Monday 19 November 2012

आनंदी राहा, सोबतच्या माणसांनाही आनंदी करा!

'हॅपी दिवाली', दिवाळी आनंदाची जावो, अशा शुभेच्छांचा आपण वर्षाव करतो. उत्तम गोष्ट आहे. पण केवळ दिवाळीच का? प्रत्येकच दिवस का नाही? माणूस दीर्घकाळ सुखाचा शोध घेत आला आहे. आनंदी राहण्याचं रहस्य शोधतो आहे. कदाचित धर्मानी सगळ्यात जास्त सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही हा शोध सुरू आहे.

भूक शमवण्यातलं सुख, प्रणयातलं सुख, बाकी सारी सुखं क्षणभंगुर आहेत. काही काळातच ती ओसरतात. म्हणून चिरकाल, अनंतकाळ टिकणारं सुख शोधण्याचा प्रयत्न धर्मानी केला. भारतीय धर्माना त्यातून मोक्ष ही कल्पना सुचली. मोक्ष म्हणजे सगळ्या सुख-दु:खांपासून सुटका. जन्म-मरणाच्या फेर्‍यामधून सुटका. चिरंतन आनंदाची अवस्था. आता ही केवळ कल्पना आहे की वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. कारण मोक्ष मरणानंतर प्राप्त होतो आणि मेल्यानंतर माणूस आपली अनुभूती, अनुभव जिवंत माणसांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळं त्या वादात, त्या क्षेत्रात आपण न शिरलेलेच बरं. शिवाय मोक्षाचा एवढा आग्रह असणार्‍या भारतातील धार्मिक वातावरणात शूद्र-अतिशूद्रांना ढोरापेक्षाही निकृष्टपणे जगण्यास, तब्बल दोन-अडीच हजार वर्षे तरी, प्रवृत्त करणारी चातुर्वण्र्याची कल्पना अमानुषपणे राबवली जाऊ शकतेच कशी? याचाच अर्थ चिरंतन आनंद अवस्था गाठण्यास आसुसलेल्या आध्यात्मिक माणसांचं या जीवनातील दु:खाशी व आनंदाशी काही देणंघेणं नव्हतं. माणुसकीशीही काही देणंघेणं नव्हतं, असं मानायचं काय? असे अनेक अमानुष प्रश्न निर्माण होतात. म्हणून आपण या पृथ्वीवरच्या, इहलोकातील सुखाच्या शोधाविषयी बोलू, विचार करू, समजून घेऊ.

गेल्या 10 लाख वर्षापासून आपण दोन पायांचा प्राणी, पृथ्वीवर वावरतो आहे. आजच्या सारखा 'माणूस' म्हणवला जाणारा प्राणी किमान दोन लाख वर्षापासून पृथ्वीवर जगतो आहे. प्रत्येकच प्राण्याकडून निसर्गाच्या किमान दोन अपेक्षा आहेत.

एक तीव्रतेनं जगण्याची, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी आटोकाट प्रयत्न करून, संघर्ष करून मारकाट करून जिवंत राहण्याची धडपड करण्याची प्रवृत्ती. जन्म घेण्याच्या प्रक्रियेसोबतच, एक नॅचरल इन्स्टिंक्टचा, जैविक प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून जगण्याची दुर्दम्य इच्छा प्रत्येक माणसाला, प्राणिमात्राला प्राप्त होत असते. म्हणूनच अगदी टाटा-बिर्ला अंबानी असो की तुमच्या माझ्यासारखा प्राथमिक गरजा पूर्ण करू शकणारा मध्यमवर्गीय माणूस असो की, आज रात्री खायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसणारा एखादा भिकारी असो, प्रत्येक जणचं धडपडत जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जगण्याची, जिवंत राहण्याची दुर्दम्य इच्छा ही प्राणिमात्राला निसर्गानं दिलेली देणगी आहे, निसर्गाची ती अपरिहार्य गरज आहे.

दुसरं, प्राणिमात्रानं आपली जात जिवंत ठेवण्यासाठी स्वत:सारखेच प्राणी जन्माला घातले पाहिजे, त्यासाठीसुद्धा वाट्टेल तेवढा प्रयत्न केला पाहिजे, प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, पण नवी पिढी जन्माला घातली पाहिजे. ही निसर्गाची दुसरी आवश्यकता.

माणूस हा उत्क्रांत प्राणी असला तरी सस्तन प्राण्याचे सारे नियम त्याला लागू होतात. मूल जन्माला यायचं असेल तर नर-मादीनं जवळ आलं पाहिजे, त्यांनी मैथुन केलं पाहिजे. तरच नवी पिढी जन्माला येणार. म्हणून नर-मादीमध्ये परस्परांविषयी जबरदस्त ओढ वाटेल, आकर्षण वाटेल अशी यंत्रणा निसर्गानं निर्माण केली. एवढंच नव्हे, तर हे एकत्र येणं कष्टप्रद, त्रासदायक न होता आनंददायक बनेल अशी योजना केली. अगदी नर-मादी एकत्र येताना प्रणयातही आनंद मिळेल, तो वाढत जाईल. एवढा आनंद वाढत जाईल की तो मधेच थांबवता येणं शक्य होणार नाही, त्याचं रूपांतर मैथुनात होईल आणि मैथुनात हा आनंद उत्तरोत्तर वाटत जाईल व त्याची परिणती 'परमोच्च आनंदात' होईल, लैंगिक तृप्तीत होईल. मगच ही प्रक्रिया थांबेल. अशीही योजना निसर्गानं आखली. कारण नर तृप्तीच्या वेळी शुक्राणू सोडले जातात, अपत्य राहण्याची शक्यता वाढते.

निसर्गानं हा सारा खेळच आनंदमय करून टाकला. बक्षीस म्हणून परमोच्च आनंद बहाल केला. कारण प्राणी आनंदासाठी धडपडायला, कष्ट घ्यायला तयार आहे म्हणून.

प्रणयाराधनातून मनुष्यप्राण्याला जो परमोच्च आनंद मिळतो तेवढा आनंद दुसर्‍या कोणत्याही माध्यमातून त्याला मिळत नाही, ही वस्तुस्थिती निसर्गानं निर्माण करून ठेवली. कारण नवी पिढी निर्मिती ही निसर्गाची गरज होती.

पण हा आनंद क्षणिक असतो, काही सेकंद-मिनिटांचा असतो, त्याऐवजी चिरंतन आनंद प्राप्त करण्यासाठी माणसानं धर्म-अध्यात्म या माध्यमातून प्रयत्न केले. दीर्घकाळ, किमान अडीच-तीन हजार वर्षे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश मिळालं की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे.

मधल्या काळात, प्रामुख्यानं धर्माच्या या प्रणयाराधनामधल्या निसर्गनिर्मित आनंदावर मर्यादा आणण्याचे खूप प्रयत्न झाले. प्रणय-मैथुन (आधुनिक भाषेत सेक्स) ही प्रक्रिया वाईट ठरली गेली, पाप ठरवली गेली. प्रणय-मैथुन हे आध्यात्मिक प्रगतीच्या, मोक्षाच्या मार्गातले अडथळे आहेत असं मानलं गेलं. ब्रह्मचर्याला प्रचंड महत्त्व दिलं गेलं, प्रतिष्ठित केलं गेलं. जवळपास, मुस्लिम वगळता, सगळ्याच धर्मानी हे ब्रह्मचर्याचे प्रयोग दीर्घकाळ राबवले. शक्य होईल तिथे प्रणय-मैथुनाला थांबवण्याचा, शक्य असेल तिथे बंदी घालण्याचा प्रयत्न केला. पण खरं म्हणजे ही लढाई निसर्गाच्या प्राथमिक नियमांच्या विरुद्धची लढाई होती. निसर्गाचं प्रॉडक्ट, निर्मिती असणार्‍या माणसानं ती आपल्या निर्मात्याविरुद्ध उभारलेली लढाई होती. ती जिंकणं शक्य होतं का? शक्यच नव्हतं. त्यामुळं हे सारे ब्रह्मचर्य प्रयोग दारुणरीत्या असफल झाले. ब्रह्मचर्याची वस्तीस्थानं विकृतीचे अड्डे बनले. ºिश्चन धर्मामधील कॅथॉलिक पंथीय विचारसरणीत 'प्रणय-मैथुन'ला स्थानच द्यायची तयारी नव्हती. अगदी नवरा-बायकोनंसुद्धा यापासून दूर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा होती. अपवाद फक्त मूल जन्माला घालण्यापुरता. तेवढय़ाचसाठी आपद्धर्म म्हणून पती-पत्नीनं एकत्र यावं अशी अपेक्षा होती. कॅथॉलिक पंथीय धर्मोपदेशकांनी ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे असा आग्रह होता. पण विसावं शतक संपता संपता धर्मोपदेशकांनासुद्धा लग्न करण्याची परवानगी देणारा फतवा व्हॅटिकन सिटीला काढावा लागला. ही चांगली गोष्ट आहे. हा निर्णय कौतुकास्पद, माणुसकीपूर्ण आहे.

निसर्गाचं अपत्य असणारा माणूस कधीच निसर्गाच्या विरुद्धची लढाई जिंकू शकत नाही. जास्तीतजास्त तो निसर्गनियमांचाच वापर करून काही निसर्गनियमांमधून थोडीशी सवलत प्राप्त करू शकतो, काही नियमांना थोडीशी मुरड घालू शकतो. निसर्गनियम समजून घेऊन काही नियमांपासून, थोडसं कंपल्शन बाजूला सारून, काहीसं स्वातंर्त्य पदरात पाडून घेऊ शकतो. ही आपली, माणसाची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. कारण शेवटी आपण या निसर्गाचे घटक आहोत, मालक नाहीत.

निसर्गानं प्राणिमात्राला आणखी एक तिसरी इन्स्टिंक्ट, जैविक प्रेरणा बहाल केली. सुखानं जगण्याची, सुखासाठी आनंदासाठी धडपडण्याची. आपल्या मेंदूत उत्क्रांतीच्या दुसर्‍या टप्प्यात लिंबिक सिस्टिम प्राप्त झाली आहे. यात एक रिवॉर्ड फंक्शन असतं तर दुसरं पनिशमेंट फंक्शन असतं. ज्या ज्या वेळी आपण एखादी कृती करतो, अनुभव घेतो, वर्तणूक करतो त्या त्या वेळी रिवॉर्ड वा पनिशमेंट फंक्शन जागृत होतं. जर रिवॉर्ड फंक्शन जागृत झालं तर आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतं. मग ती कृती पुन्हापुन्हा करावीशी वाटते; तो अनुभव, ती वर्तणूक पुन्हा पुन्हा रिपिट करावीशी वाटते. कारण सातत्यानं सुख मिळावं, आनंद मिळावा यासाठी धडपडत जगावं हाही नैसर्गिक प्रेरणेचा एक भाग आहे.

जर आपलं पनिशमेंट फंक्शन जागृत झालं तर आपल्याला वेदना होते, दु:ख होतं. मग ती कृती, वर्तणूक, तो अनुभव पुन्हा रिपिट करावासा वाटत नाही. कारण आपल्याला वेदना, दु:ख नको असतं.

निसर्गाचा पहिला नियम, जो जो जन्माला आला त्यानं वाट्टेल त्या परिस्थितीत धडपडत जगावं. पण कसं जगावं? सातत्यानं रिवॉर्ड फंक्शन जागृत होत जाईल, आनंद मिळेल, सुख मिळेल. (आणि पनिशमेंट फंक्शन जागृत होणार नाही, दु:ख आणि वेदनांपासून दूर राहता येईल.) या पद्धतीनं माणसानं जगावं, असा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो. निसर्गाचीच तशी योजना आहे.

त्यामुळं तुमच्या-माझ्या जीवनाचा खराखुरा उद्देशच आनंद मिळवणं, सुख मिळवणं हा आहे.

जर प्रत्येक माणूस सुख मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत गेला तर माणूस स्वार्थी बनणार नाही का? अमानुष बनणार नाही का? स्वत:च्या सुखासाठी स्वार्थासाठी तो दुसर्‍यांचे मुडदे पाडणार नाही का? या प्रश्नांचं उत्तर दीर्घकाळापासून माणूस शोधत आला आहे आणि कदाचित या भीतीपोटीच इहलोकातील, प्रत्यक्ष जीवनातील सुखाला किंमत देऊ नये, त्यापेक्षा परलोकातील, स्वर्गातील सुखाला, मोक्षाला किंमत दिल्यामुळं माणूस अधिक परोपकारानं वागेल, अधिक माणुसकीपूर्ण वागेल अशी अपेक्षा केली असावी. त्या दिशेनं आपण गेली दोन-अडीच हजार वर्षे प्रवास करून पाहिला. पण त्यातून असं काही साध्य होताना दिसत नाही.

तसं असतं तर किमान आपली सारी धार्मिक स्थळं माणुसकीची, प्रामाणिकपणाची, परोपकाराची स्थळं ठरली असती. देवळांमध्ये भरमसाट काळा पैसा दानपेटय़ांमध्ये जमा झाला नसता आणि कोटय़वधी रुपये दानपेटय़ांत जमा होणार्‍या देवळांच्या बाहेर भिकार्‍यांच्या रांगा लागल्या नसत्या. देवळांनीच भिकार्‍यांचं भिकारीपण संपवलं असतं.

माणसं देवधर्म मानतात म्हणून प्रामाणिकपणे वागतात, अशी एकेकाळी माझीही, इतर धार्मिक माणसांप्रमाणेच समजूत होती.

27 जून 1975 साली (25 जूनला रात्री 12 वा. आणीबाणी घोषित झाली) आणीबाणीला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली. पुढे 10 महिने वध्र्याच्या जेलमध्ये राहावं लागलं. त्या वेळी मी खरं म्हणजे देव मानणारा होतो. पण पूजाअर्चा सुटली होती. मी, माझे सहकारी चंद्रकांत वानखडे, सुभाष इथापे तिघं जण या कारणांसाठी (आणीबाणीला विरोध) जेलमध्ये आलो होतो. आम्ही तिघेही देवपूजा करत नव्हतो. बाकी सारे वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक झालेले आणि जिल्ह्यातील सारे हिस्ट्रीशिटर गुन्हेगार, सुमारे 900 लोक, जेलमध्ये होते. ते सारेच्या सारे नियमितपणे देवाची पूजा करत असत. एवढंच नव्हे, तर दरोडा घालतानाही देवाला साकडं घालत असत आणि देव त्यांना याही कामात मदत करतो, अशी त्यांची श्रद्धा होती.

तेव्हा कळलं देव मानणारी माणसं प्रामाणिक नसतात. जी प्रामाणिक माणसं देव मानतात तीच देव मानणारी माणसं प्रामाणिक असतात.

पण माणसाला एकटय़ाला जगता येत नाही. मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शिक्षा ही एकांतवासाची शिक्षा आहे. दीर्घकाळ माणूस एकटा राहिला तर पागल होतो, नाहीतर आत्महत्या करून आयुष्य संपवतो.

आपल्याला जर आनंदानं जगायचं असेल तर इतर माणसांसोबत जगलंच पाहिजे. बरं इतरांना आपण दु:खी करत गेलो तर आपण आनंदी होतो का? नाही. उलट आपल्याला रुखरुख वाटते. अपराधीपणाची टोचणी लागते. त्यामुळं आनंदानं जगायचं असेल तर आपल्यासोबतच्या माणसांच्या जीवनातील आनंद वाढवण्याचा प्रयत्न करत गेलो तरच आपल्याला आनंदानं जगता येतं.

त्यामुळं या जीवनात जगत असताना 'आनंदी राहा आणि सोबतच्या माणसांना आनंदी करा' हा तुमच्या-माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा मंत्र ठरला पाहिजे, प्रार्थना ठरली पाहिजे. ही निसर्गाची गरज आहे, निसर्गाची शिकवण आहे. हेच खरं अध्यात्म आहे ना? धर्म आहे ना? माणुसकीपूर्ण माणूस बनणं आहे ना? मी आनंदी होण्यासाठी इतरांना आनंदी करत जाणं हाच खरा परोपकार आहे ना?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

No comments:

Post a Comment