Saturday 14 July 2012

'सनातन'च्या मुखवटय़ांचाच जादूटोणा विधेयकाला विरोध


जादूटोणाविरोधी विधेयकासंबंधी पुन्हा गदारोळ सुरू झाला. काही हिंदुत्ववादी संघटनांचे या विधेयकाविरुद्ध निषेध, मोर्चे सुरू झाले. या विधेयकामुळे ''आमच्या धर्मावर गदा येणार, वारीला जाणं, सत्यनारायण करणं, पूजा करणं गुन्हा ठरणार! हे विधेयक केवळ हिंदूंच्या विरुद्ध आहे,'' असाही आरडाओरडा सुरू झाला आहे.

खरंच या विधेयकात असं काही आहे का? हे विधेयक महाराष्ट्र सरकारचं विधेयक आहे. कोणतं तरी सरकार या पद्धतीचं, चांगल्या धार्मिक आचार-प्रथांना, पंढरपूर वारीसारख्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणणार्‍या, पुरोगामी महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्‍या, 700 वर्षाच्या परंपरेला विरोध करणारं विधेयक आणण्याचं धाडस करील का?

मग हा विरोध का? गैरसमजावर आधारलेला आहे की वेड पांघरूण पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे?

विरोध करणार्‍या ह्या सगळ्यांचं नेतृत्व 'सनातन संस्था' करते. हिंदू जनजागरण समिती ते वारकरी संघटना हे याच सनातनचे मुखवटे आहेत. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीतील काही कार्यकर्ते महाराष्ट्र, गोव्यात बॉम्बस्फोटासारख्या कृत्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या लोकांनी जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, आवश्यकच आहे. कारण त्यांना या महाराष्ट्रात, देशात पुन्हा सनातन धर्म रुजवायचा आहे. चातुर्वण्र्य पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची नवी धर्मनिरपेक्ष तोंडवळ्याची राज्यघटना निर्माण करून पुरोगामी भारताची मुहूर्तमेढ रोवली. ही सगळी आधुनिकतेकडे, पुरोगामित्वाकडे वाटचाल करणारी चक्र उलटी फिरवून सनातन भारत निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे.

मीही जन्मानं हिंदू आहे. अजूनतरी धर्म न सोडल्याने वा न बदलल्याने हिंदूच आहे. त्यामुळं मी प्रत्येक हिंदू आणि इतरही धर्मातील सगळ्या धर्मप्रेमी माणसांना विनंती करतो की, त्यांनी या सनातन संस्थेतर्फे प्रकाशित होणारं 'सनातन प्रभात' दैनिक, साप्ताहिक वाचावं. किमान वर्षभराचे अंक चाळावेत म्हणजे याचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येईल. यांचा भुताखेतांपासून, मंत्रतंत्रादी सगळ्याच अंधश्रद्धांवर विश्वास आहे. नव्हे, ते या सगळ्या प्रकारांचा प्रसार-प्रचार करतात; पण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं या गोष्टी सिद्ध करण्याचं 15 लाख रुपयांचं आव्हान आहे. ते मात्र स्वीकारून भूत, मंत्रतंत्र सिद्ध करण्याचं धाडस दाखवीत नाहीत.

महाराष्ट्र सरकारनं खरंतर आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून सगळी माहिती गोळा केली तर यांच्या विरोधामागचं कारणंही सरकारला कळून येईल आणि मग त्यांच्या विरोधाला भीक घालण्याची गरज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना वाटणार नाही. हे खरं आहे की, जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सगळ्यात मोठा आघात 'सनातन संस्था-सनातन प्रभात' यांच्यावर होणार आहे. कायदा लागू झाल्यापासून त्यांना एकतर आमूलाग्र बदलावं लागणार आहे अथवा सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे.

पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात?

त्या वेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे.

16 डिसेंबर 2005 साली ते विधानसभेत, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते अडकले.

आता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या नावात बदल केला. बाकी विधेयक जसेच्या तसे आहे.

सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासोबत मला मिळाली. ना. हांडोरे, त्यांचे खाजगी सचिव मिलिंद शंभरकर आणि मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे.

अनेकांना वाटतं हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे; पण गेल्या 30 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्‍या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा प्रभावी विधेयक तयार करणं शक्य नाही.

पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर फलज्योतिषापासून तर परामानसशास्त्रीय दावे करणार्‍यांपर्यंत सारे या विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हतं.

कारण अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्या सारख्या कार्यकत्र्यांनी, प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे, पण राज्य सरकारनं जिथे माणसांची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे. याचं नीट भान ठेवून सध्याचं प्रारूप तयार झालं आहे.

सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे,''महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2011''. अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी याचा अर्थ काय?

2. ख.नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात जोडलेली 12 कलमं म्हणजेच ''अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी.'' या बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही.

अशी अपवादात्मक व सोपी सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं.

सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय, अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात, पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा.

परिशिष्टातील 12 कलमासंबंधी कृती घडली की संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्‍यासही एवढीच कठोर शिक्षा आहे.

शिवाय हा अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल.

पण अपराध काय? परिशिष्टातील ही 12 कलमे वाचा

1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने, बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे.

(भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही.)

2. एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे, फसविणे, ठकविणे, दहशत बसविणे.

3. जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन देणे, सक्ती करणे.

4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे.

5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे.

(केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही.)

6. एखादी व्यक्ती करणी करते, काळी विद्या करते, भूत लावते, जनावरांचे दूध आठविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविते, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे.

7. करणी, चेटूक केले या सबबीखाली मारहाण करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे.

8. भुतांची भीती घालणे, शारीरिक इजा भुतामुळे झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र-अघोरी उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे.

9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे सारखे उपचार करणे.

(कुर्त्यावर अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू शकतो.)

10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग बदलवितो असा दावा करणे.

11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.

12. मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय करणे.

आता या बारा कलमात विरोध करण्यासाठी काय आहे? कुणीतरी सुबुद्ध माणूस याला विरोध करणं शक्य आहे का?

ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे. मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला आधार काय?

(क्रमश:)

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

No comments:

Post a Comment