Monday 14 January 2013

बलात्कारास प्रोत्साहन देणारी मानसिकता विकृत

भारताची राजधानी दिल्ली येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणाने सारा देश ढवळून निघाला आहे. सर्वसामान्यांच्या विशेषत: तरुण-तरुणींच्या तीव्र सक्रिय प्रतिक्रिया एक नवा इतिहास निर्माण करताहेत. कोणत्याही सहृदय, संवेदनशील माणसाचं मन पिळवटून टाकणारी ही घटना आहे. आपल्यातला 'माणूस' अस्वस्थ करणार्‍या या घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

यावर केल्या जाऊ शकणार्‍या उपायांचा, सूचनांचा पाऊस पडतो आहे. बलात्कार्‍याला फाशी द्या, त्याला नपुंसक करा, कायदा कडक करा इत्यादी सूचना, उपाय सुचविले जाताहेत. कायदा कडक झाला पाहिजे. बलात्कारी पुरुषाला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे. एवढी कडक शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा दुसरा कुणी बलात्कार करण्यास धजावणार नाही. असं घडावं याविषयी दुमत असण्याचं कारण नाही.

बलात्काराचं, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही कारणानं, कोणत्याही काळी समर्थन होऊच शकत नाही. कुणीही सहृदय माणूस बलात्काराचं समर्थन करण्यास, धजावणारचं नाही हे खरं असलं तरी बलात्कार होतात का होतात? यामागच्या मनोवृत्तीचा, मानसिक कारणांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू या. एबीपी माझा या वृत्तवाहिनींनं आयोजिलेल्या बलात्कार या विषयावरील एका चर्चात्मक कार्यक्रमात गेल्या पंधरवडय़ात मी सहभागी झालो होतो. त्या वेळी काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात आल्या. यानिमित्तानं काही महत्त्वाच्या बाबींकडे, इतिहासाकडे लक्ष वेधून घेण्याची गरज वाटते.

1975 साली 25 जूनला 'आणीबाणी' घोषित झाली आणि 27 जूनला आम्ही काही सहकारी वर्धा जेलमध्ये कोंबले गेलो. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष इथापे हे तीन विद्यार्थी वगळता बाकी 900 कैदी हे गुन्हेगार होते. अनेक अट्टल गुन्हेगार होते. त्यात एक गोरा गोमटा, उंचपुरा, स्मार्ट कैदी होता. पुलगाव सैनिक कॅम्पमधील एक माजी सैनिक पण अख्ख्या जेलमधील एकही कैदी त्याच्याशी बोलत नसे, संपर्क ठेवत नसे. सारे त्याच्याशी अत्यंत तुच्छतेनं वागत असत. पुढे कारण कळलं. त्यानं त्याच्याच ऑफिसरच्या बायकोवर बलात्कार केला आहे. म्हणून सार्‍या कैद्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता.

पुढे अनेक कैदी मित्र झाले. त्यांच्या अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली. तेव्हा कळले की गुन्हेगारांचीसुद्धा एक मूल्यव्यवस्था असते. चोर, दरोडेखोर, खुनी माणसंसुद्धा बलात्कारी गुन्हेगाराला 'गया गुजरा', 'एकदम हिणकस,' हमारे साथ बैठने लायक नही' समजतात. हे कळल्यावर एका बाजूनं आश्चर्य वाटलं; पण दुसर्‍या बाजूनं फार बरं वाटलं. असाच प्रसंग आता घडला. दिल्लीतील तरुणीवर बलात्कार करणार्‍या संशयित गुन्हेगाराला तिहाड जेलमधील कैद्यांनीच बदडून काढलं. बलात्कार हा गुन्हा, हे कृत्य अट्टल गुन्हेगारांनासुद्धा तिरस्करणीय वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे.

पण 1992-93 च्या मुंबई दंगलीमध्ये आणि गुजरातच्या दंगलींमध्ये अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले. पण हे बलात्कार करणारे कुणी अट्टल गुन्हेगार नव्हते, अथवा चवचाल, विकृत समजले जाणारे तरुण नव्हते. तर उलट धर्माभिमानी म्हणविणार्‍यांनी, काही तथाकथिक सुसंस्कृत लोकांनी, हे बलात्कार केले होते आणि तेही धर्माच्या, धर्मरक्षणाच्या नावावर बलात्कार केले होते. त्यातील काही केसेस तर काळजाचा थरकाप उडविणार्‍या आहेत. दंगली आधी ज्या घरांसोबत घरोबा होता. एका घरात शिजलेली भाजी दुसर्‍या घरात जात असे. एवढे जिव्हाळ्य़ाचे संबंध आहेत. अशा दुसर्‍या धर्माच्या घरातील स्त्रीवर ओळखीच्या पुरुषांनी बलात्कार केलेत आणि हे बलात्कार करविण्यात पुढाकार घेणार्‍या स्त्रिया आहेत. आपल्याच तरुण मुलांना रोजारणीवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देताहेत, अशा किमान दोन केसेस मला माहीत आहेत. पोलीस तपास अधिकार्‍यांच्या तोंडूनच त्या ऐकल्या आहेत.

अर्थात, याच मुंबई दंगलीत इतर धर्मातील स्त्रियांना प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविल्याची, बलात्कार वाचविल्याची व शेजारधर्म प्रखरपणे पाळल्याची अनेक उदाहरणंही मला माहीत आहेत. म्हणूनच माणुसकीवरचा विश्वास अजून कायम आहे. पण याच दंगलीच्या काळात इतर धर्मीयांवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणार्‍या नेत्याचा अत्यंत बीभत्स चेहरा सप्रमाण उघड झाला होता, हेही अत्यंत विदारक सत्य आहे.

1971-72 सालच्या बांगलादेश युद्धाच्या आधी आम्ही काही 'तरुण शांती सैनिक' बंगालमधील 'बनगाव' या बॉर्डरच्या गावी काही सेवा कार्य करीत होतो. पाकिस्तान बॉर्डर केवळ तीन-चार किलोमीटर अंतरावर होती. हजारो बंगाली पाकिस्तानी शरणार्थी भारताच्या सीमेत प्रवेश करीत होते. त्यांची व्यवस्था 'बनगाव' कॅम्पमध्ये केली जात असे. त्यामध्ये अनेक बलात्कारित स्त्रिया असत. अनेक तरुणींचे स्तन कापले असत. योनीमध्ये संगिनी खुपसल्या असत. बांगला स्त्रियांचा अपमान करणं, सूड उगवणं हे परमराष्ट्रीय धर्मकर्तव्य आहे असं समजून पाकिस्तानी मिल्ट्री हे करीत असे. पाकिस्तानी बंगाली स्त्रियांना भारतीय बॉर्डरमध्ये शिरण्याआधी सर्वासमक्ष पकडून पाकिस्तानी सैनिक बलात्कार करीत आणि बंदुका, रायफली ताणून उभ्या असलेल्या भारतीय सैनिकांना खिजविण्यासाठी, तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही असं दाखविण्यासाठी तर अधिकच चेकाळून ही कृत्य केली जात.

त्या वेळी बॉर्डरवरच्या या सैनिकांची चाललेली मानसिक उलाघाल आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. आपल्या समक्ष बलात्कार केले जाताहेत, स्तन कापले जाताहेत, संगिनी योनीत खुपसल्या जाताहेत, नग्न केलं जात आहे. केवळ काही फर्लाग अंतरावर हे संगळं घडताना दुर्बिणीशिवाय प्रत्यक्ष डोळ्य़ांनी दिसत आहे. हातात शस्त्र आहे, लढण्याची खुमखुमी आहे. पण ऑर्डर नाही म्हणून हात चोळत बसण्याशिवाय काहीही करता येत नाही. अशा अत्यंत उद्विग्न मनोवस्थेत असलेल्या सैनिकांना आम्ही पाहिलं आहे. सैनिकांचं नियंत्रण सुटून आदेशाशिवाय युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आपल्या सैनिकांची एका बाजूनं समजूत काढत असतानाच आतून मात्र संतापानं प्रचंड पेटलेले सैनिक अधिकारीही त्या वेळी जवळून पाहिले आहेत.

या सर्व परिस्थितीमुळेच त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींना पूर्व पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडलं असावं. पण पुढचं आम्हाला काही पाहता आलं नाही. युद्ध सुरू झालं. पेटलेल्या सैनिकांनी अवघ्या काही दिवसांत अख्खा पूर्व पाकिस्तान ताब्यात घेतला आणि 1 लाख पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करून स्वत:ला भारतीय सैन्याच्या हवाली केलं. जगाच्या इतिहासात यापूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा संख्येनं शस्त्रसज्ज सैनिकांनी शरणागती पत्करली नव्हती. भारतीय सैन्यानं इतिहास घडविला.

पाकिस्तानी सैनिक बॉर्डरवर बलात्कार करताना, छळताना विचार करीत नसत की, ही स्त्री कोणत्या धर्माची आहे. दोन्ही धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार करीत असत. सैनिक आणि बलात्कार हा युद्धाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. पहिल्या आणि दुसर्‍या अशा दोन्ही महायुद्धात मोठय़ा प्रमाणात स्त्रियांवर बलात्कार झाले आहेत. हिटलरच्या नाझी सैन्यानं जसे असंख्य अमानुष बलात्कार केलेत तसंच प्रमाण कमी असलं तरी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनीही बलात्कार केले आहेत.

सैनिकांच्या बलात्कारांनी तर सारा भारताचा इतिहास भरलेला आहे. शिवाजी राजांच्या उदयाच्या आधी युद्धात प्रदेश जिंकला की जिंक णारे सैनिक, सरदार सारेच त्या परिसरातील तरुण, सुंदर स्त्रियांना पकडून बलात्कार करीत असत. तेवढय़ानं मन भरलं नाही तर त्यातील विशेष सुंदर स्त्रियांना सोबत घेऊन जात आणि आपल्या नाटक शाळेत व जनानखान्यात भरती करीत असत. युद्धात जिंकण्यासोबतच पराजित परिसरातील स्त्रियांना भोगण्याचा, पळविण्याचा, बलात्कार करण्याचा अधिकारच प्राप्त होतो. असा समज आणि शिरस्ता त्या काळी होता.

आपल्या सैनिकांना असे बलात्कार करण्यास बंदी घालणारा, ही आज्ञा मोडल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्याला कडक शिक्षा करणारा पहिला राजा इतिहासानं पाहिला तो शिवाजी राजा. स्त्रियांचा सन्मान राखणारा, तो सन्मान राखलाच जाईल याची काळजी घेणारा जाणता राजा म्हणूनच अद्वितीय आहे, महान आहे.

पण शिवाजी राजा नंतर काय? काश्मीर, पंजाब, नागालंॅड वगैरे परिसरात काय घडलं? भारतीय सैनिकांवर बलात्काराचे अनेक आरोप झालेत. भारतीय कायद्यानुसार काही सैनिकांना शिक्षाही झाली.

पुरुष स्त्रीवर बलात्कार का करतो? बलात्कार करणारा पुरुष विकृत असतो का? की बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणारी मानसिकता घडविणारी परिस्थिती विकृत असते? या परिस्थितीला पुरुषप्रधान संस्कृती म्हणतात का? या संस्कारात घडलेल्या प्रत्येक पुरुषाच्या मनाच्या एका कोपर्‍यात बलात्कारी दडला आहे का? पुढे शोधू या प्रश्नांची उत्तरं.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी : 9371014832

एारळश्र- ीहूरारपर्रीùीशवळषषारळश्र.लेा

No comments:

Post a Comment