आजूबाजूला केवढी दु:खं आहेत? जीवनात केवढय़ा समस्या आहेत? सारं जीवनच वेगवेगळ्या दु:खांनी भरलेलं आहे. 'एक धागा सुखाचा.., तर शंभर धागे दु:खाचे' अशी जीवघेणी वस्तुस्थिती आहे. म्हणूनच दु:ख असह्य झाल्यावर अनेक लोक आत्महत्या करतात. प्रेमाचं, विरहाचं, प्रेमभंगाचं दु:ख असह्य झाल्यानं प्रेमी हे जग सोडून जातात. कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेला शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. पत्नीनं बदफैलीपणा केला म्हणून पती इहलोक सोडून जातो. पतीनं दुसरा घरठाव केला म्हणून पत्नी संसार अध्र्यावर सोडून निघून जाते. काही माणसं जगतात, पण मरणप्राय यातना, दु:ख भोगत जगत असतात. असल्या जगण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांना वाटत असतं. हे जग असं आहे. यातील खरं काय आहे? दु:खाचा संबंध आपल्या मनाशी आहे. मनावर होणार्या परिणामांबद्दल दोन विचारधारा आहेत. एक आध्यात्मिक, पारलौकिक विचारधारा. मन प्रचंड सामर्थ्यशाली असतं. त्याची शक्ती एवढी वाढवता येते की त्याचा परिणाम आजूबाजूच्या वस्तूंवर, परिस्थितीवर, माणसांवर निसर्गावरसुद्धा होऊ शकतो. त्याची क्षमता एवढी वाढवू शकतो की मन:सामर्थ्यानं वस्तूसुद्धा हलू शकते, वाकू शकते. परिस्थिती हवी तशी बदलू शकते. प्रकाशापेक्षाही अधिक वेगाने मन प्रवास करू शकतं. 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' करू शकतं. पण या विचारधारेनुसार मानलेलं मन:सामर्थ्य आजवर सिद्ध होऊ शकलं नाही. किमान वैज्ञानिक कसोटय़ांवर ते कुणालाही सिद्ध करता आलं नाही. जगभर संशोधनं झालीत; पण असं काही आजवर सिद्ध झालं नाही. उद्याही सिद्ध होण्याची शक्यता नाही. दुसरी विचारधारा मार्क्सवादी, जडवादी, भौतिक विचारधारा. मन हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतं. माईंड इज ए रिझल्टंट ऑफ मॅटर (अँटमॉस्पिअर). थोडक्यात ते आजूबाजूच्या परिस्थितीचं गुलाम असतं. स्वतंत्र नसतं. परिस्थितीला वातावरणाचा परिणाम ते टाळू शकत नाही. दु:खी परिस्थितीनं ते दु:खीच होणार? वरपांगी पाहताना आपल्याला हे मत, ही विचारधारा खरी वाटू शकते, वाटते. कारण आपल्यापैकी बहुतेकांवर भोवतालच्या परिस्थितीचा, वातावरणाचा असा गडद प्रभाव पडतो. त्यानुसार आपलं मन दु:खी बनतं वा आनंदी बनतं. पण सत्य मात्र वेगळचं आहे. हिप्पोक्रेटस, औषधशास्त्राचा जनक साडेबावीसशे वर्षापूर्वी म्हणून गेला, 'माणसाचं सुख आणि दु:ख', 'यश आणि अपयश' त्याच्या मेंदूतून निर्माण होतं आणि मगच जीवनात ते प्रत्यक्ष अमलात येतं. स्पिनोझा नावाचा एक महान तत्त्वज्ञ म्हणून गेला, 'हॅप्पिनेस इज द अल्टिमेट व्हच्र्यू' (आनंदी असणं हा मानवी जीवनातील सर्वात मोठा सद्गुण आहे.) अथवा विसाव्या शतकातील एक महान वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ बट्रॉंड रसेल यानं 'सुखी माणसाचा सदरा' (पुस्तक लिहून) मानवजातीला घातला आहे. सुखी कसं राहता येतं ते शिकवलं आहे. हे खरं आहे की, माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणार्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्याशिवाय त्याला आनंदानं जगता येणार नाही. अन्न, वस्त्र व निवारा मिळालाच पाहिजे. त्याच्या नैसर्गिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे. अर्थात, या गरजा पूर्ण करण्यासाठी गरीब माणसांना प्रचंड धडपड करावी लागते, काबाडकष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते. समजा रडत, भेकत, कुथत, दु:खीकष्टी होत एखादी 'अ' व्यक्ती कष्ट करते. आठ-दहा तास काबाडकष्ट केल्यावर त्याच्या हातावर त्या दिवसाची मजुरी पडते. या पैशातून तो रात्रीसाठीचा शिधा घेतो. पुन्हा रडत, कुथत, नशिबाला दोष देत, ''माझ्याच वाटय़ाला कां हे भोग? इतर कसे आनंदात जगताहेत?'' असा विचार करत शिधा रांधतो. जेवतो, पोटभर जेवतो., तृप्त होतो. जेवल्यावर हा माणूस आनंदी होईल कां? नाही. कदाचित त्याचं शरीर अन्न ग्रहण केल्यावर तृप्त होईल; पण मन मात्र आनंदी होणार नाही. उलट ''आजतर कसंबसं जेवलो, पण उद्या काम मिळेल कां? जेवायला मिळेल की उपाशी राहावे लागेल?'' याच विवंचनेत, तळमळून तो रात्र काढेल. कदाचित त्याला धड झोपही लागणार नाही. तो सारखा अस्वस्थ, चिंताग्रस्त असेल. समजा दुसरा 'ब' माणूस,''चला छान काम करू या, आनंदानं काबाडकष्ट करू या'' अशा मनोवृत्तीनं कामावर भिडला. पहिल्या 'अ' इतकीच त्यानं मेहनत घेतली. मिळालेल्या मजुरीतून शिधा घेतली. आनंदानं स्वयंपाक केला, जेवला. तर शरीरही तृप्त होईल आणि मनंही आनंदानं तृप्त होईल. ''आजचं तर छान झालं. उद्याचं उद्या पाहू. काहीतरी काम मिळेलच. नाही मिळालं तर ठीक आहे. काहीतरी मार्ग शोधूच.'' हा आशावादी, आनंदी माणूस शांतपणे झोपी जाईल. तुमच्यापुढे ठेवलेली दोन्ही उदाहरणं काल्पनिक नाहीत. आपल्या देशात शेकडय़ानं अशी (दोन्ही) उदाहरणं पाहायला मिळतात. कष्ट करताना शरीराला तोषीस पडू शकते, कॅलरीज जळू शकतात; पण त्यानं दु:खच होतं असं नाही. तर कितीही कष्टाचं काम करताना ते आनंदानं करता येण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. प्रचंड काबाडकष्ट उपसताना, अर्धपोटी राहतानासुद्धा आनंदानं, हसतमुखानं जगणारी कितीतरी माणसं मी याच देशात खेडय़ापाडय़ात पाहिली आहेत. ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यामध्येही अनंत अडचणी येतात, अशीही माणसं जर आनंदानं जगू शकतात, तर ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात, त्यांना दु:खी असण्याचं कारण काय? किमान मध्यमवर्गीय माणसांनी तरी आनंदी राहायला नको कां? कारण दृष्टिकोन! 'अँटिटय़ूड'! आपला आपल्याकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर सारं अवलंबून असतं. तुम्ही जर 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे'वाले असाल तरतुम्ही नेहमी दु:खीच राहणार! एकुलता एक सुखाचा धागासुद्धा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. ''काय उपयोग? हे सुख थोडचं टिकणार आहे? आपल्या वाटय़ाला तर नेहमी दु:खच दु:ख! आपलं नशीबच असं..'' समोर असलेल्या सुखावर, आनंदावरसुद्धा तुम्ही पार बोळा फिरविणार. सुखाच्या आताच्या वर्तमान क्षणांवर भविष्यातील काल्पनिक दु:खांचे डोंगर चढवून सुखी क्षणही तुम्ही चिरडून टाकणार! हेही आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. मनानं, मन:सामर्थ्यानं तुम्ही कदाचित समोरची, भोवतालची परिस्थिती बदलवू शकत नाही; पण समोरच्या कोणत्याही, कशाही परिस्थितीचा मनावर किती आणि कसा परिणाम होऊ द्यायचा हे ठरविण्याचं सामर्थ्य मात्र निश्चितपणे आपल्या मनात आहे आणि हे मनाचं सामर्थ्य समर्थपणे वापरणं हेच खरं अध्यात्म आहे. आजच्या परिभाषेत याला आपण मानसशास्त्र म्हणतो. मनाचं शास्त्र म्हणतो. आज आपण जागतिकीकरणाच्या खुल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अजस्र विळख्यात जगत आहोत. त्यालाच आधुनिकीकरण, प्रगती समजतो आहोत. या भांडवलशाही अर्थरचनेनं काही आभासी मूल्य तुमच्या-माझ्यावर लादली आहेत. मूठभर कार्पोरेटस् आणि मोजक्या भांडवलदारांचा धनसंचय अमाप वाढायचा असेल तर अशी 'आभासी मूल्य' समाजात रुजणं नितांत गरजेचं आहे. सगळ्या माध्यमांमधून ही मूल्य खोलवर रुजवली जातात. आपल्या नकळत मनात खोलवर ती रुजतात. त्यातील आजचं एक मूल्य आहे. 'सक्सेस, सक्सेस, सक्सेस' 'नथिंग सक्सिडस् लाईक सक्सेस', यशासारखी यशस्वी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. यशस्वी व्हा! यशस्वी होणं म्हणजे काय? हेही आपल्याला सांगितलं जातं, आपल्या मनात खोलवर कोरलं जातं. ''भरपूर पैसे कमवा, उच्चपदावर विराजमान व्हा, आणखी पैसे कमवा, कार, साधी नाही बी.एमड.ब्ल्यू. कार, मोठा फ्लॅट, बंगला बाळगा, सुटाबुटात वावरा, मस्त पाटर्य़ा करा, छान दारू एन्जॉय करा, पुन्हा कष्ट करा, सारखे धडपडा, आणखी आणखी उच्चपदावर जा, अधिकाधिक पैसे कमवा. अधिक पाटर्य़ा-दारू एन्जॉय करा, अधिकाधिक सक्सेस व्हा.'' खरं म्हणजे गेली 21-22 वर्षे मी मानवी विकासाच्या, व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात व्यावसायिक पद्धतीनं कार्यशाळा चालवतो आहे. लोकांना यशस्वी, आनंदी, सुखी कसं व्हावं ते शिकवतो आहे. मानसशास्त्राचा, भारतीय अध्यात्माचा गाढा अभ्यास केल्यानंतर आधीची 20-22 वर्षे सार्वजनिक क्षेत्रात काम केल्यानंतर मी या मानवी विकास (ह्युमन डेव्हलपमेंट) क्षेत्रात काम करतो आहे. त्यामुळं माणसांना रेसमध्ये धावणारी घोडी न बनता माणूस बनता बनता यशस्वी व्हा, अशी संतुलित शिकवणूक देणं मला शक्य होतं. पण मी जेव्हा या क्षेत्रातले इतर ट्रेनर पाहतो तेव्हा 'मी जिंकणारच, मीच जिंकणारच, मी जिंकणारच', 'मी यशस्वी होणारच, यशस्वी होणारच, यशस्वी होणारच' असे जोरजोरानं खिंकाळणारे घोडेच जिकडेतिकडे दिसतात आणि ते आपल्या कार्यशाळांना आलेल्या माणसांनासुद्धा असंच जोरजोरानं खिंकाळायला लावून रेसचे घोडे बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात आणि यालाच ते 'व्यक्तिमत्त्व विकास' असं म्हणतात. त्या बिच्चार्यांना माहीतच नसतं की खुल्या भांडवलशाहीच्या हातात असणार्या लगामाच्या तालावर नाचणारे घोडे आपण आहोत म्हणून. रात्रंदिवस धावा, आमच्यासाठी राबराब राबा, पाहिजे तेवढे ताजेताजे हरभरे खाऊ घालतो, धष्टपुष्ट बनवतो, आरामदायक एसी तबेल्यांमध्ये ठेवतो. उत्तम धावला. फायदा करून दिला, तर चकचकीत सुंदर, आकर्षक नवं खोगीर घालतो. म्हणजे वरचा हुद्दा देतो. नाही, तर पेकाटात लाथ घालून तबेल्याच्या बाहेर घालवतो. हा एसी तबेल्याची, ताज्या हरभर्याची सवय झालेला धष्टपुष्ट घोडा अपयशाच्या भीतीनं ऊर फुटेस्तोवर धाव धाव धावतो अन् एक दिवस धावता धावताच ब्लडप्रेशर हाय झाल्यानं हार्टफेल होऊन मरतो. नाही तर 'ब्रेन हॅमरेज' होऊन हॉस्पिटलात भरती होतो अथवा वेगानं धावता आलं नाही म्हणून तबेल्याबाहेर घालवलं गेल्यामुळं, अयशस्वितेचा शिक्का बसल्यामुळं, गलितगात्र बनून निराशेच्या गर्तेत स्वत:ला बुडवून घेतो. अशा माणसांना कार्पोरेट, मॅनेजर्स, उद्योजक, आयटी इंजिनिअर्स वगैरे वगैरे म्हटलं जातं. हे खरं आहे की, यश माणसाच्या मेंदूतूनच निर्माण होतं. वारंवार त्याच्या मेंदूत यश प्रोग्राम केलं तर माणसाचा मेंदू त्या दिशेनं वेगानं वाटचाल करेल; पण आपल्या मेंदूत यश म्हणजे नेमकं काय प्रोग्राम करायचं ते आपण ठरवायला नको कां? मद्यसम्राट हौसेनं नागडी कॅलेंडर्स निर्माण करणारा विजय माल्या हाही आजच्या आधुनिक जगातला यशस्वी माणूस आहे. राखी सावंतही यशस्वी आहे. सनी लिओनी ही महेश भटची नटी. पोर्नोग्राफिक स्टारही यशस्वी आहे. असं आजचं यशाला पुजणारं जग मानतं. खरंतर या तिघांच्याही यशाची जातकुळी एकच आहे. महात्मा गांधीजीही एक यशस्वी माणूस होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरही यशस्वी माणूस होते. गांधी आणि आंबेडकर यशस्वी झाले नसते तर लाखो, कदाचित कोटय़वधी माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला नसता; पण आजच्या आधुनिक समाजाच्या यशाच्या व्याख्येनुसार गांधी- आंबेडकर यशस्वी होते कां? पण माल्या, राखी, सनी मात्र यशस्वी आहेत. भरपूर पैसे, समृद्धी, प्रसिद्धी सारं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं आपण आपली यशाची व्याख्या ठरवणं गरजेचं आहे. रेसमध्ये धावणारे, धष्टपुष्ट, उंची खोगीर घातलेले, एसी तबेल्यात राहणारे घोडे बनायचं आणि यशस्वी व्हायचं की स्वत: आनंदानं जगणारी, दुसर्याच्या जीवनात आनंदाचा, सुगंधाचा दरवळ पसरविणारी माणुसकीपूर्ण माणसं बनायचं आणि यशस्वी व्हायचं. एकदा तुम्ही तुमची यशस्वी व्हायची व्याख्या ठरवली की, त्या दिशेनं स्वत:ला वारंवार सांगून प्रोग्राम करता येतं. त्यासाठी म्हणजे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते; पण ही मेहनत घेतानाच, आनंदानं मेहनत घ्यायचं ठरवलं, प्रचंड कष्ट हसत खेळत, एन्जॉय करत घ्यायचे ठरविले तर यशापर्यंत पोहोचण्याचा मार्गच खूप आनंद देतो. सारी कष्टप्रद वाटचालच आनंदमय होऊन जाते आणि या वाटचालीत इतर वाटसरूंचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर सारी वाटच आनंदानं भरून ओसंडून वाहते. मग यशाच्या शिखरावर पोहोचलं तर अधिकच आनंद! आणि अपयश वाटय़ाला आलं तर? नो चिंता, नवी वाट चोखाळण्याचा नवा आनंद पुन्हा घेऊ या! आनंदी माणसाचा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. अपयशसुद्धा. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Tuesday, 27 November 2012
सुख-दु:ख, यश-अपयशाची निर्मिती मेंदूत होते!
Monday, 19 November 2012
आनंदी राहा, सोबतच्या माणसांनाही आनंदी करा!
![]() |
![]() |
भूक शमवण्यातलं सुख, प्रणयातलं सुख, बाकी सारी सुखं क्षणभंगुर आहेत. काही काळातच ती ओसरतात. म्हणून चिरकाल, अनंतकाळ टिकणारं सुख शोधण्याचा प्रयत्न धर्मानी केला. भारतीय धर्माना त्यातून मोक्ष ही कल्पना सुचली. मोक्ष म्हणजे सगळ्या सुख-दु:खांपासून सुटका. जन्म-मरणाच्या फेर्यामधून सुटका. चिरंतन आनंदाची अवस्था. आता ही केवळ कल्पना आहे की वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. कारण मोक्ष मरणानंतर प्राप्त होतो आणि मेल्यानंतर माणूस आपली अनुभूती, अनुभव जिवंत माणसांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळं त्या वादात, त्या क्षेत्रात आपण न शिरलेलेच बरं. शिवाय मोक्षाचा एवढा आग्रह असणार्या भारतातील धार्मिक वातावरणात शूद्र-अतिशूद्रांना ढोरापेक्षाही निकृष्टपणे जगण्यास, तब्बल दोन-अडीच हजार वर्षे तरी, प्रवृत्त करणारी चातुर्वण्र्याची कल्पना अमानुषपणे राबवली जाऊ शकतेच कशी? याचाच अर्थ चिरंतन आनंद अवस्था गाठण्यास आसुसलेल्या आध्यात्मिक माणसांचं या जीवनातील दु:खाशी व आनंदाशी काही देणंघेणं नव्हतं. माणुसकीशीही काही देणंघेणं नव्हतं, असं मानायचं काय? असे अनेक अमानुष प्रश्न निर्माण होतात. म्हणून आपण या पृथ्वीवरच्या, इहलोकातील सुखाच्या शोधाविषयी बोलू, विचार करू, समजून घेऊ.
गेल्या 10 लाख वर्षापासून आपण दोन पायांचा प्राणी, पृथ्वीवर वावरतो आहे. आजच्या सारखा 'माणूस' म्हणवला जाणारा प्राणी किमान दोन लाख वर्षापासून पृथ्वीवर जगतो आहे. प्रत्येकच प्राण्याकडून निसर्गाच्या किमान दोन अपेक्षा आहेत.
एक तीव्रतेनं जगण्याची, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी आटोकाट प्रयत्न करून, संघर्ष करून मारकाट करून जिवंत राहण्याची धडपड करण्याची प्रवृत्ती. जन्म घेण्याच्या प्रक्रियेसोबतच, एक नॅचरल इन्स्टिंक्टचा, जैविक प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून जगण्याची दुर्दम्य इच्छा प्रत्येक माणसाला, प्राणिमात्राला प्राप्त होत असते. म्हणूनच अगदी टाटा-बिर्ला अंबानी असो की तुमच्या माझ्यासारखा प्राथमिक गरजा पूर्ण करू शकणारा मध्यमवर्गीय माणूस असो की, आज रात्री खायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसणारा एखादा भिकारी असो, प्रत्येक जणचं धडपडत जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जगण्याची, जिवंत राहण्याची दुर्दम्य इच्छा ही प्राणिमात्राला निसर्गानं दिलेली देणगी आहे, निसर्गाची ती अपरिहार्य गरज आहे.
दुसरं, प्राणिमात्रानं आपली जात जिवंत ठेवण्यासाठी स्वत:सारखेच प्राणी जन्माला घातले पाहिजे, त्यासाठीसुद्धा वाट्टेल तेवढा प्रयत्न केला पाहिजे, प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, पण नवी पिढी जन्माला घातली पाहिजे. ही निसर्गाची दुसरी आवश्यकता.
माणूस हा उत्क्रांत प्राणी असला तरी सस्तन प्राण्याचे सारे नियम त्याला लागू होतात. मूल जन्माला यायचं असेल तर नर-मादीनं जवळ आलं पाहिजे, त्यांनी मैथुन केलं पाहिजे. तरच नवी पिढी जन्माला येणार. म्हणून नर-मादीमध्ये परस्परांविषयी जबरदस्त ओढ वाटेल, आकर्षण वाटेल अशी यंत्रणा निसर्गानं निर्माण केली. एवढंच नव्हे, तर हे एकत्र येणं कष्टप्रद, त्रासदायक न होता आनंददायक बनेल अशी योजना केली. अगदी नर-मादी एकत्र येताना प्रणयातही आनंद मिळेल, तो वाढत जाईल. एवढा आनंद वाढत जाईल की तो मधेच थांबवता येणं शक्य होणार नाही, त्याचं रूपांतर मैथुनात होईल आणि मैथुनात हा आनंद उत्तरोत्तर वाटत जाईल व त्याची परिणती 'परमोच्च आनंदात' होईल, लैंगिक तृप्तीत होईल. मगच ही प्रक्रिया थांबेल. अशीही योजना निसर्गानं आखली. कारण नर तृप्तीच्या वेळी शुक्राणू सोडले जातात, अपत्य राहण्याची शक्यता वाढते.
निसर्गानं हा सारा खेळच आनंदमय करून टाकला. बक्षीस म्हणून परमोच्च आनंद बहाल केला. कारण प्राणी आनंदासाठी धडपडायला, कष्ट घ्यायला तयार आहे म्हणून.
प्रणयाराधनातून मनुष्यप्राण्याला जो परमोच्च आनंद मिळतो तेवढा आनंद दुसर्या कोणत्याही माध्यमातून त्याला मिळत नाही, ही वस्तुस्थिती निसर्गानं निर्माण करून ठेवली. कारण नवी पिढी निर्मिती ही निसर्गाची गरज होती.
पण हा आनंद क्षणिक असतो, काही सेकंद-मिनिटांचा असतो, त्याऐवजी चिरंतन आनंद प्राप्त करण्यासाठी माणसानं धर्म-अध्यात्म या माध्यमातून प्रयत्न केले. दीर्घकाळ, किमान अडीच-तीन हजार वर्षे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश मिळालं की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे.
मधल्या काळात, प्रामुख्यानं धर्माच्या या प्रणयाराधनामधल्या निसर्गनिर्मित आनंदावर मर्यादा आणण्याचे खूप प्रयत्न झाले. प्रणय-मैथुन (आधुनिक भाषेत सेक्स) ही प्रक्रिया वाईट ठरली गेली, पाप ठरवली गेली. प्रणय-मैथुन हे आध्यात्मिक प्रगतीच्या, मोक्षाच्या मार्गातले अडथळे आहेत असं मानलं गेलं. ब्रह्मचर्याला प्रचंड महत्त्व दिलं गेलं, प्रतिष्ठित केलं गेलं. जवळपास, मुस्लिम वगळता, सगळ्याच धर्मानी हे ब्रह्मचर्याचे प्रयोग दीर्घकाळ राबवले. शक्य होईल तिथे प्रणय-मैथुनाला थांबवण्याचा, शक्य असेल तिथे बंदी घालण्याचा प्रयत्न केला. पण खरं म्हणजे ही लढाई निसर्गाच्या प्राथमिक नियमांच्या विरुद्धची लढाई होती. निसर्गाचं प्रॉडक्ट, निर्मिती असणार्या माणसानं ती आपल्या निर्मात्याविरुद्ध उभारलेली लढाई होती. ती जिंकणं शक्य होतं का? शक्यच नव्हतं. त्यामुळं हे सारे ब्रह्मचर्य प्रयोग दारुणरीत्या असफल झाले. ब्रह्मचर्याची वस्तीस्थानं विकृतीचे अड्डे बनले. ºिश्चन धर्मामधील कॅथॉलिक पंथीय विचारसरणीत 'प्रणय-मैथुन'ला स्थानच द्यायची तयारी नव्हती. अगदी नवरा-बायकोनंसुद्धा यापासून दूर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा होती. अपवाद फक्त मूल जन्माला घालण्यापुरता. तेवढय़ाचसाठी आपद्धर्म म्हणून पती-पत्नीनं एकत्र यावं अशी अपेक्षा होती. कॅथॉलिक पंथीय धर्मोपदेशकांनी ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे असा आग्रह होता. पण विसावं शतक संपता संपता धर्मोपदेशकांनासुद्धा लग्न करण्याची परवानगी देणारा फतवा व्हॅटिकन सिटीला काढावा लागला. ही चांगली गोष्ट आहे. हा निर्णय कौतुकास्पद, माणुसकीपूर्ण आहे.
निसर्गाचं अपत्य असणारा माणूस कधीच निसर्गाच्या विरुद्धची लढाई जिंकू शकत नाही. जास्तीतजास्त तो निसर्गनियमांचाच वापर करून काही निसर्गनियमांमधून थोडीशी सवलत प्राप्त करू शकतो, काही नियमांना थोडीशी मुरड घालू शकतो. निसर्गनियम समजून घेऊन काही नियमांपासून, थोडसं कंपल्शन बाजूला सारून, काहीसं स्वातंर्त्य पदरात पाडून घेऊ शकतो. ही आपली, माणसाची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. कारण शेवटी आपण या निसर्गाचे घटक आहोत, मालक नाहीत.
निसर्गानं प्राणिमात्राला आणखी एक तिसरी इन्स्टिंक्ट, जैविक प्रेरणा बहाल केली. सुखानं जगण्याची, सुखासाठी आनंदासाठी धडपडण्याची. आपल्या मेंदूत उत्क्रांतीच्या दुसर्या टप्प्यात लिंबिक सिस्टिम प्राप्त झाली आहे. यात एक रिवॉर्ड फंक्शन असतं तर दुसरं पनिशमेंट फंक्शन असतं. ज्या ज्या वेळी आपण एखादी कृती करतो, अनुभव घेतो, वर्तणूक करतो त्या त्या वेळी रिवॉर्ड वा पनिशमेंट फंक्शन जागृत होतं. जर रिवॉर्ड फंक्शन जागृत झालं तर आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतं. मग ती कृती पुन्हापुन्हा करावीशी वाटते; तो अनुभव, ती वर्तणूक पुन्हा पुन्हा रिपिट करावीशी वाटते. कारण सातत्यानं सुख मिळावं, आनंद मिळावा यासाठी धडपडत जगावं हाही नैसर्गिक प्रेरणेचा एक भाग आहे.
जर आपलं पनिशमेंट फंक्शन जागृत झालं तर आपल्याला वेदना होते, दु:ख होतं. मग ती कृती, वर्तणूक, तो अनुभव पुन्हा रिपिट करावासा वाटत नाही. कारण आपल्याला वेदना, दु:ख नको असतं.
निसर्गाचा पहिला नियम, जो जो जन्माला आला त्यानं वाट्टेल त्या परिस्थितीत धडपडत जगावं. पण कसं जगावं? सातत्यानं रिवॉर्ड फंक्शन जागृत होत जाईल, आनंद मिळेल, सुख मिळेल. (आणि पनिशमेंट फंक्शन जागृत होणार नाही, दु:ख आणि वेदनांपासून दूर राहता येईल.) या पद्धतीनं माणसानं जगावं, असा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो. निसर्गाचीच तशी योजना आहे.
त्यामुळं तुमच्या-माझ्या जीवनाचा खराखुरा उद्देशच आनंद मिळवणं, सुख मिळवणं हा आहे.
जर प्रत्येक माणूस सुख मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत गेला तर माणूस स्वार्थी बनणार नाही का? अमानुष बनणार नाही का? स्वत:च्या सुखासाठी स्वार्थासाठी तो दुसर्यांचे मुडदे पाडणार नाही का? या प्रश्नांचं उत्तर दीर्घकाळापासून माणूस शोधत आला आहे आणि कदाचित या भीतीपोटीच इहलोकातील, प्रत्यक्ष जीवनातील सुखाला किंमत देऊ नये, त्यापेक्षा परलोकातील, स्वर्गातील सुखाला, मोक्षाला किंमत दिल्यामुळं माणूस अधिक परोपकारानं वागेल, अधिक माणुसकीपूर्ण वागेल अशी अपेक्षा केली असावी. त्या दिशेनं आपण गेली दोन-अडीच हजार वर्षे प्रवास करून पाहिला. पण त्यातून असं काही साध्य होताना दिसत नाही.
तसं असतं तर किमान आपली सारी धार्मिक स्थळं माणुसकीची, प्रामाणिकपणाची, परोपकाराची स्थळं ठरली असती. देवळांमध्ये भरमसाट काळा पैसा दानपेटय़ांमध्ये जमा झाला नसता आणि कोटय़वधी रुपये दानपेटय़ांत जमा होणार्या देवळांच्या बाहेर भिकार्यांच्या रांगा लागल्या नसत्या. देवळांनीच भिकार्यांचं भिकारीपण संपवलं असतं.
माणसं देवधर्म मानतात म्हणून प्रामाणिकपणे वागतात, अशी एकेकाळी माझीही, इतर धार्मिक माणसांप्रमाणेच समजूत होती.
27 जून 1975 साली (25 जूनला रात्री 12 वा. आणीबाणी घोषित झाली) आणीबाणीला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली. पुढे 10 महिने वध्र्याच्या जेलमध्ये राहावं लागलं. त्या वेळी मी खरं म्हणजे देव मानणारा होतो. पण पूजाअर्चा सुटली होती. मी, माझे सहकारी चंद्रकांत वानखडे, सुभाष इथापे तिघं जण या कारणांसाठी (आणीबाणीला विरोध) जेलमध्ये आलो होतो. आम्ही तिघेही देवपूजा करत नव्हतो. बाकी सारे वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक झालेले आणि जिल्ह्यातील सारे हिस्ट्रीशिटर गुन्हेगार, सुमारे 900 लोक, जेलमध्ये होते. ते सारेच्या सारे नियमितपणे देवाची पूजा करत असत. एवढंच नव्हे, तर दरोडा घालतानाही देवाला साकडं घालत असत आणि देव त्यांना याही कामात मदत करतो, अशी त्यांची श्रद्धा होती.
तेव्हा कळलं देव मानणारी माणसं प्रामाणिक नसतात. जी प्रामाणिक माणसं देव मानतात तीच देव मानणारी माणसं प्रामाणिक असतात.
पण माणसाला एकटय़ाला जगता येत नाही. मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शिक्षा ही एकांतवासाची शिक्षा आहे. दीर्घकाळ माणूस एकटा राहिला तर पागल होतो, नाहीतर आत्महत्या करून आयुष्य संपवतो.
आपल्याला जर आनंदानं जगायचं असेल तर इतर माणसांसोबत जगलंच पाहिजे. बरं इतरांना आपण दु:खी करत गेलो तर आपण आनंदी होतो का? नाही. उलट आपल्याला रुखरुख वाटते. अपराधीपणाची टोचणी लागते. त्यामुळं आनंदानं जगायचं असेल तर आपल्यासोबतच्या माणसांच्या जीवनातील आनंद वाढवण्याचा प्रयत्न करत गेलो तरच आपल्याला आनंदानं जगता येतं.
त्यामुळं या जीवनात जगत असताना 'आनंदी राहा आणि सोबतच्या माणसांना आनंदी करा' हा तुमच्या-माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा मंत्र ठरला पाहिजे, प्रार्थना ठरली पाहिजे. ही निसर्गाची गरज आहे, निसर्गाची शिकवण आहे. हेच खरं अध्यात्म आहे ना? धर्म आहे ना? माणुसकीपूर्ण माणूस बनणं आहे ना? मी आनंदी होण्यासाठी इतरांना आनंदी करत जाणं हाच खरा परोपकार आहे ना?
(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)
भ्रमणध्वनी- 9371014832
Saturday, 10 November 2012
विज्ञान धर्मच सत्यशोधनाचा उद्देश पूर्ण करतो
जे शिक्षणानं अपुरे आहेत त्यांचं चिडणं, खवळणं, रागावणं मी समजून घेऊ शकतो. समजून घेतो. अतिशय समजावण्याच्या सुरातच उत्तरं देतो. पण जे उच्चशिक्षित आहेत त्यांचं काय करायचं? असाच एक फोन नांदेडवरून आला. परिचय देताना 'मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे' असं त्यांनी सांगितलं आणि डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खोटा आहे. माकडापासून माणूस बनत नाही. आजची माकडं माणसं का बनत नाही? वगैरे बोलायला लागले. वरून डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मी अभ्यासला आहे, मला सारं माहीत आहे, असं म्हणून भांडायलाही लागले. मी त्यांना शेवटी म्हणाले,''ठीक आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला कोर्टात ओढा. देशभर तो शिकविण्यावर कोर्टाची बंदी आणा.'' एका मेकॅनिकल इंजिनिअरची एखाद्या वैज्ञानिक संशोधनाबद्दलची ही बालिश प्रतिक्रिया ऐकून मला कीव आली, त्या विद्यापीठाची, त्या कॉलेजची जिथून या माणसाला मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री मिळाली. एखाद्या विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्याला विज्ञानाबद्दल असं बोलण्याचा अधिकार आहे कां? असू शकतो कां? पोटासाठी विज्ञान शिकायचं? पोट भरण्यासाठी विज्ञान वापरायचं आणि वरून स्वत:च्या अंधश्रद्धा उरी कवटाळण्यासाठी त्याच विज्ञानाला लाथाडायचं? हे कसं चालेल? सगळय़ात पहिले, जे विज्ञान मुळात खोटं आहे, अशा खोटय़ा विज्ञानाची डिग्री परत करायला पाहिजे. त्या डिग्रीचा पोट भरण्यासाठी उपयोग करणार नाही असं ठरवलं पाहिजे. तेव्हाच अशांना विज्ञानाचा खोटं म्हणण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होऊ शकेल ना? नाहीतर, एखाद्या खर्या विज्ञान विद्यार्थ्याप्रमाणं डार्विनचा सिद्धांत खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी पुढं सरसावलं पाहिजे. त्यासाठी सबळ वैज्ञानिक पुरावे, वैज्ञानिक जगतापुढे सादर करून तो सिद्धांत खोटा आहे हे सिद्ध केलं पाहिजे. पुराणातले उतारे हे पुरावा ठरू शकत नाहीत. शेवटी विज्ञान, विज्ञान म्हणजे तरी काय आहे हो? जे या निसर्गात आहे त्याचा शोध घेणं, त्यामागच्या नियमांचं आकलन करून घेणं आणि हे निसर्गाचे नियमच वापरून शॉर्टकट पद्धतीनं काही गोष्टी निर्माण करणं म्हणजे विज्ञान. विज्ञान हे या निसर्गाच्या, सृष्टीच्या पलीकडे नसतं. विज्ञान स्वत: काहीही निर्माण करत नाही वा काहीही नष्ट करत नाही. फक्त निसर्गनियमांचा वापर करून एकाचं दुसर्यात रूपांतर करू शकतं. तेही निसर्गनियमांनुसारच. त्यामुळं विज्ञान आपल्या निसर्गापेक्षा वेगळं नाही, बाहेरचं नाही, परकं नाही, अगम्य नाही. निसर्गातील सत्य म्हणजे विज्ञान. हे आपण आजच्या काळात समजून घेतलं पाहिजे आणि सहजतेनं स्वीकारलंसुद्धा पाहिजे. खर्या धार्मिक माणसाला विज्ञान स्वीकारणं अतिशय सोपं जातं. कारण सगळय़ाच धर्मानी, त्याला एकही धर्म अपवाद नाही. धर्माचा खरा उद्देश सत्यशोधन करणं आहे. सत्याचा शोध घेणं आहे, असं मानलं आहे आणि विज्ञान तर या विश्वातील, निसर्गातील, प्राण्यांतील, माणसातील सत्याचा शोध घेतं. धर्माचा उद्देशच विज्ञान पूर्ण करत आहे. तरी ही खळखळ का? ज्यांनी आपला धर्म पुरोहितशाहीकडे गहाण टाकला आहे. त्यातील 'सत्य शोधणे' या मूळ उद्देशाला गुडबाय केला आहे. काही हजार वर्षापूर्वी जे कुणी लिहून ठेवलं वा सांगून ठेवलं ते म्हणजेच अंतिम सत्य आहे असं जे मानतात, तेच अशा पद्धतीनं खळखळ करतात. खरं म्हणजे ही माणसं मुळात धर्मभ्रष्ट झालेली माणसं असतात आणि अशांमुळचे आपल्या समाजाचं प्रचंड नुकसान होतं. या देशात तब्बल (किमान) दोन हजार वर्षे स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुले रोज शाळेत जाताना, पुण्याच्या धर्ममार्तडांकडून शेणाचा मार, कचरा अंगावर घेत, कुलटा स्त्री, वेश्या असे घाणेरडे शब्द ऐकत, तरी जिद्दीनं शाळेत जात, मुलींना शिकवत आणि पाहता पाहता समाज बदलला. आज आपली आई शिकली, बायको शिकली, मुली शिकताहेत. या देशात पराकोटीची अस्पृश्यता होती. केवळ दीडशे-दोनशे वर्षापूर्वी पेशवाईत अतिशूद्रांना चप्पल न घालता चालावं लागायचं. रस्त्यावर त्यांची अपवित्र पाऊलं उमटू नयेत म्हणून त्यांच्या कमरेला काटक्या लावून चालावं लागत असे. त्यांनी रस्त्यांवर थुंकून रस्ता विटाळू नये म्हणून केवळ थुंकण्यावर बंदी नव्हती तर थुंका अथवा न थुंका; पण गळ्यामध्ये थुंकण्यासाठी 'गाडगं'ं बांधल्याशिवाय त्यांना रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती. या देशातल्या बहुसंख्येने असलेल्या शूद्रातिशूद्रांना ढोरांपेक्षाही निकृष्ट दर्जाचं जीवन जगावं लागत होतं. पण यात आपण परिवर्तन केलं. एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीची, भारताची घटना निर्माण करणार्या समितीचं अध्यक्ष बनवलं. अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा ठरवलं. स्त्रियांना समान कायदेशीर अधिकार दिले. आज अस्पृश्य समजल्या जाणार्या जातीतील हजारो लाखो माणसं अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, प्राध्यापक आहेत, आयएएस, आयपीएस, आयएफएस ऑफिसर आहेत आणि याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं नांदेडच्या एका इंजिनिअरला माझ्याशी भांडभांड भांडण्याचा, स्वत:चं अत्यंत अवैज्ञानिक मत मांडण्याचा, 'लोकशाही विचार स्वातंर्त्याचा' अधिकार दिला आहे, हे विसरून कसं चालेल? देवानं मुद्दाम, मेहनतीनं माणसाला निर्माण केलं, ही आपली आवडती कल्पना. त्यामुळं माणूस म्हणून आपल्याला खूप महत्त्व मिळतं, आपणच आपल्याला देतो. इतकी वर्षे ही आवडती जागा आपण पटकावून बसलो होतो आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतामुळं या आवडत्या जागेवरून आपली हकालपट्टी होते असे म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं, तरी सत्य स्वीकारणं आपण शिकलं पाहिजे. आजच्या माकडाचा माणूस का बरं होत नाही? हा प्रश्नच हास्यास्पद आहे. ज्याला डार्विनचा उत्क्रांतिवाद कळला नाही तोच असा प्रश्न विचारू शकतो. एकतर आपण वानरापासून निर्माण झालो नाही. आपले आणि वानराचे पूर्वज सारखेच होते, एवढंच काय ते सत्य आहे आणि ही प्रक्रिया लाखो-कोटय़वधी वर्षामध्ये घडून आली आहे. माणसाचं अख्खं आयुष्यच केवळ दहा लाख वर्षाचं आहे. त्यातही आपलं ज्ञान, आयुष्य केवळ काही हजार वर्षाचं आहे. प्राणिजगताच्या उत्क्रांतीत हा कालावधी नगण्य आहे. दुसरं, नवी जात, निसर्गातील अपघातामुळं, म्युटेशनमुळं निर्माण होते. उदा. आपण ऐकतो एका बाळाला दोन डोकी होती. दुसर्या एका बाळाला चार डोळे होते. चार हात होते. या पद्धतीने काही अपघात घडत असतात. जे निसर्गासाठी प्रतिकूल ठरतात ते प्राणी मरतात. जे निसर्गात जगण्यासाठी अनुकूल अपघात ठरतात ते प्राणी जगतात. त्यातून नव्या प्राणी जाती निर्माण होतात. शिवाय पिढय़ान्पिढय़ा निसर्गाप्रमाणं स्वत:त अनुकूल बदल करण्यासाठी धडपडणार्या प्राणी-जातीत आनुवंशिक बदल घडून येतात. त्यातून उपजाती निर्माण होतात. उदाहरणार्थ माळरानावर वावरणारं अस्वल, वाघ हिमालयातील बर्फात दीर्घकाळ जगण्याचा प्रयत्न करू लागले की त्यातून केसाळ पांढरे 'पोलार्ड बिअ' आणि हिमवाघ तयार होतात. पण हेही बदल हजारो-लाखो वर्षामध्ये होतात. डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत स्वीकारण्यास खळखळ करणारे केवळ भारतातच आहेत असं नाही. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशातसुद्धा आहे. दोन शतकांपूर्वी युरोप अमेरिकेसारख्या देशांमध्ये शाळा-कॉलेजेस मोठय़ा प्रमाणावर चर्चेसद्वारा चालवली जात. पंधराव्या-सोळाव्या शतकात ब्रुनोनं मत मांडलं, ''पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते.'' झालं. चर्चचा फतवा निघाला. युरोपमध्ये ब्रुनोला जिवंत जाळण्यात आलं. पुढे कोपर्निकसने हेच मत मांडलं. त्याचा छळ झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. कारण बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटच्या, जेनेसिसच्या, उत्पत्ती मांडणीला छेद देणारं हे मत होतं. बायबलला खोटं ठरविणारं कोणतंही मत तेथील पुरोहितशाही स्वीकारणंच शक्य नव्हतं. पुढे गॅलिलिओनं दुर्बीण शोधली. खूप मोठा गणितज्ञ म्हणून युरोपमधल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यानं प्रचंड नावलौकिक मिळविला. सर्वदूर त्यांच्या विद्वत्तेचा दबदबा निर्माण झाला. त्यानं ग्रंथ लिहिला, त्यातही पृथ्वीविषयी हेच मत मांडलं. पण एवढय़ा विद्वान, प्रतिष्ठित वैज्ञानिकाला हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही. ब्रुनो कोपर्निकसचं उदाहरण समोर होतं. अनेक वर्षानी त्याचा शाळकरी मित्र व्हॅटिकन सिटीचा पोप बनला. धर्मपीठाच्या उच्चासनावर आपलाच मित्र बसला आहे, या भाबडय़ा समजुतीतून त्यानं आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. पण पुरोहित कुणाचाच मित्र नसतो. जुना शाळकरी मित्र आता पोप होता. गॅलिलिओवर पोपनं चौकशी समिती बसवली. जीव वाचविण्यासाठी गॅलिलिओला लिहून द्यावं लागलं, ''पृथ्वी सपाट आहे, ती सूर्याभोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो.'' तरी गॅलिलिओला नजरकैदेत ठेवलं. एवढय़ा विद्वान माणसाला हा अपमानास्पद आघात सहन झाला नाही. तो पोपच्या नजरकैदेतच हे जग सोडून गेला. सोळाव्या शतकातील ही गोष्ट आहे. पण अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील डार्विनच्या वाटय़ाला मात्र हा छळ आला नाही. त्याचं संशोधन तर फारच क्रांतिकारक होतं? तरी का? कारण मधल्या 200-250 वर्षात विज्ञानानं सगळ्याच क्षेत्रात प्रचंड क्रांती केली होती. रोजच्या जगण्यात बदल निर्माण झाले होते. घोडागाडय़ांच्या ऐवजी बस, कार, ट्रेन, ट्राम रस्त्यावर धाऊ लागल्या होत्या. वेगवेगळ्या वस्तूंचं कारखान्यात उत्पादन होऊ लागलं होतं. वीज घराघरांत पोहोचू लागली होती आणि प्रत्येकच विज्ञानातील संशोधन बायबलप्रणीत समजुतींना हादरा देत होतं. पण सर्वसामान्य माणसांचं जीवन समृद्ध करणारं विज्ञान नाकारणं शक्य नव्हतं. मग धर्मसंस्थेनं, चर्चनं आपले हात आवरते घेतले. विज्ञान क्षेत्रात हस्तक्षेप करणं बंद केलं. त्यानंतर डार्विन आला. म्हणून तो वाचला. आणखी दोनशे वर्षे (सोळाव्या शतकात) आधी तो सिद्धांत मांडला असता तर त्याला सुळीच दिलं असतं. सिद्धांताचा मात्र छळ झालाच. अमेरिकेतील एका चर्चच्या शाळेत मुलांना डार्विनचा सिद्धांत शिकवत नसत. उलट तो खोटा आहे असं सांगितलं जाई. एका मुलाचे पालक कोर्टात गेले. कोर्टात चर्चविरुद्ध पालक लढाई सुरू झाली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टानं निर्णय दिला, ''चर्चच्या आधिपत्याखाली शाळा असली, तरी त्या शाळेला डार्विनचा सिद्धांत, वैज्ञानिक सिद्धांत म्हणून शिकवलाच पाहिजे. वाटल्यास बायबलचं धर्मशिक्षण देणार्या तासाला बायबलमधली जेनेसिसची कल्पना त्यांना सांगावी.'' ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये घडलेली गोष्ट आहे. तरी आपण डार्विनचा सिद्धांत नाकारणार? कशाच्या आधारावर? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Friday, 9 November 2012
सृष्टीनिर्मितीबाबत डार्विनचा सिद्धांत जगन्मान्य
ºिश्चन धर्माच्या 'ओल्ड टेस्टामेंट'मध्ये ही 'जेनेसिस'ची म्हणजे सृष्टी उत्पत्तीची कल्पना मांडली आहे. एकूण सात दिवसात ईश्वरानं सृष्टी निर्माण केली. पहिल्या दिवशी ईश्वर म्हणाला, 'लेट देअर बी लाईट', 'तिथे प्रकाश असू दे' आणि पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण झाला. दुसर्या दिवशी ईश्वर म्हणाला, 'लेट देअर बी वॉटर', 'तिथे पाणी असू दे' आणि दुसर्या दिवशी पाणी निर्माण झालं. पाचव्या दिवशी म्हणाला, 'आदम असू दे' आणि पहिला माणूस निर्माण झाला. तो एकटाच पृथ्वीवर, सृष्टीमध्ये वावरू लागला. ईश्वराला आदमची दया आली. बिचारा एकटाच हिंडतोय म्हणून सहाव्या दिवशी ईश्वरानं आदमच्या हाडापासून 'ईव्ह'ची निर्मिती केली. ही पहिली मानवी स्त्री. सौंदर्यवती स्त्री. पण ईश्वरानं तिला धोक्याचा इशारा दिला. ''बाई, या ईडन गार्डनमध्ये पाहिजे तेवढं भटक. मौज कर. खा, पी पण ज्ञानाचं फळ मात्र चाखू नकोस.'' या सगळ्या सृष्टी निर्माणप्रक्रियेत ईश्वर खूप थकला. म्हणून सातव्या दिवशी म्हणजे संडेला, रविवारी त्यानं विश्रंती घेतली म्हणून रविवार हा अजूनही सुट्टीचा दिवस मानतो आपण. पण एक अघटित घडलं. सौंदर्यवान ईव्ह अतिशय पवित्र होती. निर्मळ होती. आदम आणि ईव्ह दोघंही गुण्यागोविंदानं जगत होते. भाऊबहिणीप्रमाणं नांदत होते. पण ईव्हच्या डोक्यात एक विचार सारखा यायचा. का बरं ईश्वरानं, हे सुंदर दिसणारं, ज्ञानाचं फळ चाखण्यास मनाई केली? काय असावं त्यात? कसं असेल ते चवीला? एक दिवस तिला राहावलं नाही. खूप हिंमत करून तिनं ते 'ज्ञानाचं फळ' चाखलंच. ते चाखताच तिला ज्ञान झालं. आपण स्त्री आहोत. तिच्या मनात कामवासना निर्माण झाली. तिनं बरोबर आदमला फशी पाडलं. त्यामुळं ती गर्भवती राहिली. मूल जन्माला आलं. अशा प्रकारे मानवजात निर्माण झाली. जर ईव्हने चुकून ते ज्ञानाचं फळ चाखलं नसतं तर तिच्या मनात पाप, कामवासना निर्माण झाली नसती आणि तुमचा-माझा जन्म झाला नसता आणि हे जीवन जगण्याची तुम्हाला-मला गरज पडली नसती. ज्यातून माणसाचं जीवन निर्माण होतं, त्या प्रक्रियेला पाप ठरवलं. कामवासना म्हणजे पाप. ज्ञानाचं फळ चाखणं म्हणजे पापाला निमंत्रण देणं. 'ओल्ड टेस्टामेंट' हा धर्मग्रंथ केवळ ºिश्चनांनाच प्रिय, श्रद्धेय नाही. तर यहुदी (ज्यु) व मुस्लिम धर्मीयांनाही तेवढाच श्रद्धेय आहे. या तिन्ही धर्माचे धर्म संस्थापक ईश्वर मानले जात नाहीत. ते देवदूत, प्रेषित होते असं मानलं जातं. त्यामुळं येशू ºिस्त आणि महम्मद पैगंबर हे दोघेही ईश्वराचे प्रेषित आहेत आणि या तिन्ही धर्माचा मूळ ग्रंथ 'ओल्ड टेस्टामेंट' आहे हे तिन्ही धर्म सृष्टीनिर्मितीची समान कल्पना मानतात. आदम आणि ईव्हची, आदम आणि हौवा होते एवढाच काय तो फरक. भारतीय धर्मामध्ये जेनेसिस, सृष्टीनिर्मितीची कल्पना खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. बायबल, कुराण यांसारखा 'एखादाच' प्रमाण ग्रंथ नाही. त्यामुळं नेमकी एकच सृष्टीनिर्मितीची कल्पना सांगणं कठीण आहे. तरी सगळ्यात लोकप्रिय असणारी एक कल्पना आपण समजून घेऊ. मनुस्मृती आणि सरस्वती पुराण यामध्ये ही कल्पना मांडली आहे. ईश्वर, ब्रह्म स्वयं निर्माण झाले. ते अप्सरांचा नाच पाहू लागले. नाच पाहता पाहता उत्तेजित झाले. त्यामुळं त्यांचं वीर्यस्खलन झालं. ते द्रोणात गोळा केलं. या द्रोणातून अगस्ती ऋषींचा जन्म झाला. हा पहिला माणूस, आदम. एकदा अगस्ती ऋषी असाच अप्सरांचा नाच पाहत होते. त्यांचंही स्खलन झालं. ते द्रोणात गोळा केलं. त्यातून सरस्वतीचा जन्म झाला. सरस्वती खूप लावण्यवती होती. तिचं, पहिल्या मानवी स्त्रीचं, लावण्य पाहून ब्रह्मदेव भाळले. ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या मिलनातून माणूस जन्माला आला आणि पुढे या पद्धतीनं मानव जात निर्माण झाली. किमान या सृष्टीनिर्मिती कल्पनेत 'पाप', 'वासना' असे नकारात्मक शिक्के नैसर्गिक प्रक्रियेला (स्त्री-पुरुष संबंधाला) मारले नाहीत. ही किती चांगली गोष्ट आहे. आज माहीत असलेले मोठे धर्म साधारणत: अडीच ते दीड हजार वर्षापूर्वी निर्माण झाले आहेत. त्या काळात उपलब्ध असणार्या ज्ञानाच्या आधारावर 'सृष्टी उत्पन्नाची' कल्पना प्रत्येक धर्मग्रंथ लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे या सार्या कल्पना त्या त्या ग्रंथकत्र्यांच्या उत्तम प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. त्याचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. पण खरं काय आहे? डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. आपण याविषयी ऐकलं असेलच. हे जगन्मान्य झालेलं संशोधन आहे. याचा अर्थ वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेलं संशोधन आहे. सृष्टीनिर्मितीच्या या मांडणीत एखाद्या दुसर्या गोष्टींचे तपशील, कालावधी थोडासा बदलू शकतो. नव्या पुराव्यांनुसार तो अधिक अचूक ठरू शकतो; पण मूळ उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मात्र बदलू शकत नाही, बदलणार नाही, बदलणं शक्य नाही. हे जगातील सर्वात जास्त क्रांतिकारी संशोधन होतं. या संशोधनामुळं कदाचित मानवीजीवन समृद्ध होण्यात सरळ हातभार लागला नसेल. पण मानवी जीवनातील विचारांना मात्र क्रांतिकारक बदल करण्यास भाग पाडणारं हे संशोधन आहे. साधारणत: साडेचारशे कोटी वर्षापूर्वी सूर्याच्या गोळ्यापासून पृथ्वी वेगळी झाली. पुढे ती सूर्याभोवती फिरत फिरत थंड होत गेली. वायुरूप गोळा थंड होताना, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर अनुकूल असल्यामुळं पाणी-सागर निर्माण झालेत. भूकंपामुळं आतील खनिज वर येऊन पाण्याहून जास्त उंचावर स्थिरावून, पहाड- जमीन निर्माण झाली. साधारणत: अडीचशे कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरील वातावरणात असे अनुकूल बदल झालेत की, त्यातून एक पेशीम आमिबासारखे प्राणी निर्माण झालेत. त्यातून आधी जलचर निर्माण झालेत. नंतर स्थलचर (जमिनीवर वावरणारे) प्राणी निर्माण झालेत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेनुसार व लामार्कच्या 'विकासवादी' सिद्धांतानुसार प्राण्यांचा विकास होत गेला. ते बदलत गेले. म्युटेशनमुळं, निसर्गातील अपघातांमुळं नवनव्या प्राण्यांच्या जाती निर्माण होत गेल्या. त्यातील ज्या टिकण्यासारख्या होत्या त्या जाती जिवंत राहिल्यात. ज्या निसर्गाच्या कालचक्रात वा अपघातात टिकू शकल्या नाहीत त्या नामशेष झाल्यात. डायनासोर्स, मास्तोडॉन (महाकाय हत्तींची जात) असे कितीतरी प्राणी नष्ट झालेत. यातूनच वानर, माकड अशा दोन पायांवर चालू शकणार्या प्राणिजाती निर्माण झाल्यात. त्यातून साधारणत: 10 लाख वर्षापूर्वी जमिनीवर सरळ चालू शकणारी मानवी जात निर्माण झाली. 10 लाख वर्षापूर्वी ही मानवी जातही इतर प्राण्यांसारखीच होती. त्याच्याजवळ कपडे नव्हते, घर नव्हतं, अन्न शिजवण्याची अक्कल नव्हती. केस कापण्यासाठी कैची नव्हती. स्वत:चं संरक्षण करण्यासाठी, लढण्यासाठी दोन हात, पळण्यासाठी दोन पाय वगळता कोणतंही शस्त्र नव्हतं. फक्त त्याला अतिशय उत्क्रांत असा प्राणी जगतातील सगळ्यात विकसित असा मेंदू लाभला होता. या मेंदूत विचार करण्याची शक्ती होती; पण माणूस शारीरिकदृष्टय़ा मात्र दुबळा होता. त्याच्याजवळ हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं. सिंहासारखे ताकदवान पंजे नव्हते. त्यामुळं दुबळा असणारा हा माणूस प्राणी जिवंत राहण्यासाठी झुंडीत राहू लागला. ती त्याच्या जगण्याची अपरिहार्यता होती. यातूनच तो समाजशील प्राणी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागला. झुंडीत, समूहात राहणार्या प्राण्यांना संवादाची गरज असते. रानटी अवस्थेत खाणाखुणांच्या भाषेनं संवाद साधणारा हा माणूस हळूहळू आवाज करण्याच्या क्षमतेतून भाषा निर्माण करू लागला. भाषानिर्मितीमुळं त्याला अधिक चांगला संवाद साधता आला. त्यामुळं समूहाची परस्परांसोबत देवाणघेवाण वाढली. त्यातून जीवन सुरक्षितता व समृद्धी वाढली. एका छोटय़ा चार-पाच लोकांच्या टोळक्याला लागलेला शोध सगळ्या टोळीचा ठरू लागला. त्या डोंगरापलीकडे खूप फळं आहेत. इकडच्या डोंगरापलीकडे खूप हिंस्र जनावरं आहेत. सगळ्यांना माहिती कळू लागली. त्यामुळं सुरक्षितताही वाढली. माणसाच्या मेंदूत विचार करण्याची क्षमता होती, म्हणून त्यानं आवाज-भाषा निर्माण केली. जसजशी भाषा विकसित होत गेली तसतशी त्याची विचार करण्याची क्षमता वाढत गेली. त्यामुळं आणखीच भाषा विकसित झाली. म्हणूनच आज कोणत्याही संस्कृतीचा विकास तिच्या भाषा समृद्धीवरून ओळखला जातो. आपल्या चिमुकल्या मेंदूचा वापर करून थंडीपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पानांपासून, प्राण्यांच्या कातडीपासून त्यानं वस्त्रं निर्माण केली. काडय़ांना अणकुचीदार दगडं बांधून भाले निर्माण केले आणि हातांची क्षमता वाढवणारी शस्त्र निर्माण केलीत. निसर्गानं निर्माण केलेल्या डोंगरातील गुहांमध्ये घरं निर्माण केलीत. निसर्गात निर्माण केलेल्या डोंगरातील गुहांमध्ये घरं निर्माण केली. निसर्गात अपघातानं लागलेल्या आगीला जपून ठेवलं. त्याचा उपयोग इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी शस्त्रासारखा केला. अन्न, मांस शिजवून ते दीर्घकाळ टिकविण्याची क्षमता प्राप्त केली. धान्याचा शोध लागल्यावर डोंगरावरून खाली पठारावर उतरून शेती करू लागला. या निसर्गातून लोखंड शोधलं. त्यातून तलवारी, भाले निर्माण केले. त्याचप्रमाणं नांगर निर्माण केले. निसर्गात सापडलेल्या कापसातून वस्त्रं निर्माण केली. समृद्ध भाषा निर्माण केली. समाज निर्माण केला. अर्थव्यवस्था निर्माण केली. संस्कृती निर्माण केली. विवाहसंस्था निर्माण केली. गाव, शहरं निर्माण केलीत. धर्म निर्माण केलेत. या चिमुकल्या मेंदूच्या भरवशावरच हा सारा प्रगतीचा आलेख माणसानं निर्माण केला आहे. प्रेम, त्याग, बंधुता, स्वातंर्त्य, समता, सत्याचा आग्रह, दया ही चांगली मूल्येही निर्माण केलीत आणि राग, असूया, द्वेष, बदला यातून युद्ध, भांडणं, मारामारीही निर्माण केली. आज मानवजातीत जे काही चांगलं आहे तेही मानवानंच निर्माण केलं आहे. आज जे काही वाईट शिल्लक आहे तेही आपणच निर्माण केलं आहे. आजही आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपण खास देवाची निर्मिती आहोत, देवाचे लाडके पुत्र आहोत. खरंच? तसं असतं तर देवानं आपल्याला जन्माला घालतानाच म्हटलं असतं, ''अरे लाडक्या मानवा, तू जंगलात जातो आहेस. खूप हिंस्र श्वापदं आहेत. जरा सोबत डबल बॅरलची बंदूक घेऊन जा. खूप थंडी आहे, जरा जाड लोकरीचे कपडे घेऊन जा.'' आणि जन्मत:च आपल्याजवळ बंदूक असती, लोकरीचे कपडे असते; पण आपण तर उघडेबोडकेच जन्माला येतो. मग? तरी? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 937101483 |
Monday, 29 October 2012
मुख्यमंर्त्यांचा गणपती दूध प्यायला, त्याची गोष्ट !
मी मुंबईत. रात्रभर कुणाचा न् कुणाचा फोन येत होता. सर्वदूर मृत्यूचं, भूकंपाचं भय पसरलं. धर्म-जात-पंथ ओलांडून पसरलं. इकडे सप्तशृंगीच्या गडावरच्या देवीच्या डोळय़ांतूनही अश्रू यायला लागले. प्रचंड गर्दी उसळली. विदर्भात पोहरा देवी अतिशय प्रसिद्ध. भारतभरातील बंजारा समाज तिच्या दर्शनासाठी येतो. पण थोडय़ाच अंतरावरच्या 'श्याम की माता' कडे मात्र लोकांचं फारसं लक्ष नाही. यानिमित्तानं 'श्याम की माता' दर्शनासाठी दिवसभरात 25 हजारांपेक्षा जास्त लोक येऊन गेलेत. 'श्याम की माता' प्रसिद्ध झाली. अशा अफवा का पसरतात? आसामात मुस्लिमांचं शिरकाण होतं. अफवा पसरवली जाते. मुंबईमध्ये तास-दीड तास नंगानाच चालतो. पोलिसांना नेम धरून मारलं जातं आणि काही दिवसांत इकडे देवीच्या डोळय़ातून वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच वेळी अश्रू येतात. कधी कधी चर्चमधील मेरी मातेच्या डोळय़ातून अश्रू येतात आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट वापरणारा माणूसही या चमत्कारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडतो. अफवा पसरविण्याच्या प्रक्रियेचा सक्रिय भाग बनतो. भारतीय वातावरणात वाढलेल्या कोणत्याही धर्माचा माणूस असो, त्याला दैवी चमत्काराचं प्रचंड आकर्षण वाटतं. लहानपणापासून संस्कारातूनच हे बाळकडू त्याच्या मनात ठसलं असतं. हे चमत्कार प्रत्यक्षात घडत नाहीत. म्हणून ते घडावेत असं त्याला मनोमन वाटत असतं. त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ती गरज असते. म्हणून कोणत्याही प्रकारचा चमत्कार ऐकला रे ऐकला की त्याची मुळीच शहानिशा न करता 'आपणच तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला' अशा थाटात तो सांगत सुटतो. मोबाईल, एसएमएस ही आधुनिक साधनं त्याच्या सांगण्याचा वेग वायुवेगापेक्षाही अधिक वाढवतात. निव्वळ चमत्कारापेक्षाही भयासोबत जुळलेला चमत्कार अधिक वेगानं पसरतो. तसं भारतीय समाजमन भित्रं आहे. संस्कारानं ते तसं बनलं आहे. एखादा राजा शिवाजी, महात्मा गांधी हे भय दूर करून काही काळ समाजमन निर्भय बनवून टाकतात. एरवी ते भय-प्रोन असतं. जेव्हा जेव्हा काहीतरी अरिष्ट येईल, आपण मरू या पद्धतीची भीती या चमत्कारासोबत जुळली असेल तेव्हा अफवा पसरवणारं हे मन जास्तच सक्रिय बनतं. 'भीती' ही भावना माणसाच्या मनाचा तत्काळ ताबा घेते. या भीतीच्या आहारी गेलेल्या माणसाला त्या अवस्थेत जे सांगितले जातं, जे तो ऐकतो वा त्याच्या मनात येतं ते एखाद्या प्रभावी सजेशनसारखं काम करतं. त्याला ते खरंच वाटायला लागतं आणि मग इतरांनी या आपत्तीला बळी पडू नये म्हणून तो सक्रियपणे ही भीती इतरांपर्यंत तत्परतेनं पोहोचवतो. 'रात्रभर झोपू नका, लहान मुलांनाही झोपू देऊ नका. शेजार्यांनाही झोपू देऊ नका. जो झोपेल तो उठणारच नाही,' हे सांगण्यामध्ये आपण इतरांचे जीव वाचवतो आहोत अशी त्याची प्रामाणिक भावना असते. अफवा पसरवणे, इतरांना घाबरवणे हा त्याचा उद्देशही नसतो आणि आपण असं काही करतो आहे याची त्याला कल्पनाही नसते. ज्या क्षणी भीती मनाचा ताबा घेते, त्या क्षणी 'लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट' घडून येतो आणि वातावरणातील अफवा त्याच्यासाठी 'सत्य घटना' बनते. तो सामान्य माणूस या काळात 'हायली सजेस्टिबल' असतो. जर कुणी नकारात्मक सजेशन्स पेरलं, 'ते तुमचा जीव घेणार आहेत, त्यांनी तुमचा, तुमच्या मुलाबाळांचा जीव घेण्याआधीच त्यांना संपवा' तर हा सामान्य माणूस त्या विशिष्ट लोकांचा जीव घ्यायला, त्याचं घर जाळायला, खून करायला पुढे सरसावतो. याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो. पण ही फिअर सायकॉलॉजी असते. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एरवी मुंगीही न मारणारा हा माणूस इतरांचे जीव घेऊन मोकळा होतो. ज्यांना हे मानसशास्त्र कळतं ते त्याचा उपयोग करून घेतात. दंगली घडवून आणतात. माणसांमधली माणुसकी उद्ध्वस्त करून टाकतात. शेजारी शेजार्याचा खून करतो. शेजारी शेजारील बाईवर बलात्कार करतो. माणसाचा जनावर बनतो. माणुसकीचा खून पाडतो म्हणून या अफवांकडं निरुपद्रवी अफवा म्हणून पाहू नये. त्यांना वेळीच सक्रियपणे अटकाव केलाच पाहिजे. 'श्याम की माता' प्रकरणातील अफवा आम्हाला आमच्या कार्यकत्र्यांना झपाटय़ानं आटोक्यात आणता आली. कारण त्या परिसरात आमचं सक्रिय काम आहे. पण सामान्य, भयग्रस्त माणूस अहेतूक अफवा पसरवीत असला तरी सुरुवातीस विशिष्ट हेतूनं अफवा पसरवणारा, एक स्वार्थी हेतू राखणारा हितसंबंधी वर्ग असतोच. हा जाणीवपूर्वक, फायद्यासाठी अफवा पसरवीत असतो. त्यामुळे दरवेळी पोलीस खात्यानं काळजीपूर्वक सखोल चौकशी करून अशी अफवा पसरवणार्यांना शोधून काढून गजाआड केलंच पाहिजे. तरच अशा अफवा पसरवणार्यांना खर्या अर्थाने अटकाव बसेल, जरब बसेल. पण या ठिकाणी आपलं पोलीस खातं फारच टची असतं. असल्या धार्मिक ठिकाणी ते बिलकूल पोलिसी डोकं वापरायला तयार नसतात. उलट अफवेपोटी उसळलेल्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी मात्र त्यांना खूप मेहनत, वेळ खर्ची घालावा लागतो. कळत नकळत बदमाशांना साथ द्यावी लागते. काही वेळेस मुद्दाम चमत्कार घडवून आणले जातात. मुंबईतील गोष्ट. एका जैन मंदिरात मूर्तीवरचं चांदीचं छत आरतीच्या वेळी हलू लागलं. प्रचंड गर्दी, प्रचंड पैसा, देणग्या ओघ सुरू झाला. संबंधित पोलीस स्टेशनची मदत मागितली. त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेतली. मी, काही पत्रकार (त्यात म.टा.चे पत्रकार सुरेश वैद्यही होते) हा चमत्कार तपासण्यास गेलो. अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा चमत्कार निर्माण केला होता. मी जयंत नारळीकरांच्या माध्यमातून त्यांनी सुचवलेल्या श्री. शर्मा नावाच्या 'अप्लाईड फिजिक्स'च्या एका शास्त्रज्ञाकडे गेलो. त्यांच्या मदतीनं आम्हाला चमत्कार कळला. आता फक्त एक छुपा जनरेटर पकडण्याची गरज होती. ते आम्हाला शक्य नव्हतं. पोलीस मदत करणार नाही हे कळत होतं. शेवटी संबंधितांना कसा चमत्कार घडवला ते जाहीर करण्याची धमकी द्यावी लागली. चमत्कार तत्काळ थांबला. पुन्हा हा चमत्कार घडवला तर रंगेहाथ पकडू अशी जाहीर धमकी दिली. गेल्या 20 वर्षांत पुन्हा असा चमत्कार घडला नाही. पण चमत्कार घडवणारे मात्र मोकळे सुटले. पण त्या मंदिराचं रिनोवेशन दिमाखात पार पडलं. यात ट्रस्टी, साधू सारेच गुंतले होते. पोलिसांनी मनात आणलं तर अशा अफवांना तत्काळ पायबंद घालण्याचं काम पोलीस खातं किती अप्रतिमरीत्या करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते फारसं कुणाला माहीत नाही. म्हणून मुद्दाम सांगतो. गणपती दूध प्यायला लागले. तो दिवस आठवत असेल. रात्रभर प्रवास करून नागपूरहून मुंबईला नॉनस्टॉप पहाटे कारने पोहोचलो. झोपलो. सकाळी 6 वाजता फोन खणखणला. दिल्लीच्या टीव्हीच्या प्रतिनिधीचा फोन. 'तुम्हाला 7 च्या विमानानं दिल्लीत यायचं आहे. दिल्लीत रात्रभर ठिकठिकाणच्या मंदिरातील देवांच्या मूर्ती दूध पीत आहेत ते तपासायचं आहे.' कसंबसं, थोडय़ा वेळात संपर्क साधतो असं सांगून झोपलो. खूप थकलो होतो. पण थोडय़ा वेळानंतर सारखा फोन खणखणू लागला. झोपूच देईना म्हणून उचलला. एकदम करडा आवाज, 'एवढा वेळ फोन वाजतो. तासभर झाला. उचलत का नाही? बोला.. कमिश्नर साहेबांना बोलायचे आहे.' मुंबईचे अँडिशनल कमिश्नर पी.के.बी. चक्रवर्ती बोलू लागले, 'काय मानव साहेब तुम्ही झोपता आहात.' मुंबईत सगळय़ा मंदिरात रांगा लागल्या आहेत. आम्हाला भीती वाटते.. कुणी तरी मुद्दाम अफवा पसरवतो आहे. मंदिरात गर्दी गोळा करायची आणि बॉम्बस्फोट घडवायचे असं प्लॅनिंग असावं म्हणून रेड अँलर्ट घोषित केला आहे. गणपती दूध पितो हे प्रकरण तपासायचं आहे. माझ्या अधिकार्याकडे देतो त्यांना मदत करा.' प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. खडबडून जागा झालो. फोनवरच आमचं काम सुरू झालं. मी विचारलं मूर्ती बदलवल्या का?' ' नाही. जुन्याच मूर्ती आहेत. बहुदा सार्या संगमरमरी.' पोलीस अधिकार्याने माहिती दिली. माझं काम सोपं झालं. मी सूचना दिली, 'पुजार्याच्या हातून मूर्ती पुसून घ्या. निर्माल्य वगैरे काढून टाका. देव्हारा कोरडा करा. मूर्तीजवळ लेडीज कॉन्स्टेबल उभ्या करा. रांगेतील लोकांना दूध पाजताना चमचा वाकडा करू देऊ नका. थोडा वेळ तरी लोक वाकडा करतील. त्याशिवाय दूध ओघळणार नाही. 25-50 लोकांनी दूध पाजलं की खाली गाभार्यातील दूध स्पंजने गोळा करा. बादलीमध्ये सगळय़ा भक्तांसमोर स्पंज पिळा. बादलीत दूध गोळा होईल.' खरं म्हणजे माझं म्हणणं त्या पोलीस अधिकार्याला पटलं नाही. त्याच्या बायकोच्या हातानेही गणपती दूध प्यायला होता. प्रत्यक्ष डोळय़ानं पाहिलं होतं. त्यानं तसं बोलूनही दाखवलं. पण साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी माझी सूचना अमलात आणायची ठरवली. नाईलाजास्तव. तासभरातच या अधिकार्यानं खूप उत्साही आवाजात फोन केला, ''मानव साहेब, दहा-एक मंदिरात प्रयोग केला. बादलीत दूध गोळा होतंय. खरंच गणपती दूध पीत नाही.'' असे बोर्ड लावता येईल का याची आम्ही चर्चा केली. 12 नंतर अनेक ठिकाणी बोर्ड लागले. मंदिरामंदिरात पोलीस स्पंजने दूध गोळा करत होते. किमान 15-20 लाख लोकांना मंदिरात ओढून आणणार्या अफवेला पोलिसांनी अथक परिश्रमाने, सक्रियतेने अवघ्या 8-10 तासात थिजवलं होतं. थांबवलं होतं. संध्याकाळच्या बातम्यात प्रसिद्ध झालं- ''मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरचा गणपती दूध प्यायला.'' पोलिसांचा पुन्हा फोन, ''मानव साहेब, गणपती दूध पीत नाही, असं तुमच्या संघटनेच्या वतीने स्टेटमेंट काढा.'' ''मी म्हणालो, 'हा चमत्कार पोलिसांनी थांबवला आहे. पोलीस कमिश्नरने वा गृहमंर्त्याने स्टेटमेंट काढलं पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करा. नाहीतर मी गृहमंर्त्यांशी बोलतो. पोलिसांना स्टेटमेंट काढणं योग्य वाटत नव्हतं. कारण मुख्यमंत्री स्वत: या चमत्काराचं समर्थन करत होते. तसं वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या टीव्हीवरून केलं होतं. पण हे स्टेटमेंट काऊंटर करणं आवश्यक होतं. उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथजी मुंडे हे गृहमंत्री असल्यामुळे मुंबईत रेड अँलर्ट घोषित झाल्यामुळं सार्या प्रकारावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची नीट कल्पना असायला हवी होती. पण मित्रपक्षाच्या मुख्यमंर्त्यांचं स्टेटमेंट काऊंटर करण्याची रिस्क उपमुख्यमंत्री घेतील का? अशी शंका पोलीस अधिकार्यांना आणि मलाही वाटत होती. त्यांच्याशी त्यावेळी माझी वैयक्तिक ओळख नव्हती. जयप्रकाश आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेले प्रमोद महाजन यांची मदत मिळू शकली असती. पण.. त्याची गरज पडली नाही. काही तासातच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांचं स्टेटमेंट टीव्हीवरून प्रसारित झालं. 'पोलिसांनी ठिकठिकाणी मंदिरात दूध गोळा केलं. दूध गाभार्यात जमा होत होतं, गणपती दूध पीत नाही.' आम्हा सार्यांचा जीव भांडय़ात पडला. पोलिसांच्या अथक परिश्रमाचं चीज झालं होतं. आजही मूर्ती दूध पिते आहे. डोळय़ातून अश्रू येताहेत अशा अफवा अधूनमधून पसरतात. पोलिसांनी ठरवलं तर ते किती प्रभावीपणे अशा दैवी वलय असणार्या अफवांनाही अटकाव करू शकतात याचा हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता. पण मुंबई पोलिसांचाही तारीफ के काबील कामगिरी त्यावेळी फारशी जनतेला कळू शकली नव्हती, हेही सत्य आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी 9371014832 |
Sunday, 21 October 2012
मेडिटेशन, माईंड पॉवरच्या नावे होते फसवणूक
''किती दिवस झालेत? केव्हा कार्यशाळा केली?'' मी. ''सर, 15 दिवसांपूर्वी सातार्यात मी तुमची कार्यशाळा केली. 15 दिवस सूचना देते आहे,'' मुलगी. ''पण मी महिनाभर कंपलसरी सीडीवर संमोहन-सराव करायला सांगितला होता ना? नंतरच टार्गेट निवडून सूचना द्यायच्या होत्या नां?'' मी. ''हो पण, मला इमर्जन्सी होती म्हणून मी त्वरित स्वतंत्र सूचना द्यायला सुरुवात केली,'' मुलगी. ''बरं ठीक आहे, पण 15 दिवसांतच तुला अपेक्षित रिझल्टस् मिळतील असं तुला कुणी सांगितलं? मी तर तसं सांगितलं नव्हतं नां? बरं काय सूचना देते आहेस?'' मी. ''सर, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे, पण तो माझ्याकडे लक्षच देत नाही. गेले 15 दिवस संमोहनात सूचना देते आहे.. माझ्याकडे पाहा, लक्ष दे, माझ्यावर प्रेम कर, खूप खूप प्रेम कर... पण सर तो साधं वळूनसुद्धा पाहत नाही.,'' मुलगी. मी उडालोच. माझा विश्वासच बसेना? माझ्या कार्यशाळेत शिकलेली एखादी विद्यार्थिनी असा प्रश्न विचारू शकते? असा विचार करू शकते? मला राहावलं नाही, मी विचारलंच, ''का गं नक्की तू माझ्याच कार्यशाळेत शिकलीस नां? पाचही दिवस पूर्ण वेळ उपस्थित होती नां?'' ''हो सर, पाचही दिवस, पूर्ण वेळ, तुमच्यासमोरच पहिल्या रांगेत बसली होती.'' ''या पाच दिवसांत कधीतरी, असं दुसर्याचं नाव घेऊन अथवा त्याची प्रतिमा पाहून दुसर्याला अशा सूचना देऊन काही परिणाम साधता येतो असं मी शिकवलं का? सांगितलं का?'' ''नाही सर, तुम्ही नाही सांगितलं. उलट असं काही करता येत नाही असंच तुम्ही सांगितलं, पण मला माहीत आहे नां! संमोहनात जाऊन अशा सूचना दिल्या की परिणाम मिळतो,'' मुलगी. ''तुला कसं माहीत?'' मी. ''तुमच्या आधी सातार्यात एक संमोहनतज्ज्ञ आले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं व्याख्यान झालं. मी गेले होते व्याख्यानाला. त्यांनी काही संमोहनाचे प्रयोगही करून दाखवले होते. त्या वेळी त्यांनी सांगितलं होतं. आपण संमोहनात जशा सूचना देऊ तसा दुसर्यांवर परिणाम होतो. आपल्या इच्छेनुसार घडतं.'' ''मग तू त्यांची शाळा न करता माझ्या कार्यशाळेत कशी आलीस?'' मी. ''त्यांचं व्याख्यान मला प्रभावी वाटलं नाही. तुमचं जास्त प्रभावी वाटलं. म्हणून मी तुमच्या कार्यशाळेला आले होते.'' ''तू जे ऐकलंस वा तुला जे वाटतं तो तुझा गैरसमज आहे. आपण स्वत: संमोहनात जाऊन स्वत:ला सूचना देतो, वारंवार सूचना देतो. त्या आपल्या मेंदूत ठसतात, इंप्रिंट होतात. त्यानुसार आपली नवी सवय निर्माण होऊ शकते. आपला स्वभाव बदलू शकतो. आपली वर्तणूक बदलू शकते. आपल्यात बदल होऊ शकतो. पण आपण संमोहनात जाऊन दुसर्याची प्रतिमा डोळ्यांपुढे ठेवून कितीही सूचना दिल्या. हजारो-लाखो वेळा सूचना दिल्या तरी त्याचा त्या दुसर्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही, होणं शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, गैरसमजूत आहे.'' दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट. पण तेव्हापासून सातत्यानं या प्रकारच्या प्रश्नांना, अंधश्रद्धांना मला तोंड द्यावं लागत आहे. 1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा' मुंबईतून सुरू केल्या तेव्हाही मला सातत्यानं या प्रकारच्या अंधश्रद्धांशी, समजुतींशी सारखी लढाई करावी लागली. संमोहन म्हणजे दुसर्याला वश करण्याचं, मोहित करण्याचं तंत्र अशीच समजूत होती. त्यामुळं सुरुवातीला काही वर्षे मोठय़ा संख्येनं पुरुष शिकण्यास येत असत, पण स्त्रियांची संख्या मात्र नगण्य, अल्प असे. माझे अनेक विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी म्हणत असत- ''सर, तुम्ही संमोहन न म्हणता या विषयाला मेडिटेशन म्हणा! जर दोन्ही अवस्था एकच आहेत, अल्फा रिदमच् आहेत, तर मेडिटेशन म्हणायला काय हरकत आहे? त्यामुळं सहभागींची संख्या वाढेल. मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळेल. स्त्रियाही मोठय़ा संख्येनं येऊ शकतील. एक चांगला, महत्त्वाचा विषय सगळ्यांना नीट आत्मसात करता येईल.'' मला कळत होतं. मेडिटेशन म्हटलं तर माझं काम जास्त सोपं होणार आहे. पण हा खोटेपणा झाला असता. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे मी शिकवतो ते मेडिटेशन नव्हतं. कारण भारतीय परंपरागत मेडिटेशनमध्ये, अल्फा रिद्मच्या अवस्थेत म्हणजे मेडिटेशनच्या अवस्थेत सूचना द्यायच्या नसतात. उलट आतलं सगळं मूळ आत्मास्वरूप बाहेर येऊ द्यावं अशी अपेक्षा असते. दुसरं मेडिटेशन हे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात वापरलं जात असल्यामुळं त्यासोबत त्या त्या कल्टसंबंधीच्या अनेक अंधश्रद्धा जुळल्या आहेत. त्यांचीही सफाई मला करत बसावी लागली असती. शिवाय मी कुणी श्री श्री, बाबा, महाराज नसल्यामुळं आणि तसं दुरान्वयानंही बनायचं नसल्यामुळं मेडिटेशन शब्द न वापरताच संमोहन शब्द वापरूनच कार्यशाळा चालवायचं ठरवलं. त्यासाठी महाराष्ट्रभर हजारो विनामूल्य व्याख्यानं आयोजित करून लाखो लोकांच्या मनातील 'संमोहन' या विषयासंबंधीचे गैरसमज दूर केले, भीती, अंधश्रद्धा दूर केल्यात. माझ्या आधी फक्त एक-दोघं जण संमोहनाचे स्टेज प्रोग्राम्स घेत असत. संमोहनात टाकून सूचना देत असत. त्यांनीही पुढे कार्यशाळा सुरू केल्या. त्या कार्यशाळेतही ते संमोहनात टाकून सूचना देणं आणि संमोहन प्रयोग करणं एवढंच करायचे. त्याचा 'व्यक्तिमत्त्व विकास' वगैरेशी फारसा संबंध नसे. त्यांच्या कामातूनही संमोहनासंबंधी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसारित होत असत. पण मी ठरवलं होतं उगाच टीका करत बसण्यापेक्षा आपण या विषयासंबंधी विधायक प्रबोधन करत जायचं आणि तेच इतकी वर्षे करत आलो. मोठय़ा प्रमाणावर मेडिटेशनच्या नावाखाली संमोहनाचा वापर अलीकडच्या काळात केला जाऊ लागला आहे, पण त्याची सुरुवात बर्याच वर्षापूर्वी सुरू झाली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक कल्टने डायरेक्ट संमोहनाचा वापर मेडिटेशनच्या नावाखाली करायला फार पूर्वीच सुरुवात केली. त्यामुळं ही कल्ट खूप वाढली. संमोहनासारखं प्रभावी हत्यार वापरून ही कल्ट त्यांच्या साधकांचं पार ब्रेनवॉशिंग करून टाकतं. दुसरं उदाहरण निर्मला माताचं. त्यांनीही सक्रियपणे संमोहनाचा वापर 'सहजयोगाच्या', मेडिटेशनच्या नावाखाली केला आहे. या दोन्ही कल्टबद्दल, त्यांच्या ब्रेनवॉशिंगबद्दल पुढच्या लेखांमध्ये आपण विस्तारानं पाहू. पण सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली चालणार्या ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून संमोहन वा मेडिटेशनच्या नावाखाली चालणार्या बदमाशीविरुद्ध लक्ष केंद्रित करू. आपण आपली 'माईंड पॉवर' वापरून काहीही करू शकतो, असा दावा अनेक ट्रेनर करतात. त्यासाठी सुरुवातीला आपल्या विनामूल्य कार्यक्रमात अनेक सक्सेस स्टोरी दाखवतात. एखाद्या अपंगाचं यश, पाय नसलेला माणूस जिद्दीनं उभा कसा राहिला, सचिन तेंडुलकर, अंबानी, अमिताभ बच्चनपासून अनेक लोक कसे यशस्वी झाले. या सक्सेस स्टोरी सांगताना त्यांच्या 'माईंड पॉवर'मुळं ते यशस्वी झालेत असा आभास निर्माण केला जातो आणि मग आमच्या कार्यशाळेत या, आपली 'माईंड पॉवर' वापरा आणि सहजतेनं यशस्वी व्हा! असा उघड संदेश दिला जातो. 'माईंड पॉवर'चं स्पष्टीकरण देताना काय सांगतात? आपण एखादी प्रबळ इच्छा केली, विल पॉवर वापरली, पुन्हापुन्हा हे घडावं अशी इच्छा धरली की, ती इच्छा फलद्रूप होते, प्रत्यक्षात येते. संमोहनात, मेडिटेशनमध्ये जाऊन एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा केली, तसं घडताना चलचित्र पाहिलं, व्हिज्युअलाईज केलं की तसं खरंच घडतं, असं सांगितलं जातं. थोडक्यात एखाद्यानं संमोहनात वा मेडिटेशनमध्ये जाऊन स्वत:ला सांगितलं, पाहिलं, ''मोठ्ठा इंडस्ट्रियालिस्ट झालो. मोठ्ठा कारखानदार झालो. (वा होतो आहे).'' असं रोज करत गेलं तर तो एक दिवस अंबानी सारखा इंडस्ट्रियालिस्ट बनेल. एखाद्यानं ''मी मोठा नट बनतो आहे. अमिताभसारखा यशस्वी नट, हिरो बनतो आहे.,'' अशी प्रबळ इच्छा धरली, वारंवार इच्छा धरली तर तो खरंच मोठा, यशस्वी नट बनेल. एखाद्यानं प्रबळ विल पॉवर वापरली तर त्याला बंगला, कारसुद्धा माईंड पॉवरमुळं प्राप्त होईल. हे असले 'माईंड पॉवर'चे दावे करणारे खूप भोंदू निर्माण झाले आहेत. अहमदाबादचा 'माईंड पॉवर ट्रेनर' स्नेह देसाई आणि महाराष्ट्रातला देसाईची काळी डुप्लिकेट म्हणजे 'कार्बन कॉपी' दत्ता घोडे यांच्याविषयी आधी लिहिलंच आहे. हे दोघेही महाठग आहेत. त्यांच्या 'थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपथी' या दाव्यांना आपण जाहीर आव्हान टाकलंच आहे. त्यांनी पळ काढला म्हणून नागपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार गुदरलीच आहे. पण इतरही सगळ्या खोटे दावे करणार्या 'माईंड पॉवर'वाल्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं भांडाफोड करणारच आहोत. माझा साधा प्रश्न आहे. भारतातल्या किमान पाच कोटी तरुणांना कॅटरिना कैफ वा करिना कपूर हवी आहे. अडीच, अडीच कोटी तरुणांनी जर यापैकी एकीला प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेतला, मन एकाग्र केलं, व्हिज्युअलाईज केलं तर अडीच कोटी लोकांना करिना आणि इतर अडीच कोटींना कॅटरिना प्राप्त होईल का? करिना-कॅटरिनाची हाडं तरी पुरतील का? अडीच कोटी तरुणांना हे शक्य आहे? मग माईंड पॉवर काय आहे? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Thursday, 18 October 2012
संमोहनात दुसर्याच्या इच्छेविरुद्ध काहीही करता येत नाही
सध्या या विषयाचं फारसं गांभीर्य आणि ज्ञान नसणार्या संमोहन तज्ज्ञांनी व या क्षेत्रात शिरलेल्या काही भोंदूंनी या विषयासंबंधीच्या अंधश्रद्धा आणि गैरसमज मोठय़ा प्रमाणावर निर्माण करून ठेवले आहेत. दुसर्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या डोळय़ात डोळे घालून अथवा आवाज काढून त्याला संमोहनात टाकता येतं हेच मुळात खोटं आहे. संमोहनाच्या माध्यमातून मोहिनी घालता येते वा कुणाला वश करता येतं हेही धादांत खोटं आहे. दुसर्याच्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावणारं अथवा त्याला वश करणारं संमोहन, मोहिनी अथवा वशीकरण या जगात अस्तित्वातच नाही, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आज मी ज्या 'संमोहन' विषयासंबंधी बोलतो आहे, तो म्हणजे 'हिप्नॉटिझम' या शब्दानं ओळखली जाणारी एक वैज्ञानिक शाखा आहे. हिप्नॉटिझम शब्दाचं भाषांतर म्हणून 'संमोहन' या शब्दाचा प्रयोग आपण करतो आहोत. बाकी आपल्या मराठी भाषेत त्यानं त्याला संमोहितच करून टाकलं. म्हणजे प्रभावित केलं, वश केलं, मंत्रमुग्ध केलं वगैरे अर्थानं हा शब्द वापरला जातो तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. आज वैज्ञानिक युगात 'हिप्नोथेरपी' संमोहन उपचार पद्धती ही एक उपचार शाखा आहे. जगभर अनेक देशांत या शाखांमध्ये या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. नियमितपणे पेशंट्सवर ही उपचार पद्धती वापरली जाते. किमान अडीच हजार वर्षापासून या विषयाचा वैज्ञानिक जगताला परिचय आहे. 2450 वर्षापूर्वी औषधीशास्त्राचा जनक हिप्पोक्रेट्स 'आर्ट ऑफ हिलिंग'च्या नावाखाली या पद्धतीची प्रक्रिया वापरत असे. हजारो लोकांना रोगमुक्त करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करत असे. मधल्या काळात, विशेषत: मध्ययुगीन काळात, अनेक विषयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती निर्माण झाल्यात. याही विषयाचा प्रवास असाच जादुई, चमत्कारिक, आधिभौतिक समजुतीत गुरफटला. मॅग्नेटिझम्, इथेरियल, मेस्मेरिझम असा प्रवास करत करत तो शेवटी 'हिप्नॉसिस'पर्यंत येऊन पोहोचला. प्रामुख्यानं 18 व्या शतकात डॉ. जेम्स ब्रेड या शास्त्रज्ञानं दीर्घकाळ या विषयासंबंधी संशोधन करून काही महत्त्वाचे मुद्दे सिद्ध केले. सगळ्यात प्रथम त्याने अशा प्रकारच्या विषयाला 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. हिप्नॉस नावाची ग्रिकांची एक झोप येण्यास कारणीभूत ठरणारी देवता होती. ही प्रक्रियासुद्धा झोपेच्याजवळ जाणारी आहे असं त्याला वाटल्यामुळं त्यानं 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. आज हा शब्द जगन्मान्य झाला आहे. 'हिप्नॉसिस' या अवस्थेला ब्रिटिश इंग्लिशमध्ये 'ट्रान्स' असा शब्द वापरला जातो. पण ब्रिटनमध्येही 'हिप्नोथेरपी' हाच शब्द या विषयाच्या उपचार पद्धतीला मात्र वापरला जातो. संमोहनाच्या शेकडो प्रक्रिया आहेत. मी माझ्या संमोहन उपचारक अभ्यासक्रम (क)मध्ये 50 एक पॉझिटिव्ह प्रक्रिया शिकवतो. आणखी पन्नास एक निगेटिव्ह प्रक्रिया मला माहीत आहेत. त्या मी शिकवत नाही अथवा इतरांवर उपचारांसाठी वापरतही नाही. याचाच अर्थ यापेक्षाही अधिक मला माहीत नसलेल्याही अनेक प्रक्रिया या जगात अस्तित्वात आहेत. कोणतीही प्रक्रिया वापरून माणसाची बॉडी आणि माईंड दोन्ही रिलॅक्स झालं की माणूस संमोहित अवस्थेत जातो. या अवस्थेत माणसाची सूचना स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते. माणूस एका मानसिक संतुलनाच्या अवस्थेत जातो. काही काळ 10 ते 30 मिनिटं या अवस्थेत राहिल्यास माणसाच्या मनात साचलेल्या टेन्शन्स, अँग्झायटीचा, ताणतणावांचा निचरा होतो. माणूस शांत, अधिक शांत, अंतर्बाह्य शांत बनतो. त्यामुळं तो अधिकाधिक निरोगी बनतो. त्याच्या नकारात्मक स्वभावाचे कंगोरे कमी होतात. राग, चिडचिड, भीती, टेंशन, चिंता यांचं प्रमाण कमी होतं. केवळ रोज नियमितपणे काही काळ या संमोहन अवस्थेत राहिलं तरी हे फायदे एखाद्या बायप्रॉडक्टसारखे आपल्याला प्राप्त होतात. शिवाय संमोहित अवस्थेत आपण 'हायली सजेस्टिबल' बनत असल्यामुळे, दिलेल्या सूचना प्रभावीपणे स्वीकारत असल्यामुळे या अवस्थेचा उपयोग आपण स्वत:चं माईंड प्रोग्राम करण्यासाठी करू शकतो. त्याद्वारा आपल्या स्वभावात, वर्तणुकीत, क्रियांमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, भावनांमध्ये विधायक व आवश्यक ते बदल घडवून आणू शकतो. आपली व्यसनं, वाईट सवयी घालवू शकतो. नवे गुण आत्मसात करू शकतो. नवी कौशल्यं, नवे तंत्र, नव्या गोष्टी उत्तमपणे शिकण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करू शकतो. संमोहन ही एक आपल्या मनाची, माईंडची नैसर्गिक अवस्था आहे. मेंदूमध्ये चालणार्या कार्यप्रणालीला माईंड, मन असं म्हटलं जातं. आपल्या मेंदूत सातत्यानं काही प्रक्रिया चालत असतात. विद्युत लहरीसारख्या निघत (अेमिट) असतात. मेंदूच्या मज्जातंतूंमधून निघणार्या या विद्युत लहरींना मोजण्यासाठी आपण यंत्राचा उपयोग करतो. त्याला ई. ई.जी. घेणं असं म्हणतात. संमोहित अवस्थेत हे ई. ई. जी. नेहमी 8 ते 12 सायकल्स पर सेकंद असतात. त्याला 'अल्फा रिदम' असं म्हणण्याचाही प्रघात आहे. म्हणून संमोहनाला अल्फा रिदमची अवस्था असंही म्हटलं जातं. खरं म्हणजे एकाग्रतेनं केलेल्या प्रार्थनेमुळं अथवा वेगवेगळ्या धर्मानी जोपासलेल्या मेडिटेशन्समुळं, ध्यान धारणेमुळंसुद्धा आपण या अल्फा रिदमच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो. वैज्ञानिकदृष्टय़ा संमोहन, मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या एकच अवस्था आहेत. या सगळ्याच अवस्थांमध्ये ई.ई. जी. नेहमी 8 ते 11 सायकल्स पर सेकंद असतात. तरी अनेक लोक मेडिटेशन म्हणजे काही तरी पवित्र आहे असं मानतात आणि संमोहन म्हणजे काहीतरी हिणकस, कमी प्रतीचं आहे असं त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळं समजत असतात. मेडिटेशन, ध्यानधारणा या प्रक्रिया आपल्या संस्कारामधून आल्यामुळं त्या आपल्याला जवळच्या वाटतात. पवित्र वाटतात. पण परंपरागत भारतीय मेडिटेशन्समध्ये या अवस्थेत डायरेक्ट सूचना द्यायच्या नसतात. अशा सूचना देणं चुकीचं समजलं जातं. खरं म्हणजे या अवस्थेत आपली सूचना स्वीकारण्याची क्षमता प्रचंड वाढली असते. पण परंपरागत मेडिटेशन वापरताना आपण ही सुवर्णसंधी सोडतो, गमावतो. भारतीय समाजात मेडिटेशन्स हे देवप्राप्तीकरिता आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता वापरण्याचा प्रघात आहे. व्यावहारिक जीवनाकरिता वा व्यावहारिक उन्नतीकरिता त्याचा वापर करण्याचा प्रयत्न न झाल्यामुळे आजच्या जीवनासाठी सुसंगत असा त्यांचा विकास होऊ शकला नाही. पण संमोहनशास्त्र मात्र वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यासलं जात असल्यामुळे, वापरलं जात असल्यामुळे अल्फा रिदमच्या हायली सजेस्टिबल असण्याचा उपयोग करून घेतआणि डायरेक्ट सूचना देऊन स्वत:मध्ये हवे आहे तसे बदल घडवून आणण्यासाठी माणसाच्या हाती एक प्रभावी साधन उपलब्ध करून देतं. शिवाय मेडिटेशनच्या प्रक्रिया जास्त कठीण आहेत. वेळखाऊ, लांबलचक आहेत. सगळ्यांनाच त्या जमत नाहीत. त्या मानानं संमोहन प्रक्रिया सोप्या, सुलभ आहेत. कमी वेळात या अवस्थेमध्ये नेणार्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला संमोहन सुलभतेनं शिकता येतं. सहजतेनं वापरता येतं. त्याचा उपयोग करून आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारता येतं. स्वत: चांगले बदल घडवून आणून ऐहिक आयुष्य संपन्न बनवता येतं. मेडिटेशन आणि संमोहनाची तुलना करताना मी नेहमी एक उदाहरण देत असतो. भरदुपारी अनवाणी पायानं एक माणूस चालत जातो. 5 हजार पायर्या चढतो. वरस्थळी पोहोचल्यावर त्याला सुंदर पक्वान्नं शिजवलेली दिसतात. पण ते न खाताच तो अनवाणी पायानं पायर्या उतरून खाली उतरतो. कारण त्याला उपवास असतो. दुसरा माणूस पायर्यांच्या बाजूनं असणार्या रस्त्यावरून मोटारसायकलने लवकर वर पोहोचतो. यथेच्छ पंचपक्वान्न खातो आणि सहजतेनं पुन्हा झरकन परत येतो. पहिला माणूस मेडिटेशन करणारा आहे तर दुसरा माणूस संमोहन वापरणारा आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी 9371014832 |
Subscribe to:
Posts (Atom)