एवढय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार गुरुनाथ कुळकर्णी (ते वकीलही होते) उभे राहिलेत. म्हणू लागले, ''अहो रावते, असं या जादूटोणा बिलात काहीही नाही. कुठे आहे ते दाखवा. तुम्ही कुणाच्या आधारावर हे बोलता?'' ''तुम्ही गप्प बसा! मला थांबवू शकत नाही. बिलावर आमदाराला बोलता येतं. कितीही बोलता येतं. हा माझा अधिकार आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. माझं म्हणणं खोडा, पण आता मी बोलणारचं.. असं म्हणत आ. दिवाकर रावते बोलत राहिले. आ. गुरुनाथ कुळकर्णी आणि इतरांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आ. दिवाकर रावते बोलत राहिले, हे बिल हिंदू धर्मविरोधी आहे असं सांगत राहिले. त्या दिवशी विधानपरिषदेतील त्यांचं हे भाषण अपूर्ण राहिलं. 2006 सालची ही गोष्ट. मुंबईचं अधिवेशन संपलं. अजूनही विधानपरिषदेत आ. दिवाकर रावते हे ऑनलेग आहेत. म्हणजे बिलावर पुन्हा दुसर्या अधिवेशनात चर्चा सुरू झाली तर आ. दिवाकर रावतेंच्या बोलण्यापासून त्याची सुरुवात होणार! आ. रावतेंच्या भाषणांच्या बातम्या मोठय़ा प्रमाणावर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या.'जादूटोणाविरोधी बिल' हा खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळं महाराष्ट्रभर बातम्या वृत्तपत्र माध्यमातून पसरल्या. पण असं बिलात काहीही नाही. हे मुद्दाम चुकीचं मत मांडलं आहे असं मात्र कुणाही वर्तमानपत्रानं सोबत लिहिलं नाही. याविरुद्ध मत मांडणारं दुसर्या कुणाचं भाषणच झालं नसल्यामुळं वृत्तपत्रातून तशी बातमी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही.सनातन्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवून दाखवून वारकर्यांना, धार्मिक लोकांना भडकवलं. हे खोटंनाटं सांगून लोकांना भडकवणं आजही सुरू आहे. सनातन्यांचं मी समजू शकतो. कारण गोबेल्सप्रणीत अफवा पसरविण्याच्या यंत्रणेमध्ये ते तरबेज आहेत. त्यांच्या गुरूंनी त्यांना त्या पद्धतीनं 'ब्रेनवॉश' करूनच जनतेत सोडलं आहे. याची महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याला व त्यातील 'एटीएस'(अँन्टी टेररिस्ट स्कॉड) ला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं सनातन संस्था आणि तिचे मुखवटे असणार्या संघटनांवर बंदी आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पण या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा प्रखर डोस पाजणार्या प्रबोधनकार ( म्हणूनच त्यांना 'प्रबोधनकार' ही पदवी लोकांनी बहाल केली.) ठाकरेंचा वारसा असणार्या शिवसेनेच्या (मा. बाळासाहेब ठाकरेंचे ते वडील आहेत) आ. रावतेंनी असा खोटा, चुकीचा, समाजविघातक प्रचार का केला?आ. दिवाकर रावते हे उत्तम संसदपटू आहेत. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विधानपरिषदेत अत्यंत लढाऊ पद्धतीनं, लोकांचे प्रश्न जिव्हाळय़ानं लावून धरताना, लोकांसाठी लढताना मी आणि महाराष्ट्रानं पाहिलं आहे.म्हणूनच जेव्हा सामाजिक न्यायमंर्त्यांनी विरोधी पक्षाच्या सहमतीनं हे बिल आणूया, त्यांच्याही सूचनांचा विचार करूया, असं ठरवलं. माझ्यावर काही जबाबदारी सोपवली. तेव्हा 2005 साली सगळय़ात पहिले मी आ. दिवाकर रावते यांना भेटलो. त्यांच्यासोबत छान चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयासंबंधी बोलताना ते म्हणाले, ''अहो मानव, तुम्ही आता हे काम करता आहात, पण मी आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंसोबत या परिवर्तनाच्या लढाईत सामील आहे. शिवसेनेच्या जन्माआधीपासून माझ्यावर हा संस्कार (प्रबोधनकार ठाकरेंचा) झाला आहे. आमच्यासाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन' काही नवं नाही.'' त्यानंतर विस्तारानं त्यांच्यासोबत चर्चा झाली. मूळ बिलात बदलासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अतिशय अनुकूल प्रतिसाद दिला. त्यानंतर आ. सुभाष देसाईंशी चर्चा केली. त्यांनीही पहिल्या भेटीत अत्यंत मोलाच्या सूचना केल्या. एवढंच नव्हे, तर. डिसेंबर 2005 मधील अधिवेशनात हे बिल मांडण्याचं ठरलं. कॅबिनेटची सही झाली. बिल छपाईला जाण्याआधी मी आ. सुभाष देसाईंना दाखवलं. त्यांनी सुचवलं.''मानव,'दैवीशक्ती','देवी', 'देव' असे शब्द बिलात ठेवू नका. त्याऐवजी 'अतिंद्रिय शक्ती', 'अतिमानुष शक्ती' असे शब्द वापरा.'' केवळ सुचवलंच नाही तर माझ्यासोबत बसून ते शब्द जिथे-जिथे आहेत तिथे-तिथे आम्ही एकूण दहा बदल केले. त्यानंतर तडक मी कायदा विभागाचे सचिव श्री. शिंदेकरांकडे गेलो. त्यांना आ. सुभाष देसाईंनी सुचवलेले बदल सांगितले. त्यामुळं बिलात फरक पडत नाही. हे त्यांना पटल्यावर त्यांनी हे बिल रात्री 10 वाजता छपाईला पाठवलं. मुख्यमंर्त्यांशी फोनवर ते बोलले. आ. देसाईंनी सुचविलेल्या बदलासंबंधी सांगितलं. मुख्यमंर्त्यांनी संमती दिली. ना. हांडोरेंना सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कॅबिनेटची सही झाल्यावरसुद्धा 10 ठिकाणी बदल करण्यात आले. पंधरा दिवस आधी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्या वतीनं बिलासंबंधी बोलण्यास मी मातोश्रीवर गेलो होतो. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर वेगळंच वातावरण होतं. राज ठाकरे नाराज होऊन बाहेर पडणार अशी बातमी होती. बाळासाहेब ठाकरे फार वेगळ्या मूडमध्ये होते. शिवसेना नेत्यांची, आमदार, खासदारांची सारी धावपळ सुरू होती. त्यामुळं बाळासाहेब भेटू शकले नाहीत; पण त्याही वातावरणात उद्धव ठाकरे अर्धातास बोलले. '' हे काम आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. बिलाच्या मथळ्यात 'अंधविश्वास' हा शब्द होता. ते पाहून ते म्हणाले, 'अंधविश्वास' हा शब्द कशाला ठेवता? मग श्रद्धा, अंधश्रद्धा ही भानगड येते. त्यापेक्षा 'अघोरी प्रथा' हा शब्द वापरा. उद्धव ठाकरेंशी त्या दिवशी नीट बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर सोमवारी भेटायचं ठरलं, पण सोमवारी उद्धवजींचा फोन बंद होता. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला होता. शिवसेनेमधलं कुणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं आणि मला नागपूर अधिवेशनात पोहोचायचं असल्यानं थांबणं शक्य नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना उद्धव ठाकरेंची सूचना सांगितली. मुख्यमंर्त्यांनी आनंदानं संमती दिली. ''ठीक आहे, बिलाच्या मथळ्यातून 'अंधविश्वास' शब्द काढून टाका. त्याऐवजी 'अघोरी प्रथा' शब्द टाका.'' आणि मग बिलाचं नाव झालं, 'महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन.' हा सारा इतिहास मी का सांगतो आहे? कारण सगळ्यांच्या सहमतीनं हे बिल संमत व्हावं असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारनं हे बिल आणलं. भाजप पक्षानं 100 टक्के संमती दिली. शिवसेनेनं 100 टक्के संमती देण्याआधीच हे बिल सभागृहात मांडून 16 डिसेंबर 2005 साली विधानसभेत संमत झालं. पण तोवर शिवसेनेनं सुचविलेल्या अनेक सूचना या बिलात अंतर्भूत झाल्या आहेत. असं असताना आ. दिवाकर रावतेंनी या बिलाच्या विरोधात सनातन्यांची सुपारी का घेतली? ते सनातन्यांची भाषा का बोलतात? प्रबोधनकार ठाकरेंची भाषा ते विसरले आहेत काय? ते जे आज या बिलासंबंधी खोटंनाटं (होय, जाणीवपूर्वक हा शब्द मी वापरतो आहे) बोलताहेत ते पाहून प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्म्याला (प्रा. रावते मानतात म्हणून) वेदना होत नसतील का? मला माहीत आहे, आ. दिवाकर रावतेंना बिल चांगलं कळतं. हा त्यांचा गैरसमज नाही. ते मुद्दाम खोटं बोलून बिलासंबंधी अपप्रचार करताहेत. त्यांनी खरं बोलून या बिलाला विरोध करावा, असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी म्हणावं, परिशिष्टातील 12 कलमांना माझा विरोध आहे. भूत काढण्याच्या नावाखाली छळ होऊन माणसं मेली तरी चालतील, चमत्कारी बाबांनी लोकांना ठगवलं तरी चालेल, जादूटोण्याच्या संशयापायी छळ होऊन माणसं मेली तरी चालतील..वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुबुद्ध जनतेला माझं जाहीर आवाहन आहे की, या बिलाला विरोध करणार्या सगळ्यांनाच आपण जाहीर धारेवर धरा. आडवेतिडवे प्रश्न विचारा, जाब विचारा, तुमच्याजवळ या बिलाची प्रत नसेल तर ती मी ु.रलरपी.ेीस.ळप(ही अ.भा.अंनिसची साईट आहे) या साईटवर टाकली आहे. तिथून प्रिंट करून ही प्रत मिळवा आणि सनातन्यांचं कारस्थान उधळून लावा. त्यांना या देशात पुन्हा चातुर्वर्ण आणायचा आहे. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उतरंड निर्माण करायची आहे. सार्या प्रकारच्या अंधश्रद्धा पुन्हा समाजात रुजवायच्या आहेत. पुन्हा मनुस्मृतीचे कायदे या समाजावर लादायचे आहेत. अस्पृश्यतेचं समर्थन करणारीही मंडळी आहे हे लक्षात ठेवा. खोटं वाटत असेल तर 'सनातन प्रभात' वाचा, वर्षभराचे अंक चाळा. म्हणजे याचं खरं स्वरूप तुम्हाला दिसेल. म्हणूनच वारकर्यांचं आवरण ओढलेले छुपे सनातनी म्हणतात, ''आम्ही आधी हिंदू आहोत, नंतर वारकरी आहोत. मनुस्मृती चांगली आहे. म. फुले-सावित्रीबाई फुले यांनी काहीच केलं नाही. या देशात स्त्रियांना स्वातंर्त्य, शिक्षण होतंच. सगळं वाईट मुसलमानांमुळं झालं आहे. आधुनिक भारतातल्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण हे चालू द्यायचं का? आजच्या पिढीनं हे ठरवायचं आहे. जादूटोणाविरोधी बिल हे केवळ निमित्त. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Saturday, 28 July 2012
प्रबोधनकारांचे विचार रावते विसरलेत का?
Monday, 23 July 2012
सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी
त्यांचा विरोध प्रामाणिक होता म्हणून त्यांचं समाधान झालं. मला खात्री आहे की, थोडीशीही समाजाविषयी कणव असणारा प्रत्येक प्रामाणिक माणूस या बिलाचं समर्थनच करेल. मग विरोध का? सनातन संस्थेच्या गोबेल्स, गणित, खोटय़ा प्रचाराविषयी मी मागच्या लेखात लिहिलं आहेच. त्यांच्या आक्रमक खोटय़ा प्रचाराला अनेक सरळ धर्मप्रेमी माणसं बळी पडतात आणि काही आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी वेड पांघरूण पेडगावला जातात. आळंदीच्या एका मोठय़ा कीर्तनकारांचे खूप फोन यायचे. मला ते खूप शिव्या घालायचे. आवाजावरनं ते वयस्क कीर्तनकार आहेत हे माझ्या लक्षात आल्यामुळं एरवी कुणाचीही धमकी मुळीच ऐकून न घेणारा मी शांतपणे त्यांचं बांलणं ऐकत असे. शांतपणे त्यांचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत असे. ''तू हिंदूची औलाद नाही. मुसलमानाची औलाद आहे.'' अशी सुरुवात करणारे ते कीर्तनकार नंतर बरेच शांत होत असत. आळंदीला जाऊन मी त्यांच्यासोबतच चर्चा केली. बिलात काय आहे ते समजावून सांगितले. त्याची प्रत त्यांना दिली. त्यांचा एकच आग्रह मुसलमान.. मुसलमान.. मुसलमान. ते जे बोलत होते ते मी लिहिणं शक्य नाही. कुठलाही 'माणूस' त्याचा उच्चारही करू शकत नाही. म्हणून त्यांचे नाव जाहीर लिहीत नाही. शेवटी मी त्यांना म्हणलो, ''मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो. तीन पिढय़ांपासून माझं घर वारकर्यांचं घर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतपरंपरेचं धर्मातील अंधश्रद्घा दूर करण्याचं मोलाचं काम करण्यासाठीच मी अ. भा. अंनिसची स्थापना केली. गेली 30 वर्षे ते काम करतो आहे. फक्त कीर्तन माध्यमाचा वापर न करता भाषण माध्यमाचा वापर करतो आहे. मी तुम्हांला, वारकर्यांना बापासारखा समजतो. आपला समजतो. म्हणून माझ्यावतीनं मी खूप तळमळीनं तुम्हांला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जोवर या देशात मुसलमान आहेत तोवर एकही समस्या सुटू शकत नाही. तोवर कोणताही बदल, सुधारणा करता कामा नये असंच तुमचं मत असेल तर आधी या देशातील 22 कोटी मुसलमान मारून टाका. मगच आपण धर्मसुधारणा - अंधश्रद्घा निर्मूलन या विषयासंबंधी बोलू..'' माणसाला सहिष्णुता शिकवणार्या वारकरी संप्रदायाचा एखादा समुदाय एवढय़ा विषारी विचारांचा असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. पण हे सनातनी विचारांचं विष पेरण्याचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि त्यांच्या हाती 'ब्रेन वॉशिंग'सारखं प्रभावी, आधुनिक हत्यार आलं आहे. यासंबंधी नंतर विस्तारानं लिहीनच. पण या बिलासंबंधी मुद्दाम गैरसमज पसरविण्याचं राजकीय कौशल्य कुणाचं? मला पहिल्यांदाच जाहीररीत्या सांगून टाकलं पाहिजे, की भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा 'युवा स्तंभ' चालवत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करून टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी भाजपतर्फे अशोक मोडक या आमदारांना प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात मा.गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंगजी फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल, असं एक मतानं सांगितलं. मा. अशोक मोडक अतिशय आग्रही. पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळं आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळींना महत्त्वाचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळं या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात, ''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द, त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्याची जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2005 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितली. सुरुवातीस आ. लोढा माझ्याशी बोलण्यास तयारच होईना. सनातन्यांनी त्यांना एवढं भडकवलं होतं, की ते मला बहुधा राक्षस (मानव नाहीच) समजत असावेत. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले, ''मानव, हे तर फारच चांगलं बिल झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्ही धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठीच या बिलात काही तरी टाका. चांगल्या धार्मिक रूढी-परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी..'' मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. 'या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्या कोणत्याही चांगल्या रूढी-परंपरेचा समावेश नाही' अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्यांचं 13 वं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळे आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळं आम्ही गप्प बसलो. 2005 साली 26 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत, बहुमतानं हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं. त्यावर काही भाषणं झाली. त्यात आ. देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आणीबाणी काळातील व माझ्या नागपूर वास्तव्यातील आमचे एक जिंदादिल स्नेही गंगाधर फडणवीस यांचा तडफदार मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीस हा आम्हा सगळ्यांचा कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय. पुढच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी या 13व्या कलमाकडे माझं लक्ष वेधून घेतलं. ते वकीलही आहेत. मी ते 13 वं कलम खूप गांभीर्यानं घेतलं. काय आहे 'ते' कलम? 13. शंका दूर करण्यासाठी याद्वारे उसे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमात एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल (कारण या 12व्या कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही असं व्याख्येत 2 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणार नाही. चांगल्या रूढी-परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे 13 वं कलम समाविष्ट केलं आहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्याकडे गेलो. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे 13वं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. ''भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवतात. मग क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात ते योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.'' एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत, तर अनेक तास माझ्यासोबत बसून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली. पण पुढे म्हणाले, ''पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्या रूढी-परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्या धार्मिक, विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो.'' सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.चंद्रकांत हांडोरेही रिलॅक्स झाले. पण मग ''उद्या आम्ही, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल, शारीरिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करत असलो तर म्हणालं तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल.'' असं कोण म्हणालं? का म्हणालं? वृत्तपत्रात मोठमोठे मथळे बातम्या छापून आल्यानं. असं बिलात कुठेही नसतानाही सनातन्यांच्या खांद्याला खांदा लावून या बिलाच्या विरुद्ध असा गोबेल्सप्रणीत खोटा प्रचार करण्याची सुपारी कुणी घेतली आहे? का घेतली असावी? पाहू पुढच्या शनिवारी. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी : 9371014832 |
Saturday, 14 July 2012
'सनातन'च्या मुखवटय़ांचाच जादूटोणा विधेयकाला विरोध
खरंच या विधेयकात असं काही आहे का? हे विधेयक महाराष्ट्र सरकारचं विधेयक आहे. कोणतं तरी सरकार या पद्धतीचं, चांगल्या धार्मिक आचार-प्रथांना, पंढरपूर वारीसारख्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणणार्या, पुरोगामी महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्या, 700 वर्षाच्या परंपरेला विरोध करणारं विधेयक आणण्याचं धाडस करील का? मग हा विरोध का? गैरसमजावर आधारलेला आहे की वेड पांघरूण पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे? विरोध करणार्या ह्या सगळ्यांचं नेतृत्व 'सनातन संस्था' करते. हिंदू जनजागरण समिती ते वारकरी संघटना हे याच सनातनचे मुखवटे आहेत. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीतील काही कार्यकर्ते महाराष्ट्र, गोव्यात बॉम्बस्फोटासारख्या कृत्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या लोकांनी जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, आवश्यकच आहे. कारण त्यांना या महाराष्ट्रात, देशात पुन्हा सनातन धर्म रुजवायचा आहे. चातुर्वण्र्य पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची नवी धर्मनिरपेक्ष तोंडवळ्याची राज्यघटना निर्माण करून पुरोगामी भारताची मुहूर्तमेढ रोवली. ही सगळी आधुनिकतेकडे, पुरोगामित्वाकडे वाटचाल करणारी चक्र उलटी फिरवून सनातन भारत निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे. मीही जन्मानं हिंदू आहे. अजूनतरी धर्म न सोडल्याने वा न बदलल्याने हिंदूच आहे. त्यामुळं मी प्रत्येक हिंदू आणि इतरही धर्मातील सगळ्या धर्मप्रेमी माणसांना विनंती करतो की, त्यांनी या सनातन संस्थेतर्फे प्रकाशित होणारं 'सनातन प्रभात' दैनिक, साप्ताहिक वाचावं. किमान वर्षभराचे अंक चाळावेत म्हणजे याचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येईल. यांचा भुताखेतांपासून, मंत्रतंत्रादी सगळ्याच अंधश्रद्धांवर विश्वास आहे. नव्हे, ते या सगळ्या प्रकारांचा प्रसार-प्रचार करतात; पण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं या गोष्टी सिद्ध करण्याचं 15 लाख रुपयांचं आव्हान आहे. ते मात्र स्वीकारून भूत, मंत्रतंत्र सिद्ध करण्याचं धाडस दाखवीत नाहीत. महाराष्ट्र सरकारनं खरंतर आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून सगळी माहिती गोळा केली तर यांच्या विरोधामागचं कारणंही सरकारला कळून येईल आणि मग त्यांच्या विरोधाला भीक घालण्याची गरज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना वाटणार नाही. हे खरं आहे की, जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सगळ्यात मोठा आघात 'सनातन संस्था-सनातन प्रभात' यांच्यावर होणार आहे. कायदा लागू झाल्यापासून त्यांना एकतर आमूलाग्र बदलावं लागणार आहे अथवा सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे. पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात? त्या वेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे. 16 डिसेंबर 2005 साली ते विधानसभेत, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते अडकले. आता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या नावात बदल केला. बाकी विधेयक जसेच्या तसे आहे. सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासोबत मला मिळाली. ना. हांडोरे, त्यांचे खाजगी सचिव मिलिंद शंभरकर आणि मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे. अनेकांना वाटतं हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे; पण गेल्या 30 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा प्रभावी विधेयक तयार करणं शक्य नाही. पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर फलज्योतिषापासून तर परामानसशास्त्रीय दावे करणार्यांपर्यंत सारे या विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हतं. कारण अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्या सारख्या कार्यकत्र्यांनी, प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे, पण राज्य सरकारनं जिथे माणसांची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे. याचं नीट भान ठेवून सध्याचं प्रारूप तयार झालं आहे. सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे,''महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2011''. अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी याचा अर्थ काय? 2. ख.नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात जोडलेली 12 कलमं म्हणजेच ''अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी.'' या बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही. अशी अपवादात्मक व सोपी सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं. सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय, अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात, पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. परिशिष्टातील 12 कलमासंबंधी कृती घडली की संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्यासही एवढीच कठोर शिक्षा आहे. शिवाय हा अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल. पण अपराध काय? परिशिष्टातील ही 12 कलमे वाचा 1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने, बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे. (भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही.) 2. एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे, फसविणे, ठकविणे, दहशत बसविणे. 3. जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन देणे, सक्ती करणे. 4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे. 5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे. (केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही.) 6. एखादी व्यक्ती करणी करते, काळी विद्या करते, भूत लावते, जनावरांचे दूध आठविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविते, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे. 7. करणी, चेटूक केले या सबबीखाली मारहाण करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे. 8. भुतांची भीती घालणे, शारीरिक इजा भुतामुळे झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र-अघोरी उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे. 9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे सारखे उपचार करणे. (कुर्त्यावर अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू शकतो.) 10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग बदलवितो असा दावा करणे. 11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. 12. मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय करणे. आता या बारा कलमात विरोध करण्यासाठी काय आहे? कुणीतरी सुबुद्ध माणूस याला विरोध करणं शक्य आहे का? ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे. मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला आधार काय? (क्रमश:) (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Saturday, 7 July 2012
भोंदूंना सारे मिळून धडा शिकवू या!
खूप मेहनतीनं, प्रयत्नपूर्वक, दीर्घकाळाच्या तपश्चर्येनं स्वत:चं व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदललं. पुढे 14-15 वर्षे वेगवेगळय़ा वृत्तपत्रांचे 'युवा स्तंभ' चालवीत असताना आणि 1982 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे ही चळवळ चालवीत असताना हजारो युवक-युवतींचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हजारो व्यक्तिमत्त्वांना आकार आला. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या वेगवेगळय़ा, जगभर चालणार्या विविध पद्धतींचा, प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला. हा विषय खूपच मोलाचा वाटल्यामुळं नागपूरचा मुक्काम हलवून मी मुंबईत 1990 साली राहायला गेलो. तिथून 1991 सालापासून महाराष्ट्रभर 'व्यक्तिमत्त्व विकासा'ची कार्यशाळा चालवतो आहे. 1990-91 साली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा इंग्रजी भाषेतूनच चालत. पंचतारांकित वा मोठय़ा, महागडय़ा हॉटेलमध्ये त्यांचं आयोजन करून भरमसाठ फी आकारली जात असे. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक, इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी. पण सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचवता यावा म्हणून मुद्दाम मराठी भाषेत, कमी खर्चात ही कार्यशाळा हजारो लोकांपर्यंत पोहोचवली. त्यातून हजारो माणसांचं व्यक्तिमत्त्व घडताना अनुभवलं. सोबत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरूच होतं. बुवाबाजीविरुद्धची लढाई सुरूच होती. आज ही समाजातील बुवाबाजी उघड पद्धतीनं व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात शिरल्यामुळं मनाला प्रचंड वेदना होतात. म्हणूनच या बुवाबाजीविरुद्ध दंड थोपटून उभं राहण्याचा, या बुवाबाजांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्याचाच दृष्य परिणाम स्नेह देसाई, दत्ता घोडे यासारख्यांना जाहीर आव्हानं टाकणं, त्यांच्याविरुद्ध निदर्शनं आयोजित करून निषेध करणं हे मार्ग अनुसरावे लागले. स्नेह देसाई तर पळून गेला. पण दत्ता घोडेनं नागपूरच्या हिंदी मोरभवन समोर आमची निदर्शनं सुरू असतानाच (त्याची कार्यशाळा सुरू होण्याच्या वेळी) फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. नंतरही एक दोन वेळा फोनवरून संपर्क साधला. ''सर मी तुमचा विद्यार्थी. पुण्याला आपण प्रत्यक्षही भेटलो आहे. स्नेह देसाईंसारखे लोक असेच थर्डआयसारखे दावे करतात. त्यामुळं कार्यशाळांना लोक गर्दी करतात. मोठा व्यवसाय होतो. म्हणून इतरांसारखाच मीही टेलिपॅथीचा दावा केला. माझी चूक झाली. पुन्हा असं करणार नाही. मी आता काय करू? तुम्हीच सांगा. माझं खूप आर्थिक नुकसान झालं. पण तुम्ही म्हणाल तसं करेन. आपले कार्यकर्ते कार्यशाळेत येऊन तर काही करणार नाही ना?'', दत्ता घोडे काकुळतीनं मला सांगत होता. मी त्याला स्पष्टच शब्दात सांगितलं, ''व्यवसाय चालावा म्हणून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली असलं खोटंनाटं सांगून लोकांना फसवण्यापेक्षा सरळ बाबागिरीचा धंदाच सुरू कर ना?'' ''मग तर तुम्ही मला मुळीच सोडणार नाही,'' त्यावर घोडेचं उत्तर. 29 जूनला, शुक्रवारी आम्ही दत्ता घोडेविरुद्ध निदर्शनं केली आणि त्याच दिवशी रात्री श्रीमती छाया सावरकर, सुरेश सुरमुरे, प्रशांत सपाटे यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दत्ता घोडेविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. रविवार 1 जुलैला दत्ता घोडेचा फोन आल्यावर त्याला स्पष्टच सांगितलं; ''तूच म्हणतो की मी तुमचा विद्यार्थी आहे. मग मी एवढं वैज्ञानिक पद्धतीनं तुला शिकवलं असताना, एवढे धादांत असत्य दावे तू केले आहेस. तुझ्यापुढे दोनच पर्याय आहेत. एक तर आमचं 15 लाखांचं आव्हान स्वीकारून तुझ्यात टेलिपॅथीची (म्हणजे दूर अंतरावरच्या माणसाच्या मनाशी बोलणे, त्याचे विचार आपोआप ओळखणे) क्षमता आहे हे सिद्ध करणे. नाहीतर जनतेची जाहीर माफी मागणे. त्यासाठी तू नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घे. माझ्यात टेलिपॅथीची क्षमता नाही. अशी शक्ती कुणाला प्राप्त करता येत नाही. मी खोटा दावा केला होता. पुन्हा असं करणार नाही, अशी स्पष्ट कबुली देऊन त्या प्रेस कॉन्फरन्समधल्या निवेदनाची एक प्रत जोडून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला व सीताबर्डी पोलीस स्टेशन नागपूरला माफीनाम्यासह एक विनंतीपत्र दे. प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. तुलाही आम्ही देतो.'' सोमवारी दि. 2 जुलैला मी हे सारं करतो असं दत्ता घोडे म्हणाला, मला कबूल केलं. मला वाटलं खरंच हा तसं करेल. पण दत्ता घोडेचा मंगळवारी, 3 जुलैला फोन आला, तो धुळय़ावरून. ''सर मी धुळय़ाला आलो. मी इथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू का?'' म्हणजे दत्ता घोडेला गांभीर्य नाही. इतकी वर्षे आपण लोकांची फसवणूक केली त्याची खंत नाही. नागपूरला केलेल्या फसवणुकीची कबुली धुळय़ाला देऊ का असं म्हणतो? म्हणजे फक्त वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे. फसवून पैसे कमावण्याची चटक लागल्यानंतर प्रामाणिक मार्गावर येणं तसं कठीणच. स्नेह देसाई असो की दत्ता घोडे असो यांना धडा शिकवण्याशिवाय पर्यायच नाही. स्नेह देसाईचा सहकारी असणार्याची एक कार्यशाळा नागपूरच्या सेंटर पॉईंटला 7-8 जुलैला आहे. अ. भा. अनिस तर आपलं काम करेलच. पोलीस यंत्रणाही आपलं काम करेल. पण प्रत्येक नागरिकानंही खडसावून जाब विचारला पाहिजे. आता तुमच्या गावात कुणीही व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपॅथी, लेव्हिटेशन (हवेत तरंगणं), मनी अट्रॅक्शन, सिकेट्र, पास्ट लाईफ रिग्रेशन असे दावे करायला लागले तर सरळ त्यांना त्या क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान द्या. आमच्या वतीनं 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्याचे आव्हान द्या. त्यांचे खोटे दावे त्यांच्याच घशात घाला. आव्हान स्वीकारले तर आम्ही आहोतच. मुंबईला पोहोचताच गृहमंत्री आर. आर. पाटलांना भेटून या सगळय़ा फसवणूक करणार्या भोंदूविरुद्ध पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची विनंती करणारच आहोत. आणि ते अँक्शन घेतील याची खात्री आहे. पण आपणा वाचकांचीही जबाबदारी आहेच. असल्या भोंदूंना सारे मिळून धडा शिकवू या! (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत) भ्रमणध्वनी : 9371014832 |
Saturday, 30 June 2012
स्नेह देसाईनंतर आता पोलखोल दत्ता घोडेची!
स्नेह देसाईनंतर आता
पोलखोल दत्ता घोडेची! | ||
नागपुरात आता स्वत:ला डॉ. म्हणवणार्या एका नकली डॉ. दत्ता घोडेची कार्यशाळा होणार आहे. त्याची काही व्याख्यानं वसंतराव देशपांडे सभागृहात झालीत. तो कमी पैशात अद्भुत शक्ती प्राप्त करून देण्याचा दावा करतो. 5500 रुपये भरा माझी कार्यशाळा करा तुमचा 'सिक्स्थ सेन्स' जागृत होतो. त्यामुळं तुम्हाला तुमच्या परिचित माणसाशी तो कितीही दूर असला तरी टेलिफोनशिवाय संवाद साधता येईल, बोलता येईल. एका माणसाचं मन दुसर्या माणसाशी बोलू शकेल. म्हणजेच 'सिक्स्थ सेन्स' जागृत होईल. अंतराची मर्यादा नाही. परदेशातल्या माणसाशीही तुम्हाला (विदाऊट आयएसडी चार्जेस) संवाद साधता येईल, असा दावा या दत्ता घोडेनं केला. हाही माईंड पॉवर ट्रेनर. स्नेह देसाईसारखाच दुसरा एक ठग. यालाही अ. भा. अंनिसनं 15 लाख रुपयांचं आव्हान दिलं. हाही न स्वीकारता पळ काढणार! शनिवारी हा लेख प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी त्याची कार्यशाळा नागपुरात हिंदी मोर भवनात (सीताबर्डी, नागपूर) सुरू होणार आहे. आणि दत्ता घोडेनं आव्हान स्वीकारलं नाही तर अ. भा. अंनिस कार्यशाळेसमोर त्याच्या निषेधासाठी निदर्शनं करणार आहे. अ. भा. अंनिस गेली 30 वर्षे बुवाबाजी, चमत्कार करणार्या बाबांचा, मांत्रिकांचा, देव, देवी अंगात असल्याचा दावा करणार्यांचा, ज्योतिष्यांचा भंडाफोड करते आहे. आजवर हजारो अशा भोंदूंचा पर्दाफाश समितीनं केला आहे. पण अलीकडे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांच्या नावाखाली, सुटबुटटाय घालून, आधुनिकतेचं व वैज्ञानिकतेचं सोंग आणून जुनीच बुवाबाजी धुडगूस घालते आहे. लहानपणापासून मनावर झालेल्या अंधश्रद्धाळू संस्कारांचा फायदा उचलून, विविध आमिषं दाखवून सामान्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे.भगवी कफनी घातलेल्या बाबांपेक्षा हे सुटबुटातले बाबा जास्त घातक आहेत, धोकादायक आहेत, तरुण पिढीला खड्डय़ात टाकण्याचं काम करणारे आहेत. 'व्यक्तिमत्त्व विकास' ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे आधुनिक सुटाबुटातले बाबा त्याचाच फायदा उचलून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली बेमालूमपणे अंधश्रद्धा पेरताहेत व स्वत:ची तुंबडी भरताहेत. म्हणून यांना यांची जागा दाखवणं व यांना गजाआड करणं नितांत गरजेचं आहे. स्नेह देसाई आणि दत्ता घोडे या दोघांचेही दावे सारखेच आहेत. एक 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' म्हणतो, दुसरा 'सिक्स्थ सेन्स' म्हणतो, एवढाच काय तो फरक. देसाई म्हणतो, तुम्ही कुठेही जाऊन सूक्ष्म देहाने पाहू शकता. दत्ता घोडे म्हणतो, तुम्ही इथे राहून कुठेही, कितीही अंतरावरच्या माणसाशी बोलू शकता. पॅरासायकॉलॉजीमध्ये 'अँस्ट्रल ट्रॅव्हल'ला 'क्लेअरोव्हायन्स' म्हणतात. दूर-संवादाला 'टेलिपॅथी' म्हणतात. म्हणून दोघांनाही अ. भा अंनिसनं सारखं आव्हान टाकलं. आम्ही एक सत्य अन्वेषण समिती गठित करू. त्यात नागपुरातले ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्ते असतील. स्नेह देसाई व दत्ता घोडेनं निवडलेल्या एका माणसाला एका बंद खोलीत बसवलं जाईल. या व्यक्तीला सत्य अन्वेषण समिती काही कृती करायला वा बोलायला सांगेल. तो भाग व्हिडीओ रेकॉर्ड केला जाईल. त्याचवेळी स्नेह देसाई वा दत्ता घोडे पत्रकार संघाच्या हॉलमध्ये बसून त्यांच्या माणसानं काय कृती केली वा बोलला हे मेडिटेशनमध्ये जाऊन थर्ड आय जागृत करून वा सिक्स्थ सेन्स जागृत करून सांगावं. तेही व्हिडीओ रेकॉर्ड केलं जाईल. सत्य अन्वेषण समिती दोन्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून निर्णय देईल. जर स्नेह देसाई व दत्ता घोडेला 95 टक्के खरं सांगता आलं तर त्यांचा दावा खरा आहे असं मानलं जाईल. पुन्हा एकदा सेम प्रक्रिया रिपिट केली जाईल. दोन्हीदा 95 टक्के खरं ठरलं तर अ. भा. अंनिसचं 15 लाखांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. पहिल्यांदा त्यांना 95 टक्के खरं सांगता आलं नाही तरी दुसर्यांदा स्नेह देसाई वा दत्ता घोडे यांना संधी दिली जाईल. या पद्धतीचं आव्हान स्नेह देसाईला पाठवलं. त्यानं स्वीकारण्यास नकार दिला म्हणून कोरिअरनं पाठवलं. तेही त्यानं नाकारलं म्हणून ई-मेलनं पाठवलं. दत्ता घोडेला आव्हान प्रत द्यायला कार्यकर्ते गेले. त्याच्या माणसांनी ते घेतलं नाही. दुसर्यांदा गेले तेव्हा स्वीकारत नाही म्हणून त्याच्या माणसांसमोर आव्हान प्रत ठेवून आले. एवढंच नव्हे तर विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने अ. भा. अंनिसनं आयोजिलेल्या 27 जूनच्या 'थर्ड आय किती खरं किती खोटं' या जाहीर कार्यक्रमात दत्ता घोडेलाही स्नेह देसाईसोबतच जाहीर आव्हान दिलं आहे. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. हॉलमध्ये जागा अपुरी पडल्यामुळं अनेकांना परत जावं लागलं होतं. थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, दिव्यशक्ती, सिक्स्थ सेन्स, टेलिपॅथी या सगळय़ा प्रकारांबद्दल मी वा माझी समिती एवढं ठामपणे कसं काय बोलू शकतो? असा प्रश्न आपणास पडला असेल. दिव्यशक्ती, अँस्ट्रल ट्रॅव्हल, क्लेअरोव्हायन्स याचा अर्थ ''व्यक्ती एका ठिकाणी असताना त्याचा देह तिथेच राहतो. पण सूक्ष्म देहानं वा अन्य शक्ती मार्गानं तो कुठेही जाऊ शकतो, पाहू शकतो. स्वत: डोळय़ानं पाहिल्यासारखं सगळं त्याला दिसतं,'' असं मानलं जातं. कुठेही याचा अर्थ क्षणात, जगात कुठेही अमेरिकेत, हिमालयात कुठेही. टेलिपॅथीचा अर्थ कितीही अंतरावर दोन माणसं असली तरी त्यांना कोणत्याही अस्तित्वात असलेल्या माध्यमांशिवाय संवाद साधता येतो. मन मनाशी बोलू शकतं. या दोन्ही समजुती वा कल्पना जगभर अस्तित्वात होत्या. आध्यात्मिक शक्तीमुळं काही लोकांना, योग्यांना, साधूंना या प्रकारची क्षमता वा शक्ती प्राप्त होते अशी मान्यता होती. माझं पंचवीस वर्षांपर्यंतचं आयुष्य आध्यात्मिक वातावरणात गेलं आहे. मला स्वत:ला या सगळय़ा शक्तींविषयी प्रचंड जिज्ञासा होती. खूप अभ्यास केला. विनोबा भावेंसारखा योगी जवळून पाहिला, अनुभवला. अनेक पोहोचलेल्या (म्हणजे आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालेल्या) बाबांच्या नादी लागलो. पुढे या विषयाचा जमेल तेवढा अभ्यास केला. पण काही सापडेना. मी पुण्याच्या किलरेस्कर प्रेसमध्ये पत्रकाराची नोकरी करायला लागल्यावर 80-82 सालात विज्ञानवादी विचारांचा परिचय झाला. अभ्यासाचा परीघ वाढला आणि पुढे कळलं, आपण ज्याचा शोध घेतो आहे त्या विषयांवर शास्त्रशुद्धरीत्या संशोधन झालं आहे. अमेरिकेमधील डय़ूक युनिव्हर्सिटीमध्ये एक पॅरासायकॉलॉजी (परामानसशास्त्र) डिपार्टमेंट होतं. डॉ. जे.बी. र्हाईन यांच्या नेतृत्वाखाली तिथे सगळय़ा आध्यात्मिक शक्तींबाबत संशोधन सुरू झालं. त्यांनी या सगळय़ा शक्ती तपासण्याची एक शास्त्रशुद्ध अचूक मेथड (पद्धती) वापरण्याची शिस्त निर्माण केली. डॉ. र्हाईन यांच्यानंतरही संशोधन सुरू राहिलं. अशा पद्धतीची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स जगभर सुरू झाली. त्यातही संशोधन होत राहिलं. आत्मा, पुनर्जन्म, दिव्यशक्ती, टेलिपॅथी, सिक्स्थ सेन्स, क्लेअरोव्हायन्स, इन्टय़ुशन, सायकोकायनेसिस (नजरेनं चमचा वाकवण्याची क्षमता) या सगळय़ांवर दीर्घकाळ संशोधनं सुरू होतं. अमेरिकेतील डय़ूक युनिव्हर्सिटीतील संशोधनांवर हजारो कोटी खर्च झालेत. पण 75 वर्षांत एकही गोष्ट सिद्ध होऊ शकली नाही. म्हणून हे पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट बंद करण्यात आलं. हळूहळू जगभरची पॅरासायकॉलॉजी डिपार्टमेंट्स बंद पडलीत. जी सुरू आहेत त्यांना वैज्ञानिक जगतात मान्यता नाही, प्रतिष्ठा नाही. या गोष्टी खर्या नाहीत हे निर्विवादपणे सिद्ध झालं आहे. अमेरिकन मिल्ट्री व रशियन मिल्ट्रीनंही अशा संशोधनांवर खूप खर्च केला. पण काहीच मिळालं नाही. एक जरी दिव्यशक्ती असणारा माणूस मिळाला असता तर 26/11 चा मुंबईवर होणारा अतिरेकी हल्ला, (किमान अतिरेकी जहाजात बसल्यावर तरी) आधीच कळला असता. आपलं सैन्य, पोलीस दल समुद्रकिनार्यावर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीत राहिलं असतं. काही मिनिटांत 10 अतिरेकी मारले गेले असते आणि आमचे मित्र, एटीएसचे प्रमुख पोलीस अधिकारी हेमंत करकरे मारले गेले नसते.बिन लादेनला शोधण्यासाठी व मारण्यासाठी करोडो डॉलर्स व अनेक वर्षे वाया घालवावे लागले नसते. एक स्नेह देसाई व दत्ता घोडे.. खरंच यांच्यात अशी शक्ती असती तर पोलीस खात्याचं कामच सोपं झालं असतं. नागपुरातील मोनिकाचे मारेकरी शोधण्यासाठी नागपूर पोलिसांना जंग जंग पछाडावं लागलं नसतं. बस्स, यांच्या दिव्यशक्तीनं, 'सिक्स्थ सेन्स'नं तत्काळ शोध लागला असता. आपण असे दिव्यशक्तीवाले स्नेह देसाई त्यांचे चेले पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस खात्यात अधिकृत नेमले असते. एकही चोरी, एकही खून केस अनसॉल्व्हड राहिली नसती. 100 टक्के केसेस सोडवण्याचा पोलीस रेकॉर्ड निर्माण करता आला असता. पण हे शक्य आहे? भंपक स्नेह देसाई नामक बाबा कार्यशाळेत म्हणाला, ''हे अंनिसवाले काय मला 15 लाख देतात? मीच त्यांना 15 करोड रुपये देऊ शकतो. माझ्याजवळ करोडोंची संपत्ती आहे.'' लोकांना खोटी लालूच दाखवून, लुबाडून कोटय़वधी रुपये कमावणार्या ठग देसाईची मस्ती, माज उतरवण्याची वेळ आली आहे. गणेशपेठ पोलीस चौकीत स्नेह देसाईविरुद्ध दोन लोकांनी तक्रार केली आहे. नागपूरचे पोलीस कमिश्नर अंकुश धनविजय यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवलं आहे. स्नेह देसाईंकडून फसवल्या गेलेल्या लोकांनी हिंमत दाखवून, तक्रार करण्यास पुढे यावं आणि नागपूरचं पोलखोल शहर नावाची प्रतिष्ठा राखण्यास मदत करावी. पुढचा नंबर दत्ता घोडेचा आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत ) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Thursday, 28 June 2012
दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा
दिव्य दृष्टी : लोकांना फसविण्याचा धंदा
पुन्हा आठ दिवसांनी याच पद्धतीचा आरोप त्यानं केला. या वेळी मी हिरवा गाऊन घातला होता अन् माझ्या प्रियकरानं पांढर्या रंगाचं शर्ट घातलं होतं असं सांगून आम्ही कशी रतिक्रीडा करत होतो याचं साद्यंत वर्णन करू लागला. जणू काही बेडरूममध्ये उभा राहून तो सारं पाहतो आहे. पुन्हा कडाक्याचं भांडण.. हे सारं खोटं आहे म्हटल्यावर त्यानं माझ्या अंगावर हात टाकला. मला खूप मारलं. ती काकुळतीनं सांगत होती, ''सर, हे सारं खोटं आहे हो! मी असं काही केलं नाही. माझा कुणी प्रियकर नाही. लग्नाला दोन वर्षे झाली. आता अचानक हे असं का करतात? माझ्यावर कां खोटा आळ घेतात?'' मुलगी अगदी प्रामाणिकपणे बोलत होती. इतक्या वर्षाच्या अनुभवाच्या आधारे ती खरंच बोलते आहे हे माझ्या लक्षात येत होतं. मी तिला समजावू लागलो. काही माणसं संशयापायी एवढी पछाडली जातात, की मनात आलेली शंका त्यांना खरीच वाटायला लागते. कधीकधी हा आजार बळावला तर त्यांना तशी दृश्येही दिसायला लागतात. आम्ही याला 'पॅरोनिया', 'संशयपिशाच' म्हणतो. तो पेशंट आहे असं समजून त्याला वागवावं लागेल. प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागेल. मी समजावून सांगितलं. बहीणभाऊ पोलिसांकडे तक्रार करणार होते. त्यापासून त्यांना परावृत्त केलं. बहिणीने जाता जाता मला विचारलं, ''सर, मेडिटेशनमुळं असं होतं कां? माझा नवरा म्हणतो, मी प्रत्यक्ष पाहिलं. मला दिसतं. कुठलंही मी पाहू शकतो. कुणा गुजरातच्या देसाईचा मेडिटेशन कोर्स माझ्या नवर्यानं केला आहे.'' ''मेडिटेशनमुळं असं होत नाही. असं होत नसतं.'' असं सांगून मी त्यांना पाठवलं. पण त्यांचे वाद वाढतच गेले. त्यांना वेगळं होणं भाग पडलं. माझ्या विद्यार्थ्यानं पुढे मला माहिती पुरवली त्याच्या बहिणीनं वैतागून घटस्फोट द्यायचं ठरवलं. 14 जूनला नागपूरच्या देशपांडे सभागृहात अहमदाबादच्या माइंड पॉवर ट्रेनर स्नेह देसाईचा कार्यक्रम झाला. माझे काही कार्यकर्ते ऐकायला गेले होते. त्यात देसाईनं दावा केला, ''माझा दोन दिवसांचा वर्कशॉप केल्यानंतर मेडिटेशनद्वारे 'थर्ड आय'ची शक्ती जागृत होते. ('अँस्ट्रल ट्रॅव्हल' असंही त्याला म्हटलं) त्याद्वारा तुम्ही नागपुरात असताना तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी दिल्लीत वा कुठेही असले तरी तुम्ही त्यांना पाहू शकता. ते त्या वेळी काय करताहेत, त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत वगैरे सारं तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.'' 16-17 जून रोजी नागपुरात झालेल्या वर्कशॉपमध्ये स्नेह देसाईनं मेडिटेशनमध्ये सूचना दिली, ''आता तुम्ही शरीराच्या बाहेर आला आहात. स्वत:ला पाहता आहात.. तुम्हांला आता जिथे जायचं आहे तिथे जा.. पाहा'' आणि मग काही लोकांनी घरी जाऊन पाहिलं. कुणी दूरवरच्या गावी जाऊन पाहून आले. काहींनी परदेशात मित्र-नातेवाईक काय करतात तेही पाहिलं. नंतर त्यांचे अनुभव रेकॉर्डही केलेत. काय प्रकार आहे हा? मी गेली 22 वर्षे हिप्नोथेरपी, संमोहन उपचार शिकवतो. सुरुवातीस प्रामुख्यानं मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, सोशलवर्कर्स यांना शिकवत आलो. पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर विविध प्रकारे संमोहनाचे प्रयोग करून पाहिले आहेत. सर्वसाधारणत: सुशिक्षित लोकांपैकी 60 ते 70 टक्के लोक डीप-मेडियम ट्रान्समध्ये जाऊ शकतात. त्यांना सहज व्हिज्युअलाजेशन होतं. डोळ्य़ांपुढे चित्रमालिका उभी राहते. म्हणजे या अवस्थेत जी कल्पना मनात करतात अथवा त्यांना सांगितलं जातं ते प्रत्यक्ष दिसू लागतं. अगदी स्पष्ट-स्वच्छ दिसतं. डोळे बंद असताना उघडय़ा डोळ्य़ांनी पाहिल्यासारखं सारं दिसतं. पण हे सारं काल्पनिक असतं. खरं नसतं. ही मानवी मनाबाबत सहज घडून येणारी गोष्ट आहे. या व्हिज्युअलाजेशनच्या मानवी मनाच्या, सामर्थ्याचा उपयोग संमोहन उपचारांमध्ये रोगदुरुस्तीकरिता व्यक्तिमत्त्वविकासाकरिता केला जातो. चलाख स्नेह देसाई बुवांनी हे तेच (पुण्याला मेडिटेशन शिकविणारे ते देसाईबाबा हेच आहेत हे आता मला कळलं.) व्हिज्युअलाजेशनचं सामर्थ्य म्हणजे थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल असल्याचं सांगून तुम्ही दोन दिवसांत 'दिव्य दृष्टी' प्राप्त करू शकता असं सांगून चक्क लोकांना फसविण्याचा धंदा सुरू ठेवला आहे. ही केवळ मनाची कल्पना असते ही वस्तुस्थिती न सांगता तुम्ही सूक्ष्म देहानं कुठेही जाऊन पाहू शकता असं हा स्नेह देसाई नामक भंपक बाबा सांगतो. भारतीय संस्कारात वाढलेला माणूस 'दिव्य दृष्टी'च्या या सिद्धान्तावर चटकन विश्वास ठेवतो अन् भरपूर पैसे भरून स्वत:ला फसवून घेतो. माझ्या विद्यार्थ्याच्या बहिणीच्या त्या नवर्यानं पुण्यात स्नेह देसाईची कार्यशाळा केली. त्याची थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हलची शक्ती जागृत झाली अशी त्याची समजूत झाली. दुकानात असताना मेडिटेशनमध्ये जाऊन तो घरी बायको काय करते हे पाहू लागला. (त्याला वाटू लागलं आपण घरी जाऊन सूक्ष्म देहानं खरंच पाहतो आहे.) त्याला त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत रतिक्रीडा करताना दिसू लागली. त्याच्या मनात जशी कल्पना येईल तसं दिसेल. हा सारा मनाचा खेळ. पण त्यांच्या भंपळ बाबानं, स्नेह देसाईनं तर सांगितलं होतं, की तुम्ही सूक्ष्म देहानं प्रत्यक्ष जाऊन पाहता. मग दिसतं ते सारं खरंच असं त्याला वाटू लागलं. त्या वेळी त्या मुलीला मी पोलीस तक्रारीपासून परावृत्त केलं याचं वाईट वाटतं. मारहाणीच्या केसमध्ये तिच्या नवर्याच्या जबाबात देसाईच्या 'थर्ड आय'चा उल्लेख आला असता.. आणि.. पण मेडिटेशनच्या नावाखाली एवढा खोटारडेपणा करणारा स्नेह देसाईंसारखा एखादा ट्रेनर असू शकतो हे त्या वेळी मला माहीत नव्हतं. म्हणूनच आता आपण त्याला 15 लाखांचं आव्हान टाकलं आहे. 'थर्ड आय' सिद्ध करा, 15 लाख रु. जिंका! नाहीतर जनतेची माफी मागा! (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत ) भ्रमणध्वनी : 9371014832 |
रागाने पाहण्याचा परिणाम
रागाने पाहण्याचा परिणाम
रागाने पाहण्याचा परिणाम
| ||
हे सारे आपल्या मनाचे खेळ. वेगवेगळ्य़ा प्रसंगांत प्रकट झालेले, शब्दरूप घेऊन अवतरलेले. पण मन म्हणजे काय? हृदय, हार्ट माहीत आहे. शरीरात पाहता येतं. तपासता येतं. त्याची धडधड, फडफड जाणवते. मोजता येते; पण ते मन नव्हे. हृदय रक्ताभिसरणाचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. रक्त शुद्धीकरणाचं पम्पिंग स्टेशन आहे. अजूनही हृदयावर हात ठेवून 'ये मेरा दिल तेरेही लिये धडक रहा है,' असं म्हणत असलो तरी प्रेम जाणवणारं, करणारं मन म्हणजे हृदय नव्हे. मग मन म्हणजे काय? 1986-87 सालची गोष्ट. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू करून पाच-सहा वर्षे झाली होती. एस. एम. जोशी, यदुनाथजी थत्ते यांचे सहकारी चंद्रकांतजी शहा, ते आंतरभारतीचं देशभराचं काम पाहत असत. यांच्यासमवेत उत्तर प्रदेश दौर्यावर जात होतो. उत्तर प्रदेश सरकारनं सातव्या वर्गापर्यंतच्या शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरं आयोजिली होती. शिक्षकांसमोर 'अंधश्रद्धा निर्मूलन' हा विषय मांडावा म्हणून सुमारे दोन महिने कालावधी काढून मला जावं लागलं. त्या काळात लाखभर शिक्षकांचं प्रशिक्षण होणार होतं. तिसर्या वर्गाच्या स्लिपर कोचमध्ये आमचं आरक्षण होतं. आगगाडीनं उत्तर प्रदेशात प्रवेश केला. आरक्षणाला काहीच अर्थ उरला नव्हता. कुणीही शिरत होतं. धड बसायला पण जागा शिल्लक नव्हती. नव्या स्टेशनावरून चार-पाच आडदांड तरुणांचं टोळकं शिरलं. सहा फुटांपेक्षा अधिक उंच असणार्या, एका प्रचंड देहपठरी असणार्या, तरुणानं माझ्या शेजारच्या 6 इंच रिकाम्या जागेत अचानक बसकन मारली. मी त्या वेळी खूप बारका होतो. माझी सारी हाडं चेपली. बरगडय़ा प्रचंड दुखावल्या. मी खूप रागानं त्या धटिंगण तरुणाकडे काही वेळ पाहिलं. कदाचित माझे डोळे रागानं लालबुंद झाले असावेत. 15-20 सेकंद रोखून पाहिलं असावं. बस्स..! रागारागात उठलो आणि चंद्रकांत शहा बसले होते तिथे जाऊन कशीबशी जागा मिळवून बसलो. हे उत्तर प्रदेश होतं. इथे नियम-कायदा याला काही अर्थ नसतो हे मला माहीत होतं. भांडण्यात काहीच अर्थ नव्हता. 20-25 मिनिटांनंतर तोच धटिंगण तरुण माझ्याकडे आला. खूप रडवेला वाटत होता तो. अगदी आर्जवी आवाजात मला म्हणू लागला, ''साहबजी, मुझे माफ करो. मुझसे गलती हुई. मैने आपको पहचाना नहीं? आपने जो कुछ किया प्लिज उसे वापस लो.'' मला कळेना तो काय बोलतो आहे ते. पण त्याचा व्याकूळ स्वर पाहून, ऐकून मी अधिक निरखून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा लाल-काळाठिक्कर दिसत होता. घामानं थबथबला होता. त्याचे चारही सहकारीसुद्धा खूप घाबरलेले दिसत होते. मी विचारलं, ''क्यों? क्या बात है?'' ''साहबजी, मुझे बहुत अस्वस्थ लग रहा है! जब से आपने मेरी आँखों में देखा तब से धडकने तेज चल रही है (उलटी) आने जैसा लगता है! मै बार बार टॉयलेट जा रहा हूँ। लेकिन कै भी नहीं हो रही! और मै छटपटा रहा हूँ! मेरी पुरी जिंदगी में ऐसा बुरा अनुभव कभी नहीं हुआं! प्लिज, मुझे क्षमा किजीये! आपने आँखों से जो कुछ किया उसे वापस लिजिये.'' आता थोडासा प्रकाश माझ्या डोळ्य़ांत पडू लागला. हा एवढा पहेलवान, उद्दाम, धटिंगण तरुण एवढा गलितगात्र होऊन समोर उभा राहून विनवण्या करताना पाहून मला एका बाजूनं हंसू येत होतं. दुसर्या बाजूनं कीवही येत होती. मी खूप रागानं एकटक काही काळ त्याच्याकडे रोखून पाहिल्यामुळं मी डोळ्य़ांसमोर त्याच्यावर जादू केली, त्राटक केलं असं त्याला वाटत आहे हे माझ्या लक्षात आलं. मी अगदी सहजपणे उभं राहून त्याच्या खांद्यावर हात टाकला. थोडसं थपथपलं. अत्यंत आश्वासक आवाजात स्पष्टपणे पण प्रेमानं म्हणालो, ''आपको कुछ नहीं हुआ है. एकदम रिलॅक्स हो जाओ! रिलॅक्स.. रिलॅक्स! कुछ नहीं हुआ है। आप पुरी तरह ये स्वस्थ हो, रिलॅक्स हो। एकदम नॉर्मल हो!.'' आणि थोडा वेळ त्याच्या खांद्यावर थपथपत राहिलो. पाहता पाहता मिनिटभरात त्याचा श्वासोच्छ्वास नॉर्मल होऊ लागला. लाल-काळवंडलेला चेहरा रिलॅक्स होऊ लागला. ''आप को कुछ नहीं हुआ है! ऐसा कोई आपका कुछ बिगाड नहीं सकता है। किसी में भी ऐसी शक्ती नहीं होती है। मुझ में भी नहीं है। ये केवल आपका वहम है!'' तीन-चार मिनिटांत महाशय पूर्णत: नॉर्मल झाले. मग आमचा संवाद सुरू झाला. चंद्रकांतजी शहांनी माझा परिचय करून दिला. मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम काय असतं ते त्यांना समजावून सांगू लागलो. लहानपणापासून असेच संस्कार झाल्यामुळं 'माझं रागानं एकटक रोखून पाहणं त्याला त्राटक वाटलं. तो घाबरला. या घाबरल्या अवस्थेत त्याच्या मनानं स्ट्राँग सजेशन घेतलं. आणि लहानपणापासून निर्माण झालेल्या समजुतीमुळं त्यानं झीश-उेपवळींळेपशव र्डीससशींळेपी (आधीच पेरलेल्या समजुती सूचना) स्वीकारून आपली ही अवस्था करून घेतली. त्याला जे-जे होईल असं वाटलं ते-ते त्याला झालं. यात माझा काहीही संबंध नाही. फक्त त्याच्या समजुतीचा संबंध आहे. दुसरं कुणी काही करू शकत नसतं. जादूटोणा, त्राटक, मंत्रतंत्र वगैरे सारं कसं खोटं असतं. त्यासाठी आमचं लाखभर रुपयाचं (त्या वेळी ते 1 लाख रुपये होतं. आता बक्षिसाची रक्कम 15 लाख रुपयांची आहे) आव्हान आहे. ते कुणीही जिंकू शकलं नाही हे समजावून सांगितलं. हा धटिंगण तरुण अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट होता. आणि उत्तर प्रदेशात विद्यार्थी निवडणुका जिंकण्यासाठी 10-20 लोकांचे हातपाय तोडण्याची क्षमता असल्याशिवाय कुणी निवडणूक जिंकू शकत नाही. एरव्ही तो आणि त्याचे सहकारी अत्यंत धाडसी होते. निर्भय होते. पण माझ्या साध्या रागाने पाहण्याचा परिणाम.. खेळ हा सारा मनाचा. पण मन म्हणजे काय? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत ) |
Subscribe to:
Posts (Atom)







