Monday 11 February 2013

प्रेम म्हणजे नक्की काय? खरं प्रेम कशाला म्हणायचं?

प्रेम, ढाई अक्षर प्रेम का. एक अद्भुत अनुभव. एक अवर्णनीय अनुभूती. सार्‍या जगाला वेड लावणारी गोष्ट. सामान्य माणसाकडून अतक्र्य गोष्ट घडवून आणण्याचं कारण. माणसाला जगण्याचा प्रेरणास्नेत ठरणारी तीव्रतर भावना. माणसाला जीवन संपवून टाकण्यास प्रवृत्त करणारी, निराशेचं टोक गाठायला लावणारी असहनीय भावना आणि दुसर्‍याचं जीवनचं संपवून टाकण्यास मजबूर करणारी, अमानुष कृत्याची जन्मदाती विखारी भावना. या सार्‍यांना प्रेमचं म्हणायचं?

प्रियकरानं प्रेयसीच्या बहिणीच्या घरासमोर स्वत:वर सपासप चाकूनं वार करून घेतलेत. खिशात चिठ्ठी सापडली, 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून आत्महत्या करतोय.' काल-परवाची एक बातमी. एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं प्रेयसीचा खून केला. प्रियकरानं प्रेयसीच्या तोंडावर अँसिड फेकले. कॉलेज परिसरात प्रियकरानं प्रेयसीच्या छाताडात सर्वासमक्ष बंदुकीच्या गोळ्य़ा घातल्या. या पद्धतीच्या कितीतरी बातम्या आपण सातत्यानं वाचत, ऐकत आलो आहोत.

निसर्गानंच नर-मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण केलं आहे. जेणेकरून स्त्री-पुरुषांनी एक-दुसर्‍याकडे प्रचंड ओढीनं आकर्षित व्हावं. एक-दुसर्‍यांसोबत प्रणयाराधन करावं. त्यातून अपत्य प्राप्ती व्हावी. माणसाचं मूल खूप परावलंबी असतं. ते स्वत:च्या भरवशावर जगण्यायोग्य बनेपर्यंत मातेनं त्याला सांभाळंलच पाहिजे. नाहीतर ते मरेल. म्हणून निसर्गानंच गर्भवती स्त्रीच्या मनात होणार्‍या बाळाविषयी प्रचंड ओढ निर्माण व्हावी, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या बाळाचं संरक्षण, संगोपन करावं असं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण केलं आहे. निसर्गाच्या या दोन्ही गरजा आहेत. त्यातून दोन प्रकारचं प्रेम. एक वैषयिक प्रेम आणि दुसरं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण झालं आहे.

गुहांमध्ये राहणार्‍या रानटी नर-मादीचं पुढे जाऊन शेती करणार्‍या कुटुंबवत्सल माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं लग्न संस्था निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची गोष्ट' बदलत गेली. नर-मादीनं परस्परांजवळ यावं यासाठी निर्माण झालेलं प्रेम वात्सल्ययुक्त प्रेमाच्या सहवासात उन्नयीत होऊ लागलं. केवळ रतिक्रीडेपर्यंत मर्यादित असणारं नर-मादीमधील प्रेम, बदलून दीर्घकाळ टिकणारं, वात्सल्ययुक्त आणि वैषयिक या दोहोचं मिश्रण असणारं एक नवंच प्रेम उदयास आलं. या नव्या प्रेमाला समाजात, मानवी मनात प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे अधिक सुसंस्कारित प्रेम मानलं जाऊ लागलं.

आणि आजच्या समाजात जन्माला आल्यापासून कथा, कादंबर्‍या, सिनेमा, टी.व्ही. सार्‍या माध्यमातून 'प्रेम एके प्रेम, प्रेम दुने प्रेम' सारखं मनावर आदळत असतं. नैसर्गिक ओढ असतेच. त्यात संस्कारातून सारखं प्रेमाचं प्रोग्रामिंग मनात रुजत असतं. त्यामुळं वयात येताना, आल्यावर जवळपास प्रत्येक तरुण-तरुणी प्रेमात पडते. काही जण अलगदरीत्या नकळत प्रेम जाळ्य़ात अडकतात. आपण प्रेमात केव्हा पडलो हे त्यांना कळतही नाही. काही जणं समजून-सवरून-पाहून समोरचं पात्र आपल्या लायकीचं आहे, नाही याचा विचार करून प्रेमात पडतात आणि काही जण प्रेमात पडल्याचं दाखवतात. मोठय़ा शहरात कॉलेजियन्समध्ये बॉयफ्रेड, गर्लफ्रेड असणं हा स्टेटस् सिम्बॉल झाला आहे. त्यापेक्षा बॉयफ्रेंड नसणं हा फार मोठा 'पराभव' मानला जातो. त्यामुळं किमान दाखविण्यासाठी तरी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असली पाहिजे या अपरिहार्यतेतून प्रेमात असणं गरजेचं झालं आहे.

प्रेमात पडणं जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच प्रेमात आपटणंसुद्धा स्वाभाविक आहे. प्रेमभंग आजही होतात. एकीकडे आजही देवदास निर्माण होतात तर दुसरीकडे कॉलेजच्या 3-4 वर्षाच्या काळात 3-4 प्रेमप्रकरणं होणं, सिरियस अफेअर्स होणं, स्वाभाविक समजलं जाण्याइतपत कॉमन झालंय काही तरुणांच्या जीवनात.

'प्रेम' हा एक शब्द असला तरी त्याची अनुभूती, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. मोठय़ा शहरांनुसार, छोटय़ा गावांनुसारही ती बदलते. वयाच्या 19व्या वर्षापासून मी सामाजिक चळवळीत आहे. 14-15 वर्षे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिकांमधून 'युथ कॉलम चालविले आहेत. युवकांकरता लिखाण केलं आणि गेली 23 वर्षे मुंबईतून व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालविण्याच्या माध्यमात तरुण-तरुणींशी संवाद साधतो आहे. कौन्सिलिंगच्या निमित्तानं त्यांच्या प्रेम समस्या समजून घेतो आहे. पुण्या-मुंबईपासून ते कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरी भागातील युवकांसोबतच छोटय़ा गावातील युवकांनाही समजून घेण्याची संधी माझ्या कार्यशाळांमुळं मला सातत्यानं मिळते. त्यांचं भावविश्व, प्रेमविश्व मी दीर्घकाळापासून समजून घेतो आहे आणि म्हणूनच याही क्षेत्रात आपलं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे असं तीव्रतेनं वाटतं. म्हणूनच या लेखाचा हा प्रपंच. कदाचित कळत-नकळत आणि जाणीवपूर्वकसुद्धा माझ्या आयुष्यात मला सगळ्य़ात जास्त प्रेम, प्रेम समस्या हाताळाव्या लागल्या. प्रेमात पडलेल्या, त्यापेक्षा जास्त प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींना समजावावं लागलं, त्यांचं समुपदेशन करावं लागलं. एक चळवळीचा नेता, वृत्तपत्र-स्तंभलेखक आणि समुपदेशक या तिन्ही नात्यांनी 'प्रेम' या विषयाचा खूप अभ्यास करावा लागला. विचार करावा लागला. शिवाय एक व्यक्ती म्हणूनही या विषयाचा, प्रेमाचा व्यक्तिगत जीवनावर, जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला आहे.

गेल्या चाळीस वर्षात तीन पिढय़ांना मी 'प्रेम' करताना, जगताना पाहतो आहे. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कशाला खरं प्रेम म्हणावं? कोणतं प्रेम उच्च दर्जाचं? कोणतं प्रेम कनिष्ठ दर्जाचं? कुणाचं प्रेम किती जास्त? कुणाचं किती कमी? खरं प्रेम आहे की फक्त इनफॅच्युएशन, 'आकर्षण' आहे. प्लॅटोनिक प्रेम श्रेष्ठ आणि वासनेनं भरलेलं प्रेम खालच्या पातळीचं समजायचं काय? माणूस आयुष्यात एकदाच प्रेम करतो का? जो एकदाच प्रेम करतो ते खरं प्रेम? जो एकापेक्षा अधिकदा प्रेम करतो ते खरं नाही का? का? एकतर्फी प्रेम अर्थहीन का?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधतोय माणसांची मनं. मला छान कळतात असं खूप लोकांना वाटतं. मलाही कधीकधी तसं वाटतं. माझा मानसशास्त्राचा अभ्यासही चांगला आहे. या सगळ्य़ा प्रश्नांची उत्तरं निश्चित, ठळकपणे देता येणं शक्य नसलं तरी या विषयावर छान 'विचारमंथन' मांडलं जाऊ शकतं. यावर आपण विस्तारानं नंतर चर्चा करूच. पण आज मात्र काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सगळ्य़ाच माणसांना, स्त्री-पुरुषांना, तरुण-तरुणींना, मुला-मुलींना सांगायच्या आहेत. मानव जातीच्या धारणेसाठी, मानवतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते आपण पायदळी तुडवता कामा नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

एक - मानवी जीवनात प्रेम ही एक नितांत सुंदर भावना आहे. खूप हवीहवीशी वाटणारी, सार्‍या जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटणारी भावना आहे. सारं जीवन व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. पण स्वत:चं आणि दुसर्‍याचं 'मानवी जीवन' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असूच शकत नाही. 'सो नो टू डेथ.' मृत्यूला नकार द्या. स्वत:च्या, दुसर्‍याच्या आणि दोघांच्याही. आत्महत्या, खून दोन्हीही नाही.

कितीही प्रेमात पडला, आकंठ बुडाला आणि पुढे, प्रेमभंग झाला तरी.. या प्रेमभंगातून बाहेर पडता येतं. पुन्हा सरसरून जगता येतं. प्रेमाबाहेरही जीवनात खूप काही करण्यासारखं असतं. जीवनातील अनेक क्षेत्रे आपल्या 'डिव्होशनची' वाट पाहत असतात. प्रेमाची ही ऊर्जा त्या कामात टाका. ते काम

फुलून येईल. सरसरून, तरारून उठेल. त्याचा वटवृक्ष निर्माण होईल.

देवदास हा मानवी जीवनातील आदर्श असूच शकत नाही. तो स्वत:ही कधी आनंदानं जगला नाही. त्यानं त्याच्या आई-वडिलांनाही आनंद दिला नाही आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या पारो, चंद्रमुखींनाही कधी आनंदानं जगू दिलं नाही. देवदास हा केवळ पराभूतांचा, षंढांचा, कर्तृत्वहीनांचाच आदर्श असू शकतो. त्याचं दाढी वाढवणं, त्याचं दारू ढोसणं, हाय चंद्रमुखी, हाय पारो म्हणत म्हणत, टाचा घासत घासत उसासे सोडणं सारंच त्याज्य आहे, नाकारणीय आहे.

दोन - एकदा प्रेमात पडल्यावर, दोघांनीही प्रेमात पडल्याची कबुली दिल्यावर ते आयुष्यभर निभावलंच पाहिजे असा एक अलिखित नियमच प्रेम विश्वास निर्माण झाला आहे. हा नियम उत्तम असू शकतो, उत्तम आहे. पण.. नाहीतर धोका, बेवफाई हे लेबलही योग्य नाही. सुरुवातीस दोन पात्र एक-दुसर्‍यांना भेटतात तेव्हा सारंच नवं असतं. वरवरचं असतं. कदाचित एक-दुसर्‍यांची खरी ओळख पटण्याआधीच दोन वरवरचे मुखवटे एक-दुसर्‍याच्या प्रेमात पडतात. जसजसे जवळ येतात, काळ पुढे सरकतो, तसतसे मुखवटे गळून पडतात. आतला खरा माणूस बाहेर येतो. भारतीय समाजात या मुखवटय़ांचं प्रमाण खूपच जास्त आहे. कदाचित मुखवटय़ाआड दडलेला 'खरा माणूस एकदम वेगळाच आहे' असं नंतर लक्षात आल्यावर ते प्रेम सुरू राहणं शक्यच नसतं. अशावेळी एखाद्यानं माघार घ्यायचं ठरवलं तर तसं करण्याचा त्याला तिला अधिकार आहे हे आपण समजून घ्यायला हवं. असं समजून घेणं सोपं नाही. 'दिल टूटता है, टुकडे टुकडे होते है, हृदय छिन्न-भिन्न होतं.' हे सगळं मला कळतं. तरी ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो त्याच्या माघारी फिरण्याच्या निर्णयाचा आपण मनापासून सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. त्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. कोणत्याही प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल न करता त्या व्यक्तीला जाऊ द्यायला हवं. व्यभिचारी, बेवफा म्हणणं, तोंडावर अँसिड फेकणं, तिची येनकेन प्रकारे बदनामी करणं, तिचं जीवन असह्य होईल असं आपण वागणं हा आपण करत असलेल्या प्रेमाचाच अपमान आहे हे समजून घेतलं पाहिजे.

त्यानंतरही सामान्य मैत्री ठेवायची की नाही हा मात्र तुमचा अधिकार आहे. एकदा तुमच्या प्रेम पात्रानं नाही म्हटल्यावर सामान्य मैत्रीसुद्धा न ठेवता, कायमचे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात, तुम्हाला स्वत:ला वाचविण्याचा, मनाला कमीत कमी जखमा होतील याप्रमाणं वागण्याचा पुरेपूर अधिकार आहे. एकतर्फी प्रेमही तेवढंच खरं असतं. पण.. पुढे पाहू.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

3 comments:

  1. ajchya pidila tumchya sarkhya margadarshkachi garaj ahe sir.tumche lek mitranna share karnya sarkhe ahet.

    ReplyDelete
    Replies
    1. @Nilesh:
      एकदम खर बोललात निलेश तुम्ही.
      आजच्या पिढीला श्याम सरांची खुपच गरज आहे.:)

      Delete
  2. Aayushya sodala tar sagala vikat gheta yeta.... man-bharun jagun ghya mitranno....
    -Rp

    ReplyDelete