तीनं कामावर भिडला. पहिल्या 'अ' इतकीच त्यानं मेहनत घेतली. मिळालेल्या मजुरीतून शिधा घेतली. आनंदानं स्वयंपाक केला, जेवला. तर शरीरही तृप्त होईल आणि मनंही आनंदानं तृप्त होईल. ''आजचं तर छान झालं. उद्याचं उद्या पाहू. काहीतरी काम मिळेलच. नाही मिळालं तर ठीक आहे. काहीतरी मार्ग शोधूच.'' हा आशावादी, आनंदी माणूस शांतपणे झोपी जाईल. तुमच्यापुढे ठेवलेली दोन्ही उदाहरणं काल्पनिक नाहीत. आपल्या देशात शेकडय़ानं अशी (दोन्ही) उदाहरणं पाहायला मिळतात. कष्ट करताना शरीराला तोषीस पडू शकते, कॅलरीज जळू शकतात; पण त्यानं दु:खच होतं असं नाही. तर कितीही कष्टाचं काम करताना ते आनंदानं करता येण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. प्रचंड काबाडकष्ट उपसताना, अर्धपोटी राहतानासुद्धा आनंदानं, हसतमुखानं जगणारी कितीतरी माणसं मी याच देशात खेडय़ापाडय़ात पाहिली आहेत. ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यामध्येही अनंत अडचणी येतात, अशीही माणसं जर आनंदानं जगू शकतात, तर ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात, त्यांना दु:खी असण्याचं कारण काय? किमान मध्यमवर्गीय माणसांनी तरी आनंदी राहायला नको कां? कारण दृष्टिकोन! 'अँटिटय़ूड'! आपला आपल्याकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर सारं अवलंबून असतं. तुम्ही जर 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे'वाले असाल तरतुम्ही नेहमी दु:खीच राहणार! एकुलता एक सुखाचा धागासुद्धा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. ''काय उपयोग? हे सुख थोडचं टिकणार आहे? आपल्या वाटय़ाला तर नेहमी दु:खच दु:ख! आपलं नशीबच असं..'' समोर असलेल्या सुखावर, आनंदावरसुद्धा तुम्ही पार बोळा फिरविणार. सुखाच्या आताच्या वर्तमान क्षणांवर भविष्यातील काल्पनिक दु:खांचे डोंगर चढवून सुखी क्षणही तुम्ही चिरडून टाकणार! हेही आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. मनानं, मन:सामर्थ्यानं तुम्ही कदाचित समोरची, भोवतालची परिस्थिती बदलवू शकत नाही; पण समोरच्या कोणत्याही, कशाही परिस्थितीचा मनावर किती आणि कसा परिणाम होऊ द्यायचा हे ठरविण्याचं सामर्थ्य मात्र निश्चितपणे आपल्या मनात आहे आणि हे मनाचं सामर्थ्य समर्थपणे वापरणं हेच खरं अध्यात्म आहे. आजच्या परिभाषेत याला आपण मानसशास्त्र म्हणतो. मनाचं शास्त्र म्हणतो. आज आपण जागतिकीकरणाच्या खुल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अजस्र विळख्यात जगत आहोत. त्यालाच आधुनिकीकरण, प्रगती समजतो आहोत. या भांडवलशाही अर्थरचनेनं काही आभासी मूल्य तुमच्या-माझ्यावर लादली आहेत. मूठभर कार्पोरेटस् आणि मोजक्या भांडवलदारांचा धनसंचय अमाप वाढायचा असेल तर अशी 'आभासी मूल्य' समाजात रुजणं नितांत गरजेचं आहे. सगळ्या माध्यमांमधून ही मूल्य खोलवर रुजवली जातात. आपल्या नकळत मनात खोलवर ती रुजतात. त्यातील आजचं एक मूल्य आहे. 'सक्सेस, सक्सेस, सक्सेस' 'नथिंग सक्सिडस् लाईक सक्सेस', यशासारखी यशस्वी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. यशस्वी व्हा! यशस्वी होणं म्हणजे काय? हेही आपल्याला सांगितलं जातं, आपल्या मनात खोलवर कोरलं जातं. ''भरपूर पैसे कमवा, उच्चपदावर विराजमान व्हा, आणखी पैसे कमवा, कार, साधी नाही बी.एमड.ब्ल्यू. कार, मोठा फ्लॅट, बंगला बाळगा, सुटाबुटात वावरा, मस्त पाटर्य़ा करा, छान दारू एन्जॉय करा, पुन्हा कष्ट करा, सारखे धडपडा, आणखी आणखी उच्चपदावर जा, अधिकाधिक पैसे कमवा. अधिक पाटर्य़ा-दारू एन्जॉय करा, अधिकाधिक सक्सेस व्हा.'' खरं म्हणजे गेली 21-22 वर्षे मी मानवी विकासाच्या, व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात व्यावसायिक पद्धतीनं कार्यशाळा चालवतो आहे. लोकांना यशस्वी, आनंदी, सुखी कसं व्हावं ते शिकवतो आहे. मानसशास्त्राचा, भारतीय अध्यात्माचा गाढा अभ्यास केल्यानंतर आधीची 20-22 वर्षे सार्वजनिक क्षेत्रात काम केल्यानंतर मी या मानवी विकास (ह्युमन डेव्हलपमेंट) क्षेत्रात काम करतो आहे. त्यामुळं माणसांना रेसमध्ये धावणारी घोडी न बनता माणूस बनता बनता यशस्वी व्हा, अशी संतुलित शिकवणूक देणं मला शक्य होतं. पण मी जेव्हा या क्षेत्रातले इतर ट्रेनर पाहतो तेव्हा 'मी जिंकणारच, मीच जिंकणारच, मी जिंकणारच', 'मी यशस्वी होणारच, यशस्वी होणारच, यशस्वी होणारच' असे जोरजोरानं खिंकाळणारे घोडेच जिकडेतिकडे दिसतात आणि ते आपल्या कार्यशाळांना आलेल्या माणसांनासुद्धा असंच जोरजोरानं खिंकाळायला लावून रेसचे घोडे बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात आणि यालाच ते 'व्यक्तिमत्त्व विकास' असं म्हणतात. त्या बिच्चार्यांना माहीतच नसतं की खुल्या भांडवलशाहीच्या हातात असणार्या लगामाच्या तालावर नाचणारे घोडे आपण आहोत म्हणून. रात्रंदिवस धावा, आमच्यासाठी राबराब राबा, पाहिजे तेवढे ताजेताजे हरभरे खाऊ घालतो, धष्टपुष्ट बनवतो, आरामदायक एसी तबेल्यांमध्ये ठेवतो. उत्तम धावला. फायदा करून दिला, तर चकचकीत सुंदर, आकर्षक नवं खोगीर घालतो. म्हणजे वरचा हुद्दा देतो. नाही, तर पेकाटात लाथ घालून तबेल्याच्या बाहेर घालवतो. हा एसी तबेल्याची, ताज्या हरभर्याची सवय झालेला धष्टपुष्ट घोडा अपयशाच्या भीतीनं ऊर फुटेस्तोवर धाव धाव धावतो अन् एक दिवस धावता धावताच ब्लडप्रेशर हाय झाल्यानं हार्टफेल होऊन मरतो. नाही तर 'ब्रेन हॅमरेज' होऊन हॉस्पिटलात भरती होतो अथवा वेगानं धावता आलं नाही म्हणून तबेल्याबाहेर घालवलं गेल्यामुळं, अयशस्वितेचा शिक्का बसल्यामुळं, गलितगात्र बनून निराशेच्या गर्तेत स्वत:ला बुडवून घेतो. अशा माणसांना कार्पोरेट, मॅनेजर्स, उद्योजक, आयटी इंजिनिअर्स वगैरे वगैरे म्हटलं जातं. हे खरं आहे की, यश माणसाच्या मेंदूतूनच निर्माण होतं. वारंवार त्याच्या मेंदूत यश प्रोग्राम केलं तर माणसाचा मेंदू त्या दिशेनं वेगानं वाटचाल करेल; पण आपल्या मेंदूत यश म्हणजे नेमकं काय प्रोग्राम करायचं ते आपण ठरवायला नको कां? मद्यसम्राट हौसेनं नागडी कॅलेंडर्स निर्माण करणारा विजय माल्या हाही आजच्या आधुनिक जगातला यशस्वी माणूस आहे. राखी सावंतही यशस्वी आहे. सनी लिओनी ही महेश भटची नटी. पोर्नोग्राफिक स्टारही यशस्वी आहे. असं आजचं यशाला पुजणारं जग मानतं. खरंतर या तिघांच्याही यशाची जातकुळी एकच आहे. महात्मा गांधीजीही एक यशस्वी माणूस होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरही यशस्वी माणूस होते. गांधी आणि आंबेडकर यशस्वी झाले नसते तर लाखो, कदाचित कोटय़वधी माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला नसता; पण आजच्या आधुनिक समाजाच्या यशाच्या व्याख्येनुसार गांधी- आंबेडकर यशस्वी होते कां? पण माल्या, राखी, सनी मात्र यशस्वी आहेत. भरपूर पैसे, समृद्धी, प्रसिद्धी सारं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं आपण आपली यशाची व्याख्या ठरवणं गरजेचं आहे. रेसमध्ये धावणारे, धष्टपुष्ट, उंची खोगीर घातलेले, एसी तबेल्यात राहणारे घोडे बनायचं आणि यशस्वी व्हायचं की स्वत: आनंदानं जगणारी, दुसर्याच्या जीवनात आनंदाचा, सुगंधाचा दरवळ पसरविणारी माणुसकीपूर्ण माणसं बनायचं आणि यशस्वी व्हायचं. एकदा तुम्ही तुमची यशस्वी व्हायची व्याख्या ठरवली की, त्या दिशेनं स्वत:ला वारंवार सांगून प्रोग्राम करता येतं. त्यासाठी म्हणजे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते; पण ही मेहनत घेतानाच, आनंदानं मेहनत घ्यायचं ठरवलं, प्रचंड कष्ट हसत खेळत, एन्जॉय करत घ्यायचे ठरविले तर यशापर्यंत पोहोचण्याचा मार्गच खूप आनंद देतो. सारी कष्टप्रद वाटचालच आनंदमय होऊन जाते आणि या वाटचालीत इतर वाटसरूंचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर सारी वाटच आनंदानं भरून ओसंडून वाहते. मग यशाच्या शिखरावर पोहोचलं तर अधिकच आनंद! आणि अपयश वाटय़ाला आलं तर? नो चिंता, नवी वाट चोखाळण्याचा नवा आनंद पुन्हा घेऊ या! आनंदी माणसाचा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. अपयशसुद्धा. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Tuesday, 27 November 2012
सुख-दु:ख, यश-अपयशाची निर्मिती मेंदूत होते!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment