Saturday 10 November 2012

विज्ञान धर्मच सत्यशोधनाचा उद्देश पूर्ण करतो


गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाला आणि नेहमीप्रमाणं फोन खणखणू लागला. बरेच फोन अभिनंदन करणारे होते, धन्यवाद देणारे होते. पण काही फोन मात्र खूप चवताळून केले होते. बहुधा त्यांच्या धर्मश्रद्धा दुखावल्या गेल्या होत्या. मी काही धर्माबद्दल लिहिलं नव्हतं. फक्त आपल्या माणसांच्या कहाणीबद्दल लिहिलं होतं. डार्विनच्या उत्क्रांतिवादी सिद्धांताबद्दल त्रोटक माहिती लिहिली होती. तरी काही लोक एवढे का खवळले असावे?

जे शिक्षणानं अपुरे आहेत त्यांचं चिडणं, खवळणं, रागावणं मी समजून घेऊ शकतो. समजून घेतो. अतिशय समजावण्याच्या सुरातच उत्तरं देतो. पण जे उच्चशिक्षित आहेत त्यांचं काय करायचं? असाच एक फोन नांदेडवरून आला. परिचय देताना 'मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे' असं त्यांनी सांगितलं आणि डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खोटा आहे. माकडापासून माणूस बनत नाही. आजची माकडं माणसं का बनत नाही? वगैरे बोलायला लागले. वरून डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मी अभ्यासला आहे, मला सारं माहीत आहे, असं म्हणून भांडायलाही लागले.

मी त्यांना शेवटी म्हणाले,''ठीक आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला कोर्टात ओढा. देशभर तो शिकविण्यावर कोर्टाची बंदी आणा.'' एका मेकॅनिकल इंजिनिअरची एखाद्या वैज्ञानिक संशोधनाबद्दलची ही बालिश प्रतिक्रिया ऐकून मला कीव आली, त्या विद्यापीठाची, त्या कॉलेजची जिथून या माणसाला मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री मिळाली. एखाद्या विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्याला विज्ञानाबद्दल असं बोलण्याचा अधिकार आहे कां? असू शकतो कां? पोटासाठी विज्ञान शिकायचं? पोट भरण्यासाठी विज्ञान वापरायचं आणि वरून स्वत:च्या अंधश्रद्धा उरी कवटाळण्यासाठी त्याच विज्ञानाला लाथाडायचं? हे कसं चालेल?

सगळय़ात पहिले, जे विज्ञान मुळात खोटं आहे, अशा खोटय़ा विज्ञानाची डिग्री परत करायला पाहिजे. त्या डिग्रीचा पोट भरण्यासाठी उपयोग करणार नाही असं ठरवलं पाहिजे. तेव्हाच अशांना विज्ञानाचा खोटं म्हणण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होऊ शकेल ना? नाहीतर, एखाद्या खर्‍या विज्ञान विद्यार्थ्याप्रमाणं डार्विनचा सिद्धांत खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी पुढं सरसावलं पाहिजे. त्यासाठी सबळ वैज्ञानिक पुरावे, वैज्ञानिक जगतापुढे सादर करून तो सिद्धांत खोटा आहे हे सिद्ध केलं पाहिजे. पुराणातले उतारे हे पुरावा ठरू शकत नाहीत. शेवटी विज्ञान, विज्ञान म्हणजे तरी काय आहे हो? जे या निसर्गात आहे त्याचा शोध घेणं, त्यामागच्या नियमांचं आकलन करून घेणं आणि हे निसर्गाचे नियमच वापरून शॉर्टकट पद्धतीनं काही गोष्टी निर्माण करणं म्हणजे विज्ञान. विज्ञान हे या निसर्गाच्या, सृष्टीच्या पलीकडे नसतं. विज्ञान स्वत: काहीही निर्माण करत नाही वा काहीही नष्ट करत नाही. फक्त निसर्गनियमांचा वापर करून एकाचं दुसर्‍यात रूपांतर करू शकतं. तेही निसर्गनियमांनुसारच. त्यामुळं विज्ञान आपल्या निसर्गापेक्षा वेगळं नाही, बाहेरचं नाही, परकं नाही, अगम्य नाही. निसर्गातील सत्य म्हणजे विज्ञान. हे आपण आजच्या काळात समजून घेतलं पाहिजे आणि सहजतेनं स्वीकारलंसुद्धा पाहिजे. खर्‍या धार्मिक माणसाला विज्ञान स्वीकारणं अतिशय सोपं जातं. कारण सगळय़ाच धर्मानी, त्याला एकही धर्म अपवाद नाही. धर्माचा खरा उद्देश सत्यशोधन करणं आहे. सत्याचा शोध घेणं आहे, असं मानलं आहे आणि विज्ञान तर या विश्वातील, निसर्गातील, प्राण्यांतील, माणसातील सत्याचा शोध घेतं. धर्माचा उद्देशच विज्ञान पूर्ण करत आहे. तरी ही खळखळ का?

ज्यांनी आपला धर्म पुरोहितशाहीकडे गहाण टाकला आहे. त्यातील 'सत्य शोधणे' या मूळ उद्देशाला गुडबाय केला आहे. काही हजार वर्षापूर्वी जे कुणी लिहून ठेवलं वा सांगून ठेवलं ते म्हणजेच अंतिम सत्य आहे असं जे मानतात, तेच अशा पद्धतीनं खळखळ करतात. खरं म्हणजे ही माणसं मुळात धर्मभ्रष्ट झालेली माणसं असतात आणि अशांमुळचे आपल्या समाजाचं प्रचंड नुकसान होतं.

या देशात तब्बल (किमान) दोन हजार वर्षे स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुले रोज शाळेत जाताना, पुण्याच्या धर्ममार्तडांकडून शेणाचा मार, कचरा अंगावर घेत, कुलटा स्त्री, वेश्या असे घाणेरडे शब्द ऐकत, तरी जिद्दीनं शाळेत जात, मुलींना शिकवत आणि पाहता पाहता समाज बदलला. आज आपली आई शिकली, बायको शिकली, मुली शिकताहेत. या देशात पराकोटीची अस्पृश्यता होती. केवळ दीडशे-दोनशे वर्षापूर्वी पेशवाईत अतिशूद्रांना चप्पल न घालता चालावं लागायचं. रस्त्यावर त्यांची अपवित्र पाऊलं उमटू नयेत म्हणून त्यांच्या कमरेला काटक्या लावून चालावं लागत असे. त्यांनी रस्त्यांवर थुंकून रस्ता विटाळू नये म्हणून केवळ थुंकण्यावर बंदी नव्हती तर थुंका अथवा न थुंका; पण गळ्यामध्ये थुंकण्यासाठी 'गाडगं'ं बांधल्याशिवाय त्यांना रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती. या देशातल्या बहुसंख्येने असलेल्या शूद्रातिशूद्रांना ढोरांपेक्षाही निकृष्ट दर्जाचं जीवन जगावं लागत होतं. पण यात आपण परिवर्तन केलं. एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीची, भारताची घटना निर्माण करणार्‍या समितीचं अध्यक्ष बनवलं. अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा ठरवलं. स्त्रियांना समान कायदेशीर अधिकार दिले. आज अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीतील हजारो लाखो माणसं अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, प्राध्यापक आहेत, आयएएस, आयपीएस, आयएफएस ऑफिसर आहेत आणि याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं नांदेडच्या एका इंजिनिअरला माझ्याशी भांडभांड भांडण्याचा, स्वत:चं अत्यंत अवैज्ञानिक मत मांडण्याचा, 'लोकशाही विचार स्वातंर्त्याचा' अधिकार दिला आहे, हे विसरून कसं चालेल? देवानं मुद्दाम, मेहनतीनं माणसाला निर्माण केलं, ही आपली आवडती कल्पना. त्यामुळं माणूस म्हणून आपल्याला खूप महत्त्व मिळतं, आपणच आपल्याला देतो. इतकी वर्षे ही आवडती जागा आपण पटकावून बसलो होतो आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतामुळं या आवडत्या जागेवरून आपली हकालपट्टी होते असे म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं, तरी सत्य स्वीकारणं आपण शिकलं पाहिजे.

आजच्या माकडाचा माणूस का बरं होत नाही? हा प्रश्नच हास्यास्पद आहे. ज्याला डार्विनचा उत्क्रांतिवाद कळला नाही तोच असा प्रश्न विचारू शकतो. एकतर आपण वानरापासून निर्माण झालो नाही. आपले आणि वानराचे पूर्वज सारखेच होते, एवढंच काय ते सत्य आहे आणि ही प्रक्रिया लाखो-कोटय़वधी वर्षामध्ये घडून आली आहे. माणसाचं अख्खं आयुष्यच केवळ दहा लाख वर्षाचं आहे. त्यातही आपलं ज्ञान, आयुष्य केवळ काही हजार वर्षाचं आहे. प्राणिजगताच्या उत्क्रांतीत हा कालावधी नगण्य आहे. दुसरं, नवी जात, निसर्गातील अपघातामुळं, म्युटेशनमुळं निर्माण होते. उदा. आपण ऐकतो एका बाळाला दोन डोकी होती. दुसर्‍या एका बाळाला चार डोळे होते. चार हात होते. या पद्धतीने काही अपघात घडत असतात. जे निसर्गासाठी प्रतिकूल ठरतात ते प्राणी मरतात. जे निसर्गात जगण्यासाठी अनुकूल अपघात ठरतात ते प्राणी जगतात. त्यातून नव्या प्राणी जाती निर्माण होतात. शिवाय पिढय़ान्पिढय़ा निसर्गाप्रमाणं स्वत:त अनुकूल बदल करण्यासाठी धडपडणार्‍या प्राणी-जातीत आनुवंशिक बदल घडून येतात. त्यातून उपजाती निर्माण होतात. उदाहरणार्थ माळरानावर वावरणारं अस्वल, वाघ हिमालयातील बर्फात दीर्घकाळ जगण्याचा प्रयत्न करू लागले की त्यातून केसाळ पांढरे 'पोलार्ड बिअ' आणि हिमवाघ तयार होतात. पण हेही बदल हजारो-लाखो वर्षामध्ये होतात. डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत स्वीकारण्यास खळखळ करणारे केवळ भारतातच आहेत असं नाही. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशातसुद्धा आहे. दोन शतकांपूर्वी युरोप अमेरिकेसारख्या देशांमध्ये शाळा-कॉलेजेस मोठय़ा प्रमाणावर चर्चेसद्वारा चालवली जात. पंधराव्या-सोळाव्या शतकात ब्रुनोनं मत मांडलं, ''पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते.'' झालं. चर्चचा फतवा निघाला. युरोपमध्ये ब्रुनोला जिवंत जाळण्यात आलं. पुढे कोपर्निकसने हेच मत मांडलं. त्याचा छळ झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. कारण बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटच्या, जेनेसिसच्या, उत्पत्ती मांडणीला छेद देणारं हे मत होतं. बायबलला खोटं ठरविणारं कोणतंही मत तेथील पुरोहितशाही स्वीकारणंच शक्य नव्हतं. पुढे गॅलिलिओनं दुर्बीण शोधली. खूप मोठा गणितज्ञ म्हणून युरोपमधल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यानं प्रचंड नावलौकिक मिळविला. सर्वदूर त्यांच्या विद्वत्तेचा दबदबा निर्माण झाला. त्यानं ग्रंथ लिहिला, त्यातही पृथ्वीविषयी हेच मत मांडलं. पण एवढय़ा विद्वान, प्रतिष्ठित वैज्ञानिकाला हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही. ब्रुनो कोपर्निकसचं उदाहरण समोर होतं.

अनेक वर्षानी त्याचा शाळकरी मित्र व्हॅटिकन सिटीचा पोप बनला. धर्मपीठाच्या उच्चासनावर आपलाच मित्र बसला आहे, या भाबडय़ा समजुतीतून त्यानं आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. पण पुरोहित कुणाचाच मित्र नसतो. जुना शाळकरी मित्र आता पोप होता. गॅलिलिओवर पोपनं चौकशी समिती बसवली. जीव वाचविण्यासाठी गॅलिलिओला लिहून द्यावं लागलं, ''पृथ्वी सपाट आहे, ती सूर्याभोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो.''

तरी गॅलिलिओला नजरकैदेत ठेवलं. एवढय़ा विद्वान माणसाला हा अपमानास्पद आघात सहन झाला नाही. तो पोपच्या नजरकैदेतच हे जग सोडून गेला. सोळाव्या शतकातील ही गोष्ट आहे.

पण अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील डार्विनच्या वाटय़ाला मात्र हा छळ आला नाही. त्याचं संशोधन तर फारच क्रांतिकारक होतं? तरी का? कारण मधल्या 200-250 वर्षात विज्ञानानं सगळ्याच क्षेत्रात प्रचंड क्रांती केली होती. रोजच्या जगण्यात बदल निर्माण झाले होते. घोडागाडय़ांच्या ऐवजी बस, कार, ट्रेन, ट्राम रस्त्यावर धाऊ लागल्या होत्या. वेगवेगळ्या वस्तूंचं कारखान्यात उत्पादन होऊ लागलं होतं. वीज घराघरांत पोहोचू लागली होती आणि प्रत्येकच विज्ञानातील संशोधन बायबलप्रणीत समजुतींना हादरा देत होतं. पण सर्वसामान्य माणसांचं जीवन समृद्ध करणारं विज्ञान नाकारणं शक्य नव्हतं. मग धर्मसंस्थेनं, चर्चनं आपले हात आवरते घेतले. विज्ञान क्षेत्रात हस्तक्षेप करणं बंद केलं. त्यानंतर डार्विन आला. म्हणून तो वाचला. आणखी दोनशे वर्षे (सोळाव्या शतकात) आधी तो सिद्धांत मांडला असता तर त्याला सुळीच दिलं असतं.

सिद्धांताचा मात्र छळ झालाच. अमेरिकेतील एका चर्चच्या शाळेत मुलांना डार्विनचा सिद्धांत शिकवत नसत. उलट तो खोटा आहे असं सांगितलं जाई. एका मुलाचे पालक कोर्टात गेले. कोर्टात चर्चविरुद्ध पालक लढाई सुरू झाली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टानं निर्णय दिला, ''चर्चच्या आधिपत्याखाली शाळा असली, तरी त्या शाळेला डार्विनचा सिद्धांत, वैज्ञानिक सिद्धांत म्हणून शिकवलाच पाहिजे. वाटल्यास बायबलचं धर्मशिक्षण देणार्‍या तासाला बायबलमधली जेनेसिसची कल्पना त्यांना सांगावी.'' ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये घडलेली गोष्ट आहे. तरी आपण डार्विनचा सिद्धांत नाकारणार? कशाच्या आधारावर?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

1 comment: